पोपटपंची - २

पंकजचं प्रेम-प्रकरण

(पूर्वसूचना- पार्श्वभूमीकरिता पहा: पोपटपंची - 1)

पंकजला
पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला
पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा
पकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या
पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत पोहोचला.

पित्यासमवेत
प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत
पंक्ति-प्रपंच पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा
पुन्हा पिडणार्‍या पुराणांच्या पोपटपंचीमुळे प्राची पेटली.

पंकजच्या
प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या
पंचनाम्याला पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली.
पण पर्णकुटीत पहुडलेल्या पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने
पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले.

पंकजची परिस्थिती पाहून
प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले. प्राचीचा
प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच
पटवले.

पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्‍यांवर
पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला पांगली. प्राचीने पंकजचे पा़किट
पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच पाप्या
परतवल्या.

पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.

- (पटकथा - पुष्कर ऊर्फ शंतनु भट)