बुद्धाचे दात - २

ख्यातनाम हिंदी साहित्यिक शरद जोशी यांच्या एका कथेचे हे स्वैर भाषांतर आहे.

माओचे सरकार आल्यावर मात्र परिस्थिती बदलली, आणि ल्यू च्यांग पांग आपले भारीतले कपडे लपवून ठेवून परत जुने कपडे लेवू लागला. त्याने दुकानाबाहेर लाल झेंडा लावून टाकला, आणि दुकानात माओची एक तसबीर.

एके दिवशी ल्यू च्यांग पांगला नव्या सरकारकडून एक पत्र आले. त्यात असा आदेश होता, की त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता तीन माणसांच्या एका समितीसमोर उपस्थित राहावे आणि ते विचारतील त्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. ही समिती पेकिंगमधील प्रत्येक व्यक्तीची नीट पडताळणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आली होती.

दुसऱ्या दिवशी ल्यू च्यांग पांग ठरल्या वेळेला मुकाट्याने त्या समितीसमोर हजर झाला. दुसरा मार्गच नव्हता.

बारीक काड्यांचा, स्वस्तातला चष्मा लावलेल्या, समितीच्या अध्यक्षाने ल्यू च्यांग पांगला प्रश्न विचारायला सुरुवात केली. "कॉम्रेड ल्यू च्यांग पांग, कॉम्रेड माओ त्से तुंग यांच्या महान नेतृत्वाखाली आणि कॉम्रेड माओ त्से तुंग यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करून चीनमध्ये जी महान क्रांती झाली आहे, ती चीनच्या जनतेसाठी शुभ आहे असे तुम्हांला वाटते का? तुमची या क्रांतीला सहानुभूती आहे का?"

"अर्थातच कॉम्रेड. ही क्रांती चीनच्या जनतेला, आणि विशेषतः चीनच्या नेत्यांना फारच फायद्याची ठरणार आहे असे माझे मत आहे. मी कायमच या क्रांतीला पाठिंबा देत आलो आहे. माझे अख्खे जीवन पुंजीपतींचे दात उपटण्यात गेले आहे."

"शाबास कॉम्रेड, पण तुम्ही हे सांगाल का, की पुंजीपतींचे दात तुम्ही कसे उपटलेत, आणि क्रांतीला कसा पाठिंबा दिलात?"

"मी त्यासाठी तर माझे दुकान उघडले. तिथे मी त्यांचे दात उपटून त्यांचा त्रास वाढवीत असे."

"शाबास कॉम्रेड. पण आम्हांला तर असे कळले आहे, की दात उपटल्याने त्यांचा त्रास कमी होत असे. मग तुम्ही म्हणताय ते काय?"

ल्यू च्यांग पांग खदादून हसला. "सगळ्यांनाच वाटतं की दात उपटल्याने त्रास कमी होतो, पण प्रत्यक्षात तसे होत नाही. एक दात उपटला गेला, की लगेच माणूस अस्वस्थ होतो. त्याला म्हातारं झाल्यासारखं वाटू लागतं. मृत्यू जवळ आल्याचा भास होतो. उत्साह निचरून जातो. कॉम्रेड साहेब, मी पेकिंगमधल्या सगळ्या पुंजीपतींचा उत्साह त्यांचे दात उपटून नाहीसा करून टाकला आहे."

"तुम्ही हे कॉम्रेड माओ त्से तुंग यांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करून केलेत काय?"

"अर्थातच. मी गनिमी काव्याने दात उपटीत असे. ज्यांचे दात उपटले जात असत त्यांनाही पत्ता लागत नसे. ही माझ्याकडे वंशपरंपरागत चालत आलेली देणगी आहे. माझ्या पूर्वजांनी हिंदुस्तानात जाऊन खुद्द भगवान बुद्धांना दंतवेदनेपासून मुक्ती दिली होती. माझ्या यशामध्ये कॉम्रेड माओ त्से तुंग यांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे आणि तसे पत्रही लिहिले आहे. त्यांना मी प्रदीर्घ आयुरारोग्य चिंतीतो. जोवर आभाळात सूर्यचंद्र आहेत, तोवर माओ चीनवर राज्य करोत. त्यांनी मला लिहिलेले पत्रच दाखवतो."

माओचे नाव ऐकून समितीतले तिन्ही कॉम्रेड खाडकन उठले. जेव्हा 'ते' पत्र त्यांच्या हातात देण्यात आले, तेव्हा त्यांचे हात हर्ष आणि भय अशा संमिश्र भावनांनी थरकापत होते. तिघांनीही उभ्याउभ्याच त्या पत्राचे वाचन केले.

"कॉम्रेड ल्यू च्यांग पांग, तुमचे अभिनंदन असो. आता आम्हांला कुठलाच प्रश्न विचारायचे काहीच कारण उरले नाही. कॉम्रेड माओ त्से तुंग यांचे हे पत्र तुम्ही संभाळून ठेवा. जेव्हा चीनमधल्या दंतवैद्यांचा महासंघ गठित होईल, तेव्हा हे पत्र म्हणजे त्या महासंघाचा मॅनिफेस्टो ठरेल. काय विचार जाहीर केले आहेत या पत्रात कॉम्रेड माओ यांनी! प्रत्येक दंतवैद्याला या पत्राची एक प्रत कायम जवळ बाळगणे अपरिहार्य केले पाहिजे. जो तसे करणार नाही, त्याला शिक्षा झाली पाहिजे. आता आपण जाऊ शकता."

ल्यू च्यांग पांग कमरेतून झुकला. "धन्यवाद कॉम्रेड साहेब, धन्यवाद. माझ्या दुकानात या कधी जमलं तर. तिथे माझ्या पूर्वजाने उपटलेले खुद्द भगवान बुद्धांचे दात दाखवीन मी तुम्हांला. अगदी फुकट!"

निघताना त्याने त्या तिन्ही कॉम्रेडांच्या हातात आपल्या दुकानाची जाहिरातपत्रिका कोंबली आणि तो निघाला. तिन्ही कॉम्रेड जाहिरात वाचत बसले. "दात उपटणे आमच्या खानदानासाठी व्यवसायच नव्हे तर धर्मही आहे. ज्यांच्या पूर्वजांनी कधीकाळी खुद्द भगवान बुद्ध यांच्या दातांना हात घातला होता, त्यांचे हात आज आपले दात उपटायला सज्ज आहेत. ल्यू च्यांग पांग यांचा दंतखाना म्हणजे कमीतकमी पैशांत जास्तीत जास्त दात उपटून घेण्याचे एकमेव स्थान"

चीनमधल्या नवीन सरकारच्या सुरुवातीच्या काळात माओ त्से तुंगने ल्यू च्यांग पांगला पाठवलेले पत्र म्हणजे जणू सर्वसंकटनिवारक बावटाच ठरला. कुठल्याही वादळाच्या प्रसंगी ल्यू च्यांग पांग तो बावटा फलकावीत असे, आणि वादळ नाहीसे होत असे. जेव्हा दंतवैद्यांची संघटना करण्यात आली तेव्हा अर्थातच ल्यू च्यांग पांगकडे अध्यक्षपद चालून आले. तशी 'निवडणूक' झाली, पण बुद्धाचे दात आणि खुद्द माओचे पत्र म्हटल्यावर त्यात फारसा अर्थ उरला नाही.  ल्यू च्यांग पांग खुद्द माओने प्रोत्साहन दिलेला उमेदवार आहे म्हटल्यावर कुणाची त्याच्याविरुद्ध उभे राहण्याची बिशाद असणार? त्यामुळे टाळ्यांच्या कडकडाटात ल्यू च्यांग पांग अध्यक्ष बनला. त्याने वाकून झुकून सगळ्यांचे आभार मानले, आणि एक छोटेखानी भाषण ठोकले. "कॉम्रेड डॉक्टर्स, मला तुमचा अध्यक्ष म्हणून निवडून चीनच्या जनतेची सेवा करण्याचा जो बहुमान तुम्ही मला दिला आहे, त्याबद्दल मी तुमचे सर्वप्रथम आभार मानतो. कॉम्रेड माओंनी म्हटले आहे, की हजार पुष्पे उमलू द्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी असे म्हणू इच्छितो की सगळे दात एकसाथ चमकू द्या."

"तुम्हांला माहीत असेलच, की माझे पूर्वज स्व. पो च्यांग पांग हे थेट हिंदुस्थानात जाऊन खुद्द भगवान बुद्धांना दंतवेदनेपासून मुक्ती देऊन इथे परतले, आणि त्यांनी चिनी जनतेची सेवा सुरू केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक चिनी युवक हिंदुस्थानात जाऊन स्थायिक होऊ लागले, आणि तिथल्या जनतेचे दात उपटून चीनचे नाव महशूर करू लागले. आज अशी परिस्थिती आहे, की प्रत्येक हिंदुस्तानी माणसाच्या दातांवर कुणा ना कुणा चिनी माणसाची हुकूमत चालते. अशा रीतीने चिनी दंतवैद्यांची आपली संघटना ऐतिहासिकच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा आपले स्थान टिकवून आहे."

"चीनमधील ही जनवादी क्रांती दंतवैद्यांना वरदानच ठरेल यात शंकाच नाही. कारण महान चिनीहृदयसम्राट माओ यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे चीनमधील नवीन जनवादी सरकार चिनी माणसांच्या दातांची संख्या वाढवण्यावर भर देणार आहे. सर्वसाधारणपणे, एका चिनी माणसाला चाळीस दात असावेत. म्हणजे त्याला जे खायचे आहे ते निर्वेध आणि निःसंकोच खाता येईल."

" पुंजीवादी आणि साम्राज्यवादी देशांमध्ये असे सांगितले जाते की माणसाला बत्तीस दात असतात. साफ चुकीचे आहे. कारण आता हे स्पष्ट झाले आहे की तिथले दरडोई दातांचे प्रमाण पंचवीस ते अठ्ठावीस यामध्येच घुटमळते आहे. आणि तेही आता हळूहळू कमी होईल. त्यावेळेला इकडे चीनमध्ये आपण 'लीप-फॉरवर्ड' ही चळवळ चालू करू, जिचा उद्देश चिनी माणसाच्या तोंडातल्या दातांची संख्या वाढवणे हाच असेल. आणि या महान कार्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ, कारण आपल्याला माओ त्से तुंग यांच्यासारखा उत्तुंग नेता मिळाला आहे, ज्यांचे दात चांगले तीक्ष्ण व मजबूत आहेत, आणि गरज पडल्यास ते चावा घ्यायलाही सज्ज असतात."

टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्वजण "माओ झिंदाबाद" अशा आरोळ्या मारू लागले.

काही दिवसांतच चीनच्या जनवादी सरकारने ल्यू च्यांग पांगचा बुद्धाच्या दातांवरचा मालकीहक्क रद्दबातल करून टाकला. माओच्या सहीने अध्यादेश निघाला, की जनवादी चीनच्या प्रत्येक नागरिकाला त्याचे/तिचे दात स्वतःचेच समजून आयुष्यभर वापरता येतील. मात्र पूर्वजांचे दात, आणि जीवित व्यक्तींचे उपटलेले दात ही जनतेची संपत्ती असेल, आणि जनतेच्या संपत्तीचे विश्वस्त म्हणून सरकार त्या दातांचा जनता आणि देश यांच्या हितासाठी काहीही उपयोग करू शकेल.

ल्यू च्यांग पांगला धक्काच बसला. ते दात जरी बुद्धाचे नसले, तरी गेल्या काही काळातली त्याची भरभराट पाहता त्याला ते खरेखुरे बुद्धाचे दात वाटू लागले होते. पण तो मुकाट बसला. विदेशदौऱ्यावर जाणाऱ्या एका डॉक्टरांच्या शिष्टमंडळात त्याचे नाव सुचवण्यात आले होते, आणि पेकिंगमध्ये सुरू होणाऱ्या दंतवैद्यकीय महाविद्यालयात त्याला प्राचार्यपद मिळण्याची दाट शक्यता होती. त्याने स्वतःची समजूत घातली, की या दोन दातांचा जो काही फायदा उपटायचा होता, तो उपटून झाला होता. आता मागे न रमता मुकाट पुढे जाणे गरजेचे होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी दातांचा ताबा घ्यायला जेव्हा सरकारी मोटर त्याच्या दारात उभी राहिली, तेव्हा त्याने जिवंतपणीच देशासाठी हुतात्मा झालेल्याचे अनिर्वचनीय भाव चेहऱ्यावर थापले, आणि त्या दंतद्वयीची पाठवणी केली.

त्या दातांचा यथायोग्य सन्मान करण्याचे काम चीनच्या सरकारने अगदी नीट पार पाडले. पेकिंगमधला एक टुमदार बंगली मोकळी करून घेण्यात आली (तिथले रहिवासी त्यांच्या दातांसकट कुठेतरी गेले) आणि तिथल्या दिवाणखान्यात एका काचेच्या पेटिकेत ते दोन्ही दात ठेवण्यात आले. त्या पेटिकेचे दर्शन घ्यायला येणाऱ्यांसाठी नीटपणे एक मार्गिका आखण्यात आली आणि जाण्यायेण्यासाठी दोन दरवाजे बसवण्यात आले. सगळी बंगलीच झकपक सजवण्यात आली.

ल्यू च्यांग पांगच्या गल्लीतल्या खोपटापेक्षा ही व्यवस्था निश्चितच चांगली होती. प्रेक्षकांची गर्दी वाढू लागली. सर्वकाही प्राचीन बुद्ध आणि अर्वाचीन जनवादी सरकार यांना शोभेलसे चालले होते.

हे विसरून चालणार नाही, की चीनमध्ये तोवर सांस्कृतिक क्रांती झालेली नव्हती. माओने सगळ्या विषयांवर त्याचे अंतिम विचार प्रगट केले नव्हते. पेकिंगच्या रस्त्यांवरून लाल सैनिकांचा महापूर लोटला नव्हता. सर्व चीनला आमूलाग्र बदलण्यासाठी पळापळ, धरपकड आणि मारझोड यांचे सत्र सुरू झाले नव्हते.

पण एक दिवशी माओने जाहीर केले की सगळी जुनी धार्मिक प्रतीके ही चिनी जनतेला आळशी बनवण्याचे निंदनीय कृत्य करीत आली आहेत, अतएव त्यांना नष्ट करून त्यांच्या जागी नव्या प्रतीकांची स्थापना करणे गरजेचे आहे. माओच्या या भाषणानंतर हजारो लहानमोठे लाल झेंडे फडफडू लागले. आता लोकांना उत्सुकता होती, ती लाल सैनिकांना या हुकूमाची अंमलबजावणी करण्यासाठी काय आदेश मिळतात याची.

थोड्या वेळातच ते आदेश मिळाले. दुसऱ्या दिवशी मुख्य चौकातून लाल सैनिकांचा एक मोर्चा निघेल आणि संचलन करीत बुद्धाचे दात ठेवलेल्या बंगलीसमोर पोचेल. मग ते बुद्धाचे दात तिथून काढून फेकले जातील, आणि त्यांच्या विनाशकारी प्रभावापासून जनतेची सुटका करण्यात येईल.

"क्रांतीचा एकच हेका, बुद्धाचे दात फेका", "आव्व्वाज कुणाचा? क्रांतीचा" "माओ साहेब म्हणतात खुद्द, नको दात नको बुद्ध" अशा घोषणाही ठरवून टाकण्यात आल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळच्या वृत्तपत्रांच्या पानांतून माओचे भाषण ओसंडून वाहत होते. माओने सकाळच्या नाश्त्याच्या वेळेस त्या वृत्तपत्रांवरून एक नजर टाकली, आणि त्याच्या बसक्या चेहऱ्यावर हसू तरळले.

"तो बुद्धाचे दात उपटणाऱ्यांचा व‌ंशज कोण?" माओने पृच्छा केली.

"डॉक्टर ल्यू च्यांग पांग, हुजूर" जवळच उभ्या असलेल्या हुजऱ्याने माहिती दिली.

"बोलावा त्याला", माओने हुकूम सोडला.

काही वेळातच भेदरलेल्या ल्यू च्यांग पांगला माओच्या पुढ्यात हजर करण्यात आले. माओ बराच वेळ शांत बसला. मग त्याने भय आणि नम्रता गात्रागात्रांतून झरत असलेल्या ल्यू च्यांग पांगला विचारले, "आता बुद्धानंतर चीनला योग्य तो रस्ता दाखवणारा कोण आहे?"

"आपणच, माओ त्से तुंग, कष्टकरी जनतेचे लाडके नेते"

"आता बुद्धाच्या नव्हे, माझ्या दातांनी चीनच्या नवयुवकांना प्रेरणा मिळेल"

"अगदी ठीक, कॉम्रेड, अगदी योग्य"

"तर मग उपट माझे दोन दात" माओने ल्यू च्यांग पांगपुढे आपला अख्खा जबडा वासला.

काही वेळाने लाल सैनिकांच्या जथ्याने बुद्धाचे दात ठेवलेल्या बंगलीवर हल्ला चढवून ते दात बाहेर आणले तेव्हा जनवादी सरकारमधील एक मंत्री गाडीत बसून तिथे आले. त्यांच्याकडे माओचे दोन दात होते. त्यांनी बुद्धाच्या दातांच्या पेटिकेत ते माओचे दोन दात ठेवले आणि क्रांतीचे नवे सूत्र जाहीर केले "जिथून बुद्धाचे दात जातील, तिथेच माओचे दात येतील, क्रांतीला नवे धुमारे फुटतील, हजार पुष्पे उमलतील".

माओच्या या क्रांतीकारी पावलाला लाल सलाम देण्यासाठी लाल सैनिक बराच वेळ घसे खरवडत उभे राहिले. माओच्या दंतद्वयीचे दर्शन घेण्यासाठी लोकांची रांग वाढतच गेली.