रेफरल

विमानतळावर तो सामान घेऊन बाहेर आला आणि २२ तासांच्या प्रवासाने अवघडलेलं अंग मोकळं करत त्याने इकडे-तिकडे पाहिलं. पहिल्यांदाच परदेशी प्रवास असल्याने एकदम जोरदार तयारीने आला होता तो. एक ट्य़क्सी थांबवून त्याने हातातला पत्ता वाचून दाखवला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तो ट्यक्सीवाला भारतीय होता. :-) चला बरं झालं! 'कहांसे आये भाईसाब' म्हणत ट्यक्सीवाल्याने मीटर पाडला. मग 'पहली बार आये क्या? कहा पे काम करोगे?वगैरे,वगैरे प्रश्नांची मोडक्या हिंदीत उत्तरे देत तो दिलेल्या पत्त्यावर पोचला.मग लवकरच ट्यक्सीवाल्याने आपले business card ही त्याला दिले. सांगितले तेव्हढे पैसे देऊन तो हॊटेल रूममध्ये पोचला. हॉटेल तर एकदम झक्कास होतं. 'चला, एक काम झालं' म्हणत त्याने आपलं सामान बाजूला लावून, आवरून घेतलं.
सगळ्यात महत्त्वाचं काम घरी फोन करणे. त्याच्या एका मित्राने चक्क स्वतः:हून एका Calling card ची माहिती दिली होती आणि काही मिनिटांचा talk time free पण. घरी फोन केल्यावर त्याला जर 'सेंटी' व्हायला झालं होतं, पण तो सावरला लगेचच. दुस़ऱ्या दिवशी त्याचा एक सहकारी त्याला न्यायला आला होता. 'आता कार पण घेतली पाहिजे लवकरच' असा विचार करत तो ऑफिसात पोचलाही. शाळेच्या पहिल्या दिवशी असतो ना तसा उत्साह त्याला वाटत होता. साहेबाशी भांडून व्हिसा पासून आजपर्यंतची धावपळ डोळ्यांसमोरून जात होती. पण तिकडे झाली तेव्हढीच काय ती धावपळ. इथे आल्यापासून त्याला फारसा त्रास झाला नव्हता. आज एका सहकाऱ्याने संध्याकाळी घर दाखवायला जायचेही कबूल केले होते. त्याच सहकाऱ्याने दुपारी बँकेत जाऊन एक खातेही उघडून दिले होते.
किती आटोपशीर असतात ना इथली घरं. एकदम साफ आणि उबदार एव्हढ्या थंडीतही. पण खिडक्या बंद असल्याने ताजी हवा मिळणं मुष्किल होतं. असो. फोन, इंटरनेट, वीज घरातही सगळं सामान आणायला त्याला लोकांनी बरीच मदत केली होती. आता त्याला हळूहळू इथल्या व्यवहाराची, शिस्तीची थोडी माहिती मिळू लागली होती. बाहेर गेल्यावर त्याला बरेच भारतीय लोक दिसले, भेटले, काही बोललेही.
एक दिवस तो असेच आपल्या एका मित्राशी बोलताना म्हणाला, 'मला तर इथे किती लोकांनी मदत केली, विशेषतः: माझ्या एका सहकाऱ्याने. मग लोक उगाच त्याला किंवा कुठल्याही भारतीय माणसाला नावं का ठेवतात बरं?'
त्याचा मित्र हसून म्हणाला, 'अजून नवा आहेस, वाटणारच तसं.'
त्याचा गोंधळलेला चेहरा पाहून मित्र म्हणाला, ' हे बघ, सगळेच लोक वाईट असतात असं नाही. पण मलाही खूप विचित्र अनुभव आले आहेत. आता तुझा तो सहकारीच बघ, तुला त्याने मदत केली ही गोष्ट चांगलीच आहे. पण तुला हे माहीत आहे का की ती निःस्वार्थी नव्हती.'
तो,' म्हणजे?'
मित्र,' अरे, ज्या ज्या ठिकाणी तुला तो घेऊन गेला ना तिथे त्याला 'रेफरल'(referrel) चा फायदा मिळाला. तुला त्याने हे अपार्टमेंट सुचविले ना त्यासाठी सोसायटीकडून त्याला २०० डॉलर्स मिळाले. बँकेत खाते उघडून दिले तेव्हा २५ आणि असेच काहीसे बाकी ठिकाणीही. तू जेव्हा एखादी गोष्ट चांगली आहे आणि ती विकत घ्या असे कुणाला सुचवतोस तेव्हा अनायासे त्या कंपनीचा ही फायदा होतो. त्यामुळे ते लोक असे गिफ्ट्स ठेवतात जेणेकरून त्यांची पब्लिसिटी होते आणि खपही वाढतो.' त्याला हे सर्व नवीनच होतं.
त्याला अचानक फसविल्याची भावना मनात येऊ लागली. तसं पाहिलं तर यात त्याचं काही नुकसान नव्हतं,झाला तर फायदाच होता स्वतः:चा आणि ज्याने मदत केली त्याचाही.मग वाईट वाटायचं काय कारण होतं? त्याने मनाची समजूत घातली आणि तो रुळलाही या वातावरणात. जसे जसे दिवस जाऊ लागले त्याला जाणवलं की यात चूक काय आहे ते? कुणाची मदत करतानाही स्वतः:चा फायदा पाहण्यात नाही तर नवीन माणसाकडे एक नवीन बकरा असं पाहण्यात आहे. आता तर त्याला बरेचदा अनेक दुकानातही असे अनुभव आले. एखादा माणूस त्याच्याकडे येऊन म्हणतो, अगदी प्रेमाने,"तुम्ही कुठे काम करता, किती दिवस इथे राहणार आहात? तुम्हाला मिळतो तो पगार पुरेसा आहे काय? अजून पैसे कमावायची इच्छा आहे का?" अशा प्रकारचे अनेक प्रश्न. किती जणांना उत्तर देणार? आणि किती लोकांना टाळणार?
आता समोर येणारा प्रत्येक माणूस हा फक्त काही कामासाठीच आपल्याशी बोलतोय असं त्याला वाटू लागलं. आज काल त्या टेले मार्केटिंगसाठी तर लोकांनी हैराण करून सोडलं होतं. कुणालाही घरचा पत्ता, फोन नंबर द्यायची सोय राहिली नव्हती. हळूहळू सर्वांची सवय होत जाते. आज बऱ्याच दिवसांनी मंदिरात जायचं ठरलं होतं. भारतात असताना आठवणीतही नसणारे सण लोक उत्साहाने इथे साजरे करतात.तो मंदिराच्या पायऱ्या चढला आणि तिथली स्वच्छता, शांतता सगळंच त्याला आवडलं.पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर सगळ्या प्रांतातले लोक त्याला तिथे दिसत होते. :-) मंदिरातल्या मूर्ती,प्रसाद,आरती सर्व वेगळं होतं तरीही,खूप दिवसांनी घरी आल्यासारखं वाटत होतं.
दर्शन घेतल्यानंतर पाच मिनिटेच झाली असतील एक माणूस त्याच्या शेजारी येऊन बसला. जरासं हसून म्हणाला,'कहांसे है आप? मुंबई?मराठी? अरे मै भी मुंबईमे था बहोत दिन. मराठी भी आते जरा-जरा. हम तो काफी दिनोंसे है यहा. वैसे आप क्या काम करते है..........'  पुढचे शब्द जणू त्याच्या कानात पडलेच नाहीत........
-अनामिका.