एक किराणामालाची यादी

'आज-उद्या करत शेवटी जिम लावली एकदाची. आळस नाही हो, थंडी हा माणसाचा मोठा शत्रू आहे मग मी तरी काय करणार.तर आता इतक्या दिवसांनी व्यायामशाळेत आल्यावर मी धड राहिले तर नवलच.मेले हातपाय पण माझ्यासारखेच आहेत जरा काही बदल झाला की किरकिर करायला लागतात. पाठ आणि पोट तर पहिले चार दिवस ना हसू देत होते ना रडू. उठता-बसता त्या ट्रेनरला शिव्या घातल्या आणि स्वतः:लाही(नको ते उद्योग करायची सवयच आहे मला). असो. संध्याकाली ऑफिसातून परत आल्यावर कसाबसा चहा घ्यायचा आणि व्यायामाला पळायचे. मग परत येताना जी भूक लागते, कुठलाही खाद्यपदार्थ आठवून त्रास होतो. घरी पोचल्यावर इतका कंटाळा आलेला असतो की जेवण बनवणे ही अशक्य गोष्ट असते. मग सर्वात लौकर आणि कमी कष्टात जे काही बनविता येईल ते बनविण्याकडे माझा कल असतो. :-) मागच्या आठवड्यात भाजी आणायलाही वेळ मिळाला नाही, ना बाकी काही मसाले. शेवटी आज वेळ काढून भारतीय किराणामालाच्या दुकानात आम्ही गेलो. आणि......
गेल्यागेल्या तिथल्या समोशाच्या वासाने माझी भूक चाळवली गेली. :-( समोसा?....तेल, बटाटे.... क्यालरीज सगळं आठवून मी स्वतः:ला आवरलं.लगेचच माझी सामानाची खरेदी सुरू झाली. ती अशी:
१. सकाळी नाश्त्याला चहाबरोबर बिस्किटे,टोस्ट, खारी, केक रस्क. चहा, साखर तर काय लागतंच.
२. डाळी, पिठं, इ. जास्त घेऊन तसेच पडून राहतात, त्यामुळे जरा लहानच पाकिटे घ्यावी.
३. पुढचा माझा आवडता विभाग होता. तयार भाजण्या,पिठे.
इडली मिक्स, डोसा मिक्स,रवा इडली मिक्स, रवा डोसा मिक्स,खमण ढोकळा मिक्स, बरेच दिवसांत दही वडा खाल्ला नव्हता, त्यामुळे वडा मिक्स. आजकाल भजी साठी पण एक मिक्स मिळतं, ते मागच्या वेळी ट्राय केलं पण विशेष आवडलं नाही, ते cancel.
केप्रची थालीपीठ भाजणी.केप्रचीच उपवासाची भाजणी.अरे हो पाहुणे येणार असले की MTR चं पायसम मिक्स,गिट्सचं बासुंदी मिक्स.फारच कष्ट करायची इच्छा असेल तर गुलाबजाम मिक्स. :-)
४. पुढचा अतिशीत (फ्रोझन) विभाग:
दीप कंपनीचे आलू पराठे,साधे पराठे,मेथी पराठे,यावेळी 'बाजरा रोटी' ही घेतली आहे, बघू कशी लागते ती.भरलेले(स्टफड) पराठे आणि हो विसरलेच....पुरणपोळी. मागे एकदा मला वाटलं होतं की पुरणपोळी करावी पण जर २ मिनिटांत मला गरम-गरम पोळी मिळणार असेल तर मी एव्हढे कष्ट करावे का? आणि का करावे? :-)अतिशीत समोसे.काही कच्चे तर काही नुसते ओव्ह्नमधे गरम करणारे पण मिळतात. त्यांना तळायचीही गरज लागत नाही.अतिशीत ढोकळा,त्याची चटणीही सोबत असते.मांसाहारी लोकांसाठी कबाबही मिळतात. एकदा मी मोती कबाब आणले होते. काय असेल बरं ते? साबुदाण्याचे वडे. तेही बरे होते म्हणायचे.
आमचे दक्षिण भारतीय बंधू यातही मागे नाहीत बरं. या विभागातही डोसा,इडली,उत्तपम,त्यांची चटणी,सांबारही मिळते.
प्रत्येक पराठ्याची दोन-दोन पाकिटे घेतली की १-२ महीने सहज जातात. बाकी चटपटीत खाण्यातील ३-४ पाकिटे तर घेतलीच जातात.
५. अतिशीत विभागाच्या जवळच चिरलेल्या अतिशीत भाज्या मिळतात. त्यात पावटा, कारली(क्वचितच), ओलं खोबरं, शेवग्याच्या शेंगा, घेवडा या काही आपल्याकडील नेहमीच्या गोष्टी ज्या इथल्या दुकानांत मिळत नाहीत.चिरलेल्या मिक्स भाज्य़ाही भातात, सांबारमध्ये चांगल्या लागतात आणि कष्टही फार वाचतात.
६.एव्हढे सर्व होऊनही सटर-फटर खाण्याचे पदार्थे लागतातच.हल्दिरामचे आलू भुजिया,मूंगदाल,मटरी, मसालेवाले शेंगदाणे.स्वादची पाणीपुरी,भेलपुरी(यामध्ये चटणीही तयार असते),चितळ्यांचा मक्याचा चिवडा, यापैकी २-३ पाकिटे.
७. जेवतानाही नौरचे सूप आणि आठवड्यात कधीतरी लागतेच म्हणून मॅगी (देव त्यांचं भलं करो).तसे खूप साऱ्या 'रेडी टू ईट' भाज्याही मिळतात पण मला त्या आवडल्या नाहीत त्यामुळे Cancel.
८. सर्वात शेवटी मी मसाल्यांच्या विभागात जाते. सांबार मसाला, पावभाजी मसाला, किचनकिंग मसाला, बिर्याणी मसाला, परंपराचा पनीर माखनवाला मसाला, कोल्हापुरी मटन मसाला( परंपराच्या मसाल्यात तर तेल वगैरेही असते.फक्त दह्यात घालून चांगले एकजीव करायचे आणि भांड्यात टाकले की रस्सा तयार.
हे सर्व कमी आहे म्हणून की काय, मी काल मोड आलेली कडधान्ये, घरगुती इडली पीठ, पेढे, जिलबी सारखी मिठाई माझी वाट बघत असतात. :-( हुश्श.....हे सर्व घेईपर्यंत माझं बिल साधारण १०० डॉलर होतंच आणि घरी जाऊन पटकन काहीतरी खावं म्हणून मी तिथले रोज ताजे(?) बनवलेले समोसे/ढोकळे/कचोरी घेऊन घरी पळते. ही होती भारतीय किराणामालाची यादी,त्यातही काही पदार्थ राहून गेले असतील. इथल्या दुकानांत मिळणाऱ्या केक मिक्स,कुकी मिक्स,पास्ता सॉस, अतिशीत पिझ्झा याबद्दल पुन्हा कधीतरी......
मी विचार करतेय बऱ्याचवेळा अमेरिकेतले लोक काय खात असतील यावर आमची चर्चा होते. किती तयार अन्न खातात हे. काहीही घरी बनवत नाहीत असं म्हणणाऱ्या मला कोण काय म्हणेल? माझी आई मी काही सांगितले तर आता फक्त हसते. तिलाही कळलंय हिच्यासमोर डोकं फोडण्यात काही अर्थ नाही. इंटरनेटवर विविध पाककृती प्रसिद्ध करणाऱ्या माझ्या मैत्रिणींनो मला माफ करा. या सर्व तयार वस्तू मी रोजच वापरेन असं नाही पण दिवसांत कधी ना कधी एखादा का होईना पदार्थ वापरला/खाल्ला जातोच. यासर्वांतून मी किती प्रिझर्वड अन्न पोटात घालते हे मलाही माहीत नाही पण जिमला जायला वेळ मिळण्यासाठी माझा आटापिटा चालूच राहतो.
-अनामिका.