टंकलेखन (१)

ए, एस, डी, एफ, जी, एफ (स्पेसबार) सेमीकोलन, एल, के, जे, एच, जे या अक्षरांनी सुरवात होते टंकलेखनाच्या धड्यांची. ही अक्षरे म्हणजे कळफलकाचा गाभा म्हणले तरी चालेल. सर्वात मुख्य म्हणजे कळफलकाकडे न पाहता या अक्षरांचा सराव करावा लागतो. डाव्या हाताची चार बोटे ए, एस, डी, एफ करता व उजव्या हाताची चार बोटे एल, के, जे, एच करता. डाव्या हाताची चार व उजव्या हाताची चार बोटे वापरून म्हणजे कळफलकावरील बटणांवर जोर देऊन टंकले ही अक्षरे कोऱ्या कागदावर उमटतात. एका कागदावर ही अक्षरे मोठ्या अक्षरात टंकीत केलेली असतात तो कागद घ्यायचा तो टंकलेखन मशीनच्या डाव्या बाजूला आपल्या नजरेला सहज दिसेल असा ठेवायचा व सराव करायचा. पानेच्या पाने टंकीत करायची. प्रत्येक बोटाला जे अक्षर ठरवून दिलेले आहे त्याप्रमाणे टंकायचे की मग ती अक्षरे  आपल्या डोक्यामध्ये पक्की बसतात. टंकलेखनाचा संबंध बरीच वर्षे आला नाही तरीही तुमच्या पुढ्यात टंकलेखन मशीन आले की आपोआप कळफलकाकडे न बघता ही अक्षरे आपण टंकीत करू शकतो. याच पद्धतीने हा लेख मी संघणकाच्या कळफलकाकडे न बघता डावीकडे असलेल्या माझ्या वहीत लिहून ठेवलेल्या लेखाकडे बघून टंकत आहे.

दुसरा धडा म्हणजे ए, एस, डी, एफ च्या वरची अक्षरे आहेत त्यांचा. या अक्षरांचाही असाच पानेच्या पाने टंकीत करून सराव करायचा. तिसरा धडा म्हणजे तीन, चार, सहा अक्षरी शब्द की ज्या शब्दांची अक्षरे कळफलकाच्या वरच्या व खालच्या ओळीत असतील असे सर्व शब्द, किंवा ज्या शब्दांची  अक्षरे फक्त डाव्या बोटांमध्ये येतील किंवा फक्त  उजव्या बोटांमध्ये येतील असे शब्द. असे बरेच शब्द टंकीत करून करून पूर्ण कळफलक आपल्या डोक्यात बसतो. अक्षरे, शब्द, वाक्ये, परिच्छेद टंकीत करायचे. या सर्वांचा पानेच्या पाने टंकीत करून सराव करायचा.

एकूणच टंकलेखनाचा हा सराव म्हणजे अक्षरे, शब्द, वाक्ये व परिच्छेद टंकीत करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे कळफलकाकडे बघायचे नाही, जसे की सायकल शिकताना सायकलकडे न बघता समोर रस्त्याकडे बघायचे व सायकल चालवायची अगदी तसेच हे तंत्र आहे की जे आत्मसात केल्यावर आयुष्यात कधीही विसरत नाही. टंकलेखन ही एक कला आहे. सराव करताना चुका होतात, कळफलकाकडे पाहिले जाते. सराव झाला की मग टंकलेखन वेग. या टंकलेखन वेगाला खूप महत्त्व आहे. तुम्ही दणादणा वेगाने टंकत आहात आणि त्यात जर असंख्य चुका निघाल्या तर त्या टंकलेखन वेगाला काहीही अर्थ नाही. वेग कमी असला तरी चालेल पण जे टंकीत केले आहे ते बिनचूक असायला हवे.

जेव्हा टंकलेखन वेगाची परीक्षा घेतली जाते तेव्हा अमुक शब्द अमुक एका वेळात टंकीत केले गेले पाहिजेत. जेवढे शब्द टंकीत होतील ते सर्व मोजतात एक दोन असे करत त्यात स्पेस बार व दोन शब्दांमध्ये किंवा वाक्यांमध्ये रिकामी सोडलेली जागाही मोजली जाते. त्याचे एक गणित आहे. हे सर्व पूर्ण पान टंकीत कसे करायचे याबद्दल झाले. टंकलेखनामध्ये तुम्हाला तक्ते पण टंकीत करायचे असतात की ज्यामध्ये उभे आडवे रकाने आहेत. लाख कोटी असे आकडेही आहेत. तसेच त्यात मजकूरही टंकीत करायचा आहे.  तक्त्याला शीर्षक आहे, तेही कागदाच्या मधोमध यायला हवे. या सर्वांचा तुम्हाला एक अंदाज घ्यावा लागतो. कागदावर तो तक्ता उभा बसेल की आडवा, किंवा कसा चांगला दिसेल याचा अंदाज घ्यायला लागतो. प्रत्येकाचे मोजमाप घ्यावे लागते. तक्ता जर खूप मोठा असेल तर तो नेहमीच्या कागदावर न बसवता फूलस्केप कागदावर बसवावा लागतो. कागदाच्या वरून किती जागा सोडायची, शीर्षक लाल अक्षरात हवे की नको हे विचारात घ्यावे लागते. रकाने असतील तर टॅब लावावे लागतात. हे सर्व अचूक, खाडाखोड न करता, देखणे दिसेल याकडेही लक्ष द्यावे लागते. तक्ते बनवण्याचा पण बराच सराव करायला लागतो.

संपूर्ण कळफलक शिकायला सहा महिने लागतात. त्यानंतर क्लासला जायचे ते वेग कमावण्यासाठी. एकेक दोन दोन तास वेगवेगळी इंग्रजी मासिके घेऊन त्यातला मजकूर टंकीत करून सराव करायचा. नंतर वाचून त्यातल्या चुका काढायच्या.

टंकलेखनाचा भरपूर सराव, त्याचा वेग, त्यातील अचूकपणा हे सर्व आत्मसात झाले आणि तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कामाला लागतात की तुम्हाला एकच पत्र नाही तर बरीच पत्रे, तक्ते व इतरही बरेच काही टंकीत करावे लागते. यात बिनचूक व देखण्या पत्राची विशेष दखल घेतली जाते. पूर्वी कंपनीमध्ये एखादे पत्र टंकीत करायचे झाल्यास त्याच्या दोन प्रती काढल्या जायच्या. एक म्हणजे मुख्य पत्र की जे दुसऱ्या कंपनीत पाठवायचे असते आणि त्या पत्राची कार्बन प्रत की जी कचेरीत ठेवली जाते. किंवा त्याच्या अजूनही काही प्रती कार्बन पेपर लावून काढल्या जायच्या की जी पत्रे कंपनीतच कोणा वरिष्ठ अधिकाऱ्याला किंवा दुसऱ्या कंपनीतल्या एखाद्या महत्त्वाच्या माणसाला पाठवण्यासाठी. ही कचेरीतली पत्रे दोन चार प्रकाराने टंकीत केली जायची. पहिले म्हणजे लिहून दिलेली पत्रे, त्यात अक्षर बरे असेल तर ठीक नाहीतर ते लावता लावता खूप किचकट वाटायचे. दुसरे म्हणजे डिक्टेशन देऊन, किंवा काही वेळेला थेट तोंडी सांगतील त्याप्रमाणे लगेचच तो मजकूर टंकीत करायचा, किंवा ठराविक साचेबद्ध पत्रे टंकीत केली जायची.

दुसऱ्या भागामध्ये प्रत्यक्ष टंकलेखन कसे होते ते पाहू.

..... क्रमशः

शु. चि. वापरला आहे.