आपली बस

या संवादात बायकांवर टीका करण्याचा अजिबात हेतू नाही. एकूण सामाजिक व्यवस्थेवर मात्र आहे. गैरसमज नसावा.

सदू आणि दादू बसस्टॉपवर उभे असतात. एका जुन्या नाटकातले संवाद पुटपुटत असतात.

सदू : बस आली बस.
दादू : कुठाय बस, आपली नाही ती बस!
(तेवढ्यांत त्यांची बस येते. बसमधे चढल्यावर सदू डावीकडच्या पहिल्या सीटवर बसायला जातो.)
दादू : अरे, थांब थांब, ती सीट अपंगांसाठी आहे.
सदू : मग दुसऱ्या सीटवर बसु या का ?
दादू : नको रे, ती पण अपंगांसाठीच आहे.
सदू : अरेच्चा, एवढ्या सीट खाली असताना का नाही बसायचं ?
दादू : अरे लेका, हा आरक्षणाचा जमाना आहे. तिसरी सीट तान्ह्या बाळांना पाजणाऱ्या आयांसाठी आहे. त्या मागची बाप्यांना पाजणाऱ्या बायांसाठी!
सदू : त्वांड फोडू का ? काय बोलणं शोभतं का हे ?
दादू : उगाच चावट अर्थ काढू नकोस. बाप्यांना पाजणाऱ्या म्हणजे बारबाला. एवढ्यानं संपतय का ? त्याच्या मागच्या सीट गरोदर स्त्रियांसाठी. त्यामागच्या तरुण स्त्रियांसाठी, मग आज्यांसाठी.
सदू : म्हणजे ही "लेडीज स्पेशल" दिसतीये, चल लवकर उतरुया.
दादू : का ...ही उपयोग नाही. प्रत्येक बसमधे असंच असतंय बघ.
सदू : काही हरकत नाही. आपण उजवीकडे बसुया.
दादू : अहं, ते शक्य नाही.
सदू : का बरं ?
दादू : अरे, तिथे पण आरक्षणच!
सदू : आता ते कोणासाठी ?
दादू : पहिल्या चार सीट ज्येष्ठ नागरिकांसाठी. त्यामागल्या चार शाळेतल्या पोरांसाठी. त्या मागच्या  ..........
सदू : पुरे, पुरे, आपल्यासाठी कुठल्या रहातात ते सांग बघू.
दादू : आहेत ना आहेत, त्या शेवटल्या पांच सीट पाहिल्यास का ? सर्वांच्या झाल्यावर आपल्यासाठी तेवढ्याच उरतात. आपल्यातला जो कोणी नशीबवान असेल तो स्पीडब्रेकरवर उडून कधीतरी अपंग होईलच ना, तेंव्हा त्याची बढती एकदम डावीकडल्या पहिल्या सीटवर!
सदू : आन तोपर्यंत ??
दादू : तोपर्यंत लोंबकळायचं आपण ! नाहीतरी सामान्यांच्या कपाळी याउपर लिहिलंय काय या देशांत ?