आझाद हिंद सेना १२ - "चलो दिल्ली" आणि राणी लक्ष्मी पलटण

senapatiराशबाबूंनी आझाद हिंद संघटनेची सूत्रे नेताजींच्या हाती सोपवली व आपण केवळ सल्लागार म्हणून काम पाहण्याची इच्छा व्यक्त केली. एखाद्या महान तपस्व्याने लाजावे इतक्या सहजतेने राशबाबूंनी दोन तपे रक्ताचे पाणी करून उभी केलेली स्वातंत्र्य चळवळ आणि आपले सर्व निष्ठावंत कार्यकर्ते नेताजींच्या हाती स्वाधीन केले. कसलाही अहंकार न बाळगता, कसलीही आसक्ती न धरता आणि मोह न बाळगता केवळ आपले वय, आयुष्यभर खस्ता खाऊन ढासळणारी प्रकृती हे आता आपल्याला नेता म्हणून योग्य ठरवीत नाहीत तेव्हा नेताजींच्या रूपाने आज योग्य नेतृत्व उभे राहत आहे त्याच्या हाती आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाची सूत्रे सोपविण्यातच आपले व देशाचे हित आहे हे ओळखून व मान्य करून त्या क्रांतिकारकांच्या भीष्माचार्याने एक नवा आदर्श निर्माण केला, विशेषतः: शरीर व बुद्धी साथ देत नसतानाही बांडगुळाप्रमाणे सत्तेला चिकटून राहणाऱ्या नेत्यांना जे भावी काळात बोकाळणार होते.

पडांगवरील मानवंदना

sgp salamiJPG sgp salami2 ५ जुलै रोजी नेताजी प्रथमच सर्वोच्च नेता म्हणून आझाद हिंद सेनेचा पाहणी करणार होते व मानवंदना स्वीकारणार होते. सकाळपासूनच सिंगापूरच्या पडांग भागात गर्दी जमू लागली. पडांग समोरील महापालिकेच्या नगर सभागराच्या (टाऊन हॉल) दर्शनी भागात आझाद हिंद संघटनेच्या स्वयंसेवकांनी मांडव घालून व्यासपीठ उभारले होते. पुढील हिरवळीवर आझाद हिंद सेनेचे वीर नेताजींना सलामी देण्यासाठी सज्ज झाले होते. दहा वाजता नेताजी आणि राशबाबू मंचावर येताच लष्करी वाद्ये वाजू लागली. हिंदी शिपायांनी आजवर अनेक इंग्रज व जपानी सेनापती व अधिकारी बघितलेले होते, मात्र हिंदी सेनापती पाहण्याचा हा त्यांच्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग! लष्करी पोषाखातले नेताजी ते भान हरपून पाहत राहिले. आज नव्या चैतन्याने झपाटलेले हिंदी लष्कर आपल्या हिंदी सेनापतीला सलामी देणार होते. सलामीचा भव्य सोहळा पार पडला आणि टाळ्यांच्या कडकडाटात नेताजींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. भारलेल्या आवाजात नेताजींनी बोलायला सुरुवात केली. आपल्या लष्कराची पहिली सलामी घेताना आपले ऐतिहासिक स्वप्न पुरे होत सल्ल्याचे कृतकृत्य भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. त्या दिवशी प्रथमच आझाद हिंद सेनेची अधिकृत घोषणा करण्यात आली. आतापर्यंत कुठेही, कधीही आझाद हिंद सेनेचा जाहीर उच्चार वा उदघोषणा करण्यात आले नव्हते, आज एक तेजस्वी पर्व जगासमोर साकारत होते.

5 julai

(वरील चित्र)पडांग वरील सेना, टाऊन हॉलची पार्श्वभूमी. (खाली) आजचे चित्र

sgp t hall1आपल्या भाषणात या ऐतिहासिक क्षणी आपल्या सैन्याचे अभिनंदन करताना नेताजी म्हणाले की आज या सैनिकांनी एक स्वप्न  साकारले आहे, आता असेच पुढे जायचे आहे, शत्रूला मारून आपल्या राजधानीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकेपर्यंत ही वाटचाल सुरू राहणार आहे. आता लक्ष्य आहे ते एकच - दिल्ली. फ्रान्सने जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित करताच त्वेषाने उठलेल्या प्रत्येक जर्मन सैनिकाच्या ओठी एकच वाक्य होते - चला पॅरिसवर. १९४१ साली सिंगापूरच्या रोखाने सुटलेल्या जपानी सैन्याच्या तोंडी एकच घोषणा होती, चला सिंगापूरला! माझ्या शूरवीरांनो, यापुढे प्रत्येक हिंदुस्थानी वीराच्या तोंडी एकच जयघोष असेल - ’चलो दिल्ली’! उत्तेजित झालेल्या लाखो कंठातून गगनभेदी प्रतिध्वनी उमटला - चलो दिल्ली! आकाशातून पावसाच्या सरी कोसळू लागल्या तरी समोरचा लक्षावधी हिंदुस्थानी लोकांचा समुदाय तसूभरही विचलित न होता जीवाचे कान करून आपल्या नेत्याचे शब्द ऐकत होता. नेताजी करारी आवाजात बोलू लागले. "बंधूंनो, स्वातंत्र्याच्या अभिलाषेने निर्माण झालेल्या सैन्यात सहभागी होण्याची संधी मिळावी याहून अधिक भाग्य गुलामांच असूच शकत नाही. माझ्या सैनिकांनो, आपल्याला केवळ देश स्वतंत्र करून थांबायचे नाही तर स्वतंत्र देशाचे संरक्षण करणारी एक बलाढ्य सेना उभारायची आहे. आपल्या भावी स्वतंत्र राष्ट्राचा असा भक्कम पाया रचायचा आहे की एखाद्या चिऱ्याला नुसतं बोट लावायचे धाडस भविष्यात कुणीही करायला धजावणार नाही. जे इंग्रज कालपर्यंत उद्दामपणे बढाया मारीत होते की याच्या राज्यावरचा सूर्य कधी मावळतच नाही, तेच इंग्रज आज आपले सिंगापूर सोडून सैरावैरा पळाले आहेत. आणि ही किमया आहे बलशाली लष्कराची.  जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेच्या स्वातंत्र्यासाठी झटू शकला ते सैन्यबळावरच. गॅरिबाल्डी इटलीच्या एकीकरणाच्या कारणास्तव झुंजला तेव्हा त्याची सेना त्याच्या पाठीशी उभी होती. मात्र माझ्या बलाढ्य, अवाढव्य अशा महान देशाचे संरक्षण करायला स्वतः:ची फौज नाही ही एकच खंत माझ्या उरात आजपर्यंत सलत होती. आज तुम्ही ती दूर केली आहेत, स्वातंत्र्याच्या मार्गातील एकमेव अडसर आज तुम्ही दूर केला आहेत, आज तुम्ही एका नव्या ऐतिहासिक सत्याला जन्म दिला आहेत. ते तेजस्वी शब्द ऐकताना राशबिहारींच्या डोळ्यात वारंवार अश्रू दाटत होते. " माझ्या बंधूंनो, आज मी तुम्हाला काय देऊ शकतो? तर केवळ तहान, भूक, खडतर आगेकूच आणि मृत्यू. बस. दुसरे देण्यासारखे काहीही नाही. परंतु माझ्या साथीदारांनो, खात्री बाळगा या भयाण पर्वातल्या हाल अपेष्टांत, अंध:कारात, द:खात आणि सुखात, मंगलक्षणी अशा प्रत्येक क्षणाला मी मरेपर्यंत तुमच्या सोबत असेन. तुम्हीही जर या मृत्यूच्या छायेत माझी साथ द्याल तर मी एक दिवस तुम्हाला स्वातंत्र्याच्या आणि वैभवाच्या राजमार्गावर नक्की नेईन. या प्रवासात किती जण अंतर पार करतील ते माहीत नाही, पण जे कोणी दिल्लीत पोचतील ते हिंदुस्थानच्या हुताम्यांच्या रक्ताने रंगलेला तिरंगा लाल किल्ल्यावरचा परकीयांचा युनियन जॅक उपटून त्याच्या जागी फडकावतील. सबसे बुलंद रहेगा, तिरंगा हमारा. आता उठा, करायची वेळ आली आहे, आपल्या सर्वस्वावर पाणी सोडा आणि देशासाठी उध्वस्त व्हायला सज्ज व्हा, ’करो सब निछावर, बनो सब फकीर’. जय हिंद! आजपर्यंत अनेक हिंदी सैनिक हे शरणागताचे जीवन जगण्यापेक्षा बरे म्हणून आझाद हिंद सेनेत आले होते. अनेकांना तुरुंगातल्या हाल अपेष्टा चुकवायचा हा मार्ग सापडला होता. अनेक जण तरीही सामील होत नव्हते. खाल्ल्या मिठाला जागायची इमानी संस्कृती त्यांना आपल्या धन्याविरुद्ध लढायचा कौल देत नव्हती. मात्र नेताजींच्या त्या शब्दांनी जादू केली आणि असंख्य सैनिक स्वेच्छेने सहभागी झाले. ज्याच्या चार पिढ्या साहेब चाकरीत इमानाने राबल्या आणि जो स्वतः: राशबिहारी-नेताजींवर विश्वास ठेवायला तयार नव्हता तो शानो - शाहनवाज खान त्या दिवशी नेताजींचा गुलाम झाला आणि सेनेचे नेतृत्व करायला सरसावला.INA tops 2

हबीबूर रेहमान, मनसुखलाल, गुलाम मेहबूब, जानकी दावर, जॉन थीवी, नारायण करुपय्या (वरील ओळ)_

गुरुबक्षसिंग धिल्लन, शाहनवाझ खान, प्रेम सहगल, बॅ. यल्लाप्पा, झमन कियाणी, डॉ. लक्ष्मी(खालची ओळ)

INA tops

याच पडांगवर ९ जुलैला नेताजींनी नवा इतिहास घडवला. त्या दिवशीच्या भाषणात नेताजींनी श्रोत्यांना इंग्लंडहून परत आल्या दिवसापासूनचा जीवनप्रवास ऐकविला व त्यांनी आवाहन केले की ’मला फक्त तीन लाख सैन्य आणि तीन कोटी डॉलर्स हवेत, आपल्या सेना बाहेरून आणि चाळीस कोटी हिंदुस्थानी देशातून हल्ला करतील आणि इंग्रज साम्राज्य खाक होईल व त्या राखेतून नवा स्वतंत्र हिंदुस्थान साकारेल. याच भाषणात नेताजींनी आवाहन केले, की त्यांना १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात तेजाने तळपलेल्या राणी लक्ष्मीबाईचा वारसा चालविणारी एक केवळ महिलांची पलटण उभारायची त्यांची आत्यंतिक इच्छा आहे. स्त्री हा लोकसंख्येचा अर्धा भाग असला तरीही तिला काय मान मिळतो? समता, विकास व सन्मान यासाठी आता स्त्रियांनी या संग्रामात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढायची वेळ आली आहे. जर देशाच्या भाग्यलक्ष्मी हाती शस्त्र घेऊन रणांगणात उतरतील तर स्वातंत्र्य मिळाल्या खेरीज राहणार नाही. आजपर्यंत जगाच्या इतिहासात असा एकही दाखला नव्हता. सारेजण चकित होऊन ऐकत होते. नेताजींचा एकच सवाल होता, आहे अशी कुणी तेजस्विनी जी मला माझ्या देशासाठी अशी पलटण उभारून देईल?

capt laxmiदुसऱ्याच दिवशी सिंगापुरातले जुने नागरिक व आझाद हिंदच्या कोषागाराची जबाबदारी शिरावर घेतलेले बॅ. यल्लापा नेताजींना भेटायला आले ते अशी तेजस्विनी घेऊनच! मलायातील सर्वात सुंदर स्त्री व एक सेवाभावी डॉक्टर म्हणून महिला वर्गात प्रसिद्ध असलेली मद्रासच्या एस. स्वामिनाथन यांची मलायात येऊन राहिलेली कन्या डॉ. लक्ष्मी. स्वतः: डॉ. लक्ष्मी या साशंक होत्या की मला हे काम कितपत जमेल? मला साथ द्यायला किती मुली पुढे येतील? मात्र मनाचा निर्धार आणि नेताजींवर अपार श्रद्धा असलेल्या डॉ. लक्ष्मी यांनी हे आव्हान स्वीकारले. पहिल्या पाच दिवसात वणवण मात्र झाली, हाती काहीही लागले नाही. मात्र निर्धार कायम होता. अखेर अवघ्या वीस स्त्रियांना घेऊन आठ दिवसांच्या कठोर परिश्रमानंतर व खडतर प्रशिक्षणानंतर डॉ. लक्ष्मींनी आपल्या त्या छोट्याश्या तुकडीसह नेताजींना सलामी दिली आणि आश्चर्याचा धक्का दिला. साऱ्या जगाला एक नवा इतिहास पाहायला मिळाला. मळके, फाटके गणवेश व जुनीपुराणी हत्यारे देणाऱ्या कर्मठ जपानी सेनाधिकाऱ्यांच्या मान लाजेने खाली गेल्या. ताबडतोब महिला पलटणीला उत्तम नवे गणवेश व युद्धसाहित्य पुरविण्याचे हुकूम सुटले. या वीरांगनांच्या सलामीला उत्तर देताना नेताजी म्हणाले की " तुम्ही किती बंदुका पेलू शकता, किती फैरी झाडू शकता हा मुद्दा नाही तर तुमचा हा पराक्रम नव्या दैवी शक्तीला जन्म देईल. तुमचा हा रुद्रावतार पाहून तुमचे निद्रिस्त बांधव खडबडून जागे होतील व रणांगणाकडे धाव घेतील. तुम्ही नव्या युगाच्या स्फुर्तिदेवता ठराल. हिंदुस्थानच्या व जगाच्या इतिहासात तुमचे नाव तुम्ही आज सुवर्णाक्षरात लिहिले आहेतRLX1

ध्येयाने झपाटलेल्या डॉ. लक्ष्मींनी अहोरात्र मेहेनत करून हे स्वप्न साकारले. राणी लक्ष्मी पलटणीतील प्रत्येक स्त्री ही नेताजींना आपल्या मुलीसारखी होती. त्यांचे प्रशिक्षण नेताजींनी जातीने हाती घेतले. प्रशिक्षकाची निवड नेताजींनी जातीने केली ती प्रशिक्षकाच्या कर्तृत्वाबरोबरच त्याचे चारित्र्य पारखूनच. आपली महिला सेना ही शोभेची वा दिखाव्याची वस्तू न ठरता साऱ्या जगाला दिपवणारी पराक्रमी तुकडी असावा असा नेताजींचा कटाक्ष होता. या वीरांगना जिद्दीने पेटून मैदानात उतरल्या. zashi_rani_salami  > त्यांनी पुरूष शिपायांच्या तोडीस तोड मेहेनत करून, दिवसाला आठ आठ तास कवायत करून आपले सामर्थ्य सिद्ध केले. याच तुकडीतील महिलांनी खडतर असे गनिमीयुद्धतंत्राचे प्रशिक्षणही घेतले. बघता बघता अवघ्या तीन महिन्यांत पूर्णतः: १२०० महिला सैनिक असलेली राणी लक्ष्मी पलटण व २०० परिचारिकांची चांदबीबी तुकडी सज्ज झाली. ब्रह्मदेशात याच तुकडीच्या महिला सैनिक ब्रिटिश सेनेशी लढल्या. जेव्हा माघार घेण्याची परिस्थिती आली तेव्हा जपानी लष्कराने नेताजींना तात्काळ विमानाने परत फिरण्याचा आग्रह धरला. मात्र जोपर्यंत शेवटची सैनिक आपल्या घरी पोचत नाहीत तोपर्यंत मी zashi_rani_prashikshanत्यांच्या बरोबर असेन असे नेताजींनी ठणकावून सांगितले. या मुली त्यांच्या आई-वडिलांनी माझ्या भरवशावर धाडल्या असून त्यांचे रक्षण हे आपले परम कर्तव्य आहे असे नेताजींनी सांगितले. पुढे ब्रह्मदेश इंग्रजांच्या ताब्यात पडला तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी राणी लक्ष्मी तुकडीच्या महिला शोधून काढत त्यांना अनेक आमिषे दाखविली व अनेक प्रकारे खोदून खोदुन प्रश्न विचारून असे सिद्ध करायचा अत्यंत गलिच्छ प्रयत्न केला की या महिलांना जबरदस्तीने भरती केले गेले आहे. मात्र इंग्रजांना या वीरांगनांची खरी ओळख पटायची होती. जेव्हा जेव्हा इंग्रज अधिकारी चौकशीचा प्रयत्न करायचे तेव्हा या महिला ’आझाद हिंद झिंदाबाद’, ’नेताजी झिंदाबाद’, ’जय हिंद’ च्या घोषणा देत त्यांच्या एकाही प्रश्नाला उत्तर न देता उलट त्यांनाच सांगायच्या की आम्हाला सुद्धा युद्धकैदी म्हणून हिंदुस्थानात न्या आणि आमच्यावर खटला भरा! थक्क झालेल्या इंग्रज अधिकाऱ्यांना अखेर आझाद हिंद सेनेला बदनाम करायचा आपला नीच प्रयत्न सोडून द्यावा लागला.

धन्य ते नेताजी आणि धन्य त्या राणी लक्ष्मी पलटणीतल्या वीरांगना.