मैत्रीण - १

कुर्ला - हावडाच्या मासळीच्या वासाने भरलेल्या डब्यातला १४ तास प्रवास आणि पुढे धामणगाव ते घाटंजी  २ सीटवर तिघांनी बसून केलेला बिड्यांच्या धुरात केलेला ३ तासाचा प्रवास... अगं आई गं... मला अक्षरशः जीव नकोसा झाला होता. त्या गर्दीतून दोन जड बॅग्ज कुणालाही लागू न देता बसबाहेर कश्याबश्या काढल्या आणि मोकळ्या हवेत श्वास घेतला. ऑटोत बॅग टाकून त्याला "ग्रीन कॉलनी" सांगितले आणि जरा मागे रेललो.

ही माझी नोकरी लागल्यानंतरची पहिली दिवाळी. साहजिकच सर्वांसाठी काहिनाकाही घेतल्यामुळे बॅग्ज जड झाल्या होत्या. खड्ड्यातून उसळणाऱ्या ऑटोतही त्यांना सांभाळणे कठिणच होते.

"इतक्या लौकर रस्ता खराब झाला ? " मी ऑटोवाल्याशी काहीतरी बोलायचे म्हणून विचारले.

"कापसाच्या गाड्या जातात ना, ते रस्त्याची वाट लावतात. इथं सिमेंट रोड जरी बनवला तरी काही उपयोग नाही" त्याने उत्तर दिले. शेवटी एक गचका देऊन ऑटो बंद पडला तो माझ्या घरापुढेच.

"विजुकाका.... " मैथिली ओरडतच बाहेर आली. मी ऑटोतून सामान काढलं तशी ती मला बिलगली. मग माझ्या घरात जात ओरडली, "आज्जी.... विजुकाका आला.... ". मग पुन्हा बाहेर येऊन स्वतःच्या घरी जात पुन्हा ओरडली, " आई, विजुकाका आला गं..... ".

मी घरात सामान ठेवेपर्यंत आई पाणी घेऊन आली होतीच. मी पाणी पिलं आणि "गरम पाणी आहे का, अंघोळ करतो, मगच बरं वाटेल" असं म्हणालो.

"आधी चहा घे मग कर अंघोळ"  आईने आल्याआल्या सूचना दिली.

"हं. ठीक आहे" असं म्हणत मीही स्वैपाकखोलित शिरलो.

"बाबा कुठे गेले? " मी चौकशी केली.

"गेले संजुकडे, सत्यनारायणासाठी. तू आधी कळवलं असतं तर थांबले असते"

"हं. संजुताईकडे आहे हे माहीत असतं तर आधी तिच्याचकडे गेलो असतो. यवतमाळवरुनचतर आलो मी."

"येतीलच उद्या सकाळी". असं म्हणत मला चहा दिला.

मी चहा घेऊन अंघोळ उरकली. देवाला आणि आईला नमस्कार केला, तशी मैथिली आली. तिने माझ्यासोबत जेवण उरकलं आणि मी आडवा झालो. प्रवासाच्या थकव्यामुळे मला गाढ झोप लागली ती साडेपाचपर्यंत.

जेंव्हा आईनं उठवलं तेंव्हा डोळे जड झाले होते.

"मी जरा देवळात जाऊन येते. बाहेर जाशील तर कुलूप लावशील, ही घे चाबी. " असं म्हणत हातात चाबी ठेवली. मी अर्धवट झोपेत हूं. हूं.. करत होतो.

"नीट लावशील कुलूप..... अरे हो तुला सांगायचंच राहिलं होतं.... तुझी ती मैत्रीण येऊन गेली इथे, आठ दिवस खूप छान गेले आमचे .... फार गोड पोरगी आहे ती... बरं चल मी निघते....." बाहेरून मैथिलीचा आवाज आला, आणि मग मैथिली "चल ना गं आज्जी लौकर" म्हणत तिला ओढत घेऊन गेली.

मी पुन्हा डोळे मिटले. ५ मिनिट झाले असतील कदाचित, मी एकदम खाडकन उठलो. "माझी मैत्रीण ? आणि इथे ? घाटंजीत येऊन गेली ?" मी फाटकापर्यंत धावत गेलो पण आई निघून गेली होती.

"छ्या ! मी काहीतरी उगाच ऐकलं असेल... " असा विचार करून मी फ्रेश झालो. संध्याकाळी गावाबाहेर फिरायला जाणे हा माझा घाटंजीत असतांनाचा नेहमीचा क्रम होता, पण मुंबईत गेल्यापासून जरा फिरणं कमी झालं होतं. मी गावाबाहेर आलो. इथे एक गणपतीचं छोटसं मंदिर आहे. याच्या मागच्या बाजूला गव्हाचे शेत आहे. तिथून येणारी थंडगार झुळुक अंगावर घेतली की मन शांत वाटते. माझे डोळे आपोआप मिटले. माझी छान समाधी लागली होती.

"हाय ! " कुणीतरी म्हणालं तसं मी भानावर आलो. बघतो तर काय पुढे रवी उभा. माझा बालमित्र.

"अरे तू कुठे ? "

"यवतमाळला जाऊन येतो. ताईला आणायचं आहे. "

"अच्छा! "

"चल निघतो" त्याने कॅलिबरला किक मारली आणि गिअर टाकत म्हणाला, " अरे हो, तुझी मैत्रीण छान आहे यार. मस्त गप्पा मारल्या आम्ही"

"माझी मैत्रीण ? " मी काही पुढे बोलायच्या आतच तो निघून गेला.

"म्हणजे आई म्हणाली होती ते खरं होतं तर.... पण माझी कोणती मैत्रीण आली होती? आई म्हणाली की चार- आठ दिवस राहून गेली. इतक्या जवळची तर कोणीच नाही... आणि रवीशी गप्पा.... ज्याला आजपर्यंत कोणत्याही मुलीशी बोलणं जमलं नव्हतं तो गप्पा मारल्या म्हणतोय .... आहे तरी ही कोण.... आणि घाटंजीसारख्या छोट्याश्या गावात आठ दिवस .... नक्की गडबड आहे......  " मी विचार करतच घर गाठलं. मनात प्रत्येक मैत्रिणीबद्दल विचार करणं चालू होतं.

"आई, माझी कोणती मैत्रीण आली होती गं? " मी घरात शिरतच पहिला प्रश्न विचारला.

क्रमशः