त्रिशंकू

टीपः अश्वत्थामा या कथेनंतर ही कथा आणि त्यानंतर 'अखेर' ही कथा अशी एक त्रिपदी डोक्यात होती आणि त्याप्रमाणे लिहिलीही. ही गोष्ट साधारण १९९० ते १९९२ दरम्यानची. मग त्या सगळ्या कथा हरवल्या.
त्यातली अश्वत्थामा ही कथा आठवेल तशी २००७ साली लिहिली. मग परत ताबूत थंडे पडले.
गेल्या महिन्यात बरेच जुनेपाने सामान हुसकणे जमले. त्यात या दोन्हीही सापडल्या. मूळची अश्वत्थामा मात्र गेली ती गेलीच.
========================================================
त्यांच्या मोहिमेचा तो पाचवा दिवस होता. बर्फ आणि त्यामधून चालणे या गोष्टींचे असलेले अंगभूत आकर्षण आता विरून गेले होते. सर्वांच्याच चालण्या-वागण्यात एक यांत्रिक सहजता आली होती.
सर्वदूर पांढराशुभ्र बर्फ पसरला होता आणि हवेत विरळ बर्फकण इतस्ततः घोंगावत होते. पाठीवरच्या सामानपिशवीचे बंद चापसण्यासाठी तो क्षणभर थांबला. त्याने मागे वळून पाहिले.
ती एकटीच हळूहळू चढत होती. अभावितपणे तिने वर पाहिले. आणि नजरानजर होताच ती वाऱ्याच्या झुळकीने हलणाऱ्या गवतपात्यांच्या सहजतेने हसली.
त्याने पुन्हा समोर पाहिले. अजून दोनशे फुटांवर त्यांचा गट विश्रांतीसाठी थांबला होता. त्याने तिथेच बसकण मारली आणि तिलाही बसण्यासाठी खुणावले.
तिने त्याच्या खांद्यावर मान टेकवली आणि दोघेही आजूबाजूची झळाळती शिखरे न्याहाळू लागले.
"का कुणास ठाऊक, पण मी कल्पना केली होती तेवढी काही ही मोहीम मला आकर्षक वाटत नाहीये. "
तिने प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिले.
उत्साहाने तो पुढे बोलू लागला. "म्हणजे बघ ना, ज्या रटाळ यांत्रिकपणातून सुटण्यासाठी म्हणून इथे आलो तो काही पाठचा सुटत नाही. झोपा, उठा, दाढी, अंघोळ, जेवण, काम हे तिथले झाले. इथे फक्त त्यात थोडासा बदल. पायाचे ठसे उमटवत आपण कुठेतरी पोहोचू आणि ठसे उमटवत परत येऊ. इतकेच. "
तिने समजूतदारपणे हुंकार भरला आणि डोळे मिटले.
त्याने पुन्हा समोर पाहिले. मंडळी अजून उठलेली नव्हती, पण त्याला मधले अंतर वाढल्याचा भास झाला.
आणि दोघांनाही अचानक जाणीव झाली की ते ज्यावर बसलेत तो पृष्ठभाग हळूहळू सरकू लागलेला आहे.
अविश्वासाच्या नजरेने त्याने तिच्याकडे पाहिले. अभावितपण त्याचा हात तिच्या खांद्याभोवती वेटाळला गेला आणि शरीरातील सगळी शक्ती संपून गेल्याप्रमाणे ते पुतळ्यासारखे बसून राहिले.
सगळ्या जाणीवांना फोलपटे ठरवणारा त्यांचा प्रवास संपला तेव्हा त्यांना एकदम जाग आली. नालाकृती प्रचंड कड्याने वेढलेल्या एका सुरेख सपाट जागी त्यांच्या हिमखंडाने त्यांना आणून सोडले होते. नालाच्या एका टोकाला त्यांची घसरगुंडी निर्विकारपणे उभी होती. बाकी सर्व बाजूला खोल दऱ्या पसरल्या होत्या.
बाकी मंडळींना यांच्या नाहीसे होण्याची अजून जाणीव झालेली नसावी. किंवा हे त्यांच्यापासून बरेच दूर आले असावेत. कारण गुणगुणल्यासारख्या आवाजाच्या हिमवादळाखेरीज त्यांना कसलाही आवाज ऐकू येत नव्हता.
काय करावे ते न सुचल्याने दोघेही बराच वेळ मांजरांसारखे निचळ बसून राहिले. थंडीतल्या सकाळी नदीतून उठणाऱ्या वाफांसारखा गूढ प्रकाश सर्वत्र पसरला होता.
अचानक परिस्थितीचे वेगळेपण त्याच्या लक्षात आले. काहीतरी करण्याच्या ओढीने तो झपाटल्यासारखा उठला. हाका घालण्यासाठी त्याने तोंड उघडले.
आणि अवचित सतारीची तार छेडावी तसा तो दचकला. त्याच्या कानात अनामिक सूर आलाप आळवू लागले. त्या आलापांना हळूहळू आकार येऊ लागला णि नागासारखा तो अलगद डोलू लागला.
आरशावरून उन्हाचा कवडसा सरकावा तसा तो लख्ख हसला. ती अजून मूढ बसून होती. हात धरून त्याने तिला उठवले आणि तिच्या कमरेभोवती हात घालून तो नालाच्या पोटात पावले टाकू लागला.
सायीवर चुणी पडावी तशी कपाळावर एक मृदू आठी घालून तिने त्याच्याकडे पाहिले.
"समाजात जगण्यासाठी लागणारा यांत्रिकपणा अगदी हाडापर्यंत भिनलेला असतो हेच खरे बघ", तो मोकळेपणाने म्हणाला.
"बोलताना जरी आपण त्या यांत्रिकपणातून बाहेर पडलो तरी ते डोक्यापर्यंत काही पोचत नाही. आत्ताचेच पाहा ना. आत्तापर्यंत न अनुभवलेल्या परिस्थितीत सापडले की रडणे-ओरडणे हे खरे तर जगायला न निर्ढावलेल्या लहान मुलाचे काम. पण आपणही तेच करत असतो. माणसांच्या सहवासात जी कल्पना मनात यायलासुद्धा लाजेल ती प्रत्यक्षात समोर आली असताना आपण काही समाजाच्या बेडीतून सुटत नाही. "
ते आता त्या सपाट जागेच्या मध्यभागी पोहोचले होते. नजर वर न्यावी तसतसा पांढराशुभ्र बर्फ ल्यालेला कडा दिसत होता. आणि पार मानेला रग लागावी तेव्हा कुठे आभाळ दिसत होते. आभाळ दिसत होते असे आपले म्हणायचे इतकेच. कारण बर्फाच्या पांढरेपणात आणि आभाळाच्या पांढरेपणात फारसा फरक नव्हता.
थांबून तो तिला सन्मुख झाला आणि तिच्या दोन्ही खांद्यांवर त्याने हात रोवले.
"या पृथ्वीवर माणूस नावाचा प्राणी अत्याचार करीत मोकाट हिंडतोय याच्या सगळ्या परिचित खुणा बाजूला पडल्या की कसे मोकळे वाटते नाही? " तो गंभीरपणे म्हणाला.
"पण मग त्याचवेळेस थोडी काळजाचा तळ बघून जाणारी भीतीही वाटते. स्वतःच्याच विचारांपासून आणि स्मृतींपासून पळून जायला काही आधारच उरत नाही. अर्थात हेही बरेच आहे म्हणा. आपण जाणीवांवर कसली झापडे लावली आहेत की आपल्या संवेदना खरोखर आतमध्ये कुठेतरी पोचताहेत हे तरी कळायची संधी मिळते. "
"पण समाजात जगायचे असेल तर आपल्या जाणीवा थोड्याशा मुरडाव्याच लागतात असे नाही वाटत तुला? "
"या अशा पिसे लागलेल्या परिस्थितीत आल्यामुळे असेल, पण काय करावे लागते यापेक्षा ते बरोबर आहे की नाही हा विचारच मनात फार येतो. अर्थात आपल्या जाणीवांवर झापडे लावली आहेत की नाहीत हे बघणार कशाच्या मार्फत, तर कदाचित झापडे लावलेल्या जाणीवांमार्फतच ही काटेरी शंकाही मनात येऊन जाते. "
बर्फकणांच्या गुणगुणण्यावर कसलाही ओरखडा न उमटवता ते दोघे स्तब्ध झाले.
अचानक त्याच्या चेहऱ्यावर मळभ दाटून आले. वानराच्या पिलाने आईला बिलगावे तसा तो तिला घट्ट चिकटला. हाडांचा कस बघणारी ती मिठी अनुभवत ती हळूहळू त्याच्या मानेवर थोपटू लागली.
"आपल्या संवेदना खच्ची करत शिकार होत असलेल्या सावजाप्रमाणे केविलवाणे पळत रहायचे याची इतकी सवय झाली आहे की असा एखादा मोरपिशी अनुभव भोगण्याचीसुद्धा मनाची तयारी होत नाही" तो घुसमटत्या आवाजात म्हणाला.
ते अजून थोडा काळ स्तब्ध राहिले आणि नागाने कात टाकावी तसे हळूहळू विलग झाले.
मग एकमेकांच्या कमरेभोवती हात गुंफून त्यांनी मांजराच्या सहजतेने चालायला सुरुवात केली.
"ज्याच्यासाठी आपण हास्यास्पद वाटणारा आटापिटा करत राहतो ते जीवन म्हणजे आहे तरी काय? ते म्हणजे एक अतर्क्य मायाजाल आहे असे प्रतिपादणारी तथाकथित गुरू मंडळी, आणि ते म्हणजे बेतशीर, नियमबद्ध गणितासारखे सरळ दोरीत चालणारे काहीतरी प्रकरण आहे असा कंठशोष करणारी तथाकथित शास्त्रज्ञ मंडळी. दोन्हीही मते मला रंग विटून गेलेल्या कपड्यासारखी वाटतात. आणि प्रतिपक्षाला नामोहरम करण्यासाठी प्रत्येकजण 'आंधळे आणि हत्ती' या गोष्टीचा दाखला देतो हा तर मोठाच विनोद म्हणावा लागेल.
"आणि या जंजाळात भरकटताना आपण सहारा कसला शोधतो, तर अशाच चाचपडणाऱ्या दुसऱ्या माणसांचा.
"अशी ही आवळ्याभोपळ्याची मोट बांधायची तर मग भाषा, शासनपद्धती, नियम, राहणीच्या पद्धती हा सगळा बुजबुजाट माजायचाच. पण मग भाषा हे कुठलेतरी अंतिम, वस्तुनिष्ठ परिमाण आहे हे गृहित धरून त्या अज्ञाताशी झोंब्या खेळण्याच्या कृतीतही सगळेजण उत्साह ओततात.
"आपल्या काळजात झणत्कार उठवून जाणारी फारतर आणखी एखादी व्यक्ती भेटू शकेल आणि त्या व्यक्तीशी संभाषण करण्यासाठी मग भाषेच्या मळकट चिंधीचीही गरज राहणार नाही.
"पण संवादासाठी, किंवा खरेतर संवादाची शक्यता अजमावून पाहण्यासाठी भाषा आली असे नसून भाषेमुळेच संवाद, किंबहुना विचार, शक्य आहेत असे किंचाळण्यातच आपले तथाकथित तत्त्वज्ञ समाधान पावतात. वादविवादात त्यांना हरवणे शक्यच नाही. कारण वादविवाद खेळायचे कशात, तर परत भाषेच्याच डबक्यात.
"आणि प्रश्न सोडवणे कठीण वा अशक्य भासू लागले की हास्यास्पद रीतीने तो प्रश्न सोपा करून घेणे हे तंत्र तर सर्वांनी इतके आत्मसात केले आहे की उद्या जर कुणी 'जीवनाचे गूढ संपूर्णतया उकलले' अशी आरोळी ठोकली तर आश्चर्य वाटायला नको.
"सगळ्याची काळ्यापांढऱ्या रंगात विभागणी केली तर रंगांधळा माणूसदेखील रंगज्ञान झाल्याची शेखी मिरवू लागेल. तसे काय, चिखलात बसलेल्या म्हशीच्या दृष्टीनेही जग म्हणजे चिखल असलेला भाग आणि चिखल नसलेला भाग अशी विभागणी होत असेल.
"प्रश्न सोपा करण्याच्या भ्रमात जर प्रश्नाचाच गळा घोटला, तर शब्दाचा कोणताही बुडबुडा उत्तर असल्यासारखे भासू लागते.
"या शब्दभ्रमात अडकल्यानंतर जीवनाच्याच ताकदीने उभे राहणारे मृत्यूचे गूढही अनाकलनीय भासू लागते. आणि केवळ ते अनाकलनीय आहे या सबबीखाली त्यापासून दूर पळण्याची सगळ्यांची शर्यत सुरू होते. त्या गदारोळात जीवन तरी आकलनीय आहे का, आणि मृत्यूपासून दूर पळता येईल का हे प्रश्न कुणाच्या कानावरही पडत नाहीत. "
तिने त्याच्या गालाला हात लावून त्याचा चेहरा हलकेच तिच्याकडे वळवला आणि डोळे मिटून नाजूकपणे मान डोलावली. त्यांची एकमेकांच्या कमरेभोवतीची पकड आणखी घट्ट झाली.
हळूहळू त्याला रितेपणाची भावना स्पर्शू लागली. तांबूस किरमिजी रंगाच्या मूक नादलहरी त्याला वेढू लागल्या आणि त्या नादलहरींच्या आडून एक अदृष्य आकार त्याला खुणावू लागला.
तो तिला सन्मुख झाला आणि तिचा चेहरा त्याने ओंजळीमध्ये फुलासारखा अलगद उचलला.
"केवळ एका अनाकलनीय गोष्टीची गूढ भीती वाटते म्हणून दुसऱ्या तितक्याच अनाकलनीय गोष्टीला कवटाळून बसायचे आणि श्वासाला श्वास चिकटवत आपण जिवंत आहोत यात आनंद मानायचा हा मूर्ख खेळ अजून किती काळ खेळायचा? " त्याने आवेगाने विचारले.
तिचे गर्भकोवळे ओठ किंचित थरथरले.
आणि अचानक त्या पर्वताने हुंकार भरल्यासारखा कानठळ्या बसवणारा आवाज झाला. दोघांनीही दचकून वर पाहिले.
त्या अजस्त्र कड्याचा एक अजस्त्र भाग हळूहळू विलग होत होता. हिमकणांचा वर्षाव आता वाढू लागला होता.
तुटणाऱ्या कड्याचे हिमखंड टपाटप बरसू लागले.
झपाटल्यासारखे त्याने तिच्या ओठावर ओठ रोवले आणि ते दोघेही एकमेकांत मिसळून गेले.
रुद्रघोष करीत वरचा कडा त्यांच्याकडे झेपावू लागला.

=====
'दैव तारी त्याला कोण मारी? '
ता. २६, काठमांडू
(पी. टी. आय. )
मल्लिकेश्वर शिखरावर चढाईसाठी गेलेल्या एका मोहिमेतील दोन सदस्य कडा कोसळण्याच्या दुर्घटनेतून आश्चर्यकारकरीत्या बचावले. कोसळलेल्या कड्याचा एक मोठा तुकडा या जोडप्याच्या जरा वरती तिरका टेकून उभा राहिल्याने ते सुखरूप राहिले. मोहिमेतील बाकी सर्व सदस्य मात्र उंचावरून कोसळल्याने मृत्यू पावले असावेत.
दुर्घटनेनंतर काही तासांतच शेर्पा थोयबा यांच्या नेतृत्वाखालील एका तुकडीने या जोडप्याची सुटका केली. बाकी सदस्यांपैकी नऊ जणांचे मृतदेह हाती आले असून उर्वरित चार जणांचा तपास चालू आहे.
हे दोघेही आता शुद्धीवर आले आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
=====

लाजरीची पाने हळूहळू उमलत जावीत तसे त्याने डोळे उघडले. चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतादेता केव्हातरी त्याचा डोळा लागला होता.
नवीनच दृष्टी लाभल्याप्रमाणे बावरून त्याने आजूबाजूला बघितले. भोवतालचे पडदे आता काढले होते. खालून वाहतुकीचा गोंगाट ऐकू येत होता.
आणि खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात पलंगावर ती झोपली होती.
कुठल्यातरी अनामिक अनुभूतीने तिनेही डोळे उघडले. तो दृष्टीस पडताच तिची नजर अस्फुट हसली.
त्याची नजर बधिरपणे खोलीत भिरभिरत राहिली. मांजरपावलांनी त्याच्या चेहऱ्यावर पराभवाची छाया सरकत गेली.
"अखेर त्या मंतरलेल्या क्षणीही आपली फसवणूकच झाली. " बंदुकीच्या गोळीसारखे त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि किंचितकाळ निनादत राहिले. "आणि आपल्याला गती प्राप्त झाली आहे या भ्रमात आपण जागीच खिळून राहिलो. आता तरी या गोष्टीचा जाणीवपूर्वक शेवट केलाच पाहिजे. जीवनावर तर आपण बोळा फिरवून टाकला. आता मृत्यूवाचून पर्याय नाही. " त्याचा चेहरा कोंडल्या पशूसारखा हिंस्त्र झाला.
तिच्या नजरेत खिन्नता दाटून आली. "नाही. भाषेच्या परिघात फिरणाऱ्या या तर्काच्या चक्राला नावे ठेवताठेवता तूही त्यात गुरफटला गेला आहेस. " तिच्या आवाजात दवाचे भिजलेपण होते. "एक शक्यता तू लक्षात घेतली नाहीस की जाणिवाही अपूर्ण असू शकतात. खरे तर त्या पूर्ण की अपूर्ण हे मापायचा मानदंड आपल्याकडे नाही असे म्हणायला हवे. "
"मृत्यूच्या अनाकलनीय गूढापासून दूर पळणाऱ्यांचे विचार तुला पटत नाहीत. पण केवळ बाकीचे तसे करतात म्हणून आपण त्यांच्या विरुद्ध त्या गूढाकडे जाण्याचा अट्टाहास धरायचा हे तरी तुला पटते का? आणि मग जीवनाच्या गूढापासून पळ काढणारा अशी तुझी संभावना करणे योग्यच ठरेल. म्हणजे काय, तर स्वतःची खोटी समजूत काढत तू स्वतःला इतरांपेक्षा वेगळा मानणार.
"आपल्या जाणिवा आपल्या विचारशक्तीच्या नेहमी एक पाऊल पुढे असतात हे खरेच. पण हा विचारही आपण आपल्या लंगड्या विचारशक्तीनेच करतो ना? नेहमी म्हणजे काय, तर आतापर्यंतच्या अनुभवावरून. पुढेही तोच अनुभव येईल वा नाही हे माहीत नसताना तू त्यातला सोयिस्कर अर्थच का घेतोस? म्हणजे तूही प्रश्नाचा जीव घोटून आपले आधीच ठरवलेले उत्तर त्या प्रश्नात कोंबतो आहेस.
"आणि आपल्या अपूर्ण वा पूर्ण हे माहीत नसलेल्या जाणिवा असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण कदाचित अंतिम सत्याला स्पर्शही करीत असू. पण त्यांच्या या अनिश्चिततेमुळे आपल्याला ठामपणे काहीही म्हणता येत नाही. आणि हा मुद्दा उगाळत जीवन जगण्याचा आटाट करू नये असे म्हणण्यालाही अर्थ नाही. स्वतःचा चेहरा आपण आपल्या नजरेने कधी पाहू शकत नाही. त्यासाठी आरशासारखा प्रतिबिंब दाखवणारा भ्रम उभा करावा लागतो हे आपण विनातक्रार मानतोच ना?
"अर्थात हे सगळे तिऱ्हाईत बोलणे झाले. आपले म्हणशील तर जीवन आणि मृत्यू या दोन घटनांचा अर्थच आपल्या जाणीवेतून नाहीसा झाला आहे.
"वरून तो हिमनग कोसळत असताना आपण ज्या अनामिक ओढीने एकमेकांका कवटाळले होते ती अनुभूती, ती संवेदना, आपल्या दृष्टीने जीवनाचा अखेरचा क्षण होती. आपल्या सर्व जीवनावर आपण बोळा फिरवून लख्ख झालो होतो हे खरेच.
"पण मृत्यूचाही विचार करताना तू एक गोष्ट लक्षात घे, की या सर्व विचारांना 'जगणे' या संवेदनेची न तुटणारी बेडी पडली आहे. आपण जिवंत असेपर्यंत ही बेडी तुटणार नाही आणि मृत्यू पावल्यावर 'मरण' या संकल्पनेविषयी बाहेरून विचार करता येणार नाही. त्यामुळे कितीही असह्य वाटत असले तरीही आपल्याला कुठल्यातरी वर्तुळात जखडून रहायलाच हवे.
"मृत्यू म्हणजे काय याचे उत्तर जगण्याची बेडी संभाळत द्यायचे तर जीवनाच्या अखेरच्या क्षणी आपल्याला जाणवणारी अनुभूती असे द्यावे लागेल. ती आपण आधीच भोगून घेतली.
"त्या झांजरलेल्या क्षणी आपण जे उपभोगले त्यानंतर आपल्याला या जीवनमृत्यूच्या चक्रात कुठेही जागा राहिलेली नाही.
"मृत्यू अटळ वाटत असतानाही, किंबहुना आपण स्वतःहून मृत्यूकडे चालत गेलो असतानाही आपण सहीसलामत सुटलो. यामुळे जे अविश्वासाचे बीज आपल्या मनात पेरले गेले आहे ते आता कधीच आपला पीछा सोडणार नाही.
"अतर्क्य अशा घटनेतूनही बाहेर पडल्यामुळे मृत्यूविषयी वाटणारी अनामिक ओढही आपल्याला आता निर्जीव झाली आहे.
"मृत्यूच्या पलिकडे काय आहे हे जरी आपल्याला ज्ञात नसले तरी त्या अज्ञाताचे आकर्षण पूर्णपणे भोगण्यासाठी आपल्या ज्ञात जाणीवा तल्लख ठेवायला हव्यात.
"आणि तू रेटत मृत्यूकडे जाण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न करशील तेव्हा तेव्हा ते अविश्वासाचे बीज तुझ्या जाणीवा बधिर करेल, आणि आतातरी आपण मृत्यू पावणार का, हाच प्रश्न तिथे तल्लख राहील.
"'न यत्रौ न तत्रौ' अशा त्रिशंकूसारखी आपली अवस्था झाली आहे. जीवन आणि मृत्यू हे दोन्ही शब्द आपल्या शब्दकोषातून नाहीसे झाले आहेत.
"कुणी सांगावे, आपल्याला या दोन्ही गोष्टींपासून संपूर्णतया वेगळी, केवळ तू नि मी भोगायची अनुभूती प्राप्त होईल. "
त्या खोलीवर वाहतुकीच्या आवाजाचे झाकण बसले आणि तिथले सारे शब्द मृत्यू पावले.