आपल्या संगणकाची सुरक्षितता भाग १

आजकाल घरोघरी संगणक येऊ लागले आहेत. त्याचा (योग्य?) वापरही वाढला आहे. परंतु त्याच्या सुरक्षिततेविषयी कोणाला फारशी माहिती नसते. "हो... एक कुठलासा Antivirus आहे, पण तो कसा वापरायचा ते माहित नाही" अश्या स्वरुपाची उत्तरे मिळतात.


व्हायरस म्हणजे काय, काय म्हणजे व्हायरस नाही, तो कसा येऊ शकतो, कसा येऊ शकत नाही वगैरे गोष्टी सर्वसामान्यपणे माहित नसतात.


गेली ६-७ वर्षे संगणक अभियंता म्हणून काम केल्यावर यातील बर्‍याच गोष्टींचे ज्ञान मला मिळाले आहे. आपला संगणक सुरक्षित कसा ठेवता येईल याबाबत ४ गोष्टी लोकांना सांगाव्यात, आपले अनुभव लोकांच्या उपयोगी पडावे म्हणून हा लेख प्रपंच...


सर्वप्रथम व्हायरस हा कसा येऊ शकतो ते पाहू.
आपण काहीच नं करता जसे आपल्या शरिरात जंतू शिरु शकतात, तसे संगणकाच्या बाबतीत होऊ शकत नाही. आपल्या संगणकावर व्हायरस शिरला तर त्याला पुर्णपणे आपणच जबाबदार असतो. आपल्या कोठल्याना कोठल्या कृतीच्या वेळीच हा प्रकार आपल्या संगणकावर येतो. आता या कुठल्या कृती?



  1. फ्लॉपी डिस्क/फ्लॅश मेमरी संगणकात घालून अथवा दुसर्‍या संगणकास आपला संगणक जोडून काही व्हायरस असलेल्या फाईल्स कॉपी करणे.

  2. एखादी अशी सीडी संगणकाच्या ड्राईव्ह मध्ये घालणे की ज्यामध्ये व्हायरस असलेल्या फाइल्स आहेत.

  3. इंटरनेट ला आपला संगणक जोडणे.

  4. संगणकावरील एखादा व्हायरस असलेला प्रोग्राम चालू करणे.

  5. इमेल मधुन आलेल्या व्हायरस असलेल्या फाईल्स आपल्या संगणकावर उतरवून घेणे.

  6. आऊटलूक वगैरे प्रकारच्या इमेल सॉफ्टवेअर मधुन एखादी व्हायरस असलेली मेल बघणे.

  7. एखाद्या ब्राऊजर मध्ये एखादी साईट बघत असताना अचानक उपटलेल्या विंडो मध्ये हो(Yes) असे क्लिक करणे.

आता आपण म्हणाल की या प्रत्येक गोष्टी करताना मला कसे कळणार की त्यात व्हायरस आहे अथवा नाही. तर आपले म्हणणे रास्त आहे. कोणालच ते माहीत नसते. म्हणून आपण काळजी घ्यायची. यापैकी प्रत्येक गोष्टीविषयी अधिक माहिती तर आपण पाहूच, पण सध्या त्वरित काय उपाय करता येतील ते पाहू.


वरीलपैकी पहिल्या ५ गोष्टींसाठी आपल्या संगणकावर एखादे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर चालू स्थितीत असणे आवश्यक आहे. सहाव्या गोष्टीस उपाय नाही. आणि सातव्या गोष्टीस उपाय म्हणजे थोडी सजगता आणि ३ सॉफ्टवेअर्स.


थोडक्यात आपल्या संगणकावर एकूण ४ सॉफ्टवेअर्स असणे, आणि १ सॉफ्टवेअर नसणे अत्यावश्यक आहे.



  • नसणे गरजेचे असलेले सॉफ्टवेअर: आऊटलूक एक्सप्रेस

  • अत्यावश्यक असलेली सॉफ्टवेअर्स: अँटीव्हायरस, पॉपप-ब्लॉकर, स्पायवेअर आणि फायरवॉल. आपल्याकडे इंटरनेट सुविधा नसल्यास पॉपप-ब्लॉकर तसेच फायरवॉल ची गरज नाही.

या पाच सॉफ्टवेअर्स बद्दल:
१. आऊटलूक एक्सप्रेस: हे शक्यतो वापरु नये. वापरणे अपरिहार्य असल्यास आपल्याला व्हायरसविषयी अधिक खोलवर ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि यामुळे आपल्या संगणकावर व्हायरस येऊ शकतो, तसेच आपल्या संगणकाची वाट लावून पुढे आपल्या मित्रांकडे, नातेवाईकांकडे जाऊही शकतो हे ध्यानात ठेवावे.
याच्या ऐवजी आपण युडोरा, पेगासस मेल इत्यादी मुक्त प्रणाली वापरू शकता.


२. अँटीव्हायरस: हे आपल्या संगणकावर असणे अत्यावश्यक आहे. नुसते असुन फायदा नाही तर ते चालू स्थितीत असणे तसेच त्याची दरवेळी निघत असलेली सुधारीत आवृत्ती आपल्याकडे असणे आवश्यक आहे. आपल्या संगणकावर व्हायरस आल्याचे तत्काळ ओळखणे, तो काढून टाकणे अशी कामे हे सॉफ्टवेअर करते. ए.व्ही.जी नामक एक मुक्त प्रणाली यासाठी आपण वापरु शकता.


३. पॉपप-ब्लॉकर: ब्राऊजरवर एखादे संकेतस्थळ पहात असताना, अचानक एखादी विंडो उघडली जाते, आणि यामध्ये अतिशय त्रासदायक जाहिराती दाखवल्या जातात. बर्‍याचदा यातून लोकांना अनावश्यक, किंवा धोकादायक अशी सॉफ्टवेअर्स उतरवुन घेण्यास प्रवृत्त केले जाते. "क्लिक करा आणि हजार डॉलर मिळवा" किंवा "फुकट कॅमेरा घ्या" अश्या आशयाच्या या जाहिराती असतात. जगात कोणही फुकट काही द्यायला बसलेले नसते, त्यामुळे अश्या जाहिराती निव्वळ खोट्या असतात. यांना पायबंद घालण्यासाठी आपण पॉपप-ब्लॉकर वापरणे आवश्यक आहे. मला माहित असणारा अतिशय चांगला तसेच उपयुक्त पॉपप-ब्लॉकर म्हणजे गुगल टूलबार.


४. स्पायवेअर: बर्‍याचदा आपल्या संगणकावर काही असे प्रोग्राम्स येतात की जे दृष्य स्वरुपात हानीकारक दिसत नसले तरीही, तुमच्या नकळत तुमची माहीती बाहेर पाठवतात. जसे की तुमचे परवलीचे शब्द. ऍडवेअर हे मला माहीत असलेले आणि या अश्या प्रकारच्या फाईल्स तुमच्या संगणकावरुन शोधून काढणारे सॉफ्टवेअर आहे.


५. फायरवॉल: सर्वात परिणामकारक, परंतु वापरावयास जरा अधिक तांत्रिक माहिती आवश्यक असलेले असे हे सॉफ्टवेअर आहे. याला तुमच्या संगणक आणि इंटरनेट यामधील "लक्ष्मणरेषा" असेही म्हणता येईल. एकदा हे तुमच्या संगणकावर चालू केले म्हणजे तुमच्या संगणकावरील कुठलाही प्रोग्राम इंटरनेटवर तुमच्या परवानगीशिवाय माहितीची देवाणघेवाण करु शकत नाही. तसेच बाहेरील (इंटरनेटवरिल) कुठलाही प्रोग्राम तुमच्या संगणकापर्यंत पोहोचू शकत नाही. मी स्वतः वापरत असलेले सीगेट फायरवॉल हे एक याच प्रकारातील सॉफ्टवेअर आहे.


अधिक माहिती आता आपण पाहू भाग २ मध्ये.


(सुरक्षित) अमित चितळे