झांसीराणी लक्ष्मीबाई - १

                            बुंदेले हर बोलोके मुह - हमने सुनी कहानी थी ।
                            खुब लढी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी  ! 
राणी लक्ष्मीबाईंच्या स्वातंत्र्य समरातील आहुतीला १८ जुन रोजी जवळपास दिडशे(१४७) वर्ष पूर्ण होतील त्यानिमीत्ताने त्या समरातील विरांना एक श्रद्धांजली."१८५७ चा स्वातंत्र्य समर" ह्या स्वा.वीर सावरकर ह्यांच्या पुस्तकातील काही भाग घेउन त्याची इतिहासाशी जोडणी केली आहे.



गंगाधर रावांची पत्नी झाल्यावर लगेच विधवा होण्याचे दुर्भाग्य नशिबी आलेल्या-जळगांव जिल्ह्यातील पारोळ्याच्या मोरोपंत तांब्यांची कन्या झांशीची राणी झाली. गंगाधररावांनी मागे सोडलेले झांसीचे वैभव व दामोदर हा दत्तक मुलगा सांभाळण्याचे परम कर्तव्य लक्ष्मीवर दुर्दैवाने आले होते. दुर्भाग्य व संकट एकटी येत नाहीत - डलहौसीने १८५४ मध्ये दत्तक मुलांना वारसाहक्क देण्याचे नाकारून झांशीचे राज्य इंग्रज सत्तेत खालसा करण्याचा कुटील डाव आरंभला.


"मेरी झांसी नही दुंगी" ची गर्जना करीत लक्ष्मीने त्यांचे अधिपत्य स्विकारण्यास नकार दिला व "मेरी झांसी नही दुंगा" ची आरोळी प्रांतात दुमदुमली. ३/४ वर्ष प्रजा संगोपनाचे कार्य लक्ष्मीबाई करित असतां संस्थान घशात घालायचा डाव इंग्रज खेळत होते. "झांसी नही दुंगी" ही काय गडबड आहे हे पाहण्यासाठी सर ह्यु रोज ब्रिगेडियर जन.व्हिटलॉक व चार हजार शस्त्रसज्ज सैन्य व भयंकर तोफांसह बुंदेल खंडाकडे चालून गेला.


मद्रहून निघून सर ह्यु रोजने काल्पीपर्यंत १८५७च्या समरविरांच्या ताब्यातला प्रदेश जिंकत जावे, तर जबलपुराहून निघून सर व्हिटलॉकने बिना, कर्की वगैरे मुलूख घेत घेत सर ह्यु रोजला मिळावे व अशा रितीने ह्या दोन फौजांनी गंगा-यमुनेच्या दक्षीणेकडील प्रदेशात सत्ता संपादित करावी असा कार्यक्रम ठरला होता. सर ह्यु रोजने २० मार्च.१८५८ ला झांसी पासून १४ मैलांवर तळ ठोकला. २३च्या रात्री उशीराने आंग्लसेनेशी झुंज सुरू झाली. इंग्रजांचा रणपंडीत सर ह्यु रोज व झांसीची कोवळ्या वयाची अबला राणी लक्ष्मी ! कोण अपूर्व झुंझ ! ता. २५ पासून लढाईला खरे तोंड फुटले. अत्यंत शौर्याने राणीने बुंदेलखंडांच्या कडव्या शिपायांसह किल्ला लढला. इंग्रजांजवळ इतकी साधन सामुग्री असतांनाही झांशीचा वेढा फोढायला त्यांना तब्बल ३१ ता. पर्यंत लढावे लागले. सर ह्यु रोज च्या अवाढव्य सैन्याला झांशी पुरून उरली. तोफखान्याच्या अग्निवर्षावामुळे कोसळलेली भिंतही रातोरात गवंडी बोलावून आणून दिवस उजाडण्याच्या आत पूर्ववत भिंत बांधणारे शत्रू चे विर सर ह्यु रोजने आयुष्यात प्रथमच पाहिले होते.


तात्या टोपे विन्डहेमचा पराभव करून काल्पी मार्गे येत असता राणीची चिठ्ठी त्यांना मिळाली पण महीनो लढलेल्या त्यांच्या सेनेने इंग्रजांपुढून पळ काढला. बेटवा नदिवर झालेल्या त्या घनघोर युद्धांत इंग्रजांनी तात्या टोपेंच्या सेनेचा पराभव केला. येथे राणीने किल्ला लढवून ठेवला होता पण दक्षिण तट पडल्यावर मोजक्या सैन्य व प्रमुख माणसांसह राणीने मध्य रात्री किल्ला सोडला. तेहरी संस्थानाचा देशद्रोही पहारा फोडून काल्पीच्या दिशेने नानासाहेब पेशवे व तात्या टोपेंना सामिल होण्यासाठी पसार झाली. बौकर व त्याचे साथी तिच्या पाठलागावर लागले पण त्याला युद्धात जखमी करून दामोदरास पाठीशी बांधलेली राणी तेथून निसटली..... १०२ मैलांचे अंतर घोड्यावरून दिवस भर कापत ती काल्पीला पोहचली. काल्पीला पोहचताच तिच्या त्या कर्तव्य तत्पर घोड्याने प्राण सोडला ! 


रावसाहेब पेशव्यांनी व लक्ष्मीबाईने स्वराज्यासाठी रक्तांचा शेवटचा थेंब शरिरात असेपर्यंत शत्रुशी अखंड युद्ध चालू ठेवण्याचा निश्चय केला ! येथे झांशीत ब्रिगे.जन. व्हिटलॉकने मोरोपंत तांब्यांना पकडून फाशी दिले. झांशीत अमानुष कत्तली व नादिरशाही लूट केल्यावर ब्रिगे. शांत झाला. मधल्या काळात राणी पेशव्यांबरोबर पुढील संघर्षाची तयारी करिंत होती. काल्पी पासून ४२ मैलांवरिल कुंच गावी सर्व स्वराज्याचे विर एकत्र जमा झाले परंतू अपुर्व सावळा गोंधळ झाला. अनेक सेनापतींखाली हुकुमांनी लढलेल्या ह्या सेनेचा आपापसांत ताळमेळ नसल्याने एका हुकुमशाही इंग्रज सेनापतीच्या अधिपत्याखालिल सेनेने त्यांचा धुव्वा उडवला. तेथे तात्या टोपेंनी पराभवाची लक्षणे दिसतांच ग्वाल्हेर कडे कुच केले - काल्पी तर हातातून जात होती - ग्वाल्हेरला जावून तेथल्या मंडळींना फोडायचे कर्तव्य शिरावर घेऊन ते काल्पीहून निघाले. इंग्रजी इतिहासात ह्या महत्वपूर्ण चालीची 'पळपुटेपणा' म्हणून नोंद करून निर्भत्सना केली गेली.


तात्या टोपे इंग्रजी सेना काल्पी सर करेल ह्या अंदाजाने ग्वाल्हेर कडे फोडाफोड करायला कुच करित असतांनाच अचानक विरश्री संचारल्या गत स्वातंत्र्यविरांनी काल्पीला उचल खाल्ली. सर ह्यु रोजची २५वी नेटिव्ह इन्फंर्ट्री मेजर आर च्या कुशल नेतृत्वा खाली सामोरी आली पण राणी लक्ष्मी ह्या रणचंडीके च्या झंझावातासमोर साफ निष्प्रभ ठरली. त्या विशी बाविशीच्या तरूण रणलक्ष्मीचा आवेग, आवेश, तिचा बेफाम सुटलेला घोडा, तिची रपासप चालणारी समशेर, पाहून मेजर आर च्या अधिपत्याखालील सेनेची दाणादाण उडाली. तिचा तो भयंकर चमचमाट पाहून दिपलेला सर ह्यु भानावर येउन आपले राखलेले उंटावरचे सैन्य घेऊन पुढे घुसला. त्या नविन जोमाच्या सैन्याच्या बळावर कसेबसे मेजर आर ची वाघीणीच्या जबड्यातून सुटका झाली. त्या काळातील एका इंग्रज अधिकायाने लिहून ठेवले आहे.... " सर ह्यु ला पंधरा मिनीटे उशिर होता तर तीने आमची कत्तल उडवली असती. त्या उंटावरच्या सैन्याने आम्हाला वाचविले - त्या दिवसापासून माझे प्रेम उंटावर जडलेले आहे."


उंटावरल्या शाहण्या सर ह्यु ने स्वत:ची अब्रू वाचवण्यात यश मिळवले. आणखी एक दोन दिवस छोट्या मोठ्या चकमकींनंतर इंग्रज काल्पीत प्रवेशले. नानासाहेब पेशव्यांनी व तात्या टोपे ह्या मर्द मराठी गड्याने अथक परिश्रमाने वाढवलेले काल्पीचे साम्राज्य आंग्लांच्या गळ्याखाली उतरले(२४ मे).


सापडले नाहीत ते फक्त स्वांतंत्र्य विर ! काल्पीहून युक्तीने त्यांनी ग्वाल्हेर कडे पळ काढला होता. त्यात राणीही सामील होती.


प्रकृती अस्वास्थ्याने सर ह्यु रोजने आपला चार्ज सोडला व बंडखोरांचा बिमोड करण्यात यश मिळवल्याच्या आनंदात इंग्रज सेना विसावा घेण्यासाठी बसू लागली. तेव्हढ्यात एक जयघोष गर्जना झाली....
"आही रावसाहेब पेशवे आहोत, आम्ही स्वराज्यासाठी व स्वधर्मासाठी लढत आहोत" गोपाळपुराहून रावसाहेबांनी ही घोषणा करताच इंग्रजांच्या पायाखालील जमीन परत हादरली........


भाग २ ..... गोपाळपूर व ग्वाल्हेरचा संग्राम १७ जुन रोजी......
माधव कुळकर्णी.