रसायन-२

आमची प्रेरणा प्रदीप कुलकर्णी यांचे रसायन

उघडी असोत दारे सगळीच दालनाची
आलीच वेळ जर का मजवर पलायनाची

जमते कुणाकुणाला, चुकते कुणाकुणाचे
पहिलीच वेळ असते प्रत्येक यौवनाची

हा चेहरा कशाने गेला सुजून माझा
गावास लागलेली चाहूल मर्दनाची

इतके समीप होते दोघे परस्परांना
लय वाढली अशाने वेगात स्पंदनाची

मी ऐकले असे की, मदमस्त नार आहे
मज वाट सापडेना त्या केतकी बनाची

नाही, नको म्हणाली लाजून नेहमी ती
एकांत ह्या ठिकाणी मग लाज का जनाची

जो बंधनात नाही कुठल्याच बांधलेला
वाटे तयास भीती सगळ्याच बंधनाची

गावास माणसे या आहेत सभ्य काही
होते म्हणून चोरी वस्तीत चंदनाची

सांगू कसे कुणाला काही मला सुचेना
मजला तहान आहे कुठल्या रसायनाची

वाचून "केशवा"ला सुचलेच काव्य पुन्हा
ही टांगसाळ आहे त्याची विडंबनाची

-केशवसुमार.