डिसेंबर २००७

अमेरिकायण! (भाग १६ : धबाबा!)

ह्यासोबत

अमेरिकेत येऊन त्यातही न्यूयॉर्कमध्ये राहून नायगारा पाहिला नाही असा माणूस मिळणं कठीण. मी बाहेर फिरून आलो तरी जवळचं नायगारा होण्याचा काही योग येत नव्हता. शेवटी एकदाचा तो मणिकांचन की दुग्धशर्करा की काय म्हणतात तो योग आला. पुन्हा एकदा चायनाटाउनच्या चिनी व्यावसायिकांच्या ताब्यात स्वतःला देऊन मोकळे झालो. नेहमीप्रमाणे या चिनी हातावर डॉलर टिकवताना अशी एकही भारतीय कंपनी नाही याची यथासांग खंत वगैरे वाटली. पण नायगारा या शब्दाभोवतीची जादू अश्या तात्पुरत्या खंत वगैरेला मागे टाकून चैतन्याचं वारं अंगात भिनवून गेली. 'नायगारा'.... माझ्यासाठी जादुई शब्द होता. हा धबधबा प्रत्यक्ष पाहणं ही अनेकदा कल्पलेली गोष्ट होती.

'गॅरी' नाव धारण केलेल्या एका चायनीज माणसाने मी तुमचा नायगारा ट्रिपचा गाईड आहे हे जेव्हा "चिंग्लिश" मध्ये घोषित केलं, तेव्हा त्याचं रूप, धांदरटपणा वगैरे बसमध्ये चढण्यापूर्वीच अनुभवलेल्या मला आता पुढचे दोन दिवस प्रचंड करमणूक आहे हे जाणवलं. त्याचं काय झालं, आम्ही  त्या चायनाटाऊनच्या गलिच्छ रस्त्यांवर आमची बस क्र.२ शोधत होतो. एक उगाच इथेतिथे पळणारा चायनीज कर्मचारी पकडला. त्याला विचारले "व्हेअर इज बस नं.२?" तर तो अगदी छातीवर हात ठेवून ऐटीत म्हणाला "मी!!".आम्हाला सगळ्यांना इतकं हसू आलं. असा चान्स सोडतोय की काय. सगळ्यांच्या टवाळक्या चालू झाल्या "बापरे हाच का बस क्र. दोन आम्हाला वाटलं चांगली चार चाकांची गाडी असेल हा तर माणूस निघाला." "आता कसं या बसने जायचं. खांद्यावर हात ठेवून गाडी गाडी करत नेणार की काय हा बस नंबर दोन" वगैरे वगैरे.. आम्ही मराठीत बोलत होतो म्हणून बरं.. पुढे त्याने हातातले ग्लासेस पाडले, ड्रायव्हरला आगाऊ उपदेश करून अपमान करून घेतला आणि आम्ही त्याच्या त्या आणि इतर अनेक धांदरट लीला पाहून चार्ली चॅप्लिनचा चित्रपट पाहिल्याप्रमाणे हसून कोलमडायच्या बेताला आलो होतो. तेव्हा हा 'गॅरी' आपला गाईड असणार आहे हे कळल्यावर प्रवास हसतखेळत पेक्षा हसत होणार हे नक्की झालं.

गाडी चालू झाल्यावर या गॅरीला काय झालं कोणास ठाऊक अचानक माईकमधे अगम्य आवाज काढू लागला. काही वेळाने जाणवलं की हा बोलतो आहे. आणि चायनीजमध्ये बोलतो आहे. चायनीज भाषा शब्दांपेक्षा आवाजांनीच बनली आहे की काय असं मला त्यावेळी वाटलं. मजा अशी की त्या बसमध्ये एकही प्याशिंजर चायनीज नव्हता!! गॅरिसाहेब एकटेच चायनीज मध्ये बोलायचे आणि मग ते इंग्रजीमध्ये भाषांतर करून सांगायचे. अर्थात त्याचं इंग्रजी हे अगदी बिनअस्तराचं होतं. (जरी त्याच्याकडे बघून उगाच हसू येत होतं तरी त्याचं एकीकडे कौतुकही वाटत होतं. कोणाला कळो वा ना कळो मी आधी चायनीजमधूनच बोलणार, तेही अमेरिकेत! हा बाणा काहीसा स्तिमित करणाराच होता). जसजसं नायगारा जवळ येऊ लागलं तसतसं गॅरी प्रकरण डोक्यातून जाऊन पुन्हा डोळे त्या धबधब्याकडे लागले.

गॅरिबुवांनी एकदाचं नायगारा जवळ आल्याची घोषणा केली. सगळ्यांचे कॅमेरे सरसावले. दूरवर एक तुषारांचा ढग दिसू लागला. "आह! नायगराऽऽऽऽ "असे उद्गार अनेक मुखांतून एकत्र निघाले. ते क्षितिजावरूनही नजरेला सुखावणारं तुषारवलय  पुढे बघायला मिळणाऱ्या आनंदाची केवळ नांदी होती. गाडी नायगारा धबधब्याजवळ पोचली. गाडीतच त्या धबधब्याच्या आवाज पोचत होता. सगळ्यांना त्याच्या दर्शनाचे वेध लागले होतेच.  बसमधून बाहेर येताच आधी सगळे कठड्याकडे धावले. तिथून जो काही प्रपात डोळ्यांना दिसला तो अवर्णनीय होता. ते चित्र डोळ्यांतच मावत नव्हते ते लेखणीत उतरवणे माझ्यासारख्याला तर शक्यच नाही.

"मेड ऑफ मिस्ट" असं सुंदर नाव धारण केलेली तुषारकन्यका होडी आम्हाला त्या महाप्रचंड धबधब्याच्या अगदी गाभ्यात नेणार होती. आता सगळे त्या बोटीत बसले. अखंड क्लिकक्लिकाट चालू होता. सगळेजण ते डोळ्यातही न मावणारं ते दृश्य छबियंत्रांत माववायचा व्यर्थ प्रयत्न करत होते. इथे मला पटलं, काही ठिकाणं शब्दात मांडणं कठीण असतात, काही चितारणं कठीण असतात, काही फोटो अथवा विडियोमध्ये अडकवता येत नाहीत.. पण काही जागा अश्या आहेत त्या मानवाला ज्ञात कोणत्याही कलेने, कृत्रिम यंत्रणेने त्या पकडता येत नाहीत. त्या आपण फक्त स्तिमित होऊन अनुभवू शकतो. त्या किती छान आहेत हे व्यक्त करण्याचा फुटकळ प्रयत्न करू शकतो. या गोष्टी केवळ अनुभवता येतात... शब्द, रंग, रेषा, स्वर, दृश्य या साऱ्या साऱ्यांच्या पलीकडलं हे असतं

आमची होडी त्या विशाल जलप्रपातापुढे एखाद्या धीट योद्ध्यासारखी संक्रमण करत होती. आम्ही त्या धबधब्याच्या गाभ्यात पोचलो. लोकांची बडबड केव्हाच बंद झाली होती. आता हातातल्या कॅमेऱ्यांची तडफडही थांबली. या अफाट भयचकित करणाऱ्या सौंदर्यापुढे नतमस्तक होताना मला तरी समर्थ रामदासांच्या "शिवथर घळीचे" वर्णन करताना रचलेल्या ओळी मनात घुमल्या...

गीरीचे मस्तकी गंगा ।
तेथुनि चालिली बळे ।
धबाबा लोटती धारा ।
धबाबा तोय आदळे ॥

नायगाराच्या तुषारांचे ढग, तो ध्वनिकल्लोळ, तो तुषारांचा मारा.......

गर्जतो मेघ तो सिंधु ।
ध्वनि कल्लोळ उठीला ।
कड्यासी आदळे धारा ।
वात आवर्त होतसे ॥

त्या प्रचंड तुषारांनी आम्हालाच काय पण अंगावरच्या रोमांचांनाही रोमांचित केले होते.....

तुषार उठती रेणु ।
दुसरे रज मातले ।
वात मिश्रीत ते रेणु ।
सीत मिश्रीत धुकटे ॥ ३॥

दराच तुटला मोठा ।
झाड खंडे परोपरी ।
निबिड दाटली छाया ।
त्यांमध्ये वोघ वाहाती ॥ ४॥

ही मेड ऑफ मिस्ट म्हणजे माणसाने केलेली कमाल आहे. या ठिकाणी अमेरिका आणि कॅनडा यांनी धबधब्याच्या एवढे जवळ नेले आहे की कोणी विचारही नाही करू शकत. या धबधब्याबरोबरच, त्या अनामिक तंत्रज्ञ आणि ते काम केलेले मजूर/नाविक यांनाही मनोमन सलाम ठोकला. कॅनडाच्या बाजूने तर या धबधब्याच्या मागे जायला गुहा वगैरे बांधली आहे

कपाटे नेटक्या गुंफा ।
तापसी राहती सदा ।
नेमस्त बांधली नाना ।
उत्तमे निर्गळे स्थळे ॥

ही मेड ऑफ मिस्ट होती तरीही बहुदा तंत्रज्ञांना हा धबधबा लांबच वाटत असावा. त्यामुळे 'केव्ह ऑफ विंड' नावाची अनोखी कल्पना प्रत्यक्षात आली. हि कल्पना ज्या कोणाला सुचली त्याला आमचा शि‌.सा.न. आणि दंडवतही!! धबधबा जवळून बघणे आणि त्यात भिजायची संधी मिळणे यात फरक आहे. आणि ही वातगुंफा तुमची नायगारामध्ये भिजण्याची हौसही भागवते. नायगाराचा जो सगळ्यात छोटा धबधबा आहे त्याच्या पायथ्याशी जाता येतं. त्या नायगाराच पायथ्याशी उभा राहिलो आणि त्या प्राप्ताकडे पाहिलं.. मला विश्वरूप दर्शन झाल्यासारखं वाटलं. आवाज खूप असला तरी त्या नादमय प्रपातातून माझ्या कानात केवळ एकच स्वर घुमत होत "ओऽऽऽऽऽमऽऽऽऽ"... सर्वप्रथम ओंकार जन्माला आला हे तिथे मला पटलं. निसर्गाच्या या महान प्रदर्शनातून नैसर्गिकरीत्या तोच नाद निघावा यात मला तरी आश्चर्य वाटलं नाही 

कर्दमु निवदेना तो ।
मनासी साकडे पडे ।
विशाळ लोटली धारा ।
ती खाली रम्य विवरे ॥

[float=font:vijay;size=25;breadth:200;color:22A220;]खरंतर या धबधब्यावर लिहून त्याची मजा म्हणा किंवा आब म्हणा घालवायचा नाही असं मी ठरवलं होतं.. पण हे अमेरिकायण नायगाराशिवाय असणं मला प्रशस्त वाटेना.[/float] पण हा प्रयत्न खूपच तोकडा आहे. तुमच्यापैकी ज्यांनाज्यांना नायगारा पाहायची, नव्हे अनुभवायची नव्हे नायगारा व्हायची संधी मिळेल त्यांनी ती चुकवू नये हे अत्याग्रहाचं सांगणं आलंच.. ही जागा माझं या आयुष्यात पाहणं झालं ही माझी पूर्वजन्मीची पुण्याईच समजतो!!

विश्रांती वाटते तेथे ।
जावया पुण्य पाहिजे ।...

.....हेच शेवटी खरं

-ऋषिकेश

टीप..
१. शु.चि. अजूनही बंद आहे. तेव्हा शुद्धलेखनाची व टंकनदोषाची चुभुदेघे
प्रशासक, शु.चि. कधी चालू होई शकेल काही कल्पना देता येईल का?
२. बाकी सहलही मजेत पार पडली पण नायगाराने माझं मनोविश्वपूर्णपणे झाकोळल्याने बाकी सहलीवर या लेखात लिहिणे गरजेचे वाटले नाही

Post to Feedपुनःप्रत्यय
सुंदर लेख!
हेच म्हणतो..
झकास!!
जिओ
अगदी खरे आहे
तो..... नाएग्रा फोटो
अभिनंदन आणि शुभेच्छा.
पुन: प्रत्यय आणि-----
केव्ह ऑफ द विंड्स / कॅनडाची बाजू
बाजू
वातगुंफा की पवनगुंफा?
धन्यवाद
केव्ह ऑफ विंडस
वाव्वा!
असा दिसत असेल ना?
चित्रात
इंद्रधनुष्य
सुरेख.
विशेषण आवडलं.
सगलेच लेख अतिशय छान आहेत

Typing help hide