माणसे: अरभाट आणि चिल्लर - १४

माणसे: अरभाट आणि चिल्लर - १३ पासून पुढे.

"असे होते कधी कधी." मास्तर म्हणाले. पण आज एकंदरीने ते व्यग्र दिसत होते, कारण त्यांनी खोटेच रागावून कुणालाच भोपळ्या म्हटले नाही.
"आज येताना मला एक प्रेत दिसले. ते एका मुलाचे होते; पण त्याची आई मारूतीच्या देवळापुढे उभी राहून त्या मुलाला पूर्ण आयुष्य देऊन सुखी ठेव, असे हात जोडून म्हणत मध्येच हसत होती. मला एकदम राजहंस कवितेची आठवण झाली." ते सांगत होते. वास्तविक आम्ही त्यांचे वेगळे स्वरूप पाहून गप्प बसायला हवे होते. पण आम्ही आज फसफसून झिंगल्याप्रमाणे झालो होतो की काय कुणास ठाऊक ! मी म्हटले, "त्या कवितेत सुद्दा असल्या ओळी आहेतच -

ते ह्दय कसे आईचे
मी उगाच सांगत नाही."

एवढ्यावर देखील थांबायला हरकत नव्हती. पण माझ्यात कसले तरी पिसे चढले होते आणि शेजारच्या कांदेविक्याला पाहून तर तो जास्तच वाढले. मी सूर काढला -

परांजपेच्या हॉटेलातील पुरी-पातळभाजी-
मी उगाच सांगत नाही !"

मग प्रभाकर देखील चेकाळला. तो म्हणाला,
"तानिबाईची मिरची भजी
मी उगाच सांगत नाही !"

मग इतर काही पोरांना देखील त्यातील गंमत समजली, आणि ती "मी उगाच सांगत नाही" ही ओळ एकत्र सामील झाली.
बादशाही मधला खिमा ब्रेड-
मी उगाच सांगत नाही

ब्रम्हचारी सिनेमा बघा तरी-
मी उगाच सांगत नाही

डिलाइटमधले रवा-डोसे
मी उगाच सांगत नाही...

हा वाह्यातपणा पंधरा मिनिटे चालला, व आम्ही पोटाचे चक्र होईपर्यंत खिदळलो. पण मध्येच काही तरी तुटल्यासारखे झाले, व सगळे जण गप्पगार झाले. मास्तर माझ्यापुढे येऊन उभे राहिले होते, व माझ्याकडे पाहत होते. त्यांचा चेहरा रक्त साकळल्यासारखा झाला होता, व उजवा हात किंचित थरथरत होता.मग आम्ही पूर्वी कधी न ऐकलेल्या आवाजात ते मला म्हणाले, "तुम्ही आपली पुस्तके गोळा करा, आणि वर्गातून चालते व्हा आणि मला विचारल्याखेरीज माझ्या तासाला येऊ नका."

हा आवाज, 'तुम्ही' या शब्दाचा वापर हे सारे मास्तरांचेच, यावर माझा विश्वास बसेना. पण त्यामुळे मला एकदम मुस्कुटात मारल्याप्रमाणे झाले. मी खाली मान घालून पुस्तके गोळा केली व बाहेर पडून घरी आलो. घरी करंदीकर आजोबा येऊन बसले होते. मला पाहताच "काय म्हणतो आमचा किट्टू मास्तर," असे विचारणार हे मला माहीत होते. मी तसाच घरासमोरून पुढे गेलो, व बराच वेळ पिंपळकट्टयावर बसून बऱ्याच उशीरा घरी परतलो.

त्यानंतर दोन दिवसांनी मास्तरांचा तास होता. आधीचा तास बायबलचा होता. त्या वेळी मला बऱ्याच नव्या गोष्टी ऐकायला मिळत. शिवाय चांदेकर मास्तर गाणे देखील सुरेख म्हणत असत. आज आई आजारी म्हणून तातू आला नव्हता. मी घाईघाईने पुस्तके गोळा केली, व त्याच्या घरी जावे म्हणून निघालो, तर दारातच दातार मास्तर उभे.

"काय रे. कुठे निघालास ?" त्यांनी विचारले.

"घरी. वर्गात बसू नको असे तुम्ही सांगितलेत."

"जा, फार शहाणा झालास. बाकावर जाऊन बस." आत येत ते म्हणाले व थोडे हसले

पण नंतर साऱ्या तासभर त्यांनी नजर देखील माझ्याकडे वळवली नाही. पण त्यांचे बरेचसे बोलणे माझ्यासाठीच होते. ते म्हणाले, "कित्येकदा फार मोठया कवींच्या केसांत देखील नट्टा-पट्टा उमटतो. मग निर्जीव ओळी लिहिल्या जातात, आणि त्या वाचताना मन विरजते. शेक्सपियरच्या नाटकात देखील ओळीच्या ओळी रिकाम्या गाडग्याप्रमाणे येतात. पण हिमालयाची थोरवी त्याच्या शिखरावरून ठरवावी त्यातील खोल दऱ्याभेगांवरून नव्हे. गंगेला देखील पाणउतार असतो, आणि सरस्वतीला देखील थकून जांभई येते. म्हणून राजहंससारख्या कवितेतही 'मी उगाच सांगत नाही.' असल्या ओळी येतात.

माझा ताण तटकन तुटला, व मी रागाने ओठ आवळले. जाताना देखील मास्तरांनी माझ्याकडे पाहिले नाही. त्यानंतरचा तास चुकवून मी घरी आलो. तेव्हा करंदीकर आजोबा नुकतेच पगडी टेबलावर ठेवत होते. मला पाहताच ते म्हणाले, "काय बच्चमजी, कसा आहे आमचा किट्टू मास्तर ?"

मी उसळत्या रागात त्यांना हकीकत सांगितली व म्हटले, "तुमचे किट्टू मास्तर भयंकर पार्शिआलिटी अंपायर आहेत. मी तसे म्हटले तर त्यांनी मला वर्गातून हाकलून दिले. पण आज मात्र त्यांनी स्वतःच त्या ओळीवर टीका केली. म्हणून मी नंतरचा तास चुकवून घरी आलो." त्यावर करंदीकर आजोबा इतके हसले की त्यांना खोकला आवरायला पाच मिनिटे लागली. तोपर्यंत आप्पा काळे देखील आले. त्यांनी पायरीवरूनच सिगारेट गटारात टाकली, व ते आत आले.

"मोठा खोकला उकरून काढायचे तुमचे वय संपले, भीष्माचार्य," ते म्हणाले. खरे म्हणजे आजोबा आप्पा काळ्यांपेक्षा आठदहा वर्षांनी मोठे असतील. पण ते आप्पांना नेहमी भीष्माचार्य, द्रोणाचार्य असल्या महाभारतातील नावांनीच हाक मारत. करंदीकरांनी आप्पांना सारी हकीकत सांगितली. तेवढ्यात आमचे दादा घरी आले, आणि माझे सगळेच बिंग बाहेर पडले. मग करंदीकर मला म्हणाले, "हे बघ बच्चमजी, तू काही तरी वाह्यात बोलणे, आणि किट्टूने काही म्हणणे दोन्ही सारखेच होय रे ? त्याच्यासारखे गडकऱ्यांवर प्रेम कर, आणि मग तसे बोल. तू तुकाराम आहेस का? तुझी भक्ती असेल तर विठोबाला देखील विठ्या,काळ्या म्हण की!  आणखी एक गोष्ट सांगून ठेवतो. आमचा किट्टू म्हणजे एक अरभाट माणूस आहे अरभाट !"

अरभाट हा एक अतिशय गुणी कानडी शब्द आहे. अरभाट म्हणजे खानदानी, भव्य, मोठया थाटामाटाचा. मठातील जेवण कसे होते ? अरभाट. मन्सूरांचे गाणे कसे झाले ? तर अरभाट. ऋषिकेशला गंगा कशी आहे, तर अरभाट. देवळासमोर झालेल्या नाटकातील हिरण्यकश्यपूच्या मिशा कशा होत्या, तर अरभाट. म्हणजे अगदी क्लास !

"तुला सांगून ठेवतो. तू एक गोष्ट कर. किट्टूच्या बाबतीत तू नायडू आणि गडकरी यांच्या भानगडीत पडू नकोस." माझ्या पाठीवर थाप मारत करंदीकर म्हणाले.

मग आप्पा काळे किंचित पुढे सरकले. आवाज नेहमीचाच ठेवून पण एखादे गुपित सांगण्याचा आविर्भाव आणत ते डोळे वात्रट करत म्हणाले, "त्याच्या जोडीला देविकारणी व गायत्रीदेवी यांच्याविषयी देखील एक शब्द काढू नको. काय समजले?" आणि त्यावर काळे व करंदीकर दोघेही हसले.

देविकाराणी कोण, हे त्या काळी मला काहीच माहीत नव्हते. देविकाराणी आणि जयपूरच्या गायत्रीदेवी या दोन खानदानी नावांचे जे सुगंधी निळे चांदणे आयुष्यात पसरले ते फार नंतरच्या काळात. आणि त्या वयात पसरलेल्या चांदण्याचे गंध कधी ओसरत नाहीत, की त्यांना कधी कृष्णपक्षाची बाधा होत नाही. मास्तरांचे रागावणे, त्यांनी हाकलून लावणे, त्यांनी केलेली निबंधाची, हस्ताक्षरांची स्तुती, हे सारे आयुष्याच्या वेडवाऱ्यात अस्ताव्यस्त उडून गेले. पण त्यांच्याविषयीच्या कृतज्ञतेने एक कोनाडा गाभाऱ्यासारखा होतो, तो अनुभव वेगळाच होता.