शे(अ)रो-शायरी : दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुआ

नमस्कार काव्य-प्रेमी मित्रांनो,
आज दि.१५ अप्रिल रोजी कै. सुरेश भट ह्यांच्या जन्म-दिनाचे औचित्य साधून शे(अ)रो-शायरी ही नवीन लेखमाला सुरु करताना मी आनंदलो आहे. ह्या उपक्रमाविषयी आणि त्याच्या नावाविषयी थोडेसे सांगतो-
गेले काही महिने , नावाजलेल्या उर्दू शायरांच्या काही निवडक गझलांचा अर्थ काव्य-प्रेमींपर्यंत पोहोचविण्यासाठी काहीतरी करावे असे मनात होते. ह्याचे कारण असे की, जालाच्या माध्यमातून माझा अनेक काव्य-प्रेमींशी परिचय झाला आहे. त्यातील बहुतेक जण उत्तम मराठी कविता, गझल लिहितात. पण जेंव्हा मी त्यांना अमुक-अमुक शायराची ही उर्दू गझल वाचली आहे का, असे विचारले, तेव्हा अनेकांनी मला ’आम्हाला उर्दू अजिबात कळत नाही,आणि त्यामुळे त्या गझलांचा आस्वाद आम्हाला घेता येत नाही’ अशी खंत व्यक्त केली. अश्या मित्रांसाठी आपण काहीतरी करायला हवे असे मनापासून वाटले. मग असा विचार केला की आपण जालावर वा इतर ठिकाणी ज्या उर्दू गझलांचा आस्वाद घेतो , त्यातील आपल्याला जे जे उमजले, भावले, त्यातील थोडेसे काव्य-प्रेमी मित्रांशी का बरे ’शेअर’ करु नये?; आणि त्यातूनच शे(अ)रो-शायरी ह्या संकल्पनेचा आणि शीर्षकाचा जन्म झाला. शेरो-शायरीतील अर्थ आपल्यासोबत ’शेअर’ करायचा प्रयत्न, म्हणून शे(अ)रो-शायरी हे नाव!
आणखी एक सांगावेसे वाटते की उर्दू विषयी मला सुद्धा, उर्दू ही भाषा उजवीकडून डावीकडे लिहितात, ह्यापलिकडे फारसे काही माहिती नाही:). पण जे-जे काही थोडेसे जाणले ते आपल्यासोबत शेअर करण्यासाठी हा लेखन-प्रपंच!
दुसरे म्हणजे असे की, ही लेखमाला मर्यादित भागांचीच ठेवायची असा मानस आहे, फक्त अकरा! (कविता ह्या विषयाशी ही  लेखमाला संबंधित असली तरीही कविता नावाच्या निर्मातीच्या ’क’ पासून नाव सुरु होणाऱ्या,आणि अखंड चालणाऱ्या हिंदी मालिकांसारखी ती नसणारेय:)). शिवाय फक्त निवडक शेरच आपण घेणार असल्यामुळे-(फक्त पाच-सहाच), पोस्ट्चा आकारही फारसा मोठा नसेल. २-३ आठवड्यातून एक पोस्ट करायचा प्रयत्न करेन.
चला तर,मिर्झा गालिब ह्यांच्या ’दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुआ’, ह्या प्रसिद्ध गझलेने आपण सुरुवात करुया. त्यातील काही निवडक शेरांचा अर्थ आपण बघू.
 मिर्झा गालिब ह्यांच्या रचना अर्थाच्या दृष्टीने इंद्र-धनुष्यासारख्या असल्या तरीही अर्थ पेलायचा असल्यास त्या शिव-धनुष्या सारख्या आहेत, असे मज नेहमी वाटते. या तर, हे शिव-धनुष्य आपल्याला उचलायला जमते का ते बघू!
ह्या गझलेचा मतला असा आहे की-
                                                दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुआ
                                                मै न अच्छा हुआ, बुरा न हुआ
                                      ( मिन्नतकश=आभारी, ऋणी.  मिन्नतकश-ए-दवा= औषधाचा आभारी.)
 शायर म्हणतो की माझे दु:ख , माझी वेदना ही औषधाच्या ऋणात नाहीय, माझ्या वेदनेला औषधाचे आभार मानायची गरज पडली नाही. कारण ’मै न अच्छा हुआ’ म्हणजे माझी वेदना हे औषध काही दूर करु शकलेले नाही, मी बरा झालो नाही.  पण हे जे झाले ते, ’बुरा न हुआ’ म्हणजे काही फारसे वाईट झाले नाही, कारण मी जर बरा झालो असतो तर माझ्या वेदनेला कायम औषधाच्या ऋणात, औषधाचे आभारी रहावे लागले असते, आणि मला, माझ्या वेदनेला कुणाच्याही ऋणात राहणे कदापि मंजूर नाही. कविची स्वाभिमानी आणि मनस्वी वृत्ती ह्या शेरातून बघायला मिळते.
पुढे शायर म्हणतो की-
                                            जम्मा करते हो क्यूं रकीबो को
                                           इक तमाशा हुआ, गिला न हुआ
                                       (रकीब=शत्रू, प्रतिस्पर्धी.  गिला=तक्रार)
गालिब म्हणतोय की, ’जम्मा करते हो क्यूं रकीबो को’ म्हणजे माझ्या शत्रूंना तुम्ही का गोळा करताहात? हा तर ’इक तमाशा हुआ’, म्हणजे एक तमाशा होईल’, ’गिला न हुआ’ म्हणजे माझ्या विरुद्ध तक्रार करणे होणार नाही.  शायर आपल्याला प्रतिस्पर्ध्याला उद्देशून असे म्हणतोय, वाद तुझ्या-माझ्यात आहे, तुला माझ्या विरोधात जर काही बोलायचे आहे, काही तक्रार करायची आहे, तर ती माझ्या समोरासमोर येऊन कर, माझ्या शत्रूंना असे गोळा करुन तू जे करतो आहेस तो एक तमाशाच आहे, माझ्या विरुद्ध तक्रार करण्याची की कुठली पद्धत आहे?
पुढे गालिब म्हणतो की-
                                            है खबर गर्म उनके आने की
                                           आजही घरमे बोरिया न हुआ
                                             ( बोरिया=चटई)
ह्यातील भावार्थ असा की, माझी प्रेयसी आज माझ्या घरी येणार आहे अशी बातमी मी ऐकतोय, आणि ती आल्यावर, अगदी नजरेच्या पायघड्या घालून तिचे स्वागत करण्याची माझी इच्छा आहे, पण माझे दारिद्र्य आणि दुर्दैव बघा की तिला बसायला द्यायला, नेमकी आजच, घरात साधी चटई सुद्धा नाहीय.मला प्रेयसीचे अतिशय प्रेमाने स्वागत करायचे आहे, पण मी किती भणंग आहे बघा, की घरात एक साधी चटई सुद्धा नाहीय. गालिबने त्याच्या आयुष्यात खूप हलाखीत दिवस काढले आहेत. त्याचेच प्रतिबिंब कदाचित ह्या शेरात पडले असावे का?
पुढे शायर म्हणतो की-
                                          कितने शीरी है तेरे लब के, रकीब,
                                          गालिया खाके बे-मझा न हुआ
                                           ( शीरी= मधुर,  लब=ओठ)
 गालिबने ह्या शेरात अतिशय अनोख्या पद्धतीने प्रेयसीच्या ओठांची तारीफ केलीय. तो म्हणतो की ",कितने शीरी है तेरे लब" म्हणजे" , "प्रिये, तुझे ओठ इतके मधुर आहेत की",  "रकीब, गालिया खाके बे-मझा न हुआ", म्हणजे "माझा प्रेमातील जो प्रतिस्पर्धी आहे, ज्याने तुझ्या ओठांचे माधुर्य अनुभवलेले नाहीय, (खरे तर तो ही त्याकरिता आसुसलेला आहे), त्याने तुझ्या ओठातून ज्या शिव्या ऐकल्या, त्या सुद्धा त्याला मधुरच भासल्या! खरे तर शिव्या ह्या कडवटच वाटायला हव्या होत्या, पण तुझ्या ओठांचे माधुर्य असे की शिव्या ऐकून सुद्धा तो ’बे-मझा’ झाला नाही; म्हणजे त्याला मझाच आला!
पुढील शेर बघा-
                                         क्या वो नमरुद की खुदाई थी,
                                           बंदगी मे मेरा भला न हुआ
                                (नमरुद= एक राजा, जो स्वत:ला ईश्वर समजायचा,  बंदगी=भक्ती,ईश्वर-सेवा)
शायर म्हणतो की, एकीकडे नमरुद नावाचा राजाची ही गुर्मी, की तो स्वत:लाच खुदा मानायचा, ईश्वराने त्याचे काडीचेही वाकडे केले नाही, आणि मी आयुष्यभर जी त्याची बंदगी, म्हणजे सेवा केली, त्याचे फळ मला काहीच मिळाले नाही. गालिब एका अर्थाने ईश्वरालाच हा सवाल करतोय की माझी सेवा ही काय नमरुदच्या खुदाई सारखी होती की काय, म्हणून मला ईश्वर-सेवेचे काहीच फळ मिळाले नाही?
 ह्या लेखातील जो शेवटचा शेर आपण बघणार आहोत, तो तर एकदम उत्तुंग असा आहे, तो असा की-
                                               जान दी; दी हुई उसीकी थी,
                                             हक़ तो ये है के, हक़ अदा न हुआ
                                      (हक़=खरे,सत्य,  हक़=हक्क, जवाबदारी)
हक़ ह्या शब्दाच्या दोन अर्थाचा अतिशय अलंकारिक पद्धतीने गालिबने ह्या शेरात उपयोग केलाय. शायर म्हणतो की, "जान दी; दी हुई उसीकी थी", म्हणजे मी ईश्वराने दाखविलेल्या रस्र्त्यावरुन चालताना माझे आयुष्य वेचले, पण हे आयुष्य मला कोणी दिलेय? हे तर त्यानेच दिलेय! म्हणून पुढे शायर म्हणतो की" खरे तर हे आहे की जे आयुष्यच त्याने दिलेय, जे मुळात माझे नव्हतेच मुळी, ते मी त्याच्या सेवेत जरी लावले असेल तरीही त्याचा अर्थ, माझ्यावर त्याने टाकलेली जवाबदारी मी पूर्ण केली असा होत नाही.हे जीवन त्यानेच दिलेले होते, जे मी त्याच्या करिता वाहिले, पण मी माझ्याकडून काय दिले, हा खरा प्रश्न आहे! म्हणून शायर म्हणतो की, "हक़ तो ये है के, हक़ अदा न हुआ".  ह्या विचाराची उत्तुंगता खरे तर हिमालयालाही लाजवील अशी आहे!
चला तर, आता निघतो, पुढील भागात भेटूच!
आपल्या अधिक माहितीकरिता- ’लता सिंग्स गालिब’ ह्या हृदयनाथांनी संगीत-बद्ध केलेल्या ध्वनि-फितीत ह्या गझलेतील काही शेर आपण ऐकू शकता. (राग ’जोगकंस’ मधे ही चाल बांधली आहे बहुदा.) कृपया गुगलवर शोधा :)

                                 -मानस६