ऋग्वेदातील तत्त्वज्ञान - २

माझ्या संग्रहात आदरणीय रा.गो.कोलांगडे यांच्या 'ऋग्-रत्न भांडार 'हा ग्रंथ आहे. अधे-मधे तो मी चाळतो. या ग्रंथात दिलेली पहिल्या मंडलातील रत्न क्र.६८ ते ७६ ही तत्त्वज्ञान विषयक आहेत. ऋग्वेद हे सर्वात प्राचीन वाङ्मय असल्याचे सांगितले जाते. त्या वेळीही विचारवंतांनी परमेश्वर आणि विश्व याबद्दल किती सखोल विचार केला आहे, हे या काही ऋचांतून समजते. म्हणून, हे रत्न वाचनीय, चिंतनीय आहे. यातील ऋचा दीर्घतमा-औचथ्य ऋषींनी रचलेल्या असून देवता विश्वेदेव आहे. या ऋचा त्रिष्टुप छंदात आहेत.

ऋषींच्या नांवाचा विचार केला तर असे म्हणता येईल की 'दीर्घतमा-औचथ्य ' म्हणजे 'घोर अज्ञानाने वेढलेला व सतत अंतिम सत्याच्या शोधात असणारा '. या ऋषींनी ज्ञानप्राप्तीसाठी ज्या देवतेचे ध्यान केले आहे किंवा ज्ञानप्राप्तीसाठी ज्या देवतेकडे प्रार्थना केली आहे, ती आहे 'विश्वेदेव'. याचा अर्थ असा होतो की, या 'घोर अज्ञानी(!)' ऋषींना विश्वास होता की 'हे विश्व हेच त्या परमेश्वराचे रूप आहे ' व 'ते ऋषी ज्या ज्ञानाच्या शोधात होते, ते ज्ञान त्या विश्वरूप परमेश्वराकडूनच प्राप्त होणे शक्य आहे.

आपण या ऋचा आणि त्या ऋचांचा ग्रंथकर्त्यांनी दिलेला अर्थ पाहू -

रत्न ६८वे: को ददर्श प्रथमं जायमानमस्थन्वन्तं यदनस्या बिभर्ति ।

भूम्यां असुरसृगात्मा क्व स्वित्को विद्वांसमुप गात्प्रष्टुमेत् ॥१-१६४-४॥

- तो निर्गुण व निर्विकारी परमेश्वर जेव्हां सगुण व शरीरधारी झाला, तेव्हा त्याचा तो जन्म पाहणारा असा कोणी तरी होता काय ? कारण तेव्हा हे अस्थियुक्त पंचमहाभूतात्मक शरीर अस्थिरहित त्या परमेश्वरामध्येच गर्भित होऊन राहिले होते. प्राण व रक्त हे भूमीपासून झाले आहेत. मग तो आत्मा कोठे होता ? या सर्व गोष्टींचे ज्ञान होते त्या गुरुला विचारण्याला तरी कोण गेला होता ?

पाकः पृच्छामि मनसाविजानन् देवानामेना निहिता पदानि ।

वत्से बष्कयेऽधि सप्ततन्तून् वितत्निरे कवय ओतवा उ ॥१-१६४-५॥

- बुद्धीने अल्प असल्यामुळे हे सर्व गहनतत्त्व समजण्यास मी असमर्थ आहे आणि म्हणून मी हे प्रश्न विचारीत आहे. कारण देवांना देखील या गोष्टी गूढच आहेत. नाहीत काय ? ज्याच्यामध्ये हे सर्व त्रिभुवन स्थित आहे अशा सूर्यदेवाला आवरण घालण्यासाठी ऋषींनी पसरलेले सात धागे (सात व्याहृती-भूः भुवः स्वः महः जनः तपः सत्यं) तरी कोणते ?

अचिकित्वान् चिकितुषश्चिदत्र कवीन्पृच्छामि विद्मने न विद्वान् ।

वि यस्तस्तम्भ षड् इमां रजांस्यजस्य रूपे किमपि स्विदेकम् ॥१-१६४-६॥

- याविषयी मी अगदीच नेणता आहे. या विषयांचे ज्ञान करून घ्यावे, म्हणून मी ज्ञानवंतांना या विषयासंबंधाने विचारीत आहे, की ज्याने हे सहाही लोक धारण केले आहेत अशा त्या जन्मरहित आदित्यमंडळातील एकमेवाद्वितीय असे ते परम तत्त्व तरी कोणते ?

(क्रमशः)