मध्यंतरी केंद्र शासनाने प्रतिज्ञापत्र सादर करून राम हा केवळ कल्पनिक व्यक्तिमत्व होते असे म्हटले होते. नंतर त्यांना आपलेच शब्द गिळावे लागले आणि राम ही इतिहासकालीन व्यक्ती असल्याचे मान्य करावे लागले.
तर, असा हा राम इतिहासकालीन, याबाबत शंका नाही.
मी मात्र रामाकडे देव म्हणून पाहत नाही. एक ऐतिहासिक व्यक्ती म्हणूनच पहातो. एकदा त्याचे देवत्व दूर केले की मग त्या मागोमाग चिकित्सकाची भूमिका येते! अशा चिकित्सक दृष्टीने पाहता मला राम आदर्श पुरुष वाटत नाही.
तो एक वचनी होता. पित्याच्या शब्दाचे पालन करायाचे म्हणून वनवासात गेला. पण त्याने पित्याची दुसरी आज्ञा पाळली का? रामाला जसा वनवास सांगितला होता, तसेच भरताला राजा करणे क्रमप्राप्त होते. दुसऱ्या शब्दात राम राजा होणे अभिप्रेत नव्हते. ही दुसरी इच्छा जेव्हा रामाने आपल्या पादुका भरतास दिल्या व माझा प्रतिनिधी म्हणून आयोध्येचा कारभार बघ असे सांगितले, तेव्हाच मोडली. जरी प्रत्यक्ष नाही तरी तो तिथेच राजा बनला. लंकेहून परतल्यावर (१४ वर्षांचा वनवास संपल्यावर) तो यथाविधि राजा झाला. हा वचनभंगच नव्हे काय?
'सारे रामायण एका स्त्रीपायी झाले' असे म्हटले जाते. अर्थात ही स्त्री म्हणजे सीताच अभिप्रेत असते. मला मात्र सीता ही ती स्त्री वाटत नाही. ती स्त्री असेलच तर शूर्पणखा होय. शूर्पणखा ही रावणाची (सख्खी? ) बहिण! रावणाच्या दंडकारण्य विभागाची ती प्रमुख होती. रामाकडे ती सलोख्याचा प्रस्ताव घेऊन गेली होती. रामाने दिलेला प्रतिसाद होता- तिचे नाक-कान कापण्याचा! हे संकटास उघड-उघड आमंत्रण होते! "सूड घे, याचा लंकापती" असे ओरडत जेव्हा शूर्पणखा रावणाकडे गेली, तेव्हा रावण रामाच्या आयुष्यात डोकावला. तो पर्यंत नाही.
रामाने केलेला वाली वध पहा! वस्तुतः वालीने रामाचे काहीच वाकडे केले नव्हते. सुग्रीवाच्या मैत्रीची किंमत म्हणून रामाने वालीस ठार केले. प्रत्यक्षात तो चक्क खून होता! तो ही (रामाच्या दृष्टीने) एका निरपराध व्यक्तीचा! सुग्रीवाकडून सुपारी घेऊन केलेला! जर राम थेट लढाईस गेला असता तरी समजले असते. इथे त्याने आडून (लपून-छपून) बाण मारला आहे. वर त्याचे समर्थन कसे- "मी शाखामृगाची (वानराची) शिकार केली! " वालीने त्यावर मरता-मरता शाप दिला की तुझी हत्या सुद्धा असाच कोणीतरी अकारण करील" असे सांगतात, की हा शाप रामाने पुढील अवतारात (कृष्ण जन्मात) भोगला. एका पारध्याने हरिण समजून बाण मारला, तो कृष्णास लागून त्याचा मृत्यू झाला.
राम हा यज्ञ संस्कृतीचा रक्षक होता असे म्हणतात. मग त्याने लक्ष्मणाकरवी इंद्द्रजीताच्या यज्ञाचा विंध्वस का केला? खरे तर हे यज्ञ म्हणजे प्रयोगशाळा होत्या. इंद्रजीताचा यज्ञ ज्या कारणासाठी लक्ष्मणाने नष्ट केला, (त्यातून इंद्रजीताला म्हणे दिव्य रथ मिळायचा होता) त्याच कारणासाठी असूर विश्वामित्राचा यज्ञ उध्वस्त करू पाहत होते.
सीतेच्या बाबतीत त्याने अन्यायच अन्याय केला आहे! लंकेत अग्नि-परिक्षा तिला द्यावी लागली! हा रामाचा तिच्यावरचा विश्वास! तेवढ्यानेच भागले नाही! संशयाचा किडा अजून ही वळवळत होताच! कुठल्या तरी एका परटाला पुढे करून, तिला कोणती ही कल्पना न देता तिचा त्याग केला! जर पत्नीबद्दल खरेच प्रेम असते तर त्याने तिच्या पावित्र्याबद्दल जनतेला ठणकावून सांगितले असते. प्रसंगी राज्यत्याग ही केला असता. पण त्याचेच मन शुद्ध नव्हते!
शंबूकाला ठार का मारले? काय त्याचा अपराध होता? एका अनाधिकारी पुरुषाने (शूद्राने) तपस्या केल्ली म्हणून रामाच्या राज्यात दुष्काळ पडला, म्हणे! रामाची पुण्याई का फळाला आली नाही? वाल्मिकी शूद्रच होता ना? त्याच्या तपस्येने काही बिघडत नव्हते?
या पृष्ठ भूमीवर मला राम हा आदर्श पुरुष वाटत नाही.