नोकरांना खाज सुटली, घर्म फुटला शेटजी

प्रसाद यांनी आपल्या हार्ड हिटिंग (यासाठी कोणीतरी मराठी प्रतिशब्द सुचवा रे) आणि अप्रतिम गझलेत जरी नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी असे म्हटले असले तरी खोडसाळाची विडंबकाची जात काही जाता जात नाही. तेव्हा...

नोकरांना खाज सुटली, घर्म फुटला शेटजी
घोरतो लावून एसी मात्र टकला शेटजी!

एक वाटी उंदियोची सांडली रस्त्यावरी
अन तिथे रस्त्यावरी बैसून चरला शेटजी...

का जुन्या मालाप्रमाणे नाव सिन्हा लावता ?
का पटेलांचा, शहांचा भाव पडला शेटजी ?

का रिकामी पाडता रेशनदुकाने आमची ?
हाय, गोदामात सारा माल दडला शेटजी...

पाहता 'तसल्या' सुखांच्या जाहिराती रोज का ?
काय शेठाणीस तुमचा जीव विटला शेटजी ?

भाविकांची बोंब आणिक कर्णकर्कश आरत्या
मंदिरी येऊन बहिरा देव बनला शेटजी

ढोकळे, फरसाण, गाठ्या, अन बियरच्या बाटल्या
टंच मदिराक्षीस बघता नाच म्हटला शेटजी

रोज कोल्ह्यांच्या परी करता तुम्ही साळसुदकी
त्याच त्या करता कशाला रोज नकला शेटजी ?

चार क्विंटल ? आठ क्विंटल ? वाढवा ढेरी जरा...
एवढ्या वजनात कसले थंड पडला शेटजी ?

भुक्त आहे मी, जगी सर्वत्र कवितावानवा
खोडसाळा कोण देई रोज गझला शेटजी ?