नोव्हेंबर २४ २००७

महाराष्ट्रातील राजकीय सद्यस्थिती: अवलोकन आणि वेध - भाग २

ह्यासोबत

शिवसेनेचा जन्म होऊन एकेचाळीस वर्षे झाली. या कालावधीत शिवसेनेने जितक्या कोलांट्याउड्या मारल्या आहेत तितक्या एकादा विदूषक मारता तर एखादा जीवनगौरव पुरस्कार मिळवून जाता. प्रजासमाजवादी पक्षाशी युती, मग ती तोडणे (या प्रकरणात प्रमोद नवलकर समाजवाद्यांकडून शिवसेनेकडे हस्तांतरित झाले), कम्युनिस्टांना रक्तरंजित (कॉ कृष्णा देसाईंचा खून कुणी केला हे उघड गुपित आहे) विरोध, त्यासाठी वसंतराव नाईकांच्या (आणि नंतर वसंतदादा पाटलांच्या) आश्रयाखालील 'वसंतसेना' असे हेटाळणीखोर बिरूदही दुर्लक्षित करणे, दत्ता सामंतांच्या वाढत्या वर्चस्वामुळे घाबरून शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी उघड (अगदी शिवाजी पार्काच्या व्यासपीठावर) हातमिळवणी, भाजपबरोबर युती, मग ती तोडून परत वेगळी चूल, त्याच काळात पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत लागलेला हिंदुत्त्वाचा शोध (त्या निवडणुकीत भाजपचा पाठिंबा जनता पक्षाच्या उमेदवाराला होता), मग प्रमोद महाजनांनी कष्टाने घडवून आणलेली आणि काहीही करून टिकवलेली युती..... चांगलेच रंगीत-संगीत चित्र आहे.

एवढ्या अतर्क्य उड्या मारलेला हा पक्ष टिकला आणि या पातळीपर्यंत वाढला तरी कसा? याचे उत्तर या पक्षाच्या तत्त्वज्ञानात आहे. "कानाखाली चार आवाज काढले की प्रश्न सुटतात", "कुठल्याही परिस्थितीत 'गिरे तो भी टांग ऊपर' असा पवित्रा घेत राहिले तर काही लोक तरी कच्छपी लागतात" आणि "इतर पर्याय नसतील तर झक्कत आपल्यामागे लोक येतात" या 'तत्त्वां'ची सरमिसळ करून हा पक्ष जन्मला. जन्मतेवेळी ठाकर्‍यांनी 'राजकारण म्हणजे गजकरण' अशी आरोळी ठोकून 'मी नाही त्यातली' असा पवित्रा काहीकाळ धारण केला. व्यंगचित्रकार असलेल्या ठाकर्‍यांना 'मार्मिक'मधून मराठी मनाचे कवडसे दिसायला सुरुवात झाली होती. संयुक्त महाराष्ट्राचा तथाकथित मंगल कलश आला खरा, पण वरती डांग आणि खाली बेळगाव-निपाणी-भालकी-बीदर-कारवार असले लचके तुटून. आणि मारे चिरडीने भांडण करून मुंबई मिळवली, ती शेटजींचीच होती आणि शेटजींचीच राहिली. याबद्दल अपराधित्त्वाची भावना मनात असणारी मराठी माणसे हे शिवसेनेचे भांडवल.

ठाकरेंचा कुंचला, लेखणी, वाणी आणि सामान्यांना भावणारी 'निवडणूक लढवणार नाही, अधिकारपद घेणार नाही' ही घोषणा यावर शिवसेनेची सोळा-सतरा वर्षे गुजराण झाली. पण वाढायचे असेल तर मुंबईच्या बाहेर पडायलाच हवे. आणि मुंबईत मराठी माणूस या नावाखाली जरी अनुयायी गोळा करता आले, तरी महाराष्ट्रात सगळेच मराठी, त्यामुळे काही नवीन मुद्दा काढायला पाहिजे हे प्रथम भुजबळांच्या लक्षात आले. ते आणि चंद्रकांत खैरे या दोघांनी मराठवाड्यात मुसंडी मारली. मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रकरणात शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेने त्याला पाठबळच मिळाले (नामांतराचा ठराव पवारांनी मांडल्याने तिथला मराठा समाज जो बिथरला, त्याचे फलित म्हणजे त्यानंतर वीसेक वर्षे मराठवाडा हा शरद पवारांचा कायमच कमकुवत भाग राहिला). त्यात हिंदुत्त्वाचा अबलख वारू मिळाल्यावर तर काय, बघता बघता महाराष्ट्राच्या कोपर्‍या कोपर्‍यातून शिवसेनेच्या शाखा निघाल्या, आमदार निवडून येऊ लागले.

[float=font:samata;size:18;breadth:200;]'सामना' या मुखपत्राने तर पक्षाला अजून तीन पायऱ्या वर ढकलले. अश्लाघ्य भाषेत लिहिलेले आणि जन्तेला यकदम पसंद पडणारे झणका अग्रलेख हे त्यांचे वैशिष्ट्य.[/float] मग ना ग गोर्‍यांसारख्या वयोवृद्ध नेत्याबाबत लिहिताना "यांची धोतरे धुवायला कुठल्या धोबिणीकडे जातात हे आम्हांलाही माहीत आहे" असले चरबट लिहिले जाई. आणि ना ग गोरे हे कोण याची बिलकुल कल्पना नसणारे तरुण शिवसैनिक चवीचवीने हे चघळत असत. पण हे सोडले, तरी स्वतःची टिमकी वाजवायला हक्काची सहा-आठ पाने मिळणे हे सौख्य तोवर कुठल्याच पक्षाच्या वाट्याला आले नव्हते. 'सकाळ'चा तोवर पवार-कुल-वृत्तांत झाला नव्हता. 'केसरी' म्हटले तर काँग्रेसचा पाठीराखा होता, म्हटले तर पुणेरी ब्राम्हणांचा. 'तरुण भारत' संघाचा पुरस्कर्ता होता, पण त्याच्या आवृत्त्या कमी व्हायला सुरुवात झाली होती. 'लोकसत्ता' काँग्रेसच्या दावणीला बांधला जायचा होता, किंबहुना राज्यकर्त्या पक्षाविरुद्ध धडाडणारी तोफ म्हणूनच तो जास्त प्रसिद्ध होता. 'लोकमत', 'पुढारी' हे अजूनही गल्लीपातळीवरच खेळत होते. 'महाराष्ट्र टाईम्स' अजूनही रॉयवादाच्या तळवलकरी आढ्यतेत अडकला होता. त्यामुळे 'सामना'ने पक्षाला एक नवी संजीवनी दिली.

पण धडपडणार्‍या कार्यकर्त्याला जवळ करणारे बाळासाहेब ठाकरे अशी जोवर त्यांची प्रतिमा होती तोवर ठीक होते. जोशीबुवांच्या मिठ्ठास बोलण्याला ठाकरे भुलले आणि विधीमंडळात अक्षरशः एकहाती (ते एकटेच आमदार होते) शिवसेनेचा दरारा निर्माण करणारे भुजबळ मागे पडले. मंडल आयोगाचे निमित्त करून त्यांनी सरळ सोळा आमदारांना घेऊन काँग्रेस गाठली. राण्यांसारखा आत्ता दोन, मग एक, मग परत दोन असला कातडीबचाऊ हिशोब त्यांनी मांडला नाही. पुढील निवडणुकीत खुद्द भुजबळांनी स्व-कष्टांनी कमावलेले माजगाव गमावले. पण शिवसेना सोडूनही कुणी राजकारणात टिकू शकतो हा संदेश पोचला. नाहीतर शिवसेनेतून बाहेर पडणार्‍यांचे बंडू शिंगरे किंवा हेमचंद्र गुप्ते असे भिजके फटाकेच होत.

बाळासाहेबांच्याकडून कुंचला आणि वाणी या दोन गोष्टी सहीसही उचललेल्या राज ठाकरे यांचा बोलबाला होऊ लागला आणि माशी शिंकली. १९९५ची निवडणूक गाजवण्यात उद्धव ठाकरे जेवढे मागे होते तेवढेच राज ठाकरे पुढे. पण 'आपले' सरकार येताच वर्षभरातच रमेश किणी प्रकरण निघाले आणि राज ठाकरेंच्या उगवत्या सूर्याला ग्रहण लागले. आणि उद्धव ठाकरेंचा कॅमेरा इंचाइंचाने फोकस होत चालला. राज ठाकरेंनी पक्षात 'आपली' म्हणून निवडलेली माणसे कुजवण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले. शेवटी 'कार्याध्यक्ष' हे पद निर्माण करून त्यावर नेमणूक व्हावी म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव काँग्रेसी प्रथेप्रमाणे राज ठाकरेंनाच सुचवावे लागले आणि झक्कत गप्प बसावे लागले. त्यांचा मनाचा धीर होण्यासाठी राणेंना आधी उडी मारावी लागली.

राणे आणि राज ठाकरे यांनी शिवसेनेचा पायाच खिळखिळा केल्याचा आव आणला खरा. पण पुण्यात सिंबायोसिस म्हणजे जसे सबकुछ मुजुमदार, तसे शिवसेना म्हणजे सबकुछ ठाकरे (बाळासाहेब, आणि त्यांनीच टिळा लावला म्हणून उद्धव). त्यांच्यानंतर शिवसेनेचे काय होईल याची चर्चा करायला हरकत नाही. पण ते असेपर्यंत ही चर्चा करणे वायफळ आहे. महाराष्ट्रात स्वतःच्या नावाचा ब्रँड असणारी दोनच माणसे, शरद पवार आणि बाळ ठाकरे. उत्तर प्रदेशात बसपचा आहे तसा महाराष्ट्रात या दोघांचा स्वतःचा असा एक टक्का आहे, जो कायम त्यांच्यामागे राहील.

शिवसेनेत कुरबुरी नाहीत असे अजिबात नाही. बाळासाहेबांचे झालेले वय आणि ढासळणारी प्रकृती स्पष्ट होत चालली आहे. नारायण राणे अजूनही आपल्या खिशात इतके आमदार आणि तितके खासदार असल्याची बतावणी करतच आहेत. प्रकाश परांजप्यांसारखे खासदार त्याला पुष्टी देण्यासारखेच वर्तन करीत आहेत. सुरेश प्रभू खासदार असूनही राजकारणसंन्यास घेतल्यासारखे सारस्वत बँकेत गुंग आहेत. गुलाबराव गावंडे आदि आमदार त्यांचा कल कळून द्यायला तयार नाहीत. मनोहर जोशी गुपचूप हसत मुलाची भागीदारी राज ठाकरेंबरोबर आणि आपण थोरल्या पातीबरोबर हा तोल संभाळत आहेत.

आणि ही वादळे शिवसेनेला तशी नवीनच. आधी होते ते मतभेद. पण त्यावेळेला शिवसेना सत्तास्थापनेच्या जवळपासही नव्हती. आणि ठाकर्‍यांचा एकछत्री अंमल मान्य असणारेच शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेत होते.

आता या वादळांना तोंड द्यायला अवसान आणून घोड्यावर बसवलेले उद्धव ठाकरे कसे वागतात त्यावर शिवसेनेचे भविष्य अवलंबून असेल. आतापर्यंत मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत या दोघांनी त्यांना घोळात घेतले आहे. त्यातून बाहेर पडून त्यांनी जर आपल्या वडिलांच्या वलयाचा आणि आडनावाचा पुरेपूर उपयोग करून घेतला तर ते आणि पक्ष टिकेल.

महाराष्ट्रात नाही, पण देशात अशी घटना घडलेली आहे. नेहरू गेल्यावर इंदिरा गांधी अशाच अपरिपक्व आणि बावरलेल्या होत्या. पण अवघ्या दोन वर्षांत त्यांनी थेट वाघावर मांड ठोकायची लायकी सिद्ध केली होती. उद्धव ठाकर्‍यांची दोन वर्षे तर उलटून गेली आहेत. येणारा काळच काय ते ठरवेल.

=====

भाजप, म्हणजे पूर्वाश्रमीचा जनसंघ, हा महाराष्ट्रात भक्कम कधीच नव्हता. मध्यमवर्गीयांना आणि उच्चवर्णीयांना जरी तसा भास होत असला तरी. अगदी १९३५ साली संघाची स्थापना झालेल्या नागपुरातही त्यानंतर पन्नासेक वर्षे होईपर्यंत जनसंघाला वा भाजपला कोणी मोजत नव्हते. तिथून पहिला खासदार मिळाला तो रामजन्मभूमी आंदोलनात काँग्रेसमधून आयात केलेले बनवारीलाल पुरोहित.

[float=font:samata;size:18;breadth:200;side:right;]एकंदरीतच महाराष्ट्रात हा पक्ष वाढीला लागला तो मुख्यतः प्रमोद महाजन यांच्या धोरणीपणामुळे.[/float] त्यांचा युतीचा निर्णय, आणि त्यांच्या मेव्हण्यामुळे भाजपला मिळालेला बहुजनसमाजातील (भाजपच्या मुख्य पाठीराख्या वर्गापेक्षा वेगळा अशा अर्थाने; बहुजनसमाज हा शब्द 'मराठा' या एका छोट्या गटासाठी वापरण्याचा काहींचा प्रघात आहे म्हणून हा खुलासा) चेहरा या दोन गोष्टींनी भाजपच्या गाडीने अचानक गियर बदलला. त्यात रामजन्मभूमी आंदोलनाने अजूनच शक्ती मिळाली. आणि रामभाऊ म्हाळगी, राम नाईक, राम कापसे या त्रिरामांनीच मुख्यतः ओळखला जाणार्‍या पक्षात बापट, जोशी, फडणवीस यांच्याबरोबरच वहाडणे, खडसे अशी नावेही चमकू लागली. अचानक आमदारांचा आकडा दोन आकडी संख्येत गेला. भुजबळ शिवसेनेतून गेल्यावर शिवसेनेच्या आमदारांची संख्या एका तडाख्यात घटली, तेव्हा चपळ हालचाली करून मुंड्यांनी मनोहर जोशींकडून विरोधी पक्षनेतेपद हिसकावून घेतले.

त्यांना एकट्यालाच नव्हे, तर बर्‍याच इतरांना लाल दिव्याची गाडी लौकरच मिळाली. १९९५ साली युतीचे सरकार स्थापन झाले. अर्थात त्या सरकारला शरद पवारांच्या 'खंजिरी' राजकारणाचीही समर्थ साथ होती. सत्तेच्या किल्ल्या अपक्षांच्या हाती गेल्या होत्या. आणि ज्या अपक्षांनी युतीला पाठिंबा देऊन त्याबदल्यात भारंभार मंत्रिपदे गटकावली, ते सगळे माजी काँग्रेसी होते. आणि तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करून उभे राहिले होते. दहाजणांना 'तयारीला लागा' असे सांगायचे आणि अकराव्याला तिकीट द्यायचे ही शारदीय नीती जुनीच. पण पवारांनाही सुधाकरराव नाईकांचा हिशेब चुकता करायचा होता. त्यामुळे दुसर्‍याला अपशकुन करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पक्षाचे नाक कापून घेतले. आणि तोच शुभशकुन मानून युती सत्तेवर आली.

भाजपला राज्यात सत्ता चाखण्याची संधी त्याआधी अठरा वर्षे पवारांच्या थेट कृपेने 'पुलोद' प्रयोगात मिळाली होती. ती वगळता, आपण जन्मभर विरोधी बाकांवर बसण्यासाठीच अवतरलो आहोत याची नेत्यांपासून तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनाच इतकी खात्री होती की सुरुवातीला सगळेच गडबडले. उपमुख्यमंत्री (खरेतर घटनेत असे कुठलेही पद नाही; उपपंतप्रधान असेही पद नाही; पण संधीसाधू आणि खुदपसंद राजकारण्यांनी या शब्दांचा वापर करकरून त्याचे अनौरसत्त्व घालवून टाकले आहे) आणि गृहमंत्री अशी पदे मिळाल्याने गोपीनाथ मुंडे तर चांगलेच गांगरले. ज्या पोलिसांशी आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेतून  कायम दुसर्‍या बाजूने संबंध आला, त्यांचे प्रमुख? आणि आता आपल्यावर पाळत नसून इतर सर्वांवर पाळत आणि त्यांचे अहवाल आपल्या पुढ्यात? गडबडून मुंड्यांची गाडी भलत्याच वाटेला चौफुल्याला लागली.

किंबहुना नितीन गडकरींचा (सार्वजनिक बांधकाम खाते) अपवाद सोडला तर इतर कुठल्याही भाजपच्या मंत्र्याची कारकीर्द संस्मरणीय अशी झाली नाही. गडकरींनी मात्र 'ब्रिजमोहन' हे टोपणनाव कमावण्याइतका पूल बांधण्याचा सपाटा लावला. मुंबईत तर त्यांनी उड्डाणपुलांचे जाळेच उभारले. आणि हे सर्व करताना सार्वजनिक बांधकाम खाते ही गंगोत्री आहे याचा विसर पडू न देता पक्षाच्या खजिन्यातही मोलाची भर घातली.

मुंडें आणि शिवसेना हे गणित तितकेसे जमले नाही. महाजन आणि ठाकरे यांचे जे गूळपीठ जमले होते त्या पार्श्वभूमीवर हे उठून दिसले. किणी प्रकरणात राज ठाकरेंचे नाव ज्यारीतीने गुंतले, आणि पोलिसांकडून ज्याप्रकारे या तपासाची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोचवली गेली तिथे एक ठिणगी पडली. मग अमर नाईकचे एन्काऊंटर झाल्यावर "त्यांचा दाऊद तर आमचा अमर होता" अशी भाषा 'सामना'ने सरळसरळ वापरली. आणि मुंड्यांच्या बरखा प्रकरणात खुद्द थोरल्या ठाकरेंनी "प्यार किया तो डरना क्या" असा जाहीर सल्ला दिला.

सत्ता गेल्यावर अनेक जणांच्या बॅटर्‍या उतरल्या. तळागाळापर्यंत पक्ष नेण्यासाठी धडपडणारे सूर्यभान वहाडणेंसारखे कार्यकर्ते दुरावले. मुंडे-महाजन आणि गडकरी असे गट पडले. ते अजूनही कार्यरत आहेत. निवडणुकीतल्या तिकीटांची कापाकापी हा काँग्रेसी खेळ सगळ्यांनीच आत्मसात केला. निवडणुकीपुरते उमेदवार आयात करण्याचे धाडसी प्रयोग (कलमाडी) करून यथास्थित मार खाऊन झाला. घोटाळेबाज नेत्यांना पाठीशी घालून (पतसंस्थेच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांचे पैसे हडपलेला राजू दुर्गे अजूनही पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाचा माननीय पदाधिकारी आहे) पक्षाची प्रतिमा बिघडवण्याचा उद्योग करून झाला. गटबाजी पार शहर-उपनगर पातळीपर्यंत नेऊन सलणार्‍या काट्यांना (राष्ट्रवादीत जाऊन थेट उपाध्यक्ष झालेले वसंत वाणी) पक्षांतर करायला लागावे इतके वातावरण कलुषित करून झाले.

एकंदर सर्व निर्नायकी आहे. मुंडे दिल्लीला जायच्या गर्जना करतात, मात्र मुंबईतून. ते एकदाचे जात का नाहीत या विवंचनेत गडकरी नागपूर सोडत नाहीत. प्रत्येक जिल्ह्यात सत्तासमीकरणे वेगळी आहेत, आणि "party with a difference" असे बिरूद मिरवणारा हा पक्ष निर्लज्जपणे कुठे राष्ट्रवादी काँग्रेस (पुणे), कुठे काँग्रेस (पिंपरी-चिंचवड) आणि कुठे अपक्ष (नागपूर) यांच्या कच्छपी लागलेला दिसतो.

थोडक्यात, तीन वर्षांपूर्वीच्या पराभवातून अजूनही हा पक्ष सावरलेला नाही. शिवसेनेच्या तुलनेत कायम 'धाकटे' असण्याच्या कुचंबणेतून बाहेर तर यायचे आहे, पण तसे करणारा कुणी समर्थ असला तर त्याचे पंख छाटायला अनेक तलवारीही तयार आहेत अशी या पक्षाची अवस्था आहे.

=====

शिवसेनेतून बाहेर पडायला राज ठाकर्‍यांनी बराच वेळ घेतला. आणि बाहेर पडल्यानंतर नवीन पक्षाच्या स्थापनेला अजून जास्त. इथेच त्यांचे पहिले गणित चुकले. खरेतर भारतीय विद्यार्थी सेना ही त्यांनी एकहाती बांधलेली संघटना. पण राज ठाकर्‍यांचे वेळकाढू धोरण पाहून नार्वेकर-राऊत मंडळींनी थोरल्या पातीला मधे उतरवले आणि त्यातले बरेचसे मोहरे टिकवून ठेवले. शिवसेनेत असलेले राज ठाकर्‍यांचे पाठीराखे अगदीच एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके - बाळा नांदगांवकर, शिशिर शिंदे, आणि दीपक पायगुडे. मग पक्षाला मावळा कुठून उभारायचा? याला राज ठाकर्‍यांनी शोधलेले उत्तरच त्यांच्या पायावर कुर्‍हाड मारून गेले आहे.

शिवसेनेसारख्या राडेबाज पक्षात वीसेक वर्षे काढलेली असल्याने राज ठाकरेंना 'तसल्या' माणसांत वावरायची, नव्हे, त्यांना कसे वापरायचे याची पूर्ण जाण होती. त्या क्षेत्रातील महामहोपाध्याय नारायण तातोबा राणे यांचे राज ठाकर्‍यांशी घट्ट संबंध. या सगळ्याचा परिपाक म्हणून असेल, एकीकडे बाबासाहेब पुरंदरे, वीणा पाटील, अतुल परचुरे अशी मंडळी गोळा करताना विक्रम बोके, विद्यावत्सल अन्नाप्रगाडा अशी झकनाट मंडळीही त्यांनी गोळा केली. विक्रम बोके जरी धडाडीचे पोलिस अधिकारी म्हणून गाजून निवृत्त झाले असले, तरी त्यांची धडाडी खुलण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे जवळचे नातेवाईक शरद पवार हे सगळ्यांनाच माहीत आहे. निवृत्त झाल्यावरचे त्यांचे "सुसंस्कृत" वागणे अनुभवायचे असेल तर पुणे विद्यापीठातले सुरक्षा अधिकारी व्हा!  आणि विद्यावत्सल अन्नाप्रगाडा हा भिडू तर गावावरून ओवाळून टाकलेला. मूळच्या आंध्रातल्या या गड्याची पुण्याच्या जवळपास प्रत्येक पोलिस-स्थानकावर नोंद होती. हा हिरा शिवसेनेत कधीच नव्हता. तो पतितपावन संघटनेचा नावापुरता टिळा लावून उंडारत असे. तो मनसेनेत थेट शहर उपाध्यक्ष झाला. सांगलीचा मनसेनेचा अध्यक्ष (दलित अल्पवयीन स्त्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी आत गेलेला) हे अजून एक रत्न. पुण्यात खंडणी गोळा करण्याच्या आरोपात आत गेलेली एक महिला ही मनसेनेची अजून एक पदाधिकारी. असे हे रत्नालय.

एक विसंवादी सूर. अशा पक्षाच्या व्यासपीठावरून जाहीरपणे भाषणे ठोकताना बाबासाहेब पुरंदर्‍यांना "रांझ्याच्या पाटलाने एका बाईबरोबर बदकर्म केल्याचे कळताच, छत्रपतींनी त्याचे दोन्ही हात आणि पाय कलम करण्याची आज्ञा केली" हे वाक्य आठवत असेल का? की वाढलेल्या वयाचा परिणाम म्हणून अशा गोष्टी विस्मरणात जात असतील? असो.

तर अशी पोचलेली पात्रे गोळा करून मनसेनेने आपली बैठक बसवायचा प्रयत्न सुरू केलेला आहे. या प्रयत्नात जनाधार असलेल्या नांदगावकर, शिंदे आणि पायगुडे यांची कुचंबणा झाल्यासारखे दिसते. आणि मध्येच कवितावाचनाचे कार्यक्रम आयोजित केल्याने राडेबाज मंडळींचाही गोंधळ उडालेला दिसतो.

'जीन्स घालून ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी' ही कितीही रोमँटिक कल्पना असली, तरी आपण महाराष्ट्राचा व्हर्जिनिया वा क्वीन्सलँड करू शकत नाही हे सत्य आहे. [float=font:samata;size:18;breadth:200;]मुळात या कल्पनेला टाळ्या मारणारे सर्व लोक शहरी आहेत, जे कधी खेड्यात जायची पाळी आलीच तर बिस्लेरीच्या बाटल्या घेऊन जातील[/float], आणि मुक्कामाला रहायची वेळ येणार नाही याची काळजी घेतील असे.

केवळ बाळासाहेबांसारखा आवाज, शरीरयष्टी, वेषभूषा (डाव्या मनगटावर उलट्या बांधलेल्या घड्याळासकट), वक्तृत्त्वाची पद्धत आणि व्यंगचित्रे काढायची धाटणी एवढ्यावर राज ठाकरे किती काळ गुजराण करणार हा प्रश्नच आहे. नव्याची नवलाई संपत आली आहे. पुण्यात कलमाडींना जाहीरपणे वाल्या कोळी संबोधून मग त्यांच्याच आश्रयाला जाण्याचा प्रकार अनेकांना पसंत पडलेला नाही. नाशिक या राज ठाकरे यांनी स्वतः घडवलेल्या बालेकिल्ल्यावर अखेर शिवसेनेने झेंडा रोवलाच.

थोडक्यात, शिवसेनेला एकेचाळीस वर्षांचा इतिहास, सामना हे वर्तमानपत्र आणि मार्मिक हे साप्ताहिक यांची जोड असल्याने तो पक्ष एवढ्या झपाट्याने लयाला जाणार नाही. पण मनसेनेला तसे नाही.

येत्या दोन वर्षांत काही झपाट्याने हालचाली झाल्या नाहीत, आणि त्यावेळी होणार्‍या पुढच्या विधानसभा निवडणुकांत जर लक्षात घेण्याजोगे काही करून दाखवता आले नाही, तर या पक्षाचे भवितव्य कठीण आहे. राजकीय पक्षाची गाडी अशी झपाट्याने चालू होत नाही हे जरी खरे असले, तरी मनसेनेत आलेली मंडळी ही सगळी चालू असलेल्या गाडीतून इथे आल्याने त्यांच्या अपेक्षा काहीही करून ही गाडी झपाट्याने चालू व्हायलाच हवी अशा आहेत. हे जर दोन वर्षांत झाले नाही, तर राज ठाकरेंना मातोश्री बिल्डर्सकडेच पूर्णवेळ लक्ष द्यावे लागेल.

=====

आता या सर्व पक्षांनी नीट लक्ष देऊन पहावे अशी घडामोड. बहुजन समाज पक्ष.

महाराष्ट्रातले राजकारण हे देशाच्या राजकारणाप्रमाणेच जातीवर अवलंबून असल्याने सर्व पक्षांना त्याचा विचार करावा लागतोच. शिवसेना हा एकच पक्ष असा आहे की त्यात जातीवर आधारित राजकारण होत नाही. पण त्या पक्षाकडे नियम म्हणून पाहण्यापेक्षा अपवाद म्हणूनच पाहायला हवे. आणि शिवसेनेच्या नेतृत्त्वाच्या मनात नसले, तरी मराठवाड्यातले आणि दक्षिण महाराष्ट्रातले मराठा, रत्नागिरीतील कुणबी, रायगडातील आगरी या जाती शिवसेनेची पाठराखण करतात हे सत्य आहे.

तर या जातींवर आधारित राजकारणात आतापर्यंत लोकसंख्येच्या प्रमाणातच त्या त्या जातीला प्राधान्य दिले गेले आहे असे अजिबात नाही. एकंदरीत ब्राम्हणांना झोडपायची पद्धत जरी पडून गेली असली, तरी राजकारण या क्षेत्रातून ब्राम्हण जवळपास हद्दपार झाल्यात जमा आहेत. तीन-साडेतीन टक्क्यांचे जेवढे लाड व्हायचे तेवढेच त्यांचे होतात. पण चौदा-पंधरा (आकडा कदाचित थोडा कमी-जास्त असू शकेल) टक्क्यांच्या तुलनेत मराठा समाजाला मात्र फारच प्राधान्य मिळालेले दिसते. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्ष तर मराठा महासंघाच्याच दोन शाखा वाटतात, पण सेनाही शत्रूच्या गोटात फूट पाडण्यासाठी त्यांच्यातलेच मोहरे शोधत असते. त्यात विखे-पाटलांसारखा आयाराम-गयारामही पचवावा लागतो.

भाजपचा 'मराठा' चेहरा समोर येत नाही, कारण त्या पक्षाबद्दल मराठा जातीला असलेला कमालीचा अविश्वास. भाजप हा शेटजी-भटजींचा पक्ष म्हणूनच अजूनही ओळखला जातो.

मुस्लिमांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी या क्रमाने पर्याय आहेत.

मागासवर्गीयांपैकी महार/बौद्ध यांना रिपब्लिकन पक्षांचे फुटके तुकडे नशिबी आहेत. त्यातल्या त्यात रामदास आठवले एक खासदारपद आणि एक राज्यातील मंत्रीपद अशी शिते मिळवून बसल्याने त्यांच्याभोवती भुते जरा जास्त आहेत. प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यात आपले बस्तान बरे बसवले आहे. बाकी गट - कवाडे, कांबळे, खोब्रागडे आदि - कसे आणि कुठे शिल्लक आहेत हा संशोधनाचाच विषय आहे. आठवल्यांनी आपले गलबत सध्या तरी राष्ट्रवादीच्या बंदरात नांगरले आहे. आंबेडकरांनी एकला चालो रे हे धोरण ठेवले आहे.

मागासवर्गीयांपैकी मांग हे पक्षापक्षात विखुरले गेले आहेत.

विमुक्त आणि भटक्या जमातींचा एकूण टक्का कागदावर मोठा दिसतो, पण ते सर्वजण अजिबात एकसंध नसल्याने त्यांना कुणी मोजत नाही. लक्ष्मण मानेंनी बौद्ध धर्म स्वीकारल्याचे आन्हिक तर पार पाडले आहे, पण ते कुणी फारसे मोजलेले नाही, अगदी त्यांच्या आतापर्यंतच्या गॉडफादर शरद पवारांनीही.

इतर मागासवर्गीय हे बरेच हालचाल करू लागले आहेत. विशेषतः माळी समाज हा भुजबळांच्या मागे असल्याचे चित्र हळूहळू उमटते आहे. राष्ट्रवादीत कोंडी झालेले भुजबळही आता वेगळा विचार करायच्या मनःस्थितीत दिसत आहेत. सुरुवातीच्या गर्जना होऊ लागल्या आहेत. स्वपक्षातल्या गणेश नाईकांबरोबरच शेकापच्या जयंत पाटलांबरोबर आणि भाजपच्या गोपीनाथ मुंड्यांबरोबर डोळे-मिचकावणी सुरू झाली आहे. शिवसेनाही आता भुजबळांच्या बाबतीत मवाळ झाली आहे. त्यांना पक्षांतरापासून चिकटवलेले 'लखोबा' हे विशेषण खुद्द थोरल्या ठाकरेंनी जाहीर सांगून काढले आहे.

[float=font:samata;size:18;breadth:200;side:right;]आणि या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश एकहाती ताब्यात घेऊन मायावतींचा हत्ती आता महाराष्ट्रावर चाल करून येतो आहे.[/float] टक्क्यांच्या भाषेत आपल्यामागे लक्षणीय ताकद गोळा होऊ शकते हे त्यांच्या ध्यानात आले आहे. पक्ष उभा करतानाच कांशीराम यांनी निवडणुकीत सहभागी होण्याच्या ज्या पायर्‍या सांगितल्या होत्या - पडण्यासाठी उभे रहाणे, पाडण्यासाठी उभे रहाणे, जिंकण्यासाठी उभे रहाणे - त्यातील एक आणि काही प्रमाणात दोन या पायर्‍या आता ओलांडून झालेल्या आहेत. विशेषतः विदर्भात तर बसप दुसर्‍या पायरीवर उभा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या शायनिंग इंडियाला लोक एकुणात विटलेले असतानाही महाराष्ट्रात सेना-भाजप २५ आणि काँग्रेस-राष्ट्रवादी २३ असे बलाबल होण्यामागे बसपच्या हत्तीने विदर्भात घातलेला धुमाकूळ हे एक प्रमुख कारण होते.

बसपचे उत्तर प्रदेशातले वर्तन पाहिले तर "तिलक तराजू और तलवार, इनको मारो जूते चार" ही घोषणा आता त्यांनी गुंडाळून ठेवली आहे. टक्क्यांच्या भाषेत बोलायचे तर उत्तर प्रदेशात ब्राम्हण १०-१२ टक्के आहेत, साधारण महाराष्ट्रात मराठा आहेत तितके.

महाराष्ट्रात मराठा म्हणजे पाटील गडी, फटफट्या, आंबाशिटर, आता होंडा सिव्हिक, टवेरा इ इ हे चित्र बहुतांशी मराठ्यांच्या बाबतीत खरे नाही. किंबहुना बहुतांशी मराठ्यांच्या आर्थिक पातळीत आणि इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक पातळीत फारसा फरक नाही. मूठभर देशमुख-पवार-कदम-पाटील हे सर्व मलिदा चाटून-पुसून खाताहेत आणि आपल्याला धत्तुरा मिळतो आहे हे हळूहळू नवीन पिढीच्या जाणीवेत उतरते आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांनी ही जाणीव अधिक चरचरीत होते आहे.

या वर्गाला भुरळ घालू शकेल असा एकुलता एक प्रस्थापित पक्ष म्हणजे शिवसेना. पण थोरल्या ठाकरे आता थकिस्त झाले आहेत. आणि उद्धव ठाकरे अजूनही आपली धमक दाखवू शकले नाहीत. अगदी नुकतीच निघालेली शेतकरी दिंडी दिवाकर रावतेंनी अथक परिश्रम करून साकार केली. त्यात शेवटी खोबरे-कोथिंबीर भुरभुरवण्यापुरते उद्धव ठाकरे नागपुरात पोचले. असले वरवरचे सोपस्कार करून माणसे जोडता येत नाहीत हे त्यांना अजूनही कळलेले दिसत नाही.

व्यूहात्मक भागीदारी म्हणून का होईना, बसप आपल्याला काही देऊ करतो आहे हे जर मराठा समाजातल्या तरुण पिढीला उमजले आणि रुचले, तर तो बंध अतीव घट्ट होईलच, पण दोन्ही काँग्रेसचा पाया डळमळायची ती सुरुवात असेल. तसे झालेच तर महाराष्ट्रातील दहा वर्षांनंतरची काँग्रेस (राष्ट्रीय आणि राष्ट्रवादी दोन्ही मिळून) आजच्या उत्तर प्रदेशातल्या काँग्रेसच्या पायरीवर उतरलेली असेल!

इतर मागासवर्गीयांतील अस्वस्थ मंडळी एका नव्या सुरुवातीची वाट पहात आहेत. ती सुरुवात करण्याची धमक दाखवत बसप येतो आहे. त्यांना ताबडतोब गळाला लागतील असे छगन भुजबळ आहेत. भुजबळ बसपच्या पावलावर पाऊल टाकून आपल्यामागे असा उभा रहाणारा एक ठाम वर्ग उभा करत आहेतच. नव्या मुंबईत वसंत डावखरेंचा त्रास वाढू लागला आणि काँग्रेसनेही तिथल्या उत्तर भारतीय लोकांना खुणावायला सुरुवात केली तर गणेश नाईकही त्या वाटेने जाऊ शकतात. विदर्भात रणजित देशमुखही कुठल्यातरी आश्रयाच्या शोधातच आहेत. रणजित देशमुखांची ताकद निवडून येण्याची नसली तरी पाडण्याची निश्चितच आहे आणि ती त्यांनी रामटेकला दाखवून दिली आहे. बसपच्या तत्त्वज्ञानात चपखल बसेल असे हे व्यक्तिमत्त्व आहे. रणजित देशमुखांनाही दुसरे अजून चांगले काही मिळण्याची शक्यता नाही.

प्रकाश आंबेडकर भारिप-बहुजन महासंघ अशी जोडी जुळवून बसलेलेच आहेत. ते बसपशी अतीव आनंदाने हातमिळवणी करू शकतात. इतर रिपब्लिकन गटांबरोबर नाहीतरी त्यांचे फारसे जुळत नाहीच. त्यामुळे बसपने त्यांना सामावून घेत इतरांच्या मुळावर घाव घातले तर त्यांची काहीच हरकत असणार नाही. बसपलाही आंबेडकरांचा अकोल्यातला प्रभाव आणि त्यांच्या आडनावाचा प्रभाव या गोष्टी खुणावतील. नाहीतरी उत्तर प्रदेशात आंबेडकर जिल्हा असा नवीन जिल्हा निर्माण करण्यापासून ते जागोजागी आंबेडकर पार्क उभारण्यापर्यंत मायावतींनी आपले आंबेडकर प्रेम उघड केले आहेच.

जोगेंद्र कवाडेही आपली चतकोर घेऊन बसपच्या बिस्मिल्लामध्ये सामील व्हायला नाखूश नसतील. नाहीतरी खैरलांजी प्रकरण तापवण्याचा त्यांचा प्रयत्न अगदीच विफल झालेला आहे, आणि आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे. आता त्यांना वर्तमानपत्राच्या सातव्या पानावरदेखील दोन ओळी कुणी देत नाही. आणि आमदार नाही म्हटल्यावर कमाई बंद. अशारीतीने प्रसिद्धी आणि पैसा या दोन्ही गरजा भागवायला त्यांच्याकडे काही नाही.

रामदास आठवले आपला गट शाबूत ठेवण्यासाठी जिवापाड धडपड करतील. बसपचा महाराष्ट्रातला प्रवेश रमाबाई आंबेडकरनगर प्रकरणात आठवलेंना शर्ट काढून चोपण्यापासून झाला होता (बनियनवर आठवले जीव घेऊन पळताहेत आणि मागे जमाव त्यांचा पाठलाग करतोय हा फोटो तेव्हा वर्तमानपत्रात झळकला होता). यावेळेस शर्टावर न भागता संपूर्ण वस्त्रहरण होऊन आपण भिकेला लागू याची त्यांना जाणीव असेलच. पण हा विषम सामना वाटतो. बसपच्या हत्तीला एकहाती रोखण्याएवढा आठवल्यांचा वकूब नाही.

बसपने सुरुवातीला चार पावले ठाम टाकली तर वेळेला शिवसेनेला काडीमोड देऊनही मुंडे भाजपला तिकडे नेऊ शकतील. नाहीतरी धाकटेपणाचे चटके फारच सोसावे लागल्याने, आणि नजिकच्या भविष्यकाळात त्यात फारसा बदल होण्याचे चिन्ह दिसत नसल्याने तेही अस्वस्थच आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी शिवसेना लढवणार १६२ आणि भाजप १२६. हा आकडा मान्य केला तर भाजपला महाराष्ट्रात कधीच सत्ता निर्भेळपणे मिळणार नाही. आणि शिवसेना खाली उतरून उतरून १५० च्या खाली कदापिही येणार नाही. अधिकृतरीत्या आपल्याला 'सहयोगी' पक्षापेक्षा कमी जागा घेऊनही अपक्ष उमेदवारांची चलाख पेरणी करून त्यांच्यापेक्षा जास्त जागा निवडून आणणे हे फक्त शरद पवारांनाच जमते!

शिवसेनेतून बसपला थेट रसद पुरवली जाण्याची शक्यता फारशी नाही. जातीवर आधारित राजकारण न करण्याचा हा एक फायदा. पण उद्धव ठाकरेंच्या (राऊत-नार्वेकर दिग्दर्शित) बालिश वागणुकीला कंटाळून काही कट्टर शिवसैनिक तिकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेकापचा मराठवाड्यातला पाया उखडला गेला आहे. आता हा पक्ष फक्त रायगड जिल्ह्यातच शिल्लक आहे. त्यातही एकेक पान गळावया लागलेले असल्याने जयंत पाटलांनाही कुणीतरी लायक मालक मिळाला तर ते आपली उरलीसुरली ताकद तिथे लावायला हसत तयार होतील. नाहीतरी कुठल्याही ठाम आश्वासनाखेरीजच त्यांनी श्रीवर्धनचा गड शिवसेनेला जिंकायला मदत केली होती. इथे बसप जयंत पाटलांना योग्य किंमत देऊ करेल असे वाटते.

मनसेनेतून बसपला बरीच निर्यात होण्याची शक्यता दाट आहे. पुण्यातून विद्यावत्सल नामक हिरा बसपच्या कोंदणात गेलेलाच आहे. जर का बसपने बरे बस्तान बसवले, आणि राज ठाकरेंनी आतापर्यंत दाखवलेले अडाणीपण पुढे चालू ठेवले, तर विक्रम बोकेंसह सर्व बाहुबलींचे पाणी वळचणीला लागायला अडचण येऊ नये.

अशी कुळे जिल्ह्या-जिल्ह्यात पसरली आहेत. बसपचे राज्य नेतृत्त्व अशा सर्वांना लोभावण्यात यशस्वी ठरले, तर उत्तर प्रदेशापाठोपाठ महाराष्ट्र बसपचे शक्तिस्थान ठरेल. आणि २५ नोव्हेंबरच्या मेळाव्याला किती गर्दी होते यावरच हे सर्व अवलंबून असेल असे नाही.

Post to Feedमहाराष्ट्र दर्शन
सिंहावलोकन
छान
गणित
जबरा.
जबरदस्त
उत्तम
उत्तम
समकालीन महाराष्ट्रीय राजकारणाचा आढावा -
असेच
छानच.
सुन्दर विश्लेषण, विवेचन
विद्यावत्सल अन्नाप्रगाडा
आगामी निवडणूकाविषयी काही .....

Typing help hide