मे २०१०

बँकांचा उदय- २

ह्यासोबत
तेराव्या शतकात युरोपात व्यवहारात रोमन आकडे वापरले जायचे, जे बॅंकांमधे ज्यास्वरुपाचे काम होणे अपेक्षित असते त्यास अनुकूल नव्हतेच. पण आर्थिक व्यवहारास उपयुक्त अशी गणिती पद्धत युरोपात आणण्याचे श्रेय फिबोनासीकडे जाते. त्याकाळात फिबोनासी (http://en.wikipedia.org/wiki/Fibonacci) हा इटलीमधे गणिती तज्ञ म्हणून मान्यता पावला. त्याने "द बूक ऑफ कॅल्क्युलेशन" लिहून युरोपाला दशमान पद्धत दिली असे म्हणले जाते**. युरोपात बॅंकांच्या व्यवहाराचा पाया ह्या तंत्रामुळे घातला गेला. त्याने ह्या पुस्तकात त्याकाळात ज्या वस्तूंचा व चलनाचा व्यवहार चाले त्यांची उदाहरणे देऊन व्याज कसे काढायचे, बूककिपींग कसे करायचे आदी गोष्टी समजावून सांगितल्या आहेत.

बॅंकांच्या उदयातील प्रवासाचे आणखी दाखले दिले जातात ते शेक्सस्पीयरच्या कथांमधील काही पात्रांचा. त्याच्या काही नाटकात ज्यु (ह्यांना आपल्याकडे शनवार तेली म्हणतात का? का?) कसे सावकारी करत ते लिहिले आहे. असे व्यवहारही अर्थातच बॅंकांचा पाया घालत होते. ज्युंच्या सावकारीच्या कथांनी युरोपातील १२ ते १६ व्या शतकातील आर्थिक व्यवहारांची कल्पना येते.

१४ व्या शतकात इटली मधेच मेडीसी नावाचे प्रभावशाली कुटूंब उदयास आले. त्यांनी खरेदी केलेले राजमहालतुल्य काही प्रासाद, त्यांचे कलात्मक वस्तूंवर असलेले प्रेम व त्यासाठी कितीही किंमत मोजायची तयारी, हे सगळे त्यांच्या वैभवाची साक्ष देत. हे वैभव त्यांनी त्याकाळी परकीय चलन व्यवहारातून मिळवले होते. ज्युंप्रमाणेच त्यांनी सावकारीपासून सुरुवात केली. सावकारीशी जोड असलेली गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची होती. त्यांच्यातील गियोवानी मेडीसी ह्याने त्यांच्या परंपरागत व्यवसायाला नावारुपास आणून इतरही शहरात त्यांच्या व्यवसायाच्या शाखा निर्माण केल्या. त्याचा थोरला मुलगा कोसिमो आणि त्याने युरोपात अनेक मोठ्या शहरात शाखा सुरु केल्या. त्याकाळात प्रामुख्याने सोने आदी धातू ह्यांचे व्यवहार, तसेच काही प्रकारच्या करवसूली अशा स्वरुपाच्या आर्थिक व्यवहारात इतर सावकार पैसे गुंतवत असतांना, मेडीसी कुटूंबाने वेगळ्या स्वरुपाचे आर्थिक व्यवहार उदयास आणले. त्यांनी दोन व्यापाऱ्यांमधिल व्यवहारांत "मध्यस्त" (ब्रोकर) ची भूमिका पार पाडणे सुरु केले. मेडीसी कुटूंबाचा प्रभाव युरोपातील राजकारणावर १८ व्या शतकापर्यंत टिकून होता. बॅंकांच्या उदयात ह्या कुटूंबाचे नाव अग्रेसर राहील. त्यांना कळून चुकले होते की, बॅंकांच्या भरभराटीसाठी छोटे व्यवहार कुच्कामी आहेत; खूप मोठे व्यवहार करुनच त्यांनी त्यांचे साम्राज्य अख्ख्या युरोपात पसरवले.

मेडीसी कुटूंबाने दाखवलेल्या मार्गावर पुढे जात, इतिहासात तीन मोठ्या आणि पायाभूत अशा घटना घडल्या. त्या पुढे मांडल्या आहेत-

इटलीची ही बॅंक-देणगी संपूर्ण युरोपात राबवली गेली. आताच्या आधुनिक बॅंकांचा पाया ज्या काळात घातला गेला तो काळ म्हणजे १७ वे शतक. ऍमस्टरडॅम ए़क्सचेंज बॅंक १६०९ मधे स्थापन झाली. ह्या बॅंकेची महत्वाची कामगिरी होती, जवळपास १६ प्रकारच्या चलनांमधे व्यवहारात सुसूत्रता आणणे. व्यापरांना खाते उघडण्याची सुविधा, त्यांना प्रमाणीत चलनात व्यवहारची सुविधा देणे इतकेच नव्हे तर डायरेक्ट डेबिट, चेक, ट्रान्सफर हे आजच्या कोअर बॅंकींगचे स्वरुप त्यांनी रचले.

स्टॉकहोम बॅंकेची स्थापना १६५७ साली झाली. त्यांनी ऍमस्टरडॅम ए़क्सचेंज बॅंकेचे स्वरुप आत्मसात केले होतेच; पण असे म्हणले जाते की, त्यांनी फ्रॅक्शनल रीझर्व्ह बॅंकींगची सुरुवात केली.

तिसरी मोठी घटना होती ती म्हणजे १६९४ मधील लंडन बॅंकेची स्थापना! युद्धफंडासाठी नियुक्त केलेली ही बॅंक, कर्जरोख्यांच्या माध्यमातून सरकारला पैसा पुरवत असे. १७४२ मधे ह्या बॅंकेला सरकारने काही खास अधिकार देऊन, त्यांना चलनी नोटा निर्माण करुन त्या वापरात आणण्याची मुभा देण्यात आली.
(ह्या संदर्भात "डॉमिनो इफेक्ट" ची माहिती घेणे मनोरंजक होईल.)

ह्याच काळात इटलीतील बॅंकींगचा आदर्श घेत पुढे चाललेले युरोपातील देशात एक खोट राहीली होती- ती म्हणजे स्पेन. चांदीच्या व्यापारातून पैसे मिळवण्याचा त्यांचा प्रघात त्यांनी चालू ठेवला व इतर देशात ज्या घडामोडी घडत आहेत त्यावर दुर्लक्ष केले. त्याचा दुष्परीणाम होऊन स्पेनचे सरकार १६ व्या ते १७ व्या शतकात १४ वेळा आर्थिक संकटात सापडले. अशा बुडीत सरकारची भरभराट होणे शक्यच नव्हते आणि बँकांच्या माध्यमातून वैभव मिळवण्याचे दिवस आले होते- ते ज्यांनी स्वीकारले त्यांना त्याचे भरगोस यश मिळाले.

[आधारीत - द असेंट ऑफ मनी- लेखक- नियाल फ़र्गसन]

**(त्याने युरोपात भारतीय गणितशास्त्र वापरुन एक आकडे-मालिका प्रसिद्धीस आणली. ती आपल्याकडे आधीच माहिती होती व त्याबद्दल येथे माहिती दिली आहे- http://en.wikipedia.org/wiki/Pingala. त्या आकडे-मालिकेस आज आपण फिबोनासी नंबर (http://en.wikipedia.org/wiki/Fibonacci_number) म्हणून ओळखतो).

Post to Feedमाहितीपूर्ण

Typing help hide