सत्येन देसाई ... (भाग ४ )

सत्येन हल्ली दांड्या का मारीत होता, कोण जाणे. महिना संपत आला. नितीन भाईचे बारा लाख अजून आलेले  नव्हते. मी त्याला फोन करायचं ठरवलं. हा चान्स आता मला घ्यायचा होता. मग एक दिवस आय. टी. ने आम्हाला तिघांना पार्टी दिली. आम्ही चौघेही चर्चगेटला एका परमीट रूम मध्ये बसलो होतो. आम्ही ड्रिंक्स घेतोच असं समजून आय. टी. ने व्हिस्की मागवली. बरोबर खायला चिकन  लॉलिपॉप होतं. पावसाळा असल्याने बरं वाटत होतं.

आम्ही ग्लास तोंडाला लावणार तोच आय. टी. म्हणाला, "धिस इज फॉर सत्येन , माय सन" आम्ही चिअर्स केले. मला सत्येनचं अजिबात कौतुक नसलं तरी इलाजही नव्हता. प्रीतम कोरा चेहरा ठेऊन पीत होता. त्याला पाहून आय. टी .  म्हणाला, " अरे, कुछ तो बोलो. हम मातम मनाने आये है क्या ? " मग मीच वोलायला सुरुवात केली. सहजच टेंडर भरण्याचा विषय काढला. त्यावर आय. टी. म्हणाला की कोणाला तरी कमीशन द्यायचं आणि टेंडर मिळवायचं हे त्याला पसंत नव्हतं. मग सत्येनने सुचवलं , हा नवीन  धंदा आहे आपण करून तर पाहू. त्यावर आय. टी. म्हणाला, "अब तुम लोग बोल राहा है तो भरेंगे टेंडर, बट सत्येन , यु विल बी इंचार्ज ऑफ  धिस वर्क. "

मला ते आवडलं नाही. ते काम मला हवं होतं . मग तो पुढे म्हणाला, "लेकी न तुम्हारा काम विनायक सुपर्वाईज करेगा. "

सत्येनने  ते मान्य केले. आठ वाजायला आले होते. आत्तापर्यंत तीन चार पेग तरी पोटात गेले होते. आय. टी. ची फालतू बडबड चालू होती . ती इथे लिहिण  कठीण आहे. पण अधून मधून तो सारखा बोलायचा की सत्येन त्याचा मुलगा आहे, आणि आम्ही हसायचो. (म्हणजे मी आणि प्रीतम) मग त्याचं लक्ष समोर गेलं . तिथे त्याला नितीन भाई दिसला. त्याने त्याला बोलावलं आणि माझी ओळख करून दिली. "मीट मि. गायकवाड. ए टॅलेंटेड  मॅन ऑफ द युनिव्हर्स. "

नितीन भाई पण टाईट होता . तो फक्त ओ. के. म्हणाला आणि एक्सक्यूज म्हणून पळाला. आय. टी त्याला फारसा  आवडत नसावा. आमची जेवणं होईपर्यंत अकरा वाजले. आय. टी. चा ड्रायव्हर त्याला घेऊन गेला. गाडीत बसेपर्यंत त्याचं एकच चालू होतं.  "सत्येन इज माय सन, बोथ ऑफ यु रिमेंबर. " मग प्रीतमनि मला व्हीटी ला सोडलं आणि तो सत्येन ला सोडून तो घरी गेला असावा.

असेच काही दिवस गेले. एक रविवार पाहून सुप्रिया म्हणाली, "इतके दिवस आपल्याला मुंबईला  येऊन झाले. तुम्ही मला चौपाटीलाही घेऊन गेला नाही की मुंबईही दाखवली नाही. मग मी तिला घेऊन दुपारीच मुंबईला गेलो. तिने मनसोक्त शॉपिंग केलं आणि संधाकाळी पावसाची रिपरिप असूनही आम्ही भिजतच दादर चौपाटीला गेलो. संध्याकाळचे सात वाजत होते. पावसाळी काळोखी होती आणि अंधारही पडला होता. समुद्रावरून थंडगार वारा बेमुर्वत वाहत होता. मी तिच्यासाठी गजरा घेतला. तिच्या गळ्यात हात टाकून मी बसण्याची जागा शोधू लागलो. बरीचशी जोडपी आधी पासूनच बसलेली होति. बी. एम‌. सी. च्या मेहेरबानी मुळे अर्धे स्ट्रीट लाईट  चालू होते आणि अर्धे बंद होते. जे चालू होते ते इतके मंद होते की अंधारच जास्त वाढला होता. थोडं जास्त दूर गेल्यावर आम्हाला जागा दिसली. तिथे थोडं अंतर सोडून दोन जोडपी बसली होति. त्यांचं प्रेमगुंजन चालू होतं. मी त्यांच्या जवळून जात असता दबक्या आवाजातलं बोलणं ऐकू आलं. "प्लीज नको रे आता सोड ना" त्यावर तो म्हणाला, "अगं, आत्ताच तर आलोय आपण जायची घाई कशाला ? "

पुरुषाचा  आवाज ओळखीचा वाटल्याने मी जरा थांवलो. आवाज सत्येनचा असावा. मग त्याच्याबरोबर असलेली स्त्री म्हणाली , "प्लीज पुन्हा कधी तरी  येऊ रे. आज नको. आज उशीर झालाय. " हा आवाज नक्कीच वासंतीचा असावा. सुप्रियाला सांगण्याची सोय नव्हती. ति मला सत्येन वरून  बोलायची , " तुम्ही स्वतःचं नाव सत्येन देसाई सांगत असणार. कारण तुम्हाला जिकडे तिकडे सत्येनचाच भास होतो. " माझे कान टवकारले  गेले. ते दोघेही एक्मेकांना लगटून चालू लागले. अंधारात चेहरे दिसत नव्हते तरी त्यांचं अर्धवट बोलणं ऐकू येत होतं.

सुप्रियाने माझा हात  ओढला, म्हणाली, " शी, लोकांकडे काय बघताय? चला ना. " मी अनिच्छेनेच तिच्याकडे वळलो. मला उगाचच वासंती वापरीत असलेल्या  सेंटचा वास आला. मी कल्पना करीत होतो की खरच वास आला कोण जाणे. माझं अर्ध लक्ष त्या दोघांकडे होतं. मी उंची वरून आणि चालीवरून ओ ळखलं की ति सत्येनच होता. एका लाईटच्या प्रकाशात वासंतीच्या चेहऱ्याची आउटलाईन दिसली. माझा इंटरेस्ट एकदम नाहीसा झाला.  मी यांत्रिकपणे सुप्रियाच्या केसात गजरा माळला. ती मला बिलगली. कितीतरी वेळ ती माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन होती . माझ्या मनात आलं. बेटा विनायक तुझा पत्ता कट . थंड वारा वाहत होता. वातावरण पावसामुळे मादक झालं होतं. आम्ही दोघे बराच वेळ बसलो होतो. माझ्या कोरड्या उत्तरांचा आणि प्रतिसादांचा सुप्रियाला संशय आला नाही. मग आम्ही घरी परतलो. मला त्या रात्री अर्धवट झोप लागली. मी बराच वेळ त्या दोघांचा विचार करीत राहिलो.   

(क्र म शः )