बर्लिनचा झालो (अंत)


जर्मनीमध्ये एकट्याने केलेल्या बर्लिन प्रवासवर्णनाच्या मालिकेचा शेवटचा भाग. या आधीचा भाग  इथे  आहे.

बर्लिनसारख्या अनोळख्या शहरात आता काय करावे या विचारात गोंधळून गेलो होतो. परंतु या  अवस्थेतही विचारांच्या प्रक्रिया कार्यरत होत्या. थोड्या वेळाने अचानक सकाळी साठवून ठेवलेल्या माहितीला मेंदूने प्रकट केले. मला आठवले की सकाळी फ्रँकफर्टमध्ये चुलतभावाशी दूरध्वनीवर बोललो होतो तेंव्हा त्याने त्याच्या खोलीमित्राचा फिरता दूरध्वनी क्रमांक दिला होता. त्याने असेही सांगितले होते की तो जेंव्हा चुलतभाऊ मध्यबर्लिनमध्ये असतो तेंव्हा त्याचा फिरता दूरध्वनी आपले कान बंद करतो. 


मी वेळ वाया न घालवता खोलीमित्राचा दूरध्वनीचा क्रमांक फिरवला. सुदैवाने यावेळी एक दोन क्षणातच कोणीतरी दूरध्वनी उचलला. पलीकडच्या व्यक्तीशी माझी एक दोन हिंदी वाक्यातच ओळख पटली. त्या व्यक्तीने मला सांगितले की तोच माझ्या चुलतभावाचा खोलीमित्र आहे. या संभाषणामुळे माझ्या हृदयाचे ठोके पुन्हा व्यवस्थित गतीवर परतू लागले. नकारात्मक विचारातून सकारात्मक सत्यपरिस्थितीकडे जाणाऱ्या परिस्थितीचा मी पुन्हा एकदा सुखद अनुभव घेतला. खोलीमित्र म्हणाला की दोन तासांपूर्वीच घराजवळच्या भुयारी रेल्वे स्थानकावर माझी वाट बघून तो परत गेला होता. आणि आता तो घरामधून दूर कुठेतरी भटकत होता. चुलतभाऊ अपेक्षेप्रमाणेच मध्य बर्लिनमध्ये कामाला गेला होता. मला घरी येण्यासाठी आवश्यक ट्रॅम्सची थोडक्यात माहिती सांगून खोलीमित्राने मला घराजवळच्या भुयारी स्थानकावर येण्यास सांगितले.


खोलीमित्राने दिलेल्या माहितीनुसार मला आधी फ्रिडरिशस्ट्रासला आणि मग वेडिंकला पोहोचायचे होते. मी फ्रिडरिशस्ट्रासला घेऊन जाणाऱ्या ट्रॅम्स कुठून सुटतात याचा वेध झूलॉगिश गार्डनच्या स्थानकावर घेऊ लागलो.  मुख्य आगगाड्यांच्या फलाटांजवळच एक तुर्की फळ विक्रेत्याचे दुकान होते. त्या विक्रेत्याजवळ गेलो. मला बघताच त्याने चेहऱ्यावर स्मितहास्य प्रकट केले. मी त्याला फ्रिडरिशस्ट्रासला जाणाऱ्या ट्रॅम स्थानकाची चौकशी केली. समोरची व्यक्ती फळ विकत घेण्याच्या विचारात नाही हे कळताच त्याने आपले हास्य लपवले. त्याने थोडा वेळ विचार केला आणि मला बऱ्याच कष्टांनी ट्रॅमच्या स्थानकाची दिशा दाखवली. एव्हाना स्थानकाची माहिती कळली असतानाही मी खूश होण्याऐवजी त्याच्या व्यवहारी हास्यावर असंतुष्ट झालो होतो.


मजल दरमजल करत मी धावत्या पायऱ्यांच्या जिन्याच्या साहाय्याने जमीनीवरून वाहणाऱ्या ट्रॅमस्थानकावर  पोहोचलो. स्थानकावर ट्रॅमच्या चार पट्ट्या होत्या. सुदैवाने फ्रिडरिशस्ट्रासला जाणारी पट्टी फलकाने आधीच स्पष्ट करून ठेवली होती. मी फ्रिडरिशस्ट्रासवाल्या पट्टीवर पोहोचलो आणि जमीनीवरून जाणाऱ्या ट्रॅमची वाट बघू लागलो. थोड्याच वेळात वारा जसा शीळ घालतो तसा आवाज करत बर्लिनच्या ट्रॅम सेवेची लाल पिवळ्या रंगाची गाडी फलाटावर येऊन थांबली. ट्रॅम थोडी लांबलचकच होती.  गाडीत बरीच दंगा करणारी तरूण घोळकी दिसत होती. मी मात्र शांततेच्या दृष्टीने सोयीस्कर असा वयस्कर गर्दी असलेला डबा बघून डब्यात शिरलो. 


अर्ध्या मिनिटातच सर्व ट्रॅमचे दरवाजे बंद झाले. हलकासा धक्का देऊन ट्रॅम पुढे सरकली. ट्रॅमची स्थिती जर्मन संस्कृतीला फारशी न पटणारी होती. खिडकीच्या काचांवर जर्मनमध्ये रेघोट्या मारलेल्या होत्या. दरवाज्यावरही असेच काहीतरी लिहिलेले होते. बाकड्यांचेही हेच हाल होते. ट्रॅमचा रंग मात्र अजूनही ताजातवाना होता. खिडकीतूनच मधून मधून बर्लिनचे ओझरते दर्शन होत होते.


थोड्या वेळाने ट्रॅममध्येच एक जर्मन तरूण वर्तमानपत्र विकण्यासाठी माझ्या बाकड्याजवळ आला. माझ्या समोर खुर्चीवर बसलेल्या वृद्ध जोडप्याने वर्तमानपत्र विकत घेण्याआधी त्याच्याकडून एक कॉपी हाती घेतली. वर्तमानपत्रावर थोडी नजर फिरवल्यावर जोडप्यामधील आजोबांनी आक्षेप घेतला की हाच पेपर बाहेर फुकट विकत मिळतो. जवळपासच्या लोकांनीही त्याला जोडीनेच होकार दिला. पेपर विकणाऱ्या तरुणाने मात्र ते मान्य केले नाही. पण मग इथे कोणीच वर्तमानपत्र घेऊ इच्छित नाही हे पाहून शेवटी वर्तमानपत्रवाला तरूण परतला.


एका पाठोपाठ एक असे चार स्थानके गेल्यावर शेवटी एकदाचा फ्रिडरिशस्ट्रासचा टप्पा आला. ट्रॅम जितक्या वेळ थांबली होती तितकाच वेळ खाली उतरण्यात गेला. खाली उतरून मला वेडिंकला जाणारी ट्रॅम पकडायची होती. ही ट्रॅम भुयारी पद्धतीची असल्यामुळे मी पृष्ठभागावरील वाहतुकीच्या स्थानकावरून भुयारी वाहतुकीच्या स्थानकावर निघालो. अर्धवर्तुळाकार परंतु बंदिस्त अशा या भुयारी स्थानकावर माझी गाडी येण्यास १२ मिनिटे होती. स्थानकावर फारशी गर्दी नव्हती. भुयारात सर्वत्र एक प्रकारची भयाण शांतता होती. वेळही संध्याकाळी ५ ची होती. का कोणास ठाऊक मनात अचानक किलबिल सुरू झाली. गाडी येईपर्यंत हृदयाचे ठोके पुन्हा एकदा वेग पकडू लागले. बरोबर दिशेच्याच गाडीत आपण चढणार आहोत का, आपले वीकएण्ड तिकीट या प्रवासात चालेल का वगैरे वगैरे बऱ्याच शंका मनात गोंधळ घालू लागल्या. सुदैवाने बरोबर १२ मिनिटात गाडी येऊन थांबली. गाडी बरीच भरली असल्यामुळे मी उभ्या उभ्याच प्रवास केला. गाडीच्या उष्म हवेत हृदयाचे ठोके पुन्हा थंडावले. भुयारातूनच गाडीने पुढचा प्रवास सुरू केला. थोड्याच वेळात गाडी वेडिंक नामक स्थानकावर पोहोचली. मी गाडीतून बाहेर पडलो आणि लगेचच मी स्थानकाबाहेर घेऊन जाणारा जिना हुडकला. जिन्याच्या मदतीने बाहेर पडलो.


वर आल्यावर लगेचच मोकळ्या हवेत एक दीर्घ श्वास घेतला. बाहेर वातावरणामध्ये फरक जाणवत होता.  हवेतील थंडावा दक्षिणेतील जर्मनीपेक्षा नक्कीच जास्त होता. बर्लिन म्हणजे माझ्या  आयुष्यामधील सर्वात उत्तरेकडला टप्पा. यापूर्वी पृथ्वीतलाच्या इतके वर कधी आलो नव्हतो याची आठवण झाली. आता प्रश्न खोलीमित्राला गाठण्याचा. समोरच एक पेट्रोलपंप होता. चुलतभावाच्या खोलीमित्राने मला याच पेट्रोलपंपवर आपण भेटू असे सांगितले होते.


मी समोरचा रस्ता ओलांडून पेट्रोलपंपाजवळ गेलो. पेट्रोलपंपाजवळ उभी असलेली प्रत्येक व्यक्ती ही खोलीमित्रच आहे की काय अशा भावनेने नजर फिरवली. कोणीच माझ्या अस्तित्वाकडे लक्ष न दिल्यामुळे माझी खात्री पटली की खोलीमित्र पेट्रोलपंपावर अजून आलेला नाही. तो अजूनही भटकत असावा असा अंदाज केला. मी मग पुन्हा रस्ता ओलांडून स्थानकाजवळचा दूरध्वनी गाठला आणि खोलीमित्राचा दूरध्वनी क्रमांक फिरवायला सुरुवात केली. यावेळेस दूरध्वनी काही केल्या लागेना. मी एक दोनदा प्रयत्न करूनही दूरध्वनी लागला नाही. गारठ्यामध्ये आता काय करावे असा विचार करत परत पेट्रोलपंपाजवळ गेलो आणि मेंदूच्या विचारांच्या सर्व प्रक्रिया बंद करून वेळ काढू लागलो.


३-४ मिनिटे गेली असावीत. तेवढ्यात समोरून एक महाविद्यालयकुमार हातातला दूरध्वनी संच चेंडू सारखा वर खाली करत माझ्या दिशेने आला. तो म्हणाला, 'आप परेश हो?' त्याने मला इतक्या सहजतेने कसे ओळखले हा प्रश्नच पडला. पण माझ्या हातातील पिशवी आणि माझा भारतीय चेहरा पाहून तोच काय पण बर्लिनमधला कुठलाही प्राणी यावेळी मला ओळखू शकला असता.  मी हो म्हणून त्याच्या हातात हात मिळवला. त्याने आपले नाव 'रफिक' असे सांगितले.


रफिक हा अती उत्साही प्राणी माझ्या चुलतभावाचा खोलीमित्र. मूळचा पाकिस्तानातील पंजाबी. आता जर्मनीत स्थायिक झालेला. गेल्या दोन महिन्यांपासून तो माझ्या चुलतभावाचा खोलीमित्र झाला होता. आम्ही अगदी उड्या मारतच घराकडे निघालो. घर दोनच मिनिटांच्या अंतरावर होते. घरी पोहोचताच त्याने मोठ्या आवाजात पंजाबी भांगडा संगीत वाजवायला सुरुवात केली. आणि लगेचच माझ्या चुलतभावाला साध्या दूरध्वनीवर गाठले. एक दोन मिनिटातच मीही माझ्या चुलतभावाशी बोलायला सुरुवात केली. तो रात्री १२ वाजता परतणार होता. पण त्याने सांगितले की रफिक माझा व्यवस्थित पाहुणचार करेल. आमचे बोलणे संपल्यावर रफिकने मला चहा प्यायचा का असे विचारले. मी न लाजता चहा चालेल असे म्हटले.  थोड्याच वेळात चहाचा ग्लास आणि मारीची भारतीय बिस्किटे यांचा आम्ही मनमुराद आनंद घ्यायला सुरुवात केली..


रात्री १२ वाजता चुलतभाऊ घरी आला. तो स्थिरस्थावर झाल्यावर गप्पा सुरू झाल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या बर्लिन दर्शनाचा कार्यक्रम बनू लागला...


 


अशा प्रकारे १५ तास, ८ गाड्या आणि अगणिक सहप्रवाशांच्या मदतीने माझा बर्लिनला पोहोचण्याचा मनोदय यशस्विरीत्या पूर्ण झाला. ही सर्व जर्मन आगगाडी सेवेची कृपा.