सौरकुंडी पास

८  मे -आज असं वाटतंय एक विखुरलेलं कुटुंब खूप दिवसांनी
मंगलकार्यासाठी एकत्र आलं आणि ते कार्य एकमेकांच्या सहकार्याने 
पार पाडून एकमेकांचा निरोप घेत आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कार्य
निर्विघ्नपणे पार पडल्याचा आनंद, समाधान ओसंडून वाहत होते.  
दहा दिवसांपूर्वी हीच सगळी मंडळी एकमेकांना सर्वस्वी परकी, अनोळखी होती,
हे कुणाला सांगितलं तर खरंच वाटणार नाही. ही वेगवेगळ्या जाती-धर्म,
प्रांत, वर्गातील लोकं एकत्र यायला कारण होतं - सौरकुंडीपास ट्रेकिंग
कॅंप. 'आना आपं बंगळुरू' म्हणत यतींद्र ग्रुपने निरोप घेतला. आंटी आय कॅन
कुक मेनी रेसिपीज आदर दॅन मॅगी', असा  हर्षाने जेवणाचा प्रेमळ
आमंत्रण देत, आकांक्षाने 'आय वॉंट टु हग यु'  म्हणत व एक जादूची
झप्पी देत आयटीग्रुपने निरोप घेतला तर जुनागढवाल्यांनी 'आव जो' 'आव
जो'  म्हणत. असे एक-एक करत मंडळी घरच्या वाटेला लागली.
  दहा दिवसांपूर्वी ज्यांना आपण ओळखतही नव्हतो, ज्यांची
नावं-गावं माहिती नव्हती आज त्यांच्याशी भावबंध निर्माण झाले आणि म्हणूनच
एकेकजण जाऊ लागले तसं उदास वाटू लागलं. परत भेट होईल की नाही माहीत नाही
पण जेव्हा जेव्हा ह्या लोकांची आठवण काढू तेव्हा तेव्हा चेहऱ्यावर एक स्मित
उमटेल - नक्कीच.
२९ एप्रिल - सकाळ्ळी सकाळी डेरे दाखल
होणाऱ्या आम्ही दोघी मायलेकी. एसके३ मोहिमेला निघण्याच्या गडबडीत होता.
 

आम्ही
प्रातर्विधी आटोपून एसके४ला निरोप द्यायला रांगेत उभ्या राहिलो. 'विश यु
ऑल दी बेस्ट', 'हिप हिप हुर्ये', 'वन टु, वन टु, वन टु थ्री'
टाळ्यांच्या घोषात निरोप दिला. चंदेरी केसांच्या सखीला निरोप नकळत जरा
जास्तच जोषात दिला गेला कदाचित परवा मलाही तेवढाच मिळावा ह्या अपेक्षेने.
आमच्या ग्रुपची एकेक मंडळी येऊ लागली  होती. संध्याकाळचा माहौल
तर फारच गमतीशीर होता. वेगवेगळ्या प्रांतातील दीड-दोनशे लोकं त्या
एवढ्याश्या जागेत खेळत होती. कुणाचा पायपोस कुणाला नाही. कोण, कुठला
खेळ, कुणाबरोबर खेळतोय हे इतरांना तर सोडूनच द्या, त्या खेळणाऱ्या
व्यक्तीलाही कळतं होतं की नाही देव जाणे.

नुसता
गोंगाट!   'चालो, हाथ पकड लो, रौंड बनाओ' ची एका गुज्जुभाईंनी
नेतृत्व स्वतः कडे घेत अशी काही ओर्डर सोडली की क्षणात सगळ्यांनी पटापट
हात पकडत मोठ्ठा गोल केला व जेवणाची वेळ होईपर्यंत भाई सगळ्यांना नवनवीन
खेळ खेळवत राहिले. कॅंप फायर हा तर अतिशय मनोरंजक तसेच भारतीय संस्कृतीचे
दर्शन घडविणारा कार्यक्रम! तीनही दिवस अतिशय रंजक झाला.

३०एप्रिल-  खळखळणाऱ्या
बियास नदीच्या पार्श्वसंगीतात केलेला व्यायाम व ध्यान/प्राणायाम हा एक
वेगळाच अनुभव होता.   नाश्ता करून एक छोटासा(? ) डोंगर चढाई
-  चढण्याचा सराव. हाश - हुश्श करत एका देवळाच्या प्रांगणात
पोचलो. औपचारिक सविस्तर  ओळख कार्यक्रम झाला.  
  तुमी कुठचे,   आम्ही कुठचे अशी चढताना  ओळख
झालीच होती. एकंदरीत आपल्या बरोबर दहा दिवस असणारे लोकं थोडीफार कळली
होती.

गायक
भूपेशभाई

व कॅंप
लीडरचा बहारदार गाण्याचा कार्यक्रम झाला.   भूपेशभाई गाणं
म्हणायला सदैव तयार असायचे, आढेवेढे न घेता, हे विशेष!  
त्यामुळे १० दिवस गाण्याच्या मेजवानीची सोय झाली होती. त्यांनी गाण्याचं
औपचारिक शिक्षण घेतलेलं नव्हत. केवळ एक छंद, आवड म्हणून गातात.
त्यांच्याजवळ गाण्याचा भरपूर साठा तर होताच शिवाय गातात पण छान. एकदम साधा
आणि पारदर्शी वल्ली. संध्याकाळच्या कार्यक्रमात कॅंप लीडर युथ
हॉस्टेलबद्दलची माहिती ट्रेक दरम्यानचे  काय करायचे व काय करायचे
नाही, कोणती सावधगिरी बाळगायची समजावून   सांगितले.

१ मे -  आजही सकाळी
चालण्याचा सराव व बियास नदीकाठी काही व्यायामाचे प्रकार व ध्यान. कालच्या
सारखीच आजची

प्रसन्न
सकाळ!   नाश्ता करून रॅपलींगसाठी निघालो.   दगडाची
उंची फारशी नव्हती. आयुष्यात पहिल्यांदाच आणि तेही ह्यावयात करत
असल्यामुळे मनात भीती होती. प्रात्यक्षिक बघून, धाडस करावंस वाटलं आणि न
धडपडता जमिनीवर पाय ठेवला.

  पण दुपारच्या दगड चढाईचं (रॉक
क्लाईंबिंग) धाडस मात्र केलं नाही. तरुणींनी यशस्वी प्रयत्न केला.
महिलांमध्ये आघाडीवर होती दाक्षिणी फोनसुंदरी लताजी.    
भरतनाट्यम पारंगत लताला आम्ही 'फोनसुंदरी' हे नाव बहाल केलं होतं.
  तिचा नवरा व मुलगा कॅंपला आले नव्हते. ती सतत आंखों देखा
नजाऱ्याचं थेट वर्णन फोनवर जोर-जोरात कानडी भाषेत देत असे. मला
आपली  हिच्या फोनच्या बिलाची काळजी! किती आलं असेल बिल.... देव
जाणे? तिने दोन फोन तर ठेवलेच होते शिवाय जिथे सोय असेल तिथे
दामदुपटीने  बॅटरी चार्ज करून घ्यायची त्यामुळे तिची गैरसोय झाली
नाही.       ह्या क्षणी   जे
मला  दिसतं आणि वाटतं, ते आत्ता सांगण्यातला जो आनंद,
उत्स्फूर्तपण, ताजेपणा, टवटवीतपणा आहे तो दहा दिवसांनी घरी गेल्यावर
थोडीच असणार? अगदी खरंय! तो तिच्या आवाज, हावभाव व देहबोलीतून जाणवायचा
जरी भाषा  कळत नसली तरी.   तर अशी ही फोनसुंदरी लता
अर्धा दगड चढली. पुढचं पाऊल टाकायला जागा शोधत होती. सगळ्यांचे कॅमेरे
सज्ज होते. ' आँटी, इधर देखो'! हे  ऐकताच, एवढ्या अवघडलेल्या
अवस्थेतही तिने तिचा प्रसिद्ध डॉयलॉग  'आँटी मत कहो मुझे.... '
म्हणताच  एकच हशा पिकला. असो, तर सरतेशेवटी 
बेंगळुरुच्या राणीने दगड सर केला.  

  २मे - नाश्ता करून व
डबे भरून निघायची तयारी व गडबड. २४ किमी प्रवास बसचा व बाकीचा पायी करायचा
होता. एस्के६ व ७ निरोप द्यायला उभे होते. आशयच्या 'येनगुडगुडे
SSS  नाडगुडगुडे SSSS'   
'ढीशक्याँवSSSS  ढीशक्याँव SSSSS' च्या जयघोषात मोहिमेला निघालो.
सगळ्यांनाच वाटलं  हा काहीतरी अर्थपूर्ण घोषवाक्य आहे.

पण
आशयच्या कंपूचा  हे अर्थहीन    घोषवाक्य 'हर
हर महादेव' इतकंच स्फूर्तिदायक होतं. आशयने   
'येनगुडगुडे नाडगुडगुडे' व इतरांनी 'ढीशक्याँव ढीशक्याँव' म्हणायचे हा
रिवाजच झाला होता, पुढच्या मोहिमेला निघण्यापूर्वी व मुक्कामी पोचल्यावर.
बसमधून उतरल्याबरोबर खरेदी झाली ती 'सहाऱ्याची' अर्थात काठीची. आजचा फक्त
५ किमीचा ट्रेक होता उंची

गाठणार
होतो सातहजार फूट. देवदार व पाईनच्या झाडीतून जाणारा स्वच्छ व रम्य ट्रेक!
चारच्या आधी कॅंपवर पोचून चालणार नव्हते त्यामुळे निसर्गाचा आनंद, अनुभव
लुटत आरामाने ४ वाजता सेगलीला पोचलो. वाटेत वीस-पंचवीस घरांची वस्ती
असलेली एक दोन गावं लागली. वाटाड्या सेगलीचाच होता. आम्हाला सोडून तो
त्याच्या घरी गेला. बहुतेक इथले तरुण कमीतकमी बारावीपर्यंत 
शिकलेले आहेत. शहराची मात्र विशेष ओढ नाही. घरटी एकजण तरी सैन्यात जातो.
  गरजा अतिशय सीमित असल्यामुळेच की काय इथलं जीवन कष्टी आहे पण
दु:खी नक्कीच नाही. अश्या ह्या शांत, रम्य जीवनाची एका व्यक्तीला इतकी
भुरळ पडली की ते परततील की नाही शंकाच होती.   उद्या तुम्ही
कोणी तिकडे गेलात आणि एखाद्या झाडाखाली पहुडलेले  'तुकाराम
महाराज' भेटले तर आश्चर्य नाही. ते नक्कीच नाशिकचे तुकाराम माळी.
  आठ महिने हिमालयात व अति थंडीचे चार महिने नाशिकात राहायचे
ठरवतच खाली उतरले.   सेगलीत चहा व गरमा-गरम भज्यांनी स्वागत
झाले.   वीज नसल्यामुळे लवकर जेवण आटोपून छोटासा पण मनोरंजक
कॅंप फायरचा  विजेरीच्या प्रकाशात  पार पडला.
 

क्रमशः