दत्ताराम... (भाग ५)

"दिनू, मी कसातरी तुझ्यासमोर जिवंत उभा आहे. पण मला रावसाहेबांची फार भीती वाटते. पुढे रंजना वहिनींचं काय झालं असेल , हेच काही कळत नाही."तो बराच घाबरलेला दिसला. मी म्हंटले, "तिचं काय व्हायचे ते होऊ दे. तू तुझं बघ. पुढे तू काय करणार आहेस? माझी रजा फार तर एक आठवडा वाढवू शकतो. माझ्याबरोबर मुंबईला आलास तरी हरकत नाही. माझी जागा आहेच. तिथे राहू शकतोस. मी लग्न न करण्याचं ठरवलं आहे. तिकडे तू भिक्षुकी कर. तिथे तुझा इतिहास कोणीही विचारणार नाही आणि कोणालाही वेळही नाही. तू काही गुन्हा केला नाहीस. दैवयोगाने तुझ्याबाबतीत जे घडलं ते घडलं. येणार असलास तर लवकर सांग. त्या रंजनावहिनीला डोक्यातून काढून टाक. दुसऱ्याची बायको आहे ती. असल्या गोष्टी डोक्यात ठेऊन आयुष्य फुकट जाईल. " नंतर अकराच्या सुमारास दत्ता घरी गेला. नाना झोपलेले होते. तो दबकत दबकत जाऊन अंथरूणावर लवंडला.

दोन दिवस असेच गेले. आणि एक वेगळीच बातमी पसरली. वहिनीवाड्यातून नाहीशा झाल्या होत्या. रावसाहेब तिच्या नावाने शंख करीत होते. मधून मधून दतालाही शिव्या शाप देत होते. पण वहिनी काही सापडत नव्हत्या. मीपण जरा अस्वस्थच होतो. अजून तरी दत्ताचा माझ्याबरोबर येण्याचा निरोप नव्हता. गावात नक्की काय चालू होते , कोणालाच कळत नव्हतं. अचानक एक दिवस नानांच्या घरी तुकाराम आला. नानांपुढे लोटांगण घालून म्हणाला, 'तुमास्नी रावसायबानी वाड्यावर बलिवलय. ' नाना जरा चमकलेच. पण येतो म्हणाले. रावसाहेबांच्या हल्ली मुंबईला फेऱ्या होत असल्याने बरेच दिवसात काही कार्यही झालेले नव्हते. म्हणून बोलवले असेल असे नानांना वाटले. नेहेमींप्रमाणे नानांनी सदरा टोपी घालून अंगावर उपरणं घेतलं‍ व जोडा घालून निघाले. नाना आल्याची वर्दी दिली. नाना दिवाणखान्यात शिरले. रावसाहेब सिंहासनवजा खुर्ची वर बसले होते.

रावसाहेब म्हणजे एक सत्तरीच्या पुढे झुकलेले सडसडीत बांध्याचे सापासारखे बारिक डोळे व उंच कपाळ असलेले ताम्रवर्णी ग्रुहस्त्य होते. बोलताना त्यांचे दोनी बाजूचे सुळे नकळत पुढे येत. त्यामुळे त्यांच्या साध्या बोलण्यालाही एक प्रकारची धार चढे. त्यांचं हासणंहीभयकारी वाटे. रावसाहेबांनी नानांना समोरील चौरंगावर बसण्याची खूण केली.

नानांपुढे झुकून नमस्कार करीत ते म्हणाले, "नाना, आपल्याला मी त्रास देऊ इच्छित नाही. आपल्याही कानावर आपल्या चिरंजिवांच्या काही गोष्टी आल्या असतील्च. पण केवळ आपण मध्ये आहात म्हणूनच मी सामोपचाराने बोलत आहे. आमच्या सुनबाई गेले दोन दिवस बेपत्ता आहेत. पोलिसात तक्रार केलीच आहे. यात आपल्या मुलाचा प्रत्यक्ष संबंध नसला तरी दुरान्वये संबंध आहे असं मला वाटतं. मी आपल्याला यासाठी इथे बोलावलय की आपण मुलाला योग्य ती ताकीद द्यावी आणि खरं काय आहे ते सांगण्यास भाग पाडावं. आणखी एक आपण ज्योतिषी आहात, त र मला हे सांगा की आमची सून केव्हा परत येईल. नानांना काही सुचेना. ते म्हणाले, " दत्ताचं वागणं मला पटत नाहीच, पण मी त्याला अशी समज देईन मी तो जन्मभर लक्षात ठेवील. " रावसाहेब म्हणाले, " आपण एकदम आतताईपणाने कारवाई करू नये. आपली तब्बेत आजकाल बरी नसते , हे समजलय मला. प्रश्नाचं उत्तर सांगता येईल का? " नानांनी काही आकडेमोड केली आणि म्हणाले, "रावसाहेब , तुमच्या सुनबाई परत येणार नाहीत. "

हे ऐकल्यावर रावसाहेबांचा पारा चढला. ते ओरडले, "नाना शुद्धीवर आहात का ?, काय बोलताय काय? इतका वेळ मी आपला मान राखून बोलतोय. नीट बघा, पाहिजे तर घरी बसून बघा. पण उत्तर देण्याची घाई करू नका. आणी हेच जर तुमचं उत्तर असेल ना तर तुमच्या मुलाला वाचवायच काम करा. नानांना राग आणि अपमान वाटून चक्कर येते की काय असं वाटू लागलं. ते नमस्कार करून कसेबसे उठले व निघाले. घरी आले तर दत्ता बाहेर गेला होता. नानांनी गोळ्या घेतल्या, जेवले आणि पडले. पण त्यांची अस्वस्थता कमी होईना. नाना रावसाहेबांकडे गेले आणि तालुक्याच्या गावाकडून दत्ताला अंत्येष्टी साठी मामलेदारांकडून निरोप आला. त्यांचे वडील गेले होते.दत्ताची कीर्ती पण त्यांच्या कानावर गेली होती. दत्ताने जेऊन घेतले व तो निघाला. दत्ता घरातून बाहेर पडला आणि त्याला लांबून येणारे नाना दिसले. त्याने रस्ताच बदलला. थोड्या लांबच्या रस्त्याने तालुक्याच्या गावी जाण्यासाठी बस स्टँडवर आला.

बराग वेळ थांवूनही वस न आल्याने त्याने पायी जायचे ठरवले. अर्ध्या रस्त्यात मिळाली बस तर पकडू अशा हेतूने तो निघाला. तालुक्याचा गाव फार जवळही नव्हता व फार लांबही नव्हता. तसही सांगणाऱ्याने चारपाच वाजेपर्यत या असे सांगितले होते. पाच सहा किलोमिटर अंतर चालणे दत्ताला कठीण नव्हते. रावसाहेबांच्या वाड्याच्या मागच्या बाजूने ढोरवाडी लागायची. ती ओलांडली की एक रस्ता मोहम्मद शहा बाबांच्या टेकडीवर असलेल्या दर्ग्याकडे जायचा. दुसऱ्या रस्त्याने माळ रान ओलांडलं की तालुक्याचा गाव चालू व्हायचा. दरग्याला जाण्याच्या रस्त्यातच एक मोठा तलाव व तलावाकाठी स्मशान लागायचे. दुपारचे साडेबारा वाजत होते. ऊन हळूहळू तापू लागले. दत्ता डोक्यावर उपरणं घेउन पायातल्या वाहणांचा आवाज करीत शक्यतोवर भराभर चालत होता. रस्ता खडीचा असून मध्येच चढ लागायचा. निदान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तरी पोचायला हवचं होतं.

तो मुद्दामच मुख्य रस्ता धरून चालला होता. आलीच बस तर मिळेल तरी. जेवण झाल्यावर त्याला थोड फार पेंगण्याची सवय होतीच. एखाद दीड कि. मी. अंतर चालल्यावर तो दमला. त्याने घड्याळाकडे पाहिले. जवळजवळ दोन वाजत होते. एक डेरेदार वडाचं झाड पाहून त्याच्या बुंध्याशी उपरण्याची चुंबळ करून तो आडवा झाला. आत्ता कुठे त्याने ढोरवाडी ओलांडली होती. डावा रस्ता दर्ग्याकडे जात होता. जवळ जवळ वीस एक मिनिट त्याला डुलकी लागली. अचानक थंडगार वाऱ्याची झुळुक आली आणि त्याची झोप चाळवली गेली. तो उठून बसला. वारा वाहतच होता. अहेतुक पणे त्याची नजर वडाच्या डोलाऱ्याकडे गेली. त्याच्या मनात आलं , इतका प्रचंड वड क्वचितच सापडला असता. आपल्याच गावातला वड आहे हे पाहून त्याला जरा अभिमानही वाटला. मागच्या वर्षीचे गुंडाळलेले वटपौर्णिमेचे दोरे तसेच होते. हळूहळू त्याची नजर सबंध व्रुक्षभर फिरली. वडाची पाने वाऱ्यामुळे सळसळू लागली. वाऱ्याचा वेगही वाढला् हवेत एकदम गारवा आला. बाजूला तलाव असेल अशी त्याने समजूत करून घेतली. जरा वेळ विचार केल्यावर त्याच्या बुद्धिला ते पटलं. मग पुन्हा तो थोडा आडवा झाला. सहज म्हणून त्याने एकदा डोळे मिटले आणि पुन्हा उघडले. आजूवाजूला भिरभिरले. तो अर्धवट बसता झाला. पंधरावीस फुटावर त्याला एका पाठमोऱ्या स्त्रीची आकृती दिसली. आपण रस्त्याने जाताना एकटेच होतो आणि आपण आत्ताही एकटेच आहोत . या जाणिवेने तो विचलीत झाला. त्याने परत डोळे चोळले. समोर पाहिले. ती स्त्री तशीच उभी होती. फक्त तिचा पदर वाऱ्यावर उडत होता. हीच एकमेव हालचाल . एकदम अशा निर्मनुष्य ठिकाणी हे काहीतरी पाहून घाम सुटू लागला. आपण स्वप्नात आहोत की हा भास आहे ठरवण्याच्या आतच ती आकृती हळूहळू डावीकडे फिरली आणि तिचा चेहरा व पुढची बाजू दिसली. तिच्या अंगावर मळकट गुलाबी साडी व ब्लाऊज होता. चेहरा निर्विकार होता. प्राण कंठाशी आलेल्या दत्ताला आपल्या समोर रंजना वहिनी उभी असल्याचे दिसले. ही इथे कशी ? असं वाटून तो काही बोलणार होता. पण तोंडातून फक्त हबा बाहेर पडली. त्याचा घसा सुकला. काळीज थांबले. श्वास अनियमीत झाला. तो भारल्यासारखा पाहात राहिला.. तेवढ्यात समोरील स्त्री वळली आणि आपल्या हाताने दर्ग्याच्या रस्त्याकडे बोट दाखवून चालू लागली. दत्ताचा ताबा केव्हाच सुटला होता. तो नकळत दर्ग्याच्या रस्त्याने चालू लागला. तलावाजवळ थोडीफार झाडी होती. रंजनाबहिनी त्याच्यापुढे जात होती. तो तिच्यामागे यंत्रवत चालत होता. चालता चालता तिने दिशा बदलली आणि समोरील पडक्या वाड्याच्या दाराच्या चौकटीशी ती पाठमोरीच उभी राहिली. पुन्हा तिने दत्ताकडे पाहिलं आणि तिची आकृती हळूहळू अंधुक होत होत विरळ होऊन अद्रुश्य झाली. थंड वारा आस्ते आस्ते कमी झाला. दत्ता वाड्यापासून थोड्याच अंतरावर उभा होता. सर्वच प्रकार मेंदूच्या आकलना पलिकडील असल्याने त्याला भानावर यायला आणखी काही वेळ लागला.