मे २७ २००९

कल्पवृक्ष - १

ह्यासोबत
मला आठवतही नाही तेंव्हापासून मी गाणी ऐकतेय. अगदी 'गोरी गोरी पान फुलासारखी छान' इथपासून ते 'एका तळ्यात होती बदके पिले सुरेख' पर्यंत अनेक गाण्यांनी माझं बालपण सजवलं. गीतरामायणातलं 'सेतू बांधा रे सागरी' ऐकायला खूप आवडायचं.   हळूहळू ही सगळी गाणी लिहिणाऱ्या जादुगाराचं नाव ग दि माडगूळकर आहे ही माहिती मिळाली.  मी कविता वाचायला खूप उशिरा सुरुवात केली. पण कवितावाचनाला सुरुवात झाली तीच मुळी 'जोगिया' या काव्यसंग्रहापासून.  'जोगिया' मधल्या शब्दांचा अर्थ समजण्याच्याही आधी त्यातल्या शब्दांच्या नादमाधुर्याने मला मोहिनी घातली. विशेषतः
'स्वरवेल थरथरे फूल उमलते ओठी'
या ओळीपाशी आल्यावर अजूनही मी काही क्षण तिथेच खिळून उभी राहते.   त्यामुळे गदिमांच्या शब्दांचं गारुड माझ्या मनावर जरा उशिरा झालं असेल पण एकदा ते झाल्यावर मात्र त्यांच्या हस्तस्पर्शाने सजीव झालेली कितीतरी गाणी मला नव्याने जाणवायला लागली. 'राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा', 'येणार नाथ आता', 'देव देव्हाऱ्यात नाही', 'ऊठ पंढरीच्या राया', ' राम जन्मला गं सखी ' असा प्रवास करत करत 'नंदाचा पोर आला आडवा, कुणी मला सोडवा' आणि ' जाळीमंदी पिकली करवंदं' इथपर्यंत मी जेंव्हा येऊन पोचले तेंव्हा हा शब्दप्रभू किती विलक्षण ताकदीचा माणूस आहे हे मला पुन्हा पुन्हा नव्याने पटत गेलं.  'असा बालगंधर्व आता न होणे' पासून ते अगदी
'चंद्रभारल्या जिवाला नाही कशाचीच चाड,
मला कशाला मोजता मी तो भारलेले झाड'
पर्यंत त्याच्या अगणित कविता वाचल्यावर किती साध्या शब्दात ते किती सहजतेने प्राण ओतत असत हे जाणवलं. त्यांचं लेखन वाचणाऱ्याला फार सोपं पण लिहायला अवघड आहे हे ही जाणवलं.  या शब्दप्रभूची घडण कशी झाली असेल याबद्दल मला आदरमिश्रित कुतूहल वाटायचं. इकडेतिकडे वाचलेले त्यांच्याबद्दलचे लेख, प्रतिसरकार - बेचाळीसच्या आंदोलनातला त्यांचा सहभाग, 'वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्' चा उल्लेख, अनेक वर्षांपूर्वी वाचलेला आणि लक्षात राहिलेला गदिमांचाच 'हॅलो मिस्टर डेथ' हा लेख वगैरे गोष्टींमधून काही तुकडे मिळत होते. अलिकडेच विद्या माडगूळकरांचं आत्मचरित्र वाचलं तेंव्हा गदिमांबद्दल बरंच काही समजलं. तरीसुद्धा हे सगळं कडेकडेनेच चाललं होतं असं वाटायचं. पण गदिमांचंच 'वाटेवरल्या सावल्या' हे पुस्तक वाचलं आणि प्रवाहाच्या मुख्य धारेत येऊन पडल्यासारखं झालं. गदिमांची  जडणघडण खुद्द त्याच्याच शब्दांत वाचणं म्हणजे एक आनंदोत्सवच.

एका दिवाळी अंकात लिहिलेला बालपणाबद्दलचा प्रदीर्घ लेख आणि एका मासिकातली लेखमाला यांचं हे पुस्तकरूप संकलन. पण वाचताना तसं जाणवतही नाही. पुस्तक वाचून झाल्यावर जाणवते ती परमेश्वर नावाच्या एका वेड्या कुंभाराची गदिमा नावाचा एक मातीचा गोळा हाती घेऊन, त्याला अमृतकुंभाचा आकार देऊन, जीवनरूपी भट्टीत रसरशीत तापवून, पक्कं भाजून काढण्याची कारागिरी! आता कुंभारच परमेश्वरासारखा सर्व प्रतिभेचा धनी म्हटल्यावर हा अमृतकुंभ अमृताने कसा ओतप्रोत भरला आणि अक्षय उरला हे सर्वश्रुतच आहे. आपल्याकडे कडू पाने असणाऱ्या निंबाला त्याच्या दैवी गुणांमुळे अमृतवृक्षाची उपमा दिली जाते. गदिमा हा असा निंबवृक्ष होता ज्याची पानेफुलेफळे मुळीच कडू नव्हती. ती अमृताचाच वर्षाव करीत असत. जणू काही कल्पवृक्षच! घडणीच्या काळात गदिमांनी जितकी आग पचवली तितक्याच सुखद शब्दचांदण्याचा वर्षाव त्यांनी नंतरच्या आयुष्यात केला.

डावखुरी माणसं तशी आपल्याकडे दुर्मिळच. त्यांचा उजवा मेंदू जास्त प्रभावी असल्यामुळे त्यांची प्रतिभा वेगळीच आणि अनपेक्षित उंची गाठताना बरेच वेळा दिसते. शिवाय आपल्याकडे मारून मुटकून सर्व व्यवहार उजव्या हातानेच करायचा दंडक असल्याने या डावखुऱ्या लोकांना काही अंशी सव्यसाचित्व प्राप्त होत असावं. गदिमांच्या मातुःश्री डावखुऱ्या होत्या. जात्यावर बसल्याबसल्या त्या सहज ओव्या रचीत असत. शब्द आणि अर्थचमत्कृतींनी भरलेले अनेक म्हणी - वाक्प्रचार त्यांना मुखोद्गत होते असं गदिमांनीच कुठेतरी लिहून ठेवलंय. अशा मातेकडून गदिमांना कवित्वाचा, प्रसादगुणाचा आणि सहज साधं पण कसदार साहित्य निर्माण करण्याचा वारसा मिळाला. वडील बिचारे स्वभावाने गरीब आणि चाकरमाने. घरच्या कुलकर्णीपदापेक्षा पंतसचिव सरकारकडे कारकुनाची नोकरी करून प्रपंचाला हातभार लावणे त्यांना अधिक योग्य वाटले.  वडील स्वभावाने अत्यंत प्रेमळ होते. शालेय वयात, कागद हवेत म्हणून हटून बसलो असताना आपल्याकडे लक्ष दिले नाही म्हणून कचेरीत सर्वांसमक्ष तिथला रूळ उचलून गदिमांनी वडिलांना मारले होते.  आता वडील आपला चांगला समाचार घेणार अशा भीतीने  घाबरून घरी स्वयंपाक करून ठेवला होता. वडिलांना मात्र तो रूळ स्मरणात देखील नव्हता. उलट मुलाने स्वयंपाक केला याचेच कोण कौतुक! गदिमांच्या बिटाकाकाने मात्र एकदोनदा त्यांना चांगला चोप दिला होता. मग त्यांच्या मातेने दिराची चांगली कानउघडणी केली होती. पण या काकाचा आपल्या पुतण्यावर अपार जीव होता. या काकाबद्दल गदिमांनी अगदी गहिवरून लिहिले आहे. हा काका, काका व्हायच्या ऐवजी मोठा भाऊच झाला असता तर बरे झाले असते असेही त्यांनी लिहिले आहे.    

त्यांची आजी म्हणजे त्यांच्या वडिलांची आई वेडी होती.  ती स्वतःच स्वतःशी बडबडायची आणि आपल्याच सुनेला घाबरायची. पण तिचेही गदिमांवर फार प्रेम होते. त्यांचे आजोबा म्हणजे माडगूळचे वतनदार कुलकर्णी. अंगाने चांगलेच भारदस्त. घोड्यावर मांड ठोकून फिरायचे तेंव्हा लोक घाबरायचे. त्यांची पंचक्रोशीत बाबा बामण या नावाने ख्याती होती. आपली जरब आपल्या अपत्यांपैकी कुणाकडेच नाही हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांना लौकरात लौकर एक नातू हवा होता. कुलकर्णीपदाला वारस म्हणून. आजोळचे आजोबा म्हणजे शेजारच्या शेटफळे गावचे. या गावात कुलकर्णीपदावर माणूस टिकत नसे. नवा माणूस नेमला की वर्षाच्या आत त्याचा खून होत असे. अशा परिस्थितीमध्ये शेजारधर्म म्हणून गावचं कुलकर्णीपण करणारे हे दुसरे आजोबाही अगदी धीराचेच होते. या अशा सर्व व्यक्तिमत्त्वांकडून अनेक गुणावगुणांचा मिळालेला वारसा पेलून, जपून त्याला आपलं असं रूप देऊन गदिमा घडले. औंध संस्थानात आडबाजूला असलेल्या माडगूळच्या सातारी बाजाच्या मातीवर पोसलेल्या गदिमांवर या मातीचे संस्कार खोलवर झाले.

आपल्याला आपल्यासारखाच खमका नातू व्हावा अशी इच्छा असलेल्या आजोबांनी पहिली नात झाल्यावरही आशा सोडली नाही. उलट त्या नातीला ते विठाबाई ऐवजी विठ्ठलपंत अशी हाक मारत असत. दुसरा नातू जन्मतःच देवाघरी गेला. आणि तिसऱ्या खेपेला आजोबांची गाठ गदिमांशी पडली .  आपल्या मिस्कील स्वभावाची चुणूक पाळण्यात पडायच्याही आधीपासून दाखवायची म्हणून की काय पण बाळ जन्मतः  रडलेच नाही. याही खेपेला अपयश आलेले पाहून, त्या नवजात बाळाला पुरायला जमिनीत खड्डाही खणला होता. माता वेदनांमुळे बेशुद्ध आणि हा मांसाचा गोळा कापडात गुंडाळून पुरायला न्यायचा अशा वेळी सुइणीला सुबुद्धी झाली आणि तिने एक जळता निखारा बाळाच्या बेंबीजवळ नेला. बाळाने एकदम टाहो फोडला. आजोबांची इच्छा अखेरीस पूर्ण झाली. त्यांना 'तिन्ही लोकी झेंडा लावणारा' त्यांच्यासारखा 'गुंडा' नातू मिळाला. त्या वेळी त्या सुइणीला बुद्धी झाली नसती तर काय झाले असते या विचारानेही काळजाचा थरकाप होतो. पण नातू झाला मूळ नक्षत्रावर. केलेली शांत फळली नाही आणि दीड वर्षाच्या आत आजोबा देवाघरी गेले.

आजोबांबरोबर घरातील चांगली परिस्थितीही संपली. घरात वेडी आजी, बिटाकाका, आई, अक्का आणि गदिमा, शिवाय आलागेला, पैपाहुणा अशी खाणारी तोंडे. वडील औंध सरकारच्या नोकरीत कुंडलला. लहानपणी लाडाकोडाचा नातू म्हणून गदिमा विलक्षण हट्टीपणा करत असत. मनाला येईल त्या गोष्टीचा हट्ट धरायचा आणि तो पुरा होईपर्यंत शांत बसायचे नाही अशा प्रकाराने त्यांनी घरातल्याच काय पण शेजारपाजारच्याही लोकांना सळो की पळो करून सोडले होते. घराच्या अंगणात बसून अक्काबरोबर मोठमोठ्याने 'बाळ गंगाधर टिळक! '  असे ओरडण्याचा खेळ खेळणाऱ्या बाल गदिमांचे वर्णन डोळ्यासमोर चित्र उभेच करते आणि हसू आल्याखेरीज राहत नाही. मानेवर गळवे होणे, खांबावर धडकल्याने ती फुटणे, अवजड ट्रंक उचलायच्या नादात पायाला जखम होणे, ती चिघळणे असे अनेक 'पराक्रम' गदिमांनी या काळात केले. ही पायावरची जखम चिघळलेली असताना रात्री उखळ भरून तूपसाखर खायचा हट्ट करण्याचा प्रसंग वाचताना गदिमांच्या मातेची या सगळ्यात किती तारांबळ उडत असेल याचा विचार येऊन खूप वाईट वाटते. रात्री अपरात्री उठून भलभलते हट्ट करणाऱ्या मुलाच्या मागण्या त्या माउलीने न थकता पुरवल्या. त्या फंदात तिलाही अनेकदा अपघात झाले. जखमा झाल्या. पण त्या मातेने सारे हसत हसत सोसले.

ब्राह्मण हा द्विज असतो असे म्हणतात. जन्मतःच इहलोकीचा अवतार संपायच्या बेतात असताना गदिमांचा जणू काही पुनर्जन्मच झाला. त्यामुळे, आपण द्विज नसून त्रिज आहोत असे त्यांनीच विनोदाने म्हटले आहे. जन्म आणि मृत्यू त्यांच्या बाबतीत काही विलक्षण खेळ खेळत असले पाहिजेत. आटपाडीजवळच्या गावी वडिलांकडे असताना, घरासमोरच्या ओढ्याच्या डोहात गदिमा बुडाले. त्यांना बिटाकाकाने आणि घरमालकाने  शिताफीने वाचवले.  हा प्रसंग लिहिताना त्यांनी घराच्या बुरुजामध्ये पिंपळाखाली कसलेले देऊळ होते असा उल्लेख केला आहे. नुकतीच मुंज झालेल्या मुलाला पिंपळासमोरच्याच डोहात बुडून मृत्यू आल्यातच जमा होता हा संदर्भ वाचला की उगाचच काहीतरी गूढ वाटतं. आपल्या घरी जेवायला आलेल्या एका दशग्रंथी ब्राह्मणाने, तुझ्या मुलाच्या रूपाने तुझा कर्तृत्ववान पूर्वज तुझ्या पोटी आला आहे तेंव्हा त्याला कधीही मारू नकोस असे आईला सांगितल्याचाही यात उल्लेख आहे. खरेखोटे देवाला ठाऊक, पण जन्माने त्रिज असणाऱ्या गदिमांच्यामध्ये काहीतरी विलक्षण असणार खासच असं वाटत राहतं.

अनेक वर्षे सातवीची परीक्षा वारी करणाऱ्या बिटाकाकाने त्यांना बळेबळे अक्षर ओळख करून द्यायचे काही प्रयत्न केले होते पण खेळण्याकडेच सगळे लक्ष असलेल्या गदिमांनी त्याला मुळीच धूप घातली नाही .   पुढे वडिलांच्या नोकरीच्या गावी मात्र वडिलांनी पकडून शाळेत जायला भाग पाडले. तिथली अक्षरओळख, आधी वांडपणामुळे शाळेकडे केलेलं दुर्लक्ष, नंतर मात्र अभ्यासाची- विशेषतः पुस्ती काढण्याची लागलेली गोडी, घटवून सुंदर केलेले हस्ताक्षर, वर्गातल्या मुलांच्या गमतीजमतीही अधूनमधून वाचायला मिळतात. देव भक्तावर प्रसन्न होऊन त्याला खूप संपत्ती देतो अशा आशयाची एक कथा एकदा त्यांच्या वाचनात/ऐकण्यात आली. आपल्यावरही अशी कृपा व्हावी आणि घरातली पैशाची चणचण मिटावी या आशेने मारुती, विष्णू, शंकर इ. मातब्बर मंडळींकडे वशिला लावल्याचं त्यांनी लिहिलं आहे.  मूळ कथा अरबी असल्यामुळे, अरबांचा म्हणजे मुसलमानांचा देव - अल्ला, याच्याकडे अशी कृपा करायची काहीतरी सिद्धीबिद्धी असणार असा अंदाज बांधून, आसपास कोणी नाही असे बघत गावातल्या मशिदीलाही आपण बाहेरूनच एक नमस्कार ठोकत होतो असे गदिमांनी लिहिले आहे ते वाचताना फारच गंमत वाटते.

यानंतर मात्र घरातली आर्थिक परिस्थिती आणखी बिघडली. अक्काच्या लग्नात वडिलांना कर्ज झाले. अनेक प्रयत्न करूनही बिटाकाका सातवीची परीक्षा पास होऊ शकला नाही त्यामुळे त्याच्याही नोकरीचे काम होईना. घरातली खाणारी तोंडे वाढल्यामुळे वडिलांच्या पगारात घरखर्च चालणे अवघड होऊन बसले. तशातच वडिलांची कुंडलला बदली झाली. अठराविश्वे दारिद्र्य मराठी साहित्याला नवे नाही. साधारण गेल्या दीडेकशे वर्षांमध्ये अशा दारिद्र्यातून बाहेर पडायचं हाच विचार अनेक चरित्रनायकांना जगायची ( आणि म्युनिसिपाल्टीच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायची! ) प्रेरणा देत आला आहे असं दिसतं. उणीव असते तेंव्हाच जाणीव निर्माण होते असं माझी आई नेहमी म्हणते. ही जाणीव चांगली जोरकसपणे निर्माण व्हावी इतपत उणीव तेंव्हा गदिमांच्या घरात होती. तिचं वर्णन वाचताना डोळ्यांत पाणी येतं. घर म्हणून घेतलेली जागा जेमतेम एका खोलीची. त्यात अक्षरशः कोंड्याचा मांडा करून जगणारे कुटुंब, त्यांची गावात होणारी अवहेलना, मुलांच्या अंगावर कोट नाही म्हणून मास्तरांनी दिलेला चोप घरी सांगणार कसा ही विवंचना, त्यात प्लेगाची साथ, वडिलांचा दमा हे सगळं वाचताना खरंच रडू फुटतं.

पण याच काळात गावाबाहेर खेळताना शेजारच्या किर्लोस्करवाडीला कधीतरी पाहिलेलं नाटक खेळायचा विचार गदिमांच्या डोक्यात आला. सगळे सवंगडी या नव्या खेळाला तयार झाल्यावर गदिमांनी रामायण - महाभारत - पुराणांमधले प्रसंग घेऊन हाहा म्हणता संवाद लिहिले.   ते बसवून 'नाटक नाटक' खेळताना आलेली गंमत मनोरंजक आहे. पुराणातले प्रसंग कमी पडायला लागल्यावर त्यांनी सद्यस्थितीवरही संवाद लिहिले होते. त्यातले काही गुपचूप एका मासिकात पाठवल्यावर छापूनही आले होते. शाळेच्या नव्या इमारतीत हट्टाने एक स्टेज बांधून औंध सरकारांसमोर गडकऱ्यांचे एक नाटकही ( बहुधा राजसंन्यास )  या मुलांनी सादर केले होते. गावातल्या एका नाटकवेड्या माणसाने हे नाटक बसवले होते. पण शेवटच्या अंकात स्टेजवर मरून पडलेले एक पात्र पडदा पडला असे समजून पडदा पडायच्या आधीच उठले आणि त्या अतिकरुण प्रसंगाचा अतिविनोदी प्रसंग मात्र झाला.  आपण नट व्हावे आणि अभिनय करावा ही ओढ बहुधा या प्रसंगापासूनच त्यांच्यात निर्माण झाली. पुढे त्यांच्या पहिल्यावहिल्या नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकरांनी "गडकऱ्यांचा वारस आज आपल्याला लाभला आहे, त्याचं नाव गजानन दिगंबर माडगूळकर! " अशी त्यांची ओळख करून दिली होती तो प्रसंग वाचताना गडकऱ्यांचे संस्कार इतक्या लहान वयापासून त्यांच्यावर झाले होते हे नकळत आठवलं. त्याच प्रसंगी, लोकांनी आग्रह केल्यावर, "माझ्यात आणि गडकऱ्यांच्यात फक्त एकच साम्य आहे ते म्हणजे त्यांच्यासारखाच मीही  सभेत भाषण करायला फार भितो! " असे हजरजबाबी उत्तर देऊन त्यांनी यशस्वीपणे वेळ मारून नेली होती.

हे सगळे वर्णन एका दीर्घलेखातले आहे त्यामुळे त्यात आणखी तपशील वाचायला मिळाले असते तर किती मजा  आली असती असेही वाटते. वेड्या आजीचा करुण मृत्यू, त्यानंतर आजारपणामुळे मृत्यूच्या दारात उभी असलेली आई आणि स्वतः गदिमांचे जिवावरचे आजारपण या रडू फोडणाऱ्या आणखी काही जागा. कडक शिस्तीमुळे ज्या मुख्याध्यापकांची त्यांच्या पाठीवर टिंगल चाले त्याच मुख्याध्यापकांनी स्वतः सायकलवरून किर्लोस्करवाडीला जाऊन गदिमांसाठी औषध आणले. एकदादोनदा नाही तर चांगले महिनाभर हे मुख्याध्यापक किर्लोस्करवाडीला औषध आणायला जात होते.  आजारपणात गदिमांची आबाळ होऊ नये म्हणून स्वतःच्या घरच्या गाद्या उशा या मास्तरांनी गदिमांसाठी आणून दिल्या होत्या. आजारातून उठल्यावर हे सगळे पाहून गदिमांच्या डोळ्यांतून कृतज्ञतेने अक्षरशः पाणी आले होते.  या आणि अशाच कडू गोड आठवणींमध्ये बालपणीची हकीगत संपते आणि सुरू होतो तो चित्रपटक्षेत्रातला उमेदवारीचा प्रवास.

--अदिती

Post to Feedसुविचारः उत्तम शिक्षक!
सुंदर लेख... शंका
गदिमाच
असे तपशील उद्धृत करू नयेत!
सहमत!!!
आवडला
आवडला...

Typing help hide