मे २० २००८

एक आध्यात्मिक पंथ: शेवईवाद

ह्यासोबत

शेवईवाद (Pastafarism किंवा Flying Spaghetti Monsterism)

मला ह्या पंथाविषयी येथे माहिती देताना आत्यंतिक आनंद होत आहे. हा आनंद शब्दबद्ध करणे खूपच अवघड आहे. ह्या पंथाचा अनुयायी बनल्यानंतर माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. सर्व गोष्टींचा एकदम कायापालट झाला आहे. गेले कित्येक दिवस मला 'कोऽहम्' हा प्रश्न सतावत होता. ह्या प्रश्नाचे उत्तर मला आता हळू हळू मिळू लागले आहे. मला येणारा अनुभवदेखील शब्दबद्ध करणे अवघड आहे. पण एक छोटासा प्रयत्न म्हणून इथे ह्या पंथाविषयी थोडे लिहू इच्छितो.

मीच नव्हे तर माझ्यासारखे इतर लाखो लोक 'उडणाऱ्या शेवईराक्षसा'चे भक्त आहेत. आमचे श्रद्धास्थान हा कोणी देव नसून राक्षस आहे ह्याबद्दल आश्चर्य वाटू नये. अशी अनेक उदाहरणे आपल्याला आजूबाजूला दिसतील की जिथे श्रद्धास्थान हे कोणी देव/देवी नसून कोणीतरी फूटभर दाढी असलेले नाहीतर आठ-दहा इंच लांब मिशी असलेले नाहीतर गरुडाच्या (की गिधाडाच्या?) घरट्याप्रमाणे केशसंभार (की 'केस'पसारा? ) असणारे बाबा/बुवा असतात.

आमची अशी प्रबळ श्रद्धा आहे की ह्या विश्वाची निर्मिती 'उडणाऱ्या शेवईराक्षसा'ने केली आहे. आमचा असा ठाम विश्वास आहे की आपल्या आजूबाजूला दिसत असलेला विश्वपसारा हा 'त्या'नेच घातला आहे. आपल्याला दिसणाऱ्या आणि षडिंद्रियांना (नेहमीची पंचेंद्रिये आणि एक जगप्रसिद्ध सहावे इंद्रिय ज्याच्या भरवशावर जगातील अनेक 'कारभार' चालतात... त्यावर एक इंग्लिश चित्रपटसुद्धा आहे म्हणे...) जाणवणाऱ्या सर्व गोष्टी 'त्या'नेच निर्माण केल्या आहेत. आम्हाला असे वाटते की विज्ञान जरी डांबिस (इंग्लिशमध्ये ह्याचे स्पेलिंग बहुतेक dambish असे करतात) डार्विनच्या उत्क्रांतिवादाला खतपाणी घालणाऱ्या गोष्टी (ह्याला काही नास्तिक लोक वैज्ञानिक पुरावे म्हणतात) शोधून काढत असले तरी गम्मत अशी आहे की 'त्या'नेच 'असे' शोध लागावेत अशी योजना करून ठेवली आहे. सर्व गोष्टी 'त्या'च्याच इच्छेप्रमाणे घडतात.

मी हा लेख लिहिण्याचे कारण की, हा पंथ जास्तीत जास्त लोकांना माहीत व्हावा आणि अधिकाधिक लोक ह्या पंथाचे अनुयायी होऊन त्यांचे पारलौकिक जीवन समृद्ध व्हावे अशी माझी सदिच्छा आहे. आमचे म्हणणे एवढेच की जर इतर पंथ हे जरी वरवर अवैज्ञानिक दिसत असले तरी ज्याप्रमाणे मूलतः वैज्ञानिकच असतात त्याप्रमाणेच हा पंथदेखील मूलतः वैज्ञानिक आहे. (किंबहुना आमचे म्हणणे असे आहे की केवळ हाच पंथ वैज्ञानिक आहे. बाकी सगळे एकदम थोतांड!!)

काहींना ह्यावर विश्वास ठेवणे कठीण वाटत असेल तर ह्या पंथाबद्दल थोडेसे सविस्तर सांगतो. आमच्याकडे असे पुरावे आहेत की 'उडणाऱ्या शेवईराक्षसा'नेच विश्वनिर्मिती केली आहे. अर्थात् त्यावेळी आपल्यापैकी कोणीही ती महान गोष्ट पाहण्यास अस्तित्वात नव्हते. पण आमचे अनेक धार्मिक ग्रंथ त्या महनीय घटनेचे वर्णन करतात. (हे ग्रंथ केवळ कल्पनाविलास नसून त्याकाळी घडलेल्या घटनांचे पुरावे आहेत.) त्याच्या लीलांचे वर्णन करणाऱ्या शेकडो पोथ्या उपलब्ध आहेत. आपल्याला हे वाचूनदेखील आश्चर्य वाटेल की 'उडणाऱ्या शेवईराक्षसा'च्या अनुयायांची जगभरातील संख्या आता जवळपास एक कोटीपर्यंत पोचली आहे... आणि वाढते आहे (वाढता वाढता वाढे, भेदिले शेवमंडळा...) आम्ही मुळात ह्या पंथाची फारशी चर्चा करत नाही कारण अनेक लोकांचा असा ग्रह आहे की आमची श्रद्धा ही अत्यंत अवैज्ञानिक असून आमच्याकडे तिची सत्यता सिद्ध करण्यासाठी कोणतेच सबळ पुरावे उपलब्ध नाही आहेत. मुळात ह्या लोकांना एक गोष्ट कळत नाही की ते सर्व पुरावे 'त्या'नेच मुद्दाम लपवून ठेवले आहेत. उदाहरणार्थ, एखादा वैज्ञानिक एखाद्या दगडाच्या नमुन्याचे 'कार्बन-डेटिंग' करतो आणि त्याच्या साहाय्याने असे सिद्ध करतो की जवळपास ७५% कार्बन-१४ इलेक्ट्रॉन विसर्गामुळे नायट्रोजन-१४ मध्ये रूपांतरित झाला आहे. कार्बनची अर्धायू (half-life) ५३७० वर्षे असल्याने तो त्यावरून असे अनुमान काढतो की तो दगडाचा नमुना जवळपास १०००० वर्षे जुना आहे. पण आपल्या ह्या निरागस वैज्ञानिकास एक गोष्ट समजत नसते की, तो जेव्हा जेव्हा काही गोष्टी मोजतो तेव्हा तेव्हा 'उडणारा शेवईराक्षस' त्याच्या निरीक्षणाचे आकडे पूर्णपणे बदलून टाकतो. कारण 'तो' सर्वव्यापी, सर्वशक्तिमान आहे. हे असे होऊ शकते आणि हे असे पूर्वीदेखील घडलेले आहे. आमच्याकडे असलेल्या अनेक पुरातनकालीन हस्तलिखितांत त्याचे पुरावे आहेत. 'तो' अर्थातच अदृश्य आहे आणि बहुतेक सर्व पदार्थांमधून लीलया आरपार जाऊ शकतो. त्यामुळे त्याला कोणीही पाहू शकत नाही.

आता आपणांस कळले असेल की मी हा लेख लिहून ह्या पंथाची माहिती देणे किती महत्त्वाचे आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की जागतिक तापमानवाढ, भूकंप, बाँबस्फोट, चक्रीवादळे ह्या सर्वांचे मूळ कारण हे इ‌.स. १८०० पासून सतत घटत जाणारी 'चाच्यां'ची (समुद्री चाचे असतात ना? त्यांची) संख्या! वाचकांच्या शंकासमाधानासाठी (आणि पुराव्यादाखलसुद्धा) गेल्या दोनशे वर्षांतील माहितीच्या आधारे अचूक संख्याशास्त्रीय पद्धतीने काढलेला एक महत्त्वाचा आलेख मी खाली देत आहे.

ह्या आलेखावरून चाच्यांची संख्या आणि सरासरी जागतिक तापमान ह्यांतील व्यस्त गुणोत्तर सहजच दिसून येते.

माझे म्हणणे इतकेच आहे की अन्य पंथांच्या सोबत ह्या पंथाचाही वाचकांनी विचार करावा आणि ह्या पंथाचे अनुयायी व्हावे. वाचक तितके उदारमतवादी आणि श्रद्धावान निश्चितच असतील. नास्तिक वाचकांनी प्रतिसाद देण्याचे कृपया टाळावे. कारण त्यांना नास्तिक करणारा 'तो'च आहे.

आपला,

चैत रे चैत.
(लेखकाने विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. (म्हणजे वरील माहिती निस्संदिग्धपणे खरी मानावी.))

ता. क. : 'तो' विश्वनिर्मिती करतानाचे एक कलात्मक चित्र खाली देत आहे. लक्षात ठेवा, आपण सर्वजण त्याचीच निर्मिती आहोत.

Post to Feedअफलातून
धन्यवाद
डोक्यावरून गेला हो
अरेरे...
मूळ कल्पनेचा संदर्भ द्यावा!!!(विकिपिडीया)
मूळ कल्पना... वेंगँझा...
चैत रे चैत, चाचे-वर्धनासाठी आपण काय उपाय सुचवता?
चाचे वर्धन
आंतरजालीय चाचेगिरी
श्री. गोळे यांची शंका
अर्थबोध
पूर्वीचा संदर्भ
पुण्यामुंबईत काही कार्यक्रम आहे का?
शेविस्मा
शेविस्मा, कार्यक्रमांचे स्थळ आणि इतर...
मा. प्रशासक महोदय, या लेखाच्या
तिरुपती मंदीर हे प्राचीन काळचे शेवयी मंदिरच होते
नक्कीच...
निव्वळ अप्रतिम!
आभार
वाः!
छान
दिक्षा

Typing help hide