दक्षिण दिग्विजय - २

सकाळी उठून मुलाखत घेण्याच्या लोकांची यादी पक्की केली. शूटिंगच्या पहिल्या दिवशी बोस, प्रसाद, मधू अंबट आणि एक तमिळ/तेलुगू पौराणिक चित्रपट दिग्दर्शक असलेले ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व (त्यांचे नाव विसरलो. पण त्यांना छातीवर रुळणारी पांढरीधोट दाढी होती हे आठवते). मधू अंबट म्हणजे 'आदी शंकराचार्य' या जी व्ही अय्यर यांच्या संस्कृत चित्रपटाचे कॅमेरामन. ते माझ्या गुरूंना फिल्म इन्स्टिट्यूटमधे कनिष्ठ. त्यामुळे गुरूंचे नाव घेताच मधूशेट लगेच तयार झाले. आणि दुसऱ्या दिवशी बालू महेंद्रू ('सदमा'चे दिग्दर्शक), एक इंग्रजीतून लिहिणाऱ्या तमिळ चित्रपट समीक्षिका (नाव पक्के आठवत नाही, बहुधा व्ही शांता असावे) हे पक्के झाले. 'संधी मिळाली तर बघू' म्हणून रेवती या अभिनेत्रीला फोन केला. येण्याआधी फोन करा असा आशीर्वाद मिळाला.

आता उद्या शूटिंग. पडद्यामागच्या सर्व मंडळींना थोडा विसार दिला. आमचे शूटिंग करणाऱ्या कॅमेरामनसोबत बसून एकंदर कसे काम करायचे आहे याबद्दल चर्चा केली. नायरबुवांनी दिलेली प्रश्नावली परत पाहिली. कुणाला काय प्रश्न विचारायचे, वेळ जास्त जाऊ लागला तर कुठल्या प्रश्नांना कात्री लावायची, वेळ उरला तर जास्तीचे काय विचारायचे याची उजळणी केली.

त्या दिवशी संध्याकाळच्या 'बैठकी'नंतर चंद्राने आमची वरात 'Velu's military hotel' नामक उपहारगृहात नेली. हे military म्हणजे काय? तर सामिष भोजन

मिळण्याच्या ठिकाणाला तिकडे विशेषण लावण्याची प्रथा आहे असे कळले. जागा झकास होती. मेन्यूकार्ड नामक गोष्ट अस्तित्त्वात नव्हती. एक इसम हातात मोठ्या परातीत वेगवेगळे सामिष पदार्थ भरलेल्या ताटल्या घेऊन हिंडत होता. त्यातील आपल्याला पाहिजे ते उचलून घ्यायचे. जेवायला केळीचे पान. त्यावर भाताचा डोंगर रचायला आणि रसमचा वर्षाव करायला वेगळी माणसे होती.

दुसऱ्या दिवशीचा विचार करत झोपलो.

सकाळी ठरल्याप्रमाणे सुरुवात झाली. प्रसाद स्टुडिओमधल्या दोन्ही मुलाखती व्यवस्थित पार पडल्या. प्रसाद स्टुडिओचे मालक म्हणजे किमान काही कोटींचे धनी. पण सफारी घातलेला हा माणूस ज्या अदबीने आमच्याशी वागत होता ते पाहून भरून आले.

ते काम उरकल्यावर मधू अंबट यांचा नंबर होता. पण त्यांनी वेळ दिली होती दुपारची, आणि मध्ये एक तास होता. मग filler shots घ्यायला म्हणून चित्रपटांच्या भल्याथोरल्या पोस्टर्सचे, चित्रपटगृहांबाहेरच्या गर्दीचे शॉटस घेत हिंडलो.

मधू अंबट यांचे घर अगदी म्हणजे अगदीच साधे होते. तळेगावला स्टेशनजवळ यशवंतनगर, कडोलकर कॉलनी अश्या ठिकाणी असतात किंवा पुण्यात पूर्वी सहकारनगरला असत तसा एक छोटासा टुमदार बंगला. याआधीचे बोलणे फोनवरच झाले होते. प्रत्यक्ष भेटल्यावर कळाले की या गृहस्थांना पक्षाघात झालेला आहे, आणि शरीराची अर्धीच बाजू वापरून ते काम करतात. चेहऱ्यावर काही दिसू नये म्हणून त्यांनी झकास दाढी वाढवली होती, त्यामुळे फारसे काही कळून येत नव्हते. बोलताना जरा संथ बोलण्याची सवय त्यांनी लावून घेतली होती. आणि स्वतः कॅमेरामन असल्याने कुठल्या कोनातून काय कसे दिसेल याची उत्तम जाण होती. मुलाखत रंगली.

संध्याकाळ होत आली. आता पौराणिक चित्रपटकर्ते महाशय. त्यांच्या घरी पोचलो. चो रामस्वामी हे 'तुघलक' या तमिळ पत्राचे संपादक तिथे भेटले. त्यांची वेगळी ओळख म्हणजे ते तमिळ पौराणिक चित्रपटांतून नारदाची हातखंडा भूमिका करतात (आणि त्यासाठीच त्यांनी डोक्याचा कायमस्वरूपी गोटा करून घेतला आहे) हे कळले. लगेच त्यांना मुलाखतीसाठी गळ घातली, आणि लॉटरीच फुटली, ते हो म्हणाले! दुसऱ्या दिवशी सकाळी लौकर या असे सांगून ते गेले. हा माणूस फार अर्कट आणि फटकळ आहे, तो कसे काय हो म्हणाला बुवा? असा प्रश्न नंतर मला सगळ्यांनीच विचारला. ते मलाही आजतागायत कळलेले नाही.

शेवटची मुलाखत उरकली. रोजगारीवरच्या मंडळींचे पैसे चुकते केले. आणि हॉटेलवर आलो. दिवसभर झालेल्या शूटिंगच्या नोंदी ठीकठाक आहेत ना, दुसऱ्या दिवशीसाठी काय काय लागणार आहे त्याची उजळणी केली. त्रिवेंद्रमला जाण्यासाठी काहीच तयारी केली नव्हती. तिथे जायला रेल्वेचे आरक्षण मिळणे शक्य नव्हतेच. पण बसने एका रात्रीचा प्रवास करून तिथे जाता येते असा चंद्राने धीर दिला. त्रिवेंद्रमच्या गुरूबंधूबरोबर फोनवर बोललो आणि "परवा तिथे येतो" सांगितले.

त्या संध्याकाळच्या 'बैठकी'त चंद्राने रजनीकांत या अभिनेत्याचे किस्से सांगून धमाल आणली. थिरु मारन नव्हते. त्यामुळे रजनीकांतने एकदा अम्माला कसा ढोस दिला होता याची कथा उलगडली. तसेच, रजनीकांत मराठी बोलतो हे मला ठाऊक नव्हते. आमचे शूटिंग चालू होते तेव्हा 'रजनी सार' हैदराबादला शूटिंगमध्ये व्यस्त होते. नाही तर आपण सरळ जाऊन त्यांचीही मुलाखत घेऊ शकलो असतो असे चंद्राचे मत पडले. मी नुसते जाऊन मराठीत बोललो असतो की काम झाले असते हे नक्की हे त्याने परत परत बजावून सांगितले. कदाचित त्याच्या ग्लासात ओल्ड मंक आणि पाण्याचे प्रमाण उलटे झाले असावे.

सकाळी लौकर निघायचे होते. सर्व मंडळींना घेऊन येण्याची जबाबदारी चंद्रावर सोपवून मी दाढीदीक्षीताबरोबर अड्यारमधल्या 'चो सार' यांच्या घरी थेट पोचावे अशी योजना होती. त्याप्रमाणे सकाळी पावणेआठलाच आम्ही दोघे तिथे पोचलो. कॅमेरा आदि सामुग्री आठपर्यंत पोचणे अपेक्षित होते. पण काय झाले कोण जाणे, साडेआठ वाजले तरीही त्यांचा पत्ता नाही. वेळ काढून काढून किती काढणार? मी 'मुलाखतीच्या प्रश्नांची उजळणी करू या का' असे विचारले, तर 'मी प्रश्नांना थेट उत्तरे देतो, आधी उजळणी करून नाही' असे रोखठोक उत्तर आले. अखेर पावणेनऊला मंडळी पोचली.

झाले काय होते? तर मेटॅडोरची कागदपत्रे व्यवस्थित नव्हती, त्यामुळे एका वाहतूक पोलिसाने पकडून ठेवले होते. अर्ध्या तासाने चंद्राचा हॅंगओव्हर उतरला आणि त्याने 'चो सरांचे शूटिंग करायला चाललोय' असे सांगितल्यावर ताबडतोब सुटका झाली.

रामस्वामींची मुलाखत झकास झाली. फटकेबाजी म्हणजे काय ते जवळून पहिल्यांदाच बघितले. प्रश्न विचारायची खोटी, स्वामी तडफेने तुटून पडत. पण बोलण्यात दम होता, उगाच हवेतली तलवारबाजी नव्हती. त्यांना दाक्षिणात्यच नव्हे तर एकंदर भारतीय चित्रपटसृष्टीची खोलवर जाण आहे हे कळत होते.

तिथून मग बालू महेंद्रू यांच्याकडे मोर्चा वळवला. फटकेबाजी भाग २! एकंदरीत बालू महेंद्रू हे तिथल्या चित्रपटसृष्टीतले एक रंगेल व्यक्तिमत्त्व. त्यांचे चित्रपट, त्यांच्या नायिका, त्यांचे वाहन (उघडी जीप), त्यांच्या डोक्यावर कायम असलेली कमांडो टोपी, त्यांच्या तोंडातली विडी, ते मूळचे श्रीलंकेचे असल्या सगळ्या मसालेदार गोष्टी मला चंद्राने नंतर सांगितल्या.

परत रस्त्यावर filler shot घेत हिंडलो. चांदोबाचे कार्यालय (बाहेरून) बघितले. संध्याकाळ होत आली होती. आता त्या समीक्षिकाबाईंची मुलाखत ठरली होती. त्यानंतर त्रिवेंद्रमच्या बसमध्ये मला बसवून देतो असे चंद्राने आश्वासन दिले होते.

रेवती यांना फोन केला. त्या मुलाखत द्यायला तयार आहेत हे कळले! फक्त संध्याकाळी सात वाजता त्यांच्या घरी जायचे होते. म्हणजे आता त्रिवेंद्रमची बस मिळणार का? या प्रश्नाला चंद्राने तोंड भरून होकार दिला.

त्या समीक्षिकाबाई चांगल्याच उच्चभ्रू होत्या. तमिळ वळणाच्या इंग्रजीत त्या सत्यजित राय यांच्यापासून कुरोसावापर्यंतचे सगळी स्थानके घेत हिंडल्या. त्यातच सहा वाजून गेले.

रेवती यांच्याकडे जायला निघालो. त्यांचे घर एका नवीन वळणाच्या इमारतीत तिसऱ्या का चौथ्या मजल्यावर होते. खुद्द त्यांनीच दार उघडले. तरुण, उफाड्याचे, आणि तरीही मर्यादशील, शालीन सौंदर्य प्रत्यक्ष पहिल्यांदाच बघितले! पिवळ्याधमक सळसळत्या नागिणीने आब राखून दर्शन द्यावे तसे वाटले. बघितल्या बघितल्या कुठल्याही भौतिक पातळीवर न रहाता थेट 'आत'पर्यंत पोचणारे असे सौंदर्य परत एकदाच बघितले, मुंबईला वनमालाबाईंना भेटलो तेव्हा!

असो!

'फक्त दहा मिनिटेच द्या' अशी मधाळ आवाजात विनंती करून त्या साडी बदलायला आत गेल्या. तोवर आम्ही शूटिंगची तयारी सुरू केली. सुरेश मेनन हा त्यांचा पती स्वतः कॅमेरामन. पण आमच्या कॅमेरामनने लायटिंगसाठी सल्ला विचारेपर्यंत गृहस्थ मुकाट तोंडाला कुलूप घालून बसला होता.

मुलाखत झकास उतरली! ठरलेल्या दोन प्रश्नांना मी अजून तीन प्रश्न विचारून मुलाखत लांबवली. रेवती छान आणि मुद्देसूद बोलत होत्या. अखेर मुलाखत संपली. मग कॉफी घ्यायचा आग्रह! आमच्या लाईटबॉयसकट सगळ्यांना कॉफी मिळाली. गप्पाटप्पा करताना कळले की बाई सकाळी सहा ते संध्याकाळी सहा शूटिंग करून आमच्या पुढेच परतल्या होत्या! अखंड ऊर्जेचा स्त्रोतच, दुसरे काय म्हणू? इथे सकाळपासून नुसत्या तीन लोकांच्या मुलाखती घेऊन माझे भुस्कट पडले होते!

निरोपानिरोपी झाली. सुरेश मेनन यांनी त्यांचे व्हिजिटिंग कार्ड आवर्जून दिले. परत काहीही मदत लागली तर अवश्य कळवा असे पुनःपुन्हा सांगितले. अखेर बाहेर पडलो.

सर्वांचे पैसे चुकते केले. आज जास्त वेळ शूटिंग झाले असल्याने एका ऐवजी दीड शिफ्टचे पैसे लागणार होते. मग माझे बजेट कोसळलेच असते. जिवापाड वाटाघाटी करून बजेट सावरले. तोवर आठ वाजून गेले होते.

चंद्रा मला बस स्टँडवर सोडायला आला. आणि कळले की त्रिवेंद्रमला थेट जाणाऱ्या बसेस संध्याकाळी सहाच्या आतच सुटतात! आता? चंद्राने मला तिरुनलवेल्ली या गावी जाणाऱ्या बसमध्ये घुसवले. "तिथून त्रिवेंद्रमला जायला खूप बसेस आहेत" असे आश्वासनही दिले. त्याच्या आश्वासनावर आता किती विश्वास ठेवायचा हा प्रश्नच होता. पण दुसरा इलाज तरी काय होता?

व्हिडीओ कोच. कुठलातरी देमार तमिळ चित्रपट दणदणीत आवाजात ऐकत झोपायचा यत्न केला. फारसा नाही जमला. सकाळ म्हणजे तिरुनलवेल्लीला पोचायला आठ वाजून गेले. तोंड धुऊन त्रिवेंद्रमच्या बसची चौकशी करता कळले की त्रिवेंद्रमला थेट जाणाऱ्या बसेस खूपच कमी आहेत. पण नागरकॉईलला गेल्यास तिथून मिळतील. नागरकॉईलची बस पकडली. रस्त्यात भरपूर पवनचक्क्या दिसल्या.

नागरकॉईलचा स्टँड पाहून थेट अहमदनगर, संगमनेर, सिन्नर इथले स्टँड आठवले. तशीच गर्दी, तसाच बकालपणा, तसाच सार्वजनिक स्वच्छतागृहांचा दरवळ. त्रिवेंद्रमला जाणारी बस उभीच होती. आणि खच्चून भरली होती. पण माझ्या रडवेल्या चेहऱ्याने आणि इंग्रजीमधल्या चौकशीने तिथला एक माणूस द्रवला बहुतेक. त्याने मला थेट ड्रायव्हरच्या हौद्यामध्येच स्थानापन्न केले! मूळचा कोंकणातला असल्याने, आणि एष्टीत बरेच गणगोत असल्याने असा प्रवास नवीन नव्हताच. ड्रायव्हरही कोंकणाची आठवण करून देणारा निघाला. कोंकण रेल्वे आत्ता-आत्ताची. त्याआधी बस हेच एक साधन असल्याने ड्रायव्हर मंडळी चांगलाच आब राखून असत. ती लेलँड आणि टाटाची कालबाह्य धुडे हाकताना त्यांचा एकंदर आविर्भाव आपण जगाचा गाडाच हाकतो आहोत असा असे. हे ड्रायव्हरबुवाही तसेच होते.

त्या हौद्यात मी एकटाच नव्हतो. दुसरा एक शर्ट-पँटवाला होता. (मागे सगळे मुंडू-साम्राज्य पसरले होते). त्याच्याशी गप्पा मारताना तो SAI (Sports Authority of India) येथून प्रशिक्षण घेऊन आलेला क्रिकेट कोच होता आणि केरळ राज्य सरकारच्या नोकरीत होता हे कळले. मी लगेच 'रन-अप किती पावलांचा असावा हे कसे ठरवावे' आणि 'हूकचा फटका मारताना नजर कुठे असायला हवी' या आणि अशा शंकांचे निरसन करून घेतले. बॅटरी-बॉक्सवर बसल्या बसल्या जमेल तेवढी हालचाल करून त्याने समजावून सांगितले.

मग मी वाचायला म्हणून सॉमरसेट मॉमचे पुस्तक (South Sea Stories) काढले, तर ते बघून कंडक्टर आला आणि गप्पा मारू लागला. त्याने इंग्रजी साहित्यात एम ए केले आहे हे कळले.

त्रिवेंद्रमला पोचेपर्यंत टळटळीत दुपार झालेली होती. हॉटेलवर पोचतो तोच तिथला गुरूबंधू राजा हजर झाला. त्याने दुसऱ्या दिवसासाठीच्या शूटिंगची सामग्री, माणसे यांची जुळवाजुळव करून ठेवलेली होती. मग मी मुलाखती ज्यांच्या ज्यांच्या घ्यायच्या त्यांच्यामागे लागलो. 'पिरावी'प्रसिद्ध कॅमेरामन-दिग्दर्शक शाजी एन करुण आमच्या गुरूंना फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये दोन वर्ष ज्येष्ठ. त्यांनी पत्रातून वेळ दिलेली होती. संतोष सिवन हा आमच्या गुरूंचा कनिष्ठ, त्यामुळे त्याला हक्कानेच फोन केला. त्याने गोपी या प्रसिद्ध नटाकडे आमची रदबदली केली. आणि करुण यांनी के जी जॉर्ज यांची वेळ जुळवली.

त्रिवेंद्रमला आल्यावर अगदी राजापूरला आल्यासारखे वाटले. तशीच माती, तसेच माड, तसाच दमटपणा आणि तशाच मंद वाऱ्याच्या लहरी. रस्तेही सापासारखे वाकडे, आणि सारखे चढ-उताराचे.

दुसऱ्या दिवशी सकाळी लौकर संतोष सिवन यांच्या पासून सुरुवात केली. 'रोजा'मधल्या 'रुक्मिणी रुक्मिणी' या गाण्याकरता प्रकाशयोजना कशी केली या प्रश्नावर साहेबांची कळी जी खुलली ती सगळ्याच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देईपर्यंत मिटली नाही. मुलाखत सिवन यांच्या घराच्या मागच्या बॅडमिंटन कोर्टवर झाली. त्याला सर्व बाजूंनी लवलवत्या नारळाच्या झाडांच्या भिंती होत्या.

तिथून करुण यांचे घर गाठले. हे घर तर मधू अंबट यांच्या घरापेक्षा साधे आणि छोटे होते. इतके, की त्यांच्या दिवाणखान्यात शूटिंगसाठी दोन लाईटस ठेवल्यावर जेमतेम दोन माणसांना बसायची जागा उरली!

तिथून गोपी यांच्या मोठ्या घराकडे. सगळे कसे चटाचट उरकत होते. मद्राससारखीच, किंबहुना त्याहून जास्त शिस्त. आणि त्रिवेंद्रम म्हणजे मद्रासच्या एका कोपऱ्यात मावेल इतके. के जी जॉर्ज या ज्येष्ठ दिग्दर्शकांची मुलाखत संपली तेव्हा जेमतेम एक वाजला होता!

कॅमेरा तर संपूर्ण शिफ्टकरता घेतलेला. ते पैसे कशाला वाया घालवा? म्हणून त्रिवेंद्रमचे फिल्म आर्काईव्हज, सिनेमागृहे असे filler shots घेत बसावे असा बेत करत होतो तोच जॉर्जसाहेबांनी विचारले, "आता कुणाची मुलाखत घेणारात"? आम्ही नन्नाचा पाढा वाचल्यावर त्यांनी बॉंबच टाकला, "मम्मूटीची का नाही घेत?". मम्मूटी म्हणजे दोन मल्याळी सुपरस्टारपैकी एक. आम्हाला त्याच्यापर्यंत कोण पोचवणार? जॉर्जनी शंकानिरसन लगेच केले. "मी सांगतो त्याला. आता दोन वाजता आमचा 'अम्मा'चा (त्या 'अम्मा' नव्हेत; Association of Malyalam Movie Artists) एक कार्यक्रम आहे. तिथे तो येईलच. मीही तिथे जाणार आहे. तिथे आलात तर गाठ घालून देईन". मी शिट्टी वाजवायचेच बाकी ठेवले!

पटकन लाल तांदळाचा भात पोटात ढकलला आणि 'अम्मा'च्या कार्यक्रमस्थळी पोचलो. लगीनघाई चालू होती. मोठा मंडप घातलेला होता. त्यात अनेक मंडळी इकडून तिकडे करीत होती. कुठे भाषणे चालू होती. काही मंडळी खुर्च्या मांडून घोळामेळाने बसली होती. त्यात जॉर्जबुवा सापडले एकदाचे. त्यांनी तत्परतेने मम्मूटीला हाक मारली. मम्मूटी आज्ञाधारक मुलासारखा समोर आला. (त्यांना चित्रपटात पहिल्यांदा संधी जॉर्जनी दिली होती, आधी ते (मम्मूटी) वकीली करत होते हे नंतर कळले). "हे पुण्याहून आलेत, त्यांना मदत कर" असा आदेश सुटला.

"एक दोन मिनिटे" अशी टाईम-प्लीज घालून सुपरस्टारसाहेब विडी ओढू लागले. तोवर कॅमेरामन फ्रेम लावायला लागला. मम्मूटींनी प्रश्न काय आहेत, कॅमेऱ्याची फ्रेम काय आहे आदि विचारून घेतले आणि विडी संपताच पटापट बोलायला सुरुवात केली. त्यांनी एकंदर आमच्या टेलिफिल्मविषयी सगळे विचारून घेतले होते. त्यामुळे माझे प्रश्न संपताच त्यांनी स्वतःलाच अजून प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरेही कॅमेऱ्यासमोर दिली. सेन्सॉरशिप असावी का या मुद्द्यावर त्यांनी "who will censor whom?" अशी गर्जना केली.

मुलाखत संपली. शिफ्टची वेळही संपत आली होती. तेवढ्यात राजाने मला ढोसले - "तो बघ मोहनलाल". दुसरा मल्याळी सुपरस्टार! माझा हावरटपणा जागृत झाला. परत जॉर्जसाहेबांना कौल लावला. त्यांनी मोहनलालना हाक मारली. दोन्ही मल्याळी सुपरस्टार्सच्या मुलाखती, त्याही आधी न ठरवता! मला मी तरंगत असल्याचा भास होऊ लागला.

पण मोहनलाल यांच्याबरोबर बोलणी करत असताना घात झाला! समोरून मम्मूटी आले! एका सुपरस्टारसमोर सोडाच, एका अर्ध-स्टारसमोर दुसऱ्या पाव-स्टारला आणल्यावर कशा ठिणग्या उडू शकतात याच्या अनेक कथा मुंबईत ऐकल्या होत्या. आता मेलो! आपली मुलाखत ही exclusive अशी नाही म्हटल्यावर मम्मूटी बहुधा मुलाखत erase करायला लावणार.....

प्रत्यक्षात मम्मूटींनी दणका दिला. खराखुरा. मोहनलाल यांच्या पाठीत. आणि वर सांगितले, "अरे देऊन टाक मुलाखत, एवढ्या लांबून आलेत हे... मीपण दिली आहे" आणि डोळे मिचकावीत ते गेले.

मम्मूटी यांच्या संयत शरीरबोलीच्या मानाने मोहनलाल खूपच चळवळे होते. बोलताना त्यांनी उड्या मारल्या नाहीत एवढेच काय ते.

अखेर खरोखरचा घात झाला! कॅसेट संपल्या! आधीच्या शूटिंग केलेल्या कॅसेट काढून त्यात शेवटी कुठे मिनिट-दोन मिनिट जागा मिळते काय पाहून मोहनलाल यांची मुलाखत तुकड्यातुकड्यात घेतली. त्यांनी अजिबात खळखळ न करता एक उत्तर कंटीन्यूइटी झकास सांभाळत चार तुकड्यांत दिले.

त्या रात्रीची (३१ डिसेंबरच्या) पार्टी एका वेगळ्याच धुंदीत झाली! पण त्याबद्दल नंतर केव्हातरी...