भाया..... (व्यक्तिदर्शन) (भाग-३)

परवाच पडलेल्या पावसाची ओल अजून जमीन धरून होती त्यामुळे प्रार्थना वर्गातच झाली . परवाच्या झालेल्या मुसळधार पावसाने शाळेच्या आजूबाजूला पाण्याचे छोटे छोटे डबकेच तयार झाले होते. तासाचा टोल देऊन शाळेचा शिपाई केव्हाच आपल्या स्टूलवर (तिपाई) विराजमान झाला होता. दयाराम मास्तरांना पहिला तास नसल्या मुळे ते ही कार्यालया समोरील व्हरांड्यांत आपल्या शाळेच्या पटांगणात सहज न्याहाळत उभे होते. कदाचित आपल्या स्वतःच्याच पायवाटेने त्यांचा प्रवास चालला होता. कोण कुठल्या एका पाड्यावरचा मी कुठल्या कुठे आलो? . लोखंडाची गोल आसरी (मांडोळी) घेऊन रस्त्यावरून पळणारा आज पळत पळत एका शाळेच्या कार्यालयीन निरीक्षक पदा पर्यंत पोहचलो. मधला काळ एखाद्या चलचित्रा सारखा झर झर डोळ्यापुढून चालला होता.. ती पाण्यातील शिवासाई, विटी दांडू, गोट्या , सगळं कस मास्तर जिवंत पाहत होते. एवढ्यात लोहाराच्या सद्याने हाक मारत मास्तराला भानावर आणलं..

" काय रे सदा?, सकाळी सकाळीच शाळेत ? अरे काय झालं? " दयाराम गुरुजींनी काहीस आश्चर्यानेच विचारले.

"नाही,निरोपच तसा आहे म्हणून... " सदा पुढे बोलणार होता पण, मास्तरांनी त्याच बोलणं तोडत "बरऽऽबर ! , आलास तर ये शिक्षकांच्या

कक्षात जाऊ." म्हणत असतांना सदा म्हणाला " अरे ऐक तर खरं! तुझ्या गावातल्या घराने परवाच्या रात्रीच्या पावसात एका बाजूची भिंत सोडलीय तेव्हा... " मास्तरांनी तेवढं ऐकलं आणि " घरी निरोप दे वहिनीला !,"सांगत मुख्याध्यापकांच्या कक्षातून कोणाला काही तरी निरोप देऊन , सायकल काढून मास्तर जे निघाले ते गावाकडे.

सायकलीला कितीही गती दिली तरी ती मनाची गती थोडीच गाठू शकणार होती. 'काय झाल असेल?, कुठे लागल असेल का?,परवा कोसळलेली भिंत आणि आज निरोप, काय म्हणाव ? काय भरवसा ठेवावा?. ' स्वतःच्याच विचाराच्या तंद्रीत मास्तर सायकल पिटाळत होते. एव्हान सायकल तालुक्याच्या बाहेर पडली नव्हती पण मास्तर मात्र गावातल्या घराकडे जाऊन पोहचले होते. 'तरी म्हणत होतो

अगऽऽ! ही भिंत केंन्हा दगा देईन , तू घरी चल म्हणून!, भिंत उतरवून बांधल्यावर पुन्हा आणून सोडतो, पण ऐकेल तर ती म्हातारी कसली? वरतून म्हणते बघूया कोण दगा देते ते? आता हिच्या पुढे काय बोलणात कपाळ? '. विचारांच्या नादातच मास्तर तालूक्याची बाजातपेठ सोडून मुख्य रस्त्याला केंव्हा लागले ते त्यांनाच समजले नाही.

आता गावा बाहेरील वस्तीची घर पण माघे पडत चालली होती . काल ही तुरळक प्रमाणात रात्री पाऊस पडल्यामुळे रस्त्याकडची माती अजून तशी ,चिखल झाला नाही तरी ती ओलीच जाणवत होती . सगळी कडे जमीन अजून ओकड बोकडच होती . नाही तरी एक दोन पावसात काय होणार म्हणा ? , वाहून गेलेल्या पाण्याच्या ओघळांनी बाकी आपल्या अस्तित्वाच्या खुणा मातीवर छान पैकी उमटवल्या होत्या , नाही पेक्षा वातावरणात बदल झाला होता एवढं मात्र खर . जणू काही मानवी मनाला आनंद देण्यासाठी सृष्टी कातच टाकत होती , हा वातावरणातील बदल पाहून कोणालाही उत्साह संचारला असता हे खर पण त्याच मन मात्र त्याच्या जवळ असायला हव, नाही तरी हा मानवी स्वभावच शरीर कुठे आणि मन कुठे?.

मास्तरांचंही तसंच झाल होत. वातावरण जरी सकाळ पर्यंत आल्हाददायक होत तरी आता वातावरण मात्र घरच्या ओढीने पार बदलून गेल होत, ते एवढ की उताराला हि मास्तर सायकलीला पाय मारत होते आणि विचाराच्या तंद्रीत गावाकडच्या घरा भोवती फिरतं होते.

डांबरी रस्ता सोडून मास्तर गावाकडच्या कच्च्या रस्त्याला एव्हाना लागले होते. आता खरी कसरत होती, दगडही चुकवायचे आणि गाळ हि, आणि पल्ला गाठायचा‍. अवघड वाटत तस पण मास्तरांना काही गावाचा रस्ताही नवा नव्हता आणि पावसाळाही. बैल गाडीच्या आसारीवर (चाकाच्या) तयार झालेल्या रस्त्यावरून वाट शोधत शोधत मास्तर आपली वाट बरोबर काढत चालले होते, झाल आता ह्या टेकडीला तीन मैलाचा वळसा घातला की, पुढचा डोंगर उतरला की मास्तर आपल्या पाड्यावर उतरणार होते.

रस्ता जस जसा माघे सरत होता तस तस मास्तरांच मन मात्र वेगाने धावत होत, कितीही धाव घेतली तरी वेळ तेवढाच लागणार होता , आणि शिवाय टेकडीला वळसा घालतांना थोडा चढ चढावाच लागयाचा. मास्तर नेमके चढणीवर असल्यामुळे सायकलच्या गतीतवर हि परिणाम झालाच होता आणि त्यात गावाकडून सद्याने आणलेली हि बातमी मास्तरांचा जीव नुसता टांगणीला लागला होता. झाली एकदाची टेकडी पार झाली....