ह्यासोबत
वळणावळणाच्या चिरेबंदी पायऱ्यांनी वेढून टाकलेला तो कडा ताठ मानेने उभा होता. त्या पायऱ्या त्याला बंदिस्त करणाऱ्या साखळदंडाप्रमाणे भक्कम दिसत नसून गळ्यातल्या आभूषणासारख्या किरकोळ दिसत होत्या. पायऱ्यांचे चिरे जर्द लाल रंगाचे होते. चुन्यागुळाच्या मिश्रणाने काही शतके ते चिरे सांधलेले राहिले होते. वळणावळणावर करवंदीच्या जाळी पसरल्या होत्या. फक्त शेवटचा टप्पा तेवढा मधूनच तांबारलेल्या बोडक्या काळ्या दगडाचा होता. पायऱ्या चढताना मावळतीकडे तोंड असेल तर कोस-दोन कोसांवर करड्या चांदीसारखा चमचमणारा समुद्र नजरेत भरे. आणि उगवतीकडे तोंड केले तर या कड्याचा पणजोबा शोभेल असा एक अजस्र कडा मायेने या सगळ्यावर राखण करताना दिसे.
पायऱ्या चढून तो वर आला तेव्हा त्याचा तांबूस चेहरा लोहाराच्या भट्टीतल्या इंगळासारखा रसरसला होता. श्वास जलद झाला होता. सगळ्या चेहऱ्यावर घामाचे मोती डवरले होते.
खांद्यावरचे फडके झटकून त्याने आपला चेहरा चांगला पुसून घेतला. एक दीर्घ श्वास घेऊन सोडताना त्याच्या ध्यानात आले, की शेवटच्या पायरीपासून दहा हात अंतरावर एक घोटा बुडेल एवढा दगडी खळगा आहे, आणि त्यातून पाणी उमळून वाहत आहे. झपाट्याने पुढे जाऊन त्याने त्या पाण्यात ओंजळ बुडवली, आणि चटकन हात मागे घेतला. पाणी उकळत नव्हते एवढेच. पण पुरचुंडीत बांधून जर त्यात तांदूळ टाकले असते तर बोटचेपा भात झाला असता हे निश्चित.
सुस्कारा सोडून त्याने समोर बघितले. कड्याचा वरचा भाग एखाद्या माळासारखा सपाट होता. मावळतीला उजवीकडे ठेवून तो लंबगोलाकार माळ समुद्राला समांतर पसरला होता. माळावर काजूची आणि रातांब्याची झाडे मधूनच घोळके करून उभी होती. मुरमाड लाल जमीन सगळीकडे नजरेला तापवत होती.
'हूं' म्हणून पाण्याच्या खळग्यापाशी उकिडवा बसलेला तो उभा झाला. आणि तडफेने पावले टाकत चालू लागला. सूर्य आता जवळजवळ माथ्यावर आला होता. त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. पण काजूची अर्धपिकी बोंडे आणि रातांब्याची लुसलुशीत आंबटसर पाने चावून घशाला ओलावा देत तो चालतच राहिला. मध्येच एखादे बोंड तुरट निघे आणि घशाला तोठरा बसे. आणि रातांब्याची पाने चावून चावून शेवटी दात करकरू लागले.
पण तो चालतच राहिला. विस्तीर्ण माळावर मध्येच उमटलेल्या त्या मोठ्या विवरापाशी तो आला तेव्हा सूर्य माथ्यावरून ढळला होता.
ते विवर चांगलेच प्रशस्त होते. मोठ्या परातीच्या आकाराच्या त्या विवराकडेने खाली जाण्यासाठी पायऱ्या कोरल्या होत्या. आणि खाली गेल्यावर अंधाऱ्या दगडी ओसऱ्यांतून फिरत गेलेली भुलभुलैया वाट उन्हाचा तडाखा पार नाहीसा करून टाकत होती. काही ओसऱ्या ओलांडल्यावर तर त्याला थंडी वाजल्यासारखी भावना होऊ लागली.
अखेर त्या मोठ्या कोरीव घुमटाच्या गुहेसमोर तो आला. समोरच पुरुषभर उंचीचे पाण्याचे कुंड भरभरून वाहत होते. आधीच्या अनुभवाने शहाणा झालेल्या त्याने सावधपणे त्या पाण्यात बोट बुडवून बघितले. आणि त्या पाण्याच्या बर्फाळ थंडाव्याने त्याच्या डोक्यापर्यंत शिळीक गेली.
हट्टाने त्याने त्या कुंडात डुबकी मारली. बधिरलेल्या देहाने तो बाहेर आला. आणि तसाच निथळत्या अंगाने त्या गुहेत तो शिरला.
आतमध्ये मिट्ट अंधार होता. पण एक पणती मिणमिणत काळोखाला पिवळसर तीट लावत होती.
अंधाराला डोळे सरावल्यावर त्याने आजूबाजूला बघितले. समोर खोल गाभारा होता. त्यात समूर्त की अमूर्त या वादाला तिलांजली द्यायला बसलेला एक खडक होता. वरच्या बाजूने वाहणाऱ्या झऱ्यांनी त्याला हिरवट पोपटी झाक आल्यासारखे त्या बुडकाभर उजेडात त्याला वाटत राहिले. तो खडक कुठे संपतो आणि गाभारा कुठे सुरू होतो याचा हिशेब अव्यक्त होता.
त्याने खाकरून आजूबाजूला पाहिले. मिट्ट अंधार होता. त्याच्या खाकरण्याचे प्रतिध्वनी मात्र अंधाराची पर्वा न करता निनादत आले.
भल्या पहाटे उठून खर्ज भरायला हा गाभारा योग्य होता.
"हे देवी"..... प्रतिध्वनींच्या गुंजनाने त्याचा मूळचा मंद्र सप्तकातला आवाज अजून दोन स्वर खाली सरकला. डोळे मिटून, भुवया वक्र करून त्याने हलकेच खाकरून सूर तपासून घेतला. आणि बोलायला सुरुवात केली.
"या निराकार, निर्गुण खडकात मला देवी कुठे दिसते असा प्रश्न उमटला असेल कुठे, तर 'या खडकात देवीच आहे, ती न दिसणारे कोण आहे?' असे माझे प्रश्नात्मक उत्तर आहे. आणि पूर्ण शहानिशा होईपर्यंत मी तुला 'देवी' असेच संबोधणार, तेव्हा तो प्रश्न मिटला."
"थेटच विचारतो, या सगळ्यासगळ्याचा अर्थ काय?"
"मी कोण, काय हे तुला माहीत असणारच. देवलोक ना तुम्ही! पण तरीही सांगतो. तुला कळावे म्हणून नाही, तर माझे आतापर्यंत उरात दडपून ठेवलेले आक्रंदन आता बाहेर पडायला आतुर झाले आहे म्हणून."
"एका दरिद्री खेड्यात, एका दरिद्री कुटुंबात माझा जन्म झाला. हाती सापडेल त्या बऱ्यावाईट गोष्टींपासून मद्य तयार करणे, आणि ते विकून पोट भरणे हा माझ्या आई-बापाचा व्यवसाय. कळत्या वयापासून मीही त्यांच्यासोबत त्यात सहभागी होत गेलो. फुले गोळा करून आणणे, भट्टी एकसंध केशरी ज्वाळा येईल अशी पेटवणे, तो मेंदूत घुसणारा आंबूस दर्प मन लावून हुंगणे आणि त्यावरून मद्याची प्रतवारी ठरवणे, शंका आलीच तर हातावर एक थेंब घेऊन त्याने जीभ चरचरवणे.... आयुष्यात दुसरे काही असते हे कळायचा काहीच मार्ग नव्हता."
"पण तो मार्ग दाखवायला आलेच कुणीतरी. गावात भटक्या लोकांची पाले पडली. त्यांचाही एक व्यवसाय मद्य तयार करण्याचा आहे कळल्यावर ताबडतोब माझ्या आईने चुलीतले जळते लाकूड घेऊन त्यांचा तळ गाठला. त्या दरिद्री गावात मुळात आमच्याच पोटाला दोनवेळ अन्न ही कधीच्या काळी होणारी चैन होती. त्यात भागीदार येऊन आपल्या मुलाबाळांच्या तोंडचा आहे तोही घास जाईल या भीतीने ती मुठीएवढी बाई वाघिणीसारखी चवताळली."
"आईमागोमाग मीही गेलो. आईबापांचे किंवा असेच कुणाचेही ऐकायचे असतेच असे नाही, हे तेव्हा ठाऊक नव्हते."
"एका पालातून तंतुवाद्याची स्वरलड उलगडत होती. आईने पुढे होऊन त्या पालाला चूड लावली. स्वरलड जळून गेली."
"पण त्या काही क्षणांपुरत्या कानात शिरलेल्या स्वरलडींनी मला झपाटायचे काम चोख केले होते."
"त्या रात्रीच मी घर सोडले. कुठे जायचे माहीत नव्हते. पण जायला हवे एवढे उमटले होते."
"ऊन डोक्यावर आले तसा मी थांबलो. गाव चांगले ऐसपैस होते. बाजारपेठ गच्च भरलेली होती. भाज्यांचे ढीग लागले होते. सांड-लवंडलेल्या भाज्या आणि फळे खात गायी संथ हिंडत होत्या. हे मला नवीन होते."
"आमच्या सगळ्या गावाच्या एकत्रित सांड-लवंडीवर एखाद्या मुंगीचेही पोटभर झाले नसते."
"तरुण होतो, अंगात बळ होते, वाटेल ते काम करायची इच्छा होती, त्यामुळे पोट भरणे जड गेले नाही. पण मी निव्वळ पोट भरायला थोडाच बाहेर पडलो होतो? आमच्या गावातही अर्धवट का होईना, पोट भरत होतेच. आता इथे सुबत्ता होती म्हणून मी काय दुप्पट पोट भरणार होतो थोडाच!"
"अखेर एका गुरुंची गाठ पडली. त्यांनी त्यांच्या घरी ठेवून घेतले खरे, पण सगळा काळ त्यांच्या घरी पाणी भरण्यात आणि त्यांची पिलावळ सांभाळण्यात गेला. प्रत्यक्ष शिक्षण, म्हणजे समोर बसून असे शिक्षण कधी झालेच नाही. गुरुंचा रियाज मी जमेल तेव्हा, जमेल तसा ऐकत असे, आणि माझ्यानंतर शिष्यगणात सामील झालेल्या मुलांना मागच्या ओसरीवर माझ्याच मनाने काही ऐकवत बसे. गुरू कधी लहर लागली तर आतूनच ओरडून चुकले म्हणून सांगत. बरोबर काय ते काही त्यांनी कधीच सांगितले नाही."
"पण स्वरांच्या महासागरात त्यांनी कुठल्याही ओंडक्याशिवाय मला ढकलून दिले, म्हणूनच त्यांना गुरू म्हणतो मी. कारण त्यामुळे कुठे कणसूर लागला किंवा तानेने तालाचा गळा घोटला, तर बाहेरून कुणी ओरडण्याची गरज उरली नाही. मनातच एक खवीस बसून असे, आणि त्याच्या पसंतीला उतरल्याशिवाय सर्व व्यर्थ असे. मग कितीही गळा घासला तरी काही उपयोग नसे."
"एक दिवस माझ्या गुरूंनी 'चल' एवढेच म्हटले आणि मी त्यांच्या मागोमाग गेलो. काळ्या दगडातून कोरलेला तो विस्तीर्ण सभामंडप माणसांनी फुलला होता. मधल्या दगडी मंचावर साथीदार आपापली वाद्ये परजत बसले होते. एवढी गर्दी असूनही कुणीही काहीही बोलत नव्हते. वाद्यांचे सुरात येतानाचे लडिवाळ विभ्रम सर्वजण कानांनी पिऊन घेत होते."
"दुभंग गर्दीतून वाट काढत गुरुजी मंचावर गेले. आणि 'आजपासून मी संगीतसेवेतून निवृत्ती घेत आहे, हा माझा शिष्य माझी गादी चालवेल' एवढेच जाहीर करून बाहेर पडले. ते परत येणार नाहीत, आता आपल्याला कधीच दिसणार नाहीत याची झोंबरी जाणीव माझ्यासकट सर्वांना त्या क्षणी झाली."
"त्यांनी आतापर्यंत मला प्रत्यक्ष काही दिले नसले तरी हे पहिले आणि शेवटचे देणे मला हालवून गेले. कळवळून हंबरडा फोडावा असे तीव्रतेने वाटले, आणि तो खवीस लाल डोळे करून समोर आला. त्याने फेकलेल्या चार स्वरधाग्यांनी मी माझा कळवळा विणत गेलो. तलम रेशमी स्वरतंतू जीव घेणारा फाशीचा दोरही ठरू शकतात हे जाणवले. अस्तित्व आणि आत्महत्येच्या त्या सीमारेषेवर मी माझे वस्त्र विणत गेलो. बाकी काहीही शुद्ध उरली नाही."
"मी थांबलो. जाणीव-ग्लानीच्या त्या सीमारेषेवरून मला परत आणले ते लोकांच्या सामूहिक शांततेने. सुन्न अवस्थेत मी समोर पाहिले तर श्वासाचाही आवाज येऊ नये याची खबरदारी घेत तो प्रचंड समुदाय अश्रूभरल्या नेत्रांनी माझ्याकडे पाहत होता. टाळ्या, वाहवा, असले थिल्लर चाळे करायची गरज त्यांना वाटली नाही."
"अशा रीतीने मी स्वरसागरात माझी होडी हाकारली. धन, यश, मान, भगतगण आपोआपच मागे चालत आले. पण त्यांच्याकडे लक्ष देण्याइतका मला वेळ नव्हता. क्षितिजावरचे अनाघ्रात लोभस इंद्रधनुष्य मला सतत खुणावत होते."
"जनरीतीप्रमाणे जे काही होत होते याला विरोध करायलाही मी वेळ वाया घालवला नाही. माझे कुटुंब कुठे होते याचा शोध परस्पर माझ्या हितचिंतकांनी घेतला, आणि एका दुष्काळात सर्वजण नाहीसे झाल्याची बातमी मिळवून ते परतले. मी गात राहिलो."
"दुसऱ्या अशाच एका वाभरट टोळक्याने माझे लग्न ठरवले. रीतीप्रमाणे ते पार पडले. वधू चारचौघांच्या व्याख्येप्रमाणे अतीव सुंदर होती. तिचे सौंदर्य न सहन झाल्याने तीन लोकांनी आत्महत्या केली होती, आणि सतरा जणांनी कवी बनून इतरांचा छळ मांडला होता अशी वदंता होती. सौंदर्यांची माझी व्याख्या विचारण्याची तसदी कुणी घेतली नाही, आणि मीही त्यात वेळ दवडला नाही."
"स्वरसागरात मुशाफिरी करीत असलो तरी माझा देह मानवी होता. त्याला नैसर्गिक जाणीवा, गरजा, भोग होते. आतापर्यंत कधी त्याची जाणीव झाली नव्हती. पण लग्न झाल्यावर जीवनाला तीही मिती आली."
"माझे भगतगणही आता झुंडींझुंडींनी लोटायला लागले होते. मी आपला गात असे, पण त्यातून हजारो अर्थ काढून दाखवायची त्यांच्यात चढाओढ लागे. माझ्या एका स्वरातून कसा 'काळोखाची तीटही न लागलेला शुभ्र प्रकाश उमटतो' असे एकाने प्रतिपादले की दुसरा वावदूक माझे गाणे कसे 'आवाज न करता पडणारी, आणि डोळे न दिपवता सगळे स्वच्छ करणारी विद्युल्लता आहे' याबद्दल इरेसरीने बेताल बडबडू लागे."
"माझ्या बायकोला स्वर-तालाचा हिंदोळा पूर्णपणे वेळेचा अपव्यय वाटे. मी जीव तोडून गायलो काय, आणि पाय मोडलेला कुत्रा विव्हळला काय, आवाजच तर येतो दोन्ही वेळेला असा तिचा स्वच्छ कोरडा हिशेब असे."
"पण कळत नसूनही तिने सदैव माझी पाठराखण केली. रात्री-बेरात्री मी गळा फेकत बसलो की हळद घातलेल्या कोमट दुधाचा पेला हातात घेऊन ती सोशिकपणे माझी वाट पाहत जागत बसे. आपला पती काय करतो ते आपल्याला उमजत-पोचत नाही हे अलम दुनियेतल्या बायकांना न झेपणारे सत्य तिने अलगदपणे स्वीकारून टाकले. आवाज हळूहळू तापवत तारसप्तकात शिरण्याची पायाभरणी करावी तशी आमची मने उमलू लागली."
"तिला मज्जासंस्था बधिर करणारा तो असाध्य रोग झाल्याचे निदान झाले तेव्हा त्या खविसाला न जुमानता एक कणसूर चिरकत उमटला. या आजारावर इलाज नाही असे जागोजागच्या धन्वंतरींनी निदान केले. आरोग्य हा माझा प्रांत नव्हता. स्वरांच्या वेलींखाली आडोसा शोधत मी गात राहिलो."
"दिवसेंदिवस क्षीण होत जाणारी तिची मूर्ती असह्य वेदना दातांखाली दाबत त्याच सोशिकपणे माझी वाट पाहत राहिली"
"आणि एक दिवस मिटून गेली."
"निराकार स्वरांची निराकार साधना करणारा मी, या साकार देहामध्ये इतका गुंतलो असेन कळले नव्हते. रागाने तटाटून मी सर्व धागे तोडून टाकले आणि परत चालायला लागलो. तिच्या अंत्यसंस्काराला हजर राहण्याची हिंमत न झाल्याने भेकडासारखा त्या सगळ्यापासून दूर चालायला लागलो."
"परत दुसरे आयुष्य. मात्र आता संगीताशी कोणत्याही स्वरूपाचा संबंध ठेवायचा नाही एवढा निश्चय केला होता. भिरभिरत्या अवस्थेत मी चालतच राहिलो. किती दिवस, कोण जाणे."
"त्या ओसाड प्रार्थनामंदिरात पोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती एवढे आठवते. रात्री झोपण्यापुरती जागा साफसूफ करताना मला एक पोलादी छिन्नी आणि हातोडी सापडली. अजून काहीही न सुचल्याने मी दुसऱ्या दिवसापासून एका मोठ्या शिळेत अडकलेल्या मूर्तीला मुक्त करायच्या उद्योगाला लागलो. आसपास झाडी होती आणि त्यांवर माझ्या पोटाला पचतील अशी फळे होती. प्रार्थनामंदिराच्या मागेच थंड पाण्याचा झरा होता. बाकीच्या गोष्टींची भ्रांत करण्याइतका माझ्याकडे वेळ नव्हता. ती मूर्ती मुक्त होईपर्यंत देह जगवणे एवढेच लक्ष्य ठेवून मी काम करत राहिलो."
"किती दिवसांनी ती मूर्ती प्रकटली हे आठवत नाही, पण एक दिवस मला अंगातले रक्त निचरून जावे तसे झाले. डोळे क्षणभर मिटून मी त्यांसमोर तरंगणारी काळोखी स्वतःभोवती लपेटली आणि परत डोळे उघडले. ठिकऱ्या ठिकऱ्या होत काळोख विरून गेला आणि मूर्ती समोर दिसली."
"ती हुबेहूब माझ्या बायकोची प्रतिकृती होती."
"स्वतःविषयीचा संताप आणि अपराधित्वाची भावना यांचा उद्रेक झाला. आयुष्यात पहिल्यांदाच मी स्फुंदून स्फुंदून रडलो."
"आणि रडल्यावर असे जाणवले, की खरेच माझ्या शरीरातले जुने, दूषित रक्त कुणीतरी बदलले होते जणू! त्या मूर्तीकडे मी निखळ मूर्तिकार म्हणून पाहिले आणि मला जाणवले की निराकार स्वरांकडून या त्रिमिती कलेकडे केलेला हा प्रवासही आतपर्यंत भिनायला लागला आहे."
"मी तिथेच राहिलो. हळूहळू शेजारच्या खेड्यातल्या लोकांना त्याची वार्ता लागली. मग त्याच्या शेजारचे खेडे. मग शहर. मग...."
"परत भगतगण गोळा होऊ लागले. एव्हाना माझे दाढी-केस झकास वाढले होते. मग तर काय? जो येईल तो दूध, फळे असलेच काहीबाही घेऊन येऊ लागला. हळूहळू माझ्या दोनवेळच्या अंघोळीला पुरेल एवढे दूध येऊ लागले, आणि फळांचा ढीग कमरेला लागू लागला. मी केलेली प्रत्येक मूर्ती त्यांना कुठल्या ना कुठल्या देवतेची वाटे. हळूहळू मला 'दैवी ज्ञान' प्राप्त झाले आहे अशीही आवई उठली आणि सर्वांनी त्यावर ठाम विश्वास ठेवला. मी बोललेला एखादा शब्द, टाकलेला एखादा कटाक्ष, यांतून निरनिराळे अर्थ काढण्याची चढाओढ सुरू झाली."
"एकदा संतापून मी श्लील-अश्लीलतेच्या सगळ्या संकल्पनांना रोखठोक आव्हान देणाऱ्या एका मदालसेला मूर्तिरूपात उमटवले. तर ती कशी आदिशक्ती आहे, मला कसा तिने प्रत्यक्ष दर्शन दिले आहे, आणि त्यामुळे सामान्य, मर्त्य मानवांची मोजमापे मला लावण्यात कसा अर्थ नाही हे सांगायचाच कलकलाट सुरू झाला."
"शेवटी या वेडाचारांकडे दुर्लक्ष करून मी परत मला आवाहन करणाऱ्या आकारांना दगडातून मुक्त करण्याच्या मागे लागलो."
"एक दिवस एक अति धनाढ्य सावकार माझ्यासाठी एक काम घेऊन आला. आता मी कसा त्याचा अपमान करून हाकलून घालतो ते पाहायला लोक जमले. एवढ्या दैवी शक्तीच्या कलाकाराला आपले खाजगी काम सांगायचे म्हणजे काय?"
"त्याचे काम ऐकल्यावर मला असे काही वेडेविद्रे करवले नाही. मज्जासंस्था बधिर करणाऱ्या त्याच रोगाने त्या सावकाराची एकुलती मुलगी यौवनाच्या उंबरठ्यावरच आयुष्यातून गळून गेली होती. तिची काही चित्रे त्याच्याकडे होती. मुलीच्या निधनाने सैरभैर झालेली त्याची पत्नी झुरून झुरून मृत्युपंथाला लागली होती. मी जर त्या चित्रांवरून त्याच्या मुलीची मूर्ती करून दिली, तर नजरेतील सगळ्या भावना निचरून गेलेल्या त्याच्या बायकोच्या डोळ्यांत एकदा तरी ओळख उमटेल अशी त्याला आशा होती."
"मला नाही म्हणवले नाही. मी झपाटल्यासारखी कामाला सुरुवात केली. त्याचा अर्थ लावायची जबाबदारी भगतगणांवर सोडून दिली."
"पहुडलेल्या अवस्थेतील मूर्ती पूर्ण झाली. तिला पाहताच त्या सावकाराच्या पत्नीने तिला कुशीत घेतले. तिच्या चेहऱ्यावर वात्सल्याचे झरे उमटले. मूर्तीला थोपटत थोपटत ती शांत चेहऱ्याने आपल्या मुलीकडे निघून गेली."
"सावकाराने माझ्या वजनाइतके सोने मला अर्पण केले. मी चपापलो. माझी किंमत काही सोन्याच्या लगडींमध्ये परावर्तित झाली आणि मला काहीतरी चुकल्यासारखे जाणवले. स्वरांच्या लाटांवर आरूढ होताना असले सगळे 'व्यवहार' माझ्या पाठीवर होत असत. मात्र माझ्या मनातून आलेल्या ऊर्मी आणि त्या प्रत्यक्षात उतरवणारे माझे हात आता बाजारात विकायला निघाले होते."
"परत निघायची वेळ झाली होती. छिन्नी आणि हातोडी कुठेतरी खोल खड्ड्यात भिरकावून देण्याचा मोह झाला. पण विचार केल्यावर मला त्यातील फोलपणा कळला. कदाचित ज्या कारागिराने ती मागे सोडली होती त्यालाही असाच मोह झाला असेल आणि त्यानेही तो असाच आवरला असेल.... कदाचित 'अचानक उमलून आलेले आत्मभान' हा प्रयोग आधीही या मंचावर झडला असेल.... ती साखळी तोडणारा मी कोण होतो? सापडल्या जागीच त्या वस्तू ठेवून दिल्या आणि परत चालायला लागलो."
"कुठे जायचे अर्थातच माहीत नव्हते. सर्व दिशा निर्विकार होत्या. चालत राहिलो."