लग्न (दोन)

मी जिथे जातो तिथे रमतो त्यामुळे कामात गर्क झालो, त्यात मी वर्षातून एकदाच प्रत्यक्ष भेटत असल्यानी क्लायंटही माझी वाट बघत असतात. क्लायंट बरोबर जेवण, गप्पा आणि काम यात संध्याकाळ केव्हा झाली कळलं नाही. मी काम संपवलं तेव्हा लक्षात आलं की बायकोला सकाळी माहेरी सोडलंय, मी तिला फोन केला. मुलगा मित्रांबरोबर पिक्चरला गेलायं आणि रात्री मित्राकडेच राहणार आहे ती म्हणाली. माझे आई वडिल, माझा मेव्हणा गावाला गेल्यामुळे बहिणीकडे रहायला गेले होते. मी म्हणालो 'मग तू इकडे का येत नाहीस, आपण कँपमध्ये फिरु, मलाका स्पाइसला जेवू आणि तू येईपर्यंत मी इ-स्क्वेअरच्या लास्ट शोची तिकीटं पण काढतो'. ती म्हणाली 'चालेल, मी वेस्टएंडपाशी थांबते'. माझी इ-स्क्वेअरला ओळख असल्यामुळे मी तिथे फोन केला आणि आमच्यासाठी दोन लास्ट शोची तिकीटं ठेवायला सांगीतली.

मी वेस्टएंडपाशी पोहोचलो तर बघतंच राहिलो, तिनी पिंक अँड ग्रे कॉंबीनेशनचा स्टँड कॉलरचा ड्रेस घातला होता आणि त्याच्यावर पिंक दुपट्टा घेऊन केसात मोगरा माळला होता. मी गाडीचं दार उघडायचं सोडून बघतच राहीलो. ती दार उघडून आत आली आणि आतला सगळा रंगच बदलून गेला.

मी म्हणालोः ' पहेले वो सितम करते थे तो कयामत थी, अब मेहेरबां हुऐ तो हादसा हो गया'!

तिला अर्थ समजला होता पण तरीही म्हणाली : 'म्हणजे नक्की काय?'

मी म्हणालो : 'मला तुझ्याशी पुन्हा लग्न करावसं वाटतंय'

माझी उस्तफूर्तता मला केंव्हा काय बोलायला लावेल याचा नेम नाही. मला वाटायला लागलं आपण इतक्या चांगल्या मूड मध्ये उगाच पार स्टेडियम बाहेर बॉल मारला, पण वातावरणाचे सूर जुळले असावेत, ती म्हणाली : ' मी योगा आणि प्राणायाम करून आता कमालीचा फिटनेस आणि फिगर ठेवणार आहे'.

'क्या बात है'! मला तिचं कौतुक वाटलं, तिनी परत मूड तयार केला होता.

मलाका स्पाईस जवळ एक बाग आहे आम्ही तिथे गेलो. हिरवळीवर स्प्रिंकलर्स चालू होते, मी म्हणालो ' चल, मी भिजून घेतो'. ट्रॅकवर आम्ही निःशब्द फिरत राहीलो कारण तिची पावलं माझ्या पावलां बरोबर पडत होती आणि हे आत कुठे तरी सूर जुळल्यामुळे होत असावं अशी माझी कल्पना होती.

स्वाद ही चव आणि गंध यांनी मिळून होणारी जादू आहे आणि ती मलाका स्पाईसवाले अशी काही जमवतात की जेवणाची मैफल संपूच नाही असं वाटतं. त्यात कॉईन थ्रू ही लिक्यूअर देखील अशी काही भन्नाट आहे की तुम्ही एकाच वेळी कवी, शायर आणि संगीतकार होता. तुमचा रंग असा काही आकाशी होतो की तुम्हाला नवनवीन कल्पना सुचायला लागतात. त्यात अशी मैत्रीण बरोबर मग तर काही विचारायलाच नको. 

मला एकाच वेळी तिच्यात आणि माझ्यात एक ओढ लावेल असं अंतर आणि निर्भय समन्वय जाणवायला लागला. माझे सगळे शब्द आणि अर्थ अभीव्यक्तीच्या साऱ्या सीमा ओलांडून तिच्या पर्यंत पोहोचतील असं वाटायला लागलं. ती काही बोलत नव्हती पण विचार ही करत नव्हती फक्त सगळा विरोध, सगळा विसंवाद संपल्या सारखा वाटत होता. मला वाटायला लागलं बास! या क्षणी हे आयुष्य संपावं! स्त्री ही काय जादूगीरी आहे, एका स्त्रिशी सूर जुळणं साऱ्या अस्तित्वाशी एकरुपता जमण्या सारखं आहे.

मला पिक्चरचं प्रचंड आकर्षण आहे. तुम्हाला गुतंवून ठेवणारी विषयाची मांडणी, ती रमणीय स्थळांची, आपण पोहोचू शकणार नाही अशा अँगल मधून घेतलेली दृश्य, रंगांची सुरेख उधळण, पेहेरावांची नजाकत, बेभान करणारं संगीत, परस्परातले संबंध, संवादांची जादू, सौंदर्य, प्रणय आणि अभिनय सगळं एकावेळी हजर असतं! हे पिक्चरवाले कल्पनाच इतक्या सुरेख मांडतात की वास्तव फिकं वाटतं. जगातली सारी बुद्धीमत्ता, सौंदर्य आणि संपत्ती जर तुम्हाला एका जागी पहायची असेल तर एकेका फ्रेमची मजा घेत पिक्चर बघावा.

घरी आलो तेंव्हा एक वाजला असावा. मी घड्याळ वापरत नाही आणि आमच्या घरात टी व्ही आणि घड्याळ दुसऱ्या बेडरुममध्ये आहे. घर इतकं शांत आहे की आपण बोललो तरच आवाज त्यामुळे वेळेचा फक्त अंदाज बांधावा लागतो. त्यात घरात आज आम्ही दोघंच आणि त्यातून पुन्हा जीवनातला 'उद्या' मी संपूर्णपणे संपवलेला. घरात असा काही माहौल झाला होता की कॉफी घेत एकमेकांच्या सहवासात शांत बसून रहावं आणि झोप आली की झोपून जावं. तिनी कॉफी केली आणि आम्ही शांतपणे एकमेकां समोर बसलो.

'सत्य म्हणजे नक्की काय हो?' ती म्हणाली.

आमचा प्रेमविवाह असल्यामुळे मला तिचा धाडसी स्वभाव आणि कमालीची पारदकर्शता माहिती होती. तिनी इतका खोलवरचा पण इतका उघड प्रश्न विचारला होता की मी शब्द जुळवू शकत नव्हतो. मी ऊठलो आणि माझा सिल्कचा स्टँड कॉलरचा अप्रतिम मरून  रोब घेऊन आलो, हा रोब घातला की तुमचं अंतरंग बदलून जातं. मी म्हणालो तू मस्तं वॉश घे आणि हा मरून रोब घालून ये. ती काहीही न विचारता उठली आणि फ्रेश होऊन तो मरून रोब परिधान करून माझ्या समोर येऊन बसली. त्या रोबमध्ये ती अशी काही लावण्यवती दिसायला लागली की मी सत्यं वगैरे सगळं पार विसरून गेलो आणि तिच्याकडे बघतच राहीलो.

'सांगा नं सत्य म्हणजे काय? '

मी म्हणालो 'सखे तुला खरं सांगू? मला ही नक्की माहिती नाहीये पण हा आताचा जो माहौल आपल्याला जाणवतोयं ना, त्याला बहुदा सत्य म्हणत असावेत'. 

ती माझ्याकडे नुसती बघत राहीली. मग अत्यंत शांतपणे म्हणाली 'सत्य म्हणजे काय ते मला कळलंय'.

मी सर्द झालो. मी म्हणालो 'क्या बात है! सुनाइए'

ती म्हणाली : 'आपण वेगळे होऊ शकत नाही'.

मी इतका सद्गदीत झालो की मला शब्दच सुचेना. मी म्हणालो : 'पियू मी माझा रोब तुला बहाल करतो, तुला सत्य समजलयं! '. संन्यास्यानी स्वतःचा रोब पत्नीला बहाल केल्याची जगाच्या इतिहासातली ही बहुदा पहिली घटना असावी. तिनी माझे हात हातात घेतले आणि मला मिठी मारली.

'मी तुम्हाला समजू शकले नव्हते' ती म्हणाली.

प्रकृती आणि पुरुष एक कसे याचा मला अचानक उलगडा पण ते रहस्य आता मी शब्दात व्यक्त करू शकत नव्हतो. कॉईन थ्रू ची नशा अशी काही भन्नाट झाली होती की मला तीच एक रहस्य वाटायला लागली आणि मी तिला घेऊन त्या रहस्यात खोल उतरायला लागलो.  

संजय