खेकडा नि कबिला

पनवेलला शाळेत जातांना आबी घरापुढल्या बांबूच्या फाटकापर्यंत मला साथ द्यायची. 'नीट जा जपून. नीट परत ये. कुत्र्याला पाहून पळू नको. '-अशी अगदी न चुकता आबी मला सूचना करायची. नि मी तिचं एकुलतं एक का़र्टून सूचनेकडं दुर्लक्ष करून. पुढल्याच वळणावर आबी दिसेनाशी झाली की द्ण्ण पळतच शाळा गाठायची. अश्या वागण्यानं आबी सतत परेशान राहायची.  नि मी माझ्या पळण्यानं व्हायचं काय की, स्तब्ध उभं दिसणारं कुत्रं पण मी का पळते म्हणून उत्सुकतेनं साथ द्यायचं. आधी मी खूप भ्यायची. पण नंतर सवय झाली. रोज वेगवेगळी कुत्रे माझ्यामागं पळत साथ देत. त्यांच्या साथीमुळं शाळेचं फाटक कधी यायचं कळायचं नाही. यातही मी खूश होते. अगदी इवल्या-इवल्या क्षणात तनमनानं हरवून जाणारी माझ्यासारखी मीच!!...   

ऊन्हाळयाच्या दीर्घ सुट्टीनंतर शाळा सुरू म्हणजे पावसाचे दिवस सुरू व्हायचे. रोज गच्च आभाळ भरून यायचं. सारीकडं काळंकुट्ट अंधारायचं. गारवा वाहायचा. नि वासरू वारं पिल्यागत मी पळायची. खूप थकायची. नि गवताळी मैदानात दमल्यानं आडवं  होऊन गच्च आभाळाला न्याहळत राहायची. कितीतरी वेळ मी असं वेडयागत पडायची. पावसाच्या मोठाल्या थेंबाची मी वाट पाहायची. पण ते बरसत नसत. दरवर्षीच्या पहिल्या पावसाचं नको इतकं वेड मनात घर करून वसलं होतं.  

शाळेत जातांना रोज रेनकोट दप्तरात असायचाच. एक महिना उलटून गेला तरी अजून रेनकोट घालायची संधी आली नव्हती. दरवर्षी ज्या पहिल्या पावसाचा इंतजार होता. तो पाऊस शाळेत असतांना आला.  ढगं रोजच्या प्रमाणं जा- ये करत वातावरण गडद नि गार करून टाटा SSSकरत जायचे. म्हणून मी बेफीकर होते. शाळेत जातांना असंच गच्च आभाळ आलेलं. धारा बरसतील असं वाटत नसतांनाही अगदी दणंदणं धारा नुसत्या बरसत होत्या. वर्गात ज्या जागेवर मी बसलेली तिथनं असलं धारानृत्य गुलमोहरासह पाहात होते.      

गुलमोहर तर दणंदणं धारा अंगावर घेत होता. वारं तर आडवं-तिडवं सुटलेलं कसला तो धरबंद नाही. वातावरण नुसतं गार-गार करून सोडलेलं. माझ्या शरीरभर शिरशिरीची लहर दौडत गेली. नि उगीच मी डोलू लागले. नशिब माझं की, चित्रकलेचा तास सुरू होता. म्हणून माझं वागणं विशेष कुणाच्या नजरेत येत नव्हतं. नि मला तर हेच हवं होतं. माझ्या दुनियेत मीच असावं फक्त हा अलिखित नियम होता. झाडाखाली पाऊलभर पाणी साचलेलं. त्यात झाडाची पानं-फुलं मार खाऊनही तरंगण्याचा आनंद लुटत होती. या पाण्यात काय तरंगत नव्हतं!.. इवल्या काडया-पानं-फुलं-किडे-मुंग्या-पाखरांची पिसं-इतर सटरफटर तरंगणाऱ्या वस्तू आनंदानं त्यात डूलत होत्या. वर्गात फळ्यावर बाईंनी दिलेलं नावेचं चित्र काढण्यात कुणालाही रस राहिला नाही. रद्दी वहीतल्या पानांची नाव करण्यात एकूण एक दंग झाले. आमच्यासोबत बाई पण नाव नकळत करू लागल्या. सारे कसे पहिल्या पावसाचं मन:पूर्वक स्वागत करण्यास रमले होते. नि असा बरसता पाऊस तर माझा जीव नुसता वेडावून गेला.  

इतक्यात शाळा सुटल्याची घंटा वाजली. नि साऱ्यांची रेनकोट घालायची धांदल उडाली. हातांचा ऐकमेकांना धक्का लागून एकमेकांवर कुरबुरणं झालं. बाई दारात छत्री उघडण्याच्या बेतात उभं राहून पाहत होत्या की साडीचं काठ न भिजवता ऑफिसात कसं पोचता येईल. या घुरदाळ्यात बाहेर आलं तर गढूळ पाण्याचे शिंतोरे बाईच्या कपडयांवर उडणारच. मी ऐक नजर बाईकडं टाकली.   त्या अगदी गहन विचारात उभ्या होत्या.   त्यांचा प्रश्न सोडवण्यास मी असमर्थ होते. बाहेर अजूनही पाऊस कमी न होता वाढतच होता. एकदाचं मी गढूळ पाण्यात पाऊल टाकलं नि रप रप चालत समोर फाटकाजवळ आले. असल्या पावसातही माझ्या डोक्यात पळत घर गाठण्याचा बेत शिजत होता. मला पळायची संधी मिळतेय का मी पाहत होते.