दैवस्पर्श - अंतिम भाग

दुवा क्र. १ पासून पुढे
~*~ 
    अंकितचा प्रसन्न चेहरा पाहून सचिनला बरं वाटलं. अंकितला खुर्चीत बसायची त्यानं विनंती केली आणि त्याला चहा आवडतो म्हणून त्यानं लगेच चहासुद्धा मागवला. एरवी अंकितच्या ऐवजी दुसरा कोणी असता तर त्यानं इतका पाहुणचार केला नसता.
गेल्या चार रात्री अंकितला स्वप्न पडलं नव्हतं. दिवसा-रात्री कसलाच त्रास त्याला झाला नाही. त्यामुळं त्याला अजिबात धीर नव्हता. त्यानं लगेचच ह्या सगळ्यामागची कारणं सांगायला सचिनला भाग पाडलं. सचिनसुद्धा फार वेळ न घालवता सांगायला लागला.
"अंकित, सर्वप्रथम तुझ्या स्वप्नाबद्दल तू मला सांगून तू एक चांगली गोष्ट केलीस. जर स्वत:च्या मनाशी कुढत बसला असतास तर परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता होती.
सगळ्यात आधी आपण घराला वाळवी का लागली त्याचं कारण बघूयात. मग तुझ्या स्वप्नाविषयी बोलू. मी जेव्हा परवा घरी आलो होतो, तेव्हा आपण बोलत असताना तुझ्या घराच्या तुळया मी पहिल्या. एक गोष्ट मला प्रकर्षानं दिसली, ती म्हणजे त्या तुळयांचे लाकूड वाळवीने उभ्या रेषांच्या रचनेत पोखरून काढलं होतं. हे काम वाळवीचंच आहे ते लगेच कळत होतं. मी घरी परतताना वाळिंबे यांच्या घराचे उरलेले अवशेष मुद्दाम बघितले. तिथं पडलेल्या लाकडांनासुद्धा वाळवीने त्याच पद्धतीनं पोखरून काढलं होतं. इतक्या वर्षात ऊन आणि पावसामुळे  त्यावरची वाळवी मरून गेली. पण वाळवीचं त्या लाकडावरचे कोरीव काम स्पष्ट दिसलं मला. आता ह्यावरून वाळिंबे यांचं घरसुद्धा वाळवी लागल्या कारणानेच पडायला आलं ते स्पष्ट होतं. वाळिंबे यांच्या  घराला वाळवी का लागली ते मात्र मी सांगू शकत नाही. त्याच्या घरावरून वाळवीनं आपला मोर्चा तुमच्या घराकडे वळवला. तुमच्या नकळत, अगदी सावकाश, वाळवी बरीच फोफावली. "
"हम्म हे पटतंय मला.. " अंकित ने होकारार्थी मान हालवली.
"आता तुझ्या स्वप्नाबद्दल आणि त्या झाडाबद्दल बोलूयात! खूप आदर करतोस ना त्या झाडाचा? देवासारखं मानतोस ना त्याला? " - सचिन.
"देवासारखं नव्हे, देवच रे! लोक म्हणतात ते दत्ताचं स्थान आहे. पण लोक काय म्हणतात त्यापेक्षा मला काय वाटतं ते मला महत्त्वाचं वाटतं. माझ्या मते तो औदुंबर एक शक्तीकेंद्र आहे. माझ्यासाठी तो एक प्रेरणास्थान आहे. लोकांनी त्याला जमीनदोस्त केला. पण सर्व शक्ती एकवटून तो परत उभा राहिला. पहिल्यापेक्षा अधिक बळकट! आणि हे सगळं त्याच्यात असलेल्या प्रचंड शक्तीमुळेच शक्य झालं आहे.. " - अंकित भावनिक होऊन म्हणाला.
"बरोबर आहे अंकित तुझं. मूर्तीमधल्या देवामध्ये सगळेच लोक काही ना काही तरी शोधत असतात. पण मूर्तीपेक्षाही अश्या जिवंत उदाहरणाला तू एक शक्ती आणि प्रेरणाकेंद्र मानतोस, हीच खरी श्रद्धा म्हणायला लागेल.
माझ्यावर प्लीज चिडू नकोस. पण समजा उद्या त्या औदुंबराला काही झालं, जसं की कीड लागली, किंवा त्याला परत पाडायला लोक आले, तर तुला काय वाटेल अंकित? "
"काय वाटेल म्हणजे? आधी एकदा त्याला पडताना मी डोळ्यांनी बघितलं आहे. त्याचा पश्चात्ताप अजून होतोय मला. पुढे जर असं काही झालं, तर खूप त्रास होईल रे, मी वाट्टेल ते करेन त्याला वाचवायला! " - अंकित एकदम टेन्शन मध्ये येऊन पुटपुटला.
"हम्म.. असं चीड चीड होणं किंवा दु:ख होणं स्वाभाविक आहे. मी समजू शकतो. घाबरू नकोस, असं काही होणार नाही अशी प्रार्थना करू आपण.. बरं मला संग, तुझ्या घरावर प्रेम करतोस? "
सचिन औदुंबराबद्दल बोलता बोलता मध्येच घराबद्दल बोलायला लागला ते बघून अंकित कोड्यात पडला. पण त्यानं प्रश्नाला प्रश्न करण्याऐवजी उत्तर देणंच पसंत केलं.
"प्रेम करतोस म्हणजे? अरे जन्मापासून राहतोय मी तिथे. घर कसंही असलं तरी खूप प्रेम आहे माझं त्याच्यावर. माझ्या घराशिवाय इतर कुठे झोप लागत नाही मला. ते म्हणतात ना, आपलं घर हगून भर. कितीही जुनं, जीर्ण असलं तरी माझं घर ते माझं घर रे.. खूप सवय झालीये बघ! " - अंकित उत्साहाने म्हणाला.
"पण तुझं घर कधी पडलं नाही! हो ना? " सचिनने पटकन फिरकी टाकली.  
"म्हणजे? मला कळले नाही. असं का विचारतोयस? माझं घर का पडेल? " अंकित गडबडला.
"सांगतो. लक्ष देऊन ऐक. अंकित, तू जितकं त्या झाडावर प्रेम करतोस त्यापेक्षा खूप जास्ती तू तुझ्या घरावर प्रेम करतोस. घराला वाळवी लागली आहे ते तुला माहीत होतं. वाळवीमुळे किती नुकसान होऊ शकतं ते तुझ्या मनाला माहीत होत. पण तू त्याच्याकडे नकळतपणे दुर्लक्ष केलंस. दिवसेंदिवस वाळवी वाढत आहे ते तू बघत होतास, पण त्यावर उपाय मात्र केला नाहीस. जसा जसा वाळवीचा प्रादुर्भाव वाढत होता, तसं तुला स्वप्न पडणं सुरू झालं. स्वप्नात तू औदुंबराच्या रूपात त्या झाडाला नाही, तर तुझ्या घराला बघत होतास. तुला ऐकू येणाऱ्या किंकाळ्या झाडाच्या नव्हत्या, तर त्या तुझ्या घराच्या होता. वाळवी झाडाला नव्हे, तुझ्या घराला पोखरून काढत होती.... " इतकं बोलून सचिनने क्षणभर विश्राम घेतला.
"बोलत राहा सचिन, मी ऐकतोय! " - अंकित सुन्न होऊन म्हणाला.
"स्वप्नात घराच्या ऐवजी ते झाड दिसण्याचं कारण हेच होतं की, तू त्या झाडाला जमीनदोस्त होताना स्वत:च्या डोळ्यांनी बघितलं होतंस. वाळवीमुळे आपल्या घराची अवस्था अशीच होऊ शकते हे तुझ्या मनाला कुठेतरी माहीत होतं. 'आपण राहतोय ते  घर कोसळतंय' ह्या कल्पनेचीसुद्धा तुझ्या मनात खूप भीती होती. त्या भयंकर भीतीपोटी स्वप्नातही ते स्पष्टपणे समोर आणायची हिंमत तुझ्या मेंदूने केली नाही. त्याच्या ऐवजी तुझ्या मेंदूने औदुंबराला पुढे केलं. ह्याला आमच्या भाषेत एक प्रकारचा 'फोबिया' म्हणतात. जेव्हा तू घरी पेस्ट कंट्रोल केलंस, त्यासाठी तुला बरीच मेहनत घ्यावी लागली, बरेच पैसे खर्च करावे लागले, तेव्हा तुला एक विश्वास आला, की आपण वाळवीचा खात्मा केला आहे. आता आपल्या घराला वाळवीपासून कसलाही धोका नाही! आपलं घर आता वाळवीपासून मुक्त आहे... त्याची दखल तुझ्या मेंदूनं घेतली. त्या रात्रीपासून तुला ते गूढ स्वप्न कधीच पडलं नाही. " - सचिन आता आपलं बोलणं संपवत आला होता.
" एक मानसशास्त्रज्ञ म्हणून हेच माझं स्पष्टीकरण आहे. तुला ते स्वप्न परत कधीही पडणार नाही ह्याची खात्री आहे मला.
पेस्ट कंट्रोल करताना तुला सापडलेली दत्ताची मूर्ती हा एक योगायोग म्हणायला लागेल. तुझ्या स्वप्नाशी त्या मूर्तीचा संबंध असेल असं वाटत नाही मला. " - सचिन बोलून थांबला. अंकित ला हे सगळं समजायला वेळ लागणार होता ते त्याला माहीत होतं. काही वेळ शांतता होती.
अंकितच्या हावभावांवरून त्याला काही गोष्टी पटल्या आहेत ते नक्की होतं. पण त्याच्या चेहऱ्यावर शंभर टक्के समाधान दिसत नव्हतं.  
"तुला काय वाटतं अंकित? काही पटत नाहीये का? ह्यापेक्षा काही वेगळं असू शकेल ह्या सगळ्या मागे? " - सचिनने अंकित ला बोलतं करायचा प्रयत्न केला.
अंकित वाक्यरचना करण्यासाठी दोन मिनिट थांबला. काही क्षणांनी त्यानं बोलायला सुरुवात केली.
"सचिन, तू सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मनाला पटत आहेत. माझा तुझ्या सांगण्यावर पूर्ण विश्वास आहे. पण काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतंय. काहीतरी अपूर्ण आहे. माझ्या मनाला तुझं स्पष्टीकरण ऐकून समाधान मिळत नाहीये! एखाद्या चित्रपटाचा शेवट मनाला पटत नसेल तर ती गोष्ट मनाला टोचत राहते. तसंच होतंय बघ माझं. "
"तुझ्या मनात काय सुरू आहे ते कळेल का मला? " - सचिन.
"तुला माहीत आहे की मी अतिश्रद्धाळू वगैरे नाहीये. पण माणसापेक्षा ह्या जगात कोणीतरी श्रेष्ठ आहे ह्या भावनेनं मी  देवाला मानतो. फक्त दत्ताला आणि स्वामी समर्थांच्या दर्शनाला मठात जातो. मला असं वाटतंय की हे सगळं दैवानंच तर करवून आणलं नसेल? आपल्याला अनेक प्रश्न अनाकलनीय असतात. त्यात ह्या प्रश्नाची भर घातली तर काय बिघडलं?
ती दत्ताची मूर्ती फार पूर्वीपासून आमच्या घराण्यात होती. आजोबांना त्यांच्या तरुणपणी ती भेट मिळाली आहे. त्याआधी ती मूर्ती कुठे होती, ती मूळची किती जुनी आहे, तिचा इतिहास काय आहे ते आपल्याला काहीच माहीत नाही! त्या मूर्तीची आमच्याकडे रोज रीतसर पूजा व्हायची. पण नंतर ती मूर्ती घरातून गायब झाली. परत जेव्हा आईने ती मूर्ती घरी आणली, त्यानंतर आमच्या कडून त्या मूर्तीकडे दुर्लक्ष झालं. ती अडगळीच्या जागेत ठेवली गेली. तिकडे ती कशी गेली ते आत्ता आठवत नाही, पण  त्यामागे आमच्याच घरातील कोणीतरी जबाबदार असणार आहे. नाही का?
अडगळीच्या जागेत देवाला ठेवल्यामुळे त्याचा आमच्या हातून एक प्रकारे अपमानच झाला. माझ्या स्वप्नात औदुंबर यायचा. तो मला घराला वाळवी लागली आहे ते खुणावत होता. पेस्ट कंट्रोल च्या निमित्तानं मी घरातल्या वस्तू हालवीन, अडगळीची जागा नजरेखालून घालीन आणि मग मला ती मूर्ती सापडेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतक्या जीर्ण झालेल्या तुळईवर ठामपणे उभं असलेलं आमचं घर.. त्याचं काय उत्तर आहे? भौतिक शास्त्रात तरी त्याचं उत्तर असेल का?..  
ह्या सगळ्या गोष्टी मस्त प्लॅन केल्यासारख्या नाही वाटत तुला सचिन? आणि हे सगळं प्लॅनिंग तू किंवा मी नाही, तर साक्षात देवानंच केल्यासारखं वाटतंय मला  ! "
"हा मला झालेला देवाचा साक्षात्कारच म्हणावा लागेल! ह्या जगात देवाचं अस्तित्व असल्याचा अजून एक पुरावा! ते दाखवून द्यायची त्या परमेश्वराचा अजब आणि विलक्षण मार्ग.. हाच खरा दैवस्पर्श  ! ".. बोलता बोलता अंकित खूप एक्साइट झाला होता. त्याची नजर शून्यात गेली होती.
"तू म्हणतोयस त्याला छेद द्यायला मला कोणताच मार्ग नाही अंकित! हा दैवी चमत्कारच म्हणावा लागेल!! " सचिनने अंकितच्या भावनांना पूर्ण मान दिला. अंकित श्रद्धाळू आहे, पण अंध-श्रद्धाळू अजिबात नाही ते सचिनला माहीत होतं.
"मग, अंकित सर, आता काय करणार त्या मूर्तीच? " सचिनने वातावरण हलकं करायचा प्रयत्न सुरू केला.
"अरे तुला सांगायचं राहिलं, मी तीन महिन्यांपूर्वीच नवा फ्लॅट घेतला आहे! जेव्हा तिकडे राहायला जाईन तेव्हा मूर्ती तिकडच्या देवघरात ठेवणार! तोपर्यंत इकडेच. पाच दिवस स्वत: पूजा करतोय त्याची! आणि अजून एक गोष्ट मला समजली, ती मूर्ती नक्की कोणत्या धातूची बनली आहे ते बघायला सोनाराकडे घेऊन गेलो होतो. मूर्ती पंचधातूंची आहे आणि त्यात ९ तोळे सोनं आहे म्हणे! "
सगळं सांगत असताना अंकितच्या चेहऱ्यावरची चमक सचिन बघत होता. त्याच्या आनंदी चेहऱ्याकडे बघत सचिन स्वत:शीच पुटपुटला  - "खरंच, हा तर दैवस्पर्श चं! "
समाप्त
~*~