ऐसी अक्षरे सीडॅके मेळवीन !

आजच्या ईसकाळात ही बातमी वाचली आणि लवकरच सर्व भारतीय भाषांतली संकेतस्थळे कधी ना कधी देखणी, सुंदर आणि नीटनेटकी दिसायला लागतील, हे स्वप्न सत्यात रूपांतरित होण्याची शक्यता दिसू लागली. सर्वांना विचारांची देवाणघेवाण करता यावी ह्या उद्देशाने ती बातमी येथे उतरवीत आहे.

ईसकाळातली बातमी : सी-डॅक करतेय ११ लिपींचे विविध "फॉंट'

पुणे, ता. १९ - "सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग'ने (सी-डॅक) देशातील २२ भाषांच्या ११ लिपींचे विविध प्रकारचे "फॉंट' तयार करण्याचे काम हाती घेतले असून, येत्या सहा ते आठ महिन्यांत "फॉंट'ची ही "डिझायनर सिरीज' तयार होईल. ......
एकीकडे विविध प्रकारचे "फॉंट' उपलब्ध होत असताना दुसरीकडे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा "टेक्‍नॉलॉजी डेव्हलपमेंट फॉर इंडियन लॅंग्वेजेस' हा विभाग इंग्रजी मजकुराचे भारतीय भाषांत "ऑनलाइन' भाषांतर करता येणे शक्‍य व्हावे म्हणून संशोधन करीत आहे.

भारतीय भाषांच्या लिपी संगणकावर उपलब्ध करून दिल्यानंतर "सी-डॅक'ने आता या विविध लिपी अधिक देखण्या पद्धतीने कशा मांडता येतील, यासाठी संशोधन सुरू केले आहे. अक्षरलेखनाद्वारे वेगवेगळे "फॉंट' तयार होऊ शकतात. त्याला तंत्रज्ञानाची जोड देण्याचा "सी-डॅक'चा हा प्रयत्न आहे. याच हेतूने "सी-डॅक'ने अक्षरलेखक, भाषातज्ज्ञ, सॉफ्टवेअर विकसक यांना एकत्र आणण्यासाठी दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले असून, त्याचे आज उद्‌घाटन झाले. ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, "टेक्‍नॉलॉजी डेव्हलपमेंट फॉर इंडियन लॅंग्वेजेस'चे (टीडीआयएल) वरिष्ठ संचालक एस. डी. दधीच, व्हिज्युअल डिझाईन तज्ज्ञ प्रा. आर. के. जोशी, "सी-डॅक'चे संचालक डॉ. एस. सी. पुरोहित आदी या वेळी उपस्थित होते.

श्री. दधीच म्हणाले, ""ऑनलाइन भाषांतराबरोबरच "टेक्‍स्ट टू स्पीच' सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय देशातील २२ पैकी १० भाषांतील लिपीत संगणक आज्ञावली उपलब्ध करून दिल्या आहेत. संगणक वापरकर्त्याला http://www.ildc.in/ या वेबसाइटवरून या सुविधा मोफत "डाउनलोड' करता येतील. त्यांच्या "सीडी'ही "सी-डॅक'कडे मोफत उपलब्ध आहेत. याद्वारे संगणकावर ब्राउझर, ई-मेल, ओपन ऑफिस, मेसेंजर आदी सुविधा या दहा लिपीत उपलब्ध होतात. प्रत्येक लिपी शंभराहून अधिक "फॉंट'मध्ये उपलब्ध आहे.''

या "डिझायनर सिरीज' प्रकल्पावर १२ जणांचा गट काम करीत आहेत. हा गट विविध भावना केवळ अक्षरलेखनातून व्यक्त होतील, अशाप्रकारचे "फॉंट' तयार करीत आहे. तांत्रिकदृष्ट्या अक्षरलेखनाचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी "सी-डॅक' लवकरच अक्षरलेखक, भाषातज्ज्ञ, सॉफ्टवेअर विकसक यांना एकत्र आणणारे राष्ट्रीय व्यासपीठ (नॅशनल गिल्ड) तयार करीत असल्याचेही "सी-डॅक'च्या "जिस्ट' गटाचे प्रकल्प समन्वयक महेश कुलकर्णी यांनी सांगितले.


भांडारकर संस्थेत अक्षरलेखनाचे संग्रहालय
भाषा अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी अधिकाधिक "फॉंट्‌स' विकसित करणे आवश्‍यक असल्याचे नमूद करून डॉ. भटकर म्हणाले, ""यासाठी अक्षरलेखन कला व तंत्रज्ञान यांचा समन्वय आवश्‍यक आहे. या क्षेत्रातही संशोधन व विकासाला वाव आहे. याचा प्रसार व्हावा यासाठी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत अक्षरलेखनाचे संग्रहालय करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. निधीची उपलब्धता झाली, की या कामाला सुरवात होऊ शकेल.''