आयुष्याचे नाटक - प्रवेश दुसरा

प्रवेश दुसरा - होऊन जाऊदे

आमच्या कडची ८४ नी त्यांच्या कडची ३७२ माणसं जमवून (लग्नाचा खर्च अर्धा अर्धा) आमचं लग्नं झालं आणि आम्ही नवरे पणाच्या नव्या नोकरीत रुजू झालो.

आपल्या पूर्वजांनी गृहस्थाश्रम नंतर वानप्रस्थाश्रमाची योजना केली हा निव्वळ योगायोग नसावा. संसार केल्यावर माणसाला आपसूकच आयुष्याचा कंटाळा येऊन, दूर कुठे तरी एकांतात राहावंसं वाटणार हे समजून ती सोय केली असावी. पण ही माणसं जंगलात जाऊन तरी सुखी होत असतील का ह्या बद्दल मला शंकाच आहे. कारण तिथेही बायको सोबत असणारच. जंगलातही बायको मोठी पर्णकुटी बांधू म्हणून मागे लागत असेल काय? त्यात तिचे आई वडीलही जंगलातच असल्याने छोटी तर छोटी, पण बाबांच्या शेजारी बांधू म्हणून नवऱ्याला पिडत असेल काय? अहो सामान्य माणसांचं सोडाच, पण प्रत्यक्ष रामरायालाही वनवासात असून सुद्धा बायको च्या हट्टापायी नव्या फॅशन चा ब्लाउजपीस आणायला जावंच लागलं होतं.

थोडक्यात काय, प्रत्यक्ष भगवंतालाही जे सांसारिक भोग चुकले नाहीत, ते आमच्या सारख्या नव्यानेच संसारात पडलेल्यांना कसे चुकावेत. देवाच्या कृपेने आम्हाला बायको चांगली मिळाली आहे. दिवसातनं एखाद वेळा ओरडा, २/३ दिवसातून एकदा आदळ-आपट आणि आठवड्यातून एकदा 'मी म्हणून तुझ्याशी लग्नं केलं' हे ऐकवण्यावर तिचं समाधान होतं.

पण खरं सांगायचं तर ह्या संसारातही मजा असते. आणि खास करून पहिल्या काही दिवसांची मजा तर निराळीच असते. तिच आता आम्ही तुमच्या सोबत शेअर करणार आहोत. त्याचं काय असतं, पहिला गुलाबजाम जितका गोड लागतो तितके पुढचे लागत नाहीत. जेवण कितीही सुंदर झालं तरी पहिल्या घासाचीच चव लक्षात राहते. तसंच संसारांचंही. (बियरचं तसं नसतं, पहिल्या घोटा इतकाच शेवटचा घोटही झकास वाटतो. किंबहुना, कुठलाच घोट शेवटचा असू नये असं वाटतं. त्यामुळे 'संसार हा मिठाई सारखा गोग्गोड नसून बियर सारखा फेसाळता हवा' असा एक नव सुविचार मला सुचलाय) असो.

मी प्रायव्हेट गुलाम असल्याने मला लग्ना साठी मोजून २ दिवस सुट्टी मिळाली. ती सुद्धा देताना मालकाने तुला म्हणून देतोय असं ऐकवलं. ही सरकारात असल्याने हिला १८ दिवस सुट्टी मिळाली. आम्हाला कुठे फिरायला जायला जमलं नाही म्हणून शेवटी आई बाबांनीच आठवडाभर कोंकणात राहायला जायचं ठरवलं. जाता जाता बाबांनी मला कोपऱ्यात घेऊन सांगितलं 'तुम्हाला एकमेकांना वेळ देता यावा, समजून घेता यावं म्हणून एकटं सोडून जातोय. तेव्हा एकमेकांच्या उरावर बसू नका. झक मारली नी ह्यांना एकटं सोडलं असं म्हणायची पाळी आणू नका. दया कर आमच्यावर.' तर असा आमचा आठवणीतला आठवडा सुरू झाला.

पहिल्या दिवशी उठलो तर चक्क नऊ वाजले होते. उडालोच. शेजारी बायको पसरली होती. तिला हालवून जागं केलं नी म्हणालो 'अगं नऊ वाजले. ऑफिस उशीर होणार आता. उठवलं का नाहीसं?' हिने डोळे न उघडताच सवयी प्रमाणे प्रश्नाला प्रश्न दिला 'सांगितलं होतंस?' आणि कूस बदलली.

लग्ना आधी बिचारी आई न सांगता उठवायची. सकाळी सात वाजता 'सोन्या ऊठ' अशी सुरुवात करून आठ वाजे पर्यंत 'अरे डुकरा सारखा किती वेळ लोळत पडणारेSSSस???' इथ पर्यंत पोचायची. डुक्कर म्हटलं की आठ वाजले ही खूणगाठ मी मनाशी बांधली होती. तेव्हा उठायचं.

तसा मला नोकरी करायचा फार उत्साह नाहीये. पण बाईक, पेट्रोल, बियर, सिगारेटी, सिनेमा, खरेदी, पार्ट्या हे सगळं करायचं असेल तर स्वतःच्या पैशानं करा असं बाबांनी सांगितल्याने झक मारत नोकरी करावीच लागते. वर बाबा असंही म्हणाले 'मी माझ्या पेन्शन मध्ये फार फार तर तुला २ वेळचा वरण भात, आठवड्यातून एकदा तोंडी लावायला पापड नी सणासुदीच्या दिवशी अर्ध्या केळ्याची शिकरण देऊ शकेन. जमत असेल तर बस घरी.' आई माझ्यावर कधी रागावली की बाबा नेहमी तिची समजून काढताना 'उंच वाढला एरंड...' असं काही तरी म्हणत. वाक्याचा नक्की अर्थ माहिती नाही, पण ते मला उद्देशूनच काही तरी असावं असा मला संशय आहे.

तर, पहिल्या दिवशी मी घाई घाईत कसाबसा आवरून घरा बाहेर पडलो. संध्याकाळी घरी आलो तर हिने माझ्या पुढे डझन भर हॉटेल्स ची मेनू कार्डस नाचवत विचारलं 'काय मागवायचं?' मी म्हणालो घरीच कर काही तरी. त्यावर मॅडम लाडात येत म्हणाल्या 'मला स्वयंपाक नाही येत.' मी - 'काय??? तुला स्वयंपाक नाही येत???" ह्या प्रश्नावर तिने सवयी प्रमाणे उत्तर न देता प्रश्न टाकला 'तुला येतो?' मी गप्प. मॅडम रागावल्यात हे माझ्या लक्षात आलं. ही रागावली की नेहमी अशीच दोन शब्दात गुगली टाकते. गुपचुप जेवण मागवलं. रात्री झोपताना डबल बेड असल्याने मला गाद्या घालाव्या लागल्या नाहीत. पण कुठल्याही क्षणी 'पाय चेपून दे' अशी आज्ञा यायची धाकधूक मनात होतीच. पण सुदैवाने तसं काही झालं नाही.

दुसरा दिवसही असाच गेला. माझी गडबड. मॅडम निवांत. घरी यायला उशीर. बाहेरून जेवण. झोपताना धाकधूक.

तिसरा दिवसाची सुरुवात मात्र वेगळी झाली. हिने चक्क मला उठवलं. घड्याळात बघितलं तर मध्यरात्रीचे सहा वाजले होते. इतक्या लवकर कशाला उठवलंस असं विचारणार तेवढ्यात हिने हातात पिशवी देऊन सांगितलं 'दूध घेऊन ये.' आणि ' जाताना चावी घेऊन जा, उगाच माझी झोपमोड नको' हे वर. दूध घेऊन येता येता निवांत पणे एक सिगारेट ओढावी म्हणून एका बागेच्या कट्ट्यावर टेकलो नी सिगारेट पेटवली. २-४ झुरके मारले नसतील इतक्यात एक आजोबा समोर येऊन उभे राहिले. त्यांनाही हवी असेल म्हणून पाकीट पुढे केलं तर आजोबा फिसकटले 'इथे सकाळी सकाळी लोकं शुद्धं हवेत श्वास घेण्यासाठी फिरायला येतात आणि तुम्ही चक्क सिगरेट ओढताय?' गुपचुप उठलो नी घरी आलो. घराच्या चावी ऐवजी सवयी प्रमाणे बाइकची चावी खिशात टाकल्याने बेल वाजवून हिला उठवावं लागलं. दार उघडून ही काही तरी पुटपुटली नी बाहेरच्या सोफ्यावरच आडवी झाली.

आमचा पहिला आठवडा असाच गेला.

सोमवार उजाडला. येता येता उद्या आई घरी येणार नी फायनली आता घरचं जेवायला मिळणार ह्या आनंदात होतो. बेल वाजवली. हिने प्रसन्न हसत दार उघडलं (ही अशी हसली की माझ्या मनात पुढील संकटाची पाल चुकचुकते) बूट काढून सोफ्यावर पसरलो इतक्यात ही कप घेऊन आली 'चहा घे...' आयला मी उडलोच. बायको नी चक्क चहा केला होता. माझ्या कडे बघून हसत हसत ही म्हणाली 'कपडे बदलून घे. गरम गरम जेवायला वाढते.' हातात कप तसाच घेऊन मी हिच्या मागे मागे किचन मध्ये गेलो, तर गॅस वर कुकर फुसफुसत होता आणि आमची बायको चक्क कणीक मळत होती. आता मी कोसळायचाच बाकी होतो. मॅडम माझ्याकडे बघून पुन्हा गोड हसल्या नी कणकेने भरलेले हात गळ्यात टाकून म्हणाल्या 'मला टिपीकल नवरा नको होता म्हणून तुझ्याशी लग्नं केलं. पण लग्नानंतर तू बदलतोस का हे पाहण्या साठी तुला आठवडा भर त्रास दिला. त्रासा बद्दल सॉरी, आणि न बदलल्या बद्दल थँक्स'. असं म्हणून बायको नी चक्क मला डोळा मारला. मी अजूनही ह्या धक्क्यातून सावरलो नव्हतो. पण काही तरी बोलावं म्हणून तोंड उघडलं आणि तेव्हढ्यात कुकरची शिट्टी वाजली.