जाता पंढरीसी ... (२)

वारी नेमकी कशी असते? कल्पना करा, तुम्ही सी. एस. टी. किंवा चर्चगेट किंवा तत्सम लांब फलाटाच्या एका टोकाला गाडीतून उतरलात आणि समोरच्या गर्दीबरोबर पुढे चालायला लागलात...  समजा फलाट संपावा तिकडे न संपता वाढत वाढत दोन-अडीचशे किलोमीटर लांब झाला तर कसं वाटेल?

फारच रुक्ष वर्णन झालं का? हो, खऱ्या वारीत यातल्या अनेक गोष्टी नसतात पण लांब चालायचा (गर्दीबरोबर) मार्ग मात्र असतो. डोक्यावर असतं मोकळं आकाश, आजूबाजूला शेतं.. हे सगळं 'सूत्र'मय पद्धतीनेच सांगायला हवं -

तर तुम्ही आळंदी - पंढरपूर भक्तीच्या मेगा हायवेवर आलात. रस्त्याच्या उजवीकडल्या अर्ध्या भागात वाहनांची रांग असते. single lane, कोणीही सहसा overtake करत नाही. यात पाण्याचे टँकर असतात, इतर फुटकळ विक्रेत्यांच्या गाड्या व चहाच्या ठेल्यांपासून मुख्य म्हणजे दिंड्यांचे ट्रक असतात. एकेका दिंडीचा जामानिमा तीस-चाळीस वाहनांत पुरत नाही!

राहिलेला डावीकडला अर्धा भाग केवळ माणसांसाठी. यातही तीन lanes असतात. मध्यभागातून दिंड्या त्यांच्या नंबराप्रमाणे चालत असतात.  त्यांना अधनंमधनं 'क्रॉस' करायची अजिबात परवानगी नाही. प्रत्येक दिंडीच्या शेवटी वीणेकरी असतो, त्याच्यामागे दिंडीतल्या स्त्रिया असतात. दिंडीच्या सुरुवातीला पताका (अर्थात ध्वज) असतात. जर दिंडी ओलांडायची असेल तर या पताकांच्या पुढूनच, अन्यथा नाही! ही नियमावली अलिखित आहे, पण काटेकोरपणे पाळली जाते.

माणसांच्या या मुख्य प्रवाहाच्या उजव्या व डाव्या बाजूने free lanes असतात. पुढे जाऊ इच्छिणाऱ्यांनी तिथून बिनदिक्कत पुढे जावं.

दिंड्यांना नंबर असतात, उदा. रथामागे ४३ किंवा रथापुढे ३ वगैरे. ही मागे-पुढेची भानगड मला बागल महाराजांनी समजावून सांगितली. बागल महाराज मुंबईच्या ग्रूपचे. त्यांच्या तंबूत मी पहिल्या दिवशी (किंवा) रात्री राहिलो. वारीची basic तत्त्वं समजावून सांगणारे ते पहिले गुरुदेव! वारी सुरू असताना माऊलीचा रथ [माऊली = ज्ञानेश्वरमहाराज] मधे असतो. त्याच्या दुतर्फा - पुढे व मागे, सगळ्या दिंड्या असतात. नंबरप्राप्त दिंड्या म्हणजे जरा व्यवस्थित मोठ्या - आकाराने, वारकरी संख्येने.. [आमच्या दिंडीत जवळजवळ ५००० लोक होते] याशिवाय जे 'किडुक-मिडुक' गट असतात ते या नंबरांच्या नंतर चालतात ते 'बिननंबराच्या दिंड्या' या शीर्षकाखाली. त्यांची संख्या वाढली की/ तर ते माऊलीकडे नंबराकरता 'अप्लाय' करू शकतात.

 ९५ - ९४ - ...३-२-१- माऊली - १-२-३-...-९४

त्यामुळे एवंगुणविशिष्ट दिंडी चालू लागली की मोठी मौज येते - ती याकरता -

फलटण ------माऊली------                                                                                               बरड [पुढला मुक्काम]

सकाळी सात-सव्वासातच्या सुमाराला शेवटली दिंडी फलटण सोडत आहे असं वाटेपर्यंत पहिली दिंडी पुढल्या मुक्कामाच्या दिशेने पाच-सहा किलोमीटरवर पोचलेली असते.

'वारीचं पुढलं टोक, मागलं टोक' अशी 'सूत्र'मय भाषा वारकऱ्यांच्या तोंडी येते ती याचमुळे!

आळंदीहून निघालेल्या सूत्राचा वाखरीपर्यंत जाड दोरखंड होतो!!

क्रमशः