वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग २

भाग १

सकाळी लवकर उठून डीसी भटकंतीला सुरुवात केली. डीसीतील मंद गतीने चालणार्‍या ट्रॅफिक मध्ये गाड्यांवरील नंबर प्लेटकडे लक्ष गेले. दिसायला अतिशय साध्या असलेल्या या नंबर प्लेटवर लिहिलेल्या एका घोषवाक्याने चांगलेच लक्ष वेधले. त्यावर लिहिले होते "TAXATION WITHOUT REPRESENTATION".  या घोषवाक्या मागील इतिहासा विषयी थोडे खोदकाम करायचे ठरवले. याचे मूळ घोषवाक्य आहे "No taxation without representation".  
सन १७५० ते सन १७६० च्या दशकात या घोषवाक्याचा उगम झाला. त्या काळी अमेरिकेत ब्रिटिशांच्या १३ वसाहती होत्या. ब्रिटिश संसदेत त्यावेळी या वसाहतींचे थेट प्रतिनिधित्व कुणी करत नव्हते. त्यामुळे ब्रिटिशांनी पास केलेला कोणताही कायदा या मूळ वसाहतींना मान्य नव्हता. कारण हे कायदे त्यांच्या मते राईट्स ऑफ इंग्लिशमेन या हक्कांची पायमल्ली करणारे होते. थोडक्यात काय की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये अमेरिकेतल्या वसाहतींना  थेट प्रतिनिधित्व असल्याशिवाय कोणत्याही स्वरूपाचा कर भरायला वसाहतींतील नागरिकांचा विरोध होता. या प्रकारे प्रत्येक राजांशी निगडित नंबरप्लेट  वरील वाक्यांमागील पार्श्वभूमी जाणून घेणे खरंतर एक वेगळा विषय आहे.
no tax
हा फोटो जालावरून साभार.

युएस कॅपिटॉलची बाहेरुन भटकंती केली. कॅपिटॉलच्या मागील बाजूच्या तळे आणि पुतळ्यांचे बरेच फोटो काढले.




तोवर जेवायची वेळ झाली म्हणून मग आधी पोटपूजा केली. बसने परत कॅपिटॉल जवळच्या रस्त्यावर उतरलो. काही मॉन्युमेंट्स पाहावेत म्हणून मग वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या दिशेने चालत निघालो. आम्ही ज्या भागातून फिरत होतो तो फेडरल ट्रँगल म्हणून ओळखला जातो. या त्रिकोणी भागाच्या एका बाजूला युस  कॅपिटॉल आहे तर त्या विरुद्धच्या बाजूला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान 'व्हाईट हाउस' आहे. फेडरल ट्रँगल मध्ये फेडरल प्रशासनाच्या तसेच वॉशिंग्टन डीसी शहराच्या विविध कार्यालयांच्या इमारती आहेत. या सर्वच इमारती स्थापत्यसौंदर्याच्या बाबतीत एकाहून एक वाटतात.        


चालता चालता अनपेक्षितपणे ट्रंप इंटरनॅशनल हॉटेलच्या भव्य इमारतीसमोर येऊन थांबलो. हे हॉटेल पेनस्लिवेनिया ऍव्हेन्यु वर स्थित आहे. या हॉटेलचे गेल्या वर्षी   राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काही दिवस अगोदर डॉनल्ड ट्रंप यांच्या हस्ते थाटात उद्घाटन सोहळा पार पडला होता. इमारत पाहून असे वाटले की ही वास्तू किमान १०० वर्षांपूर्वीची असावी. म्हणून मग इमारतीचे बरेच फोटो काढले. ही बहुमजली अशी इमारत बाहेरून बघायला अतिशय आखीवरेखीव वाटते.


2
3
4
5
6

इमारतीचे समोरून, आजूबाजूने असे बरेच निरीक्षण केले. त्यावरच समाधान मानले आणि हॉटेलच्या बाजूने पुढे चालू लागलो. तेवढ्यात तेथील सुरक्षा कर्मचार्‍याने आम्हाला पाहिले आणि म्हणाला की हॉटेलच्या मागील बाजूने वर जाऊन क्लॉक टॉवर आवर्जून पहा. झाले आम्ही लगेच हॉटेलच्या मागे असलेल्या लिफ्टकडे निघालो. हा क्लॉक टॉवर पाहायला. क्लॉक टॉवर हा हॉटेलच्या इमारतीचा एक भाग आहे. खरंतर हे हॉटेल म्हणजे "ओल्ड पोस्ट ऑफिसची" ची इमारत आहे. डॉनल्ड ट्रंप यांच्या कंपनीने या इमारतीचे रूपांतर एका आलिशान हॉटेल मध्ये केले आहे. 

7

सन १८९२ साली बांधकामाला सुरुवात झाली आणि सन १८९९ साली ओल्ड पोस्ट ऑफिस' आणि क्लॉक टॉवर यांचे बांधकाम पूर्ण झाले. या इमारतीला 'ओल्ड पोस्ट ऑफिस पॅव्हिलियन' असेही संबोधले जाते. यात क्लॉक टॉवरची उंची ३९५ फूट एवढी आहे. ही इमारत पेनसिल्वेनिया ऍव्हेन्युवरच्या ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. डी सी शहरातील ही पहिलीच अशी इमारत बांधली गेली ज्यामध्ये स्टीलच्या फ्रेमचा उपयोग करण्यात आला होता. तसेच इमारतीच्या डिझाइन मध्ये इल्केट्रिकल वायरिंग अंतर्भूत असणारीही ही या शहरातली पहिलीच इमारत होती. क्लॉक टॉवर मधील घड्याळ सुरुवातीला यांत्रिक स्वरूपाचे होते. नंतर मात्र ते बदलून विजेवर चालणारे करण्यात आले. सन १९१४ पर्यंत या इमारतीने वॉशिंग्टन डी सीचे मुख्य पोस्ट ऑफिस म्हणून भूमिका बजावली.
या इमारतीच्या उद्घाघाटनानंतर  एक वर्षात डी सी शहराचे पोस्टमास्तर जेम्स विलेट यांचा इमारतीतील लिफ्टच्या  पोकळीत पडून अपघाती मृत्यू झाला. तसेच या इमारतीच्या शेजारी असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ओल्ड पोस्ट ऑफिस जमीनदोस्त करावे असे त्या काळी काँग्रसचे मत होते. मात्र त्यावेळी इमारत पाडली गेली नाही. पुन्हा एकवार १९३८ साली ही इमारत पाडावी असे काही काँग्रेसच्या सदस्यांचे मत होते. मात्र तेही बारगळले गेले. स्थानिक  लोकमतही सुस्थितीत असणाऱ्या ३५ वर्षा जुनी इमारत पाडण्याच्या विरोधात होती. असो ही इमारत आजही अतिशय सुस्थितीत आहे यातच सारे काही आले.
२००१ सालापासून या इमारतीचे रूपांतर एका हॉटेल मध्ये व्हावे यासाठी बरेच प्रयत्न केले गेले. अखेर सन २०१२ साली ट्रंपच्या कंपनीने या इमारतीचे लीज मिळवण्यासाठी वाटाघाटींना सुरुवात केली. यात त्यांनी जवळजवळ २०० मिलियन डॉलर्स इतका खर्च करण्याची तयारी दाखवली. यावेळी डीसीतील सामान्य जनतेला वाटले की  क्लॉक टॉवर पर्यटकांसाठी बंद केला जाईल. मात्र तसे काही झाले कारण की नॅशनल पार्क सर्व्हिसकडे हा भागाचे हक्क आहेत आणि पर्यटकांसाठी हा क्लॉक टॉवर आजही खुला आहे. एवढेच नव्हे तर क्लॉक टॉवर पाहायला कोणतेही प्रवेशशुल्क नाही. सन २०१३ साली वाटाघाटी पूर्ण झाल्या. ट्रंपच्या कंपनीला ६० वर्षांचे लीज दिले गेले. ज्यात ते सुमारे २, ५०, ००० डॉलर्स इतके मासिक भाडे भरते. आता या आलिशान हॉटेलमध्ये सर्व सुखसोयींनी युक्त  अशा २६० खोल्या आहेत.


१९११ सालचा हा फोटो विकीवरून साभार.

9
फेडरल ट्रायंगलचा एक भाग असलेली इमारत.
इमारतीच्या मागील बाजूने आत प्रवेश केल्यावर एक छोटेखानी म्युझियम आहे.त्यात जुन्या काळातील ओल्ड पोस्ट ऑफ़िस आणि क्लॉक टॉवरची अनेक छायाचित्रे आहेत. ते म्युझियम पाहून आम्ही क्लॉक टॉवरला जाण्यासाठी लिफ्टच्या दिशेने निघालो. या लिफ्टने थेट ९व्या मजल्यावर पोचवले जाते. या लिफ्ट मधून वर जाताना खाली ट्रंप हॉटेलच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या रेस्टॉरंटचे विलोभनीय दृश्य दिसत राहते. तिथून पुढे आणखी एक लिफ्ट आहे त्यातून ११व्या मजल्यावर पोचावे लागते. शेवटी तिसर्‍या लिफ्टने आणखी १ मजला  वर जाऊन आपण क्लॉक टॉवरच्या ऑब्झरवेटरी डेकला  पोचतो. इथे मध्यभागी ते भव्य घड्याळ आणि ते चालवणारी अजस्त्र वाटणारी यंत्रणा दिसते. तसेच या उंचीववरून डी सी शहराचे अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. ते दृश्य नजरेत साठवून आणि बरेच फोटो काढून आम्ही पुन्हा खाली आलो.
म्युझियम मधील काही फोटो.

Peter Charles L'Enfant - यांनी सन १७९१ साली डी सी शहराचा मूळ आराखडा तयार केला होता.  पेशाने तो मिलिटरीत काम करणारा इंजिनियर होता. याच्या नावाने डी सी शहरात  एक मोठे स्टेशन आहे.

युएस कॅपिटॉलच्या डोमचे काम चालु असताना (साल १८६२) .

पेनसिल्वेनिया अ‍ॅव्हेन्यु 
 ट्रंप हॉटेल मधील काही दृश्य.



 १९१४ सालचा हा फोटो विकीवरुन साभार
 

 
 
 
 
 
त्या दिवशी ठरवले होते की कॅपिटॉल बाहेरुन पाहून झाल्यावर काही मॉन्युमेंट्स पाहायचे. पण अनपेक्षितपणे ओल्ड पोस्ट ऑफिस आणि क्लॉक टॉवरची इमारत पाहायला मिळाली. ऐतिहासिक असा हा ठेवा अतिशय उत्तम प्रकारे आजही जतन करून ठेवला आहे याचे समाधान वाटले.
माहितीचा स्तोत्र :  टॅक्स विदाऊट रिप्रेस्नेटेशन, ओल्ड पोस्ट ऑफिस पॅव्हिलीयन, L'Enfant
क्रमशः