गावोगावी ... (५)

देशोदेशीच्या माणसांच्या वेगवेगळ्या तऱ्हा. भाषा, संस्कृती, वेषभूषा, चाली रीती. सारे काही वेगळे. प्रत्येक देशीचे काही आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. प्रत्येकाचा इतिहास अनेक रसभरित कथानकांनी परिपूर्ण आहे. सर्वत्र संस्कृतीची जपणूक केली जाते.अधुनिक युगाच्या नव्या संकल्पना स्वीकारताना,भूतकाळ सर्वस्वी झुगारलेला नसतो. जुन्याला नवकल्पनांची जोड देत हा वारसा जपलेला असतो. जगाच्या पाठीवर कुठेही जा.. माणसे अंतर्यामी समानच असतात हे मात्र त्रिवार सत्य. त्यांचा देश, वेष, भाषा वेगळी असेल, पण मानवी भाव भावना त्याच असतात.
मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वारापाशी मी प्रवासी सामान आणि माझा साडेचार वर्षांचा मुलगा यांच्यासह थांबलेली होते. मी जाणार होते सिंगापूरला. माझा पहिलाच परदेश प्रवास होता तो. फ्लाईट रात्री उशीरा होती. पण मी वेळेच्या कितीतरी आधीच मुंबई विमानतळावर पोहोचले होते.
पुणे ते मुंबई विमानतळ अशी के. के. ट्रॅव्हल्स ची बस होती. ती बस प्रत्येक प्रवाशाच्या घरापर्यंत येत असे. परतीचा प्रवास पण तसाच, मुंबई विमानतळ ते घर. खूपच सोयीची सुविधा होती ती. त्या दिवशी बऱ्याच लवकर माझ्या प्रवासाला सुरुवात झाली होती. आणि वेळेच्या खूप आधी मुंबईमध्ये पोहोचले होते. तिथे मला सांगितले की फ्लाईटच्या तीन तास आधी मला आत प्रवेश मिळेल. त्यामुळे तो पर्यंत म्हणजे जवळ जवळ अडीच ते तीन तास बाहेरच थांबणे क्रमप्राप्तं होते. माझे प्रवासी सामान आणि एकाजागी स्वस्थ थांबायला अजिबात तयार नसलेला माझा मुलगा, यांना सांभाळताना माझी चांगलीच तारांबळ होत होती. शेवटी एकदाचा आम्हाला विमानतळाच्या आत प्रवेश मिळाला. सारे सोपस्कार पार पडले आणि आम्ही सिंगापूरला निघालो होतो.
विमान आकाशात झेपावले. सकाळपासून माझ्यासोबत प्रवास करणारा माझा छोटुसा पोर कधीच झोपेच्या अधीन झाला होता. सिंगापूर भारताच्या अडीच तास पुढे आहे. सिंगापुरामध्ये आमचे विमान पोहोचले तेव्हा लख्खं उजाडले होते. नुकताच पाऊस पडून गेलेला असावा. सिंगापूरचे चँगी विमानतळ हे जगातील सर्वोत्तम विमानतळांपैकी एक आहे. स्वच्छ, नीटनेटके आणि सुंदर. जागोजागी माहितीचे फलक लावलेले. कुणाला काही विचारायची जरूरच नव्हती. तिथले कर्मचारी मदतीस तप्तर होते. प्रवाशाशी सौजन्याने वागत होते. आम्ही सरकत्या जिन्यावरून खाली येत होतो. समोर काउंटर्स जिथे पासपोर्ट व्हिसावर शिक्के घ्यायचे होते. त्याच्या पलीकडे काचेची भिंतच होती. त्या पलीकडे काही लोकं थांबलेली होती. माझा मुलगा तिकडे बोट दाखवत अत्यानंदाने सांगत होता, " आई तो बघ बाबा".
सिंगापूरचे प्रथम दर्शन अत्यंत आल्हाददायक होते. स्वच्छ, प्रशस्त रस्ते, शिस्तशीर रहदारी, रस्त्याच्या कडेला, मध्यभागी जिथे शक्य असेल तिथे हिरवीगार झाडे होती. काही झाडांवर रंगीबेरंगी फुले होती. तिथे सारे काही आखीव रेखीव. इमारती एकसारख्या, नीट नेटक्या रंगवलेल्या होत्या. सिंगापूर मध्ये इमारतीच्या भिंतीवर अथवा रस्त्यात कुठेही पोस्टर्स, होर्डिंग्स वगैरे दिसत नाहीत. भिंतीवर कुठे भित्तीचित्रे दिसत नाहीत. सारे स्वछ आणि सुंदर. या साठी प्रशासन आणि नागरिकांची एकवाक्यता असणे गरजेचे आहे. इथे प्रशासनाने केलेले नियम कसोशीने पाळले जातात.
निवासी इमारतींच्या जवळ मुलांसाठी तयार केलेली क्रीडांगणे होती. त्या क्रिडांगणांमध्ये आकर्षक रंगसंगती असलेले क्रिडेची साधने देखिल होतील. कुठेही मोडलेले, नादुरूस्त, रंग ऊडालेले असे काहीच नव्हते.
सिंगापूरच्या वास्तव्यात प्रकर्षाने जाणवली ती त्या शहराची रचना. सुंदर, आकर्षक तर आहेच, परंतु नागरिकांच्या सर्व गरजांचा विचार करून सोयिस्कर देखिल केलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या, दररोजच्या गरजांचा योग्य तो आढावा घेऊन अनेक सोयी सुविधां उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इथल्या बसेस आणि एमआरटी (ट्रेन्स) वक्तशीर आणि आरामदायी आहेत. स्टेशनवर चार भाषांमध्ये उद्घोषणा केली जाते.
सर्वत्र माहिती फलक आणि नकाशे असतात. त्यामुळे खाजगी वाहन नसले तरी प्रवासकरणे सुलभ आहे.
रस्त्याच्या कडेचे फुटपाथ चांगले रुंद आहेत. त्यावर ठराविक अंतरावर कचरा टाकण्यासाठी ठेवलेया पेट्या आहेत. त्यावर झाकणे आहेत. त्यातून कचरा बाहेर, बाजूला पडलेला कधीच दिसत नाही. ठराविक अंतरांवर मोठाली झाडे लावलेली आहेत. काही ठिकाणी पूर्ण फुटपाथवर छप्पर घातलेले आहे. सिंगापूरमध्ये कधीही पडणाऱ्या पावसापासून संरक्षण करण्यासाठी सोय आहे. पाउस नसेल तेव्हा कडक उन असते. त्यामुळे चालणाऱ्यांना ती खूपच चांगली सुविधा आहे. पार्कींगसाठी जागा आरक्षित केलेल्या आहेत. किंवा काही ठिकाणी बहुमजली वाहनतळ आहेत. इमारतींच्या खाली मोकळ्या जागेत बेंचेस, टेबले ठेवलेली असतात. काही ठिकाणी विविध पेयांची व्हेंडींग मशीन्स आहेत. तिथल्या निवासी क्षेत्रात सुपर मार्केटस, वेटमार्केटस इ. आहेत. सिंगापूर मध्ये जागोजागी अनेक उद्याने आहेत. तिथे व्यायामाची साधने ठेवलेली असतात. त्याचा वापर ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुलांपर्यंत सारेजण करतात. एकंदरीत इथल्या शासनाने, नागरिकांचे रोजचे आयुष्य सहज आणि सोप्पे केलेले आहे.
सिंगापूरमधली मला सगळ्यात आवडलेली सुविधा म्हणजे इथली समृद्ध आणि सुसज्ज ग्रंथालये. ग्रंथालयामध्येच वाचनाची पण सोय आहे. तिथे अनेकजण वर्तमानपत्रे, पुस्तके वाचत बसलेले असतात. विविध विषयांची अनेक पुस्तके इथे आहेत. इंग्रजी, चायनिज, मलेशियन आणि तामीळ भाषांमधली आमाप ग्रंथसंपदा इथे दिसते. त्याचे अतिशय काळजीपूर्वक जतन केलेले आहे. प्रत्येक निवासी क्षेत्रात एक ग्रंथालय आहेच. ग्रंथालयाची वार्षिक वर्गणी खूपच कमी आहेत. एका सभासदास साधारण आठ पुस्तके घरी नेता येतात. तिथे ऑडीओ बुक्स आणि सीडीजचा देखिल प्रचंड साठा आहे. आणि हे सारे पद्धतशीरपणे ठेवलेले आहे. कुठले पुस्तक, अथवा सिडी त्या प्रचंड ग्रंथालयांमध्ये कुठे आहे, हे अचूकपणे शोधता येते.
सिंगापूरमध्ये चार भाषा प्रामुख्याने वापरल्या जातात. चायनिज, मलेशियन, तामीळ आणि इंग्रजी. तसे इथे देशोदेशीचे आणि अठरापगड जाती धर्माचे लोक अढळतात. भारतीय समुदायाचे प्रमाण लक्षणीय आहे. यात गुजराथी, पंजाबी आणि तामीळ लोकसंख्या जास्त आहे. महाराष्ट्रीयन देखिल भरपूर आहेत आणि अर्थात महाराष्ट्र मंडळ देखिल आहेच. सिंगापोरियन लोकं शांतताप्रिय आहेत. भांडणे, मारामाऱ्या, आरडाओरडा अगदी क्वचित होताना दिसतात. सर्व नागरिक कायदे आणि नियमांचे पालन करतातच. कारण तसे न केल्यास जबरदस्त दंड अथवा शिक्षा केली जाते. इथले प्रशासन नेहमी सावध आणि जागरूक असते. त्यामुळे इथल्या नागरिकांचे जीवन सुरक्षित झाले आहे.
घरी पोहोचल्यावर दुपारी थोडी विश्रांती घेऊन, संध्याकाळी बाहेर जायचे ठरवले होते. पुण्याहून निघताना वाटत होते, दुसऱ्या देशात मी जाणार. तिथले रीतिरिवाज, भाषा, पोषाख सारे काही वेगळे, माझ्या सवयीचे नसलेले. तिथे राहणे, वावरणे जमेल की नाही मला?
संध्याकाळी आम्ही ज्या भागात होतो तो अतिशय गर्दीचा भाग होता. अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि शॉपिंग मॉल्सने इ. ने गजबजलेला होता. तऱ्हेतऱ्हेच्या वस्तूंनी सजलेली दुकाने होती. झगमगणाऱ्या दिव्यांची आकर्षक प्रकाशयोजना केलेली होती. तिथल्या फुटपाथवर काही विक्रेते निरनिराळ्या वस्तू विकत होते. घड्याळे, पर्सेस स्कार्फ आणि बरेच काही. देशोदेशीचे लोक तिथे दिसत होते. त्यांचे रंग, रूप, भाषा सारे काही निराळे. प्रत्येक जण स्वतःच्या विश्वात मश्गुल होता. स्वतःचा खाजगीपणा सारेचजण जपत होते. तसेच दुसऱ्याच्या खाजगीपणाचा देखिल आदर राखला जात होता. माझ्या मनावरचे दडपण जरा दूर झाले. त्यानंतर तिथे वावरताना, मला कसलीच अडचण भासली नाही.
कालचा पूर्ण दिवस आणि रात्र मी प्रवासच करीत होते. त्यांमुळे आता जास्त उत्साह नव्हता. घरी लवकरच जायचे असे ठरवले. तिथे मॅकडोनाल्ड बर्गर ची मोठी पाटी होती (आता पुण्यात मॅकडोनाल्ड आहे, पण त्या वेळी नव्हते).
काउंटरच्या वर मेन्युबोर्ड लावलेले. आपल्याला हवे असलेले पदार्थ आपणच घेऊन यायचे अशी पद्धत. भरपूर बर्फ असलेला कोकाकोलाचा मोट्ठा कागदी पेला तिथल्या पदार्थांसोबत दिला जाई. माझ्यासाठी तो प्रकार नवीनंच होता. पण छान होता. पुढील संपूर्ण वास्तव्यात, कुठेही स्थळदर्शन अथवा शॉपिंग करताना आम्ही जास्त करून मॅक, के एफ सी, बर्गर किंग यांचाच आश्रय घेत होतो. कारण अतिशय कमीवेळात मिळणारे आणि संपणारे असे पदार्थ असतात. शिवाय नेहमीच स्वच्छ, चवदार आणि माफक किंमती मध्ये मिळतात.
सिंगापूरमध्ये फुडकोर्ट हा प्रकार प्रथमच पाहिला (आता भारतात सुद्धा काही ठिकाणी फुड कोर्ट दिसतात ). एका मोठ्या हॉल मध्ये चारही बाजूला वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स होते. मधल्या जागेत खुर्च्या टेबले मांडलेली. प्रत्येकाने ट्रे मधून हवे ते पदार्थ घेऊन यायचे. आणून देणारे कुणी नाही. पदार्थांच्या स्टॉल्स मध्ये खूप विविधता असते. कोरियन, मलेशियन, थाई, चायनीज, इंडियन असे विविध प्रकार. एका ठिकाणी सर्वप्रकारची थंड, गरम पेये मिळतात. पाणीसुद्धा विकतच घ्यायचे. गर्दी खूपच, टेबल शोधायला लागते.
मी तिथे फिश सूप आणि राईस घेतला होता. अगदी पातळ आणि उकळते सूप, त्यामध्ये फिश चे दोन चार तुकडे, समुद्री शैवाल (सीवीड), एखदी पालेभाजी, टोमॅटोची एखादी बारकीशी फोड इतकेच. सोबत एका छोट्या बाऊल मध्ये साधा पांढरा भात. नूडल्स हवे असतील तर सूपमध्ये मिसळून देणार. काउंटरवर दोन तीन प्रकारचे सॉस असतात. प्रत्येकाने त्याच्या आवडीप्रमाणे ते घ्यायचे. सोयासॉस मध्ये बारीक चिरलेल्या लालमिरच्या घातलेल्या. ते त्या सूप मध्ये मिसळून घ्यायचे. मिरच्या भयंकर तिखट असतात. त्यामुळे घेताना जरा जपूनच. सूप अत्यंत चवदार होते.
तिथेच "यांग तो फू" नावाचा एक स्टॉल होता. निरनिराळ्या चिरलेल्या भाज्या, चिकन, बिफ, मासे इ. चे अत्यंत पातळ कापलेले तुकडे इ. बरेच वेगवेगळे पदार्थ मांडून ठेवलेले असतात. एका वाडग्या मध्ये त्यातील आपल्याला हवे ते निवडून घेऊ, तो वाडगा तिथल्या कर्मचाऱ्याकडे द्यायचा. तो ते सर्व मोजून, त्याचे किती पैसे द्यायला लागतील ते सांगतो. त्यानंतर ते सारे पदार्थ एखाद्या मोठ्या, स्टील ची बारीक जाळी असलेल्या मोठ्या खोलगट गाळणीत काढतो. त्या गाळणीचा दांडा चांगला लांब असतो. तिथे उकळत असलेल्या सूपच्या भांड्यात ती गाळणी बुडवून त्याचा दांडा भांड्याच्या कडेला अडकवून ठेवतो. साधारण पाच एक मिनिटात ती गाळणी बाहेर काढतो. त्या अवधीत त्यातील पदार्थ हवे तितके शिजलेले असतात. मग ते सर्व परत एका बाऊलमध्ये ओतून त्यावर गरम सूप वाढतो. त्या सोबत भाताचा एक छोटा बाऊल देतात. आणि काही सॉस. अतिशय चवदार पदार्थ आणि आरोग्यासाठी उत्तम. कारण त्यात तेल, मसाले इ. काहीच नाही.
एकदिवस तिथल्या फूडकोर्टमधील जपानी स्टॉलमधून जेवण घेतले होते. चार भाग केलेली काळ्या रंगाची प्लेट. एका भागात भात, दुसऱ्या भागात फिश किंवा चिकन असे काही, एकात सॉस सारखे काही तरी, आणि एकात जपानी पद्धतीचे लोणचे, ज्यात वाळवलेले बारके मासे असतात. सोबत गरम मिसो सूप. हा प्रकार पण मला आवडला. तिथे सर्वजण जेवताना चॉपस्टिक्स वापरत होते. आजकाल माझा लेक आणि त्याचा बाबा चांगले सराईतपणे चॉपस्टिक्स वापरतात. मला अजून तितकासा सराव नाही झालेला.
सिंगापूर मध्ये "बोट की" नावाचा एक विभाग आहे. नदी किनाऱ्यालगत असलेला हा भाग, संध्याकाळ नंतर चांगलाच गजबजलेला असतो.
नदीमध्ये नौकाविहारासाठी अनेक लहान लहान नौका असतात.
किनाऱ्यावर विविध देशांच्या भोजनाचा आस्वाद घेता येतो. भिंती, दारे, खिडक्या इ. काही नाही. फक्त कापडी छत असते.
काही ठिकाणी टेबलवर मांडलेले, सुंदर, डौलदार आकाराचे मेणबत्तीचे स्टॅंडस दिसतात.
प्रकाशयोजना अगदी माफक आणि जेमतेमच असते.
रात्रीच्या वेळेस, अंधाऱ्या पाण्यावर चालणाऱ्या प्रकाशमान नौका, हलक्या आवाजातले संगीताचे सूर आणि गार वारा असे जादुमयी वातावरण असते.
तिथून दूरवरचा मरलायन देखिल दिसतो.
सिंगापूर मध्ये मी असताना मी आणि मुलगा दिवसभर घरीच असायचो कारण बाबाचे ऑफिस असायचे. तिथे नवखी असूनही, मला एकटीने सगळीकडे जाण्यात काहीच अडचण जाणवत नसे. त्याचे ऑफिस सनटेक सिटी मध्ये होते त्यावेळी. एकदिवस मी संध्याकाळी साधारण ऑफिस संपायच्या वेळेस सनटेक सिटी मध्ये गेले होते. तो खाली येई पर्यंत मी आणि माझा मुलगा तिथली दुकाने, वस्तू बघत वेळ घालवत होतो. एकाजागी एक फुगेवाला होता. वेगवेगळ्या कार्टून्सच्या आकाराचे हवा भरलेले फुगे त्याच्याकडे होते. ते घेण्यासाठी मुलगा हट्ट करायला लागला, म्हणून मी तिथे गेले. किंमत विचारली तर एक फुगा चार का पाच सिंगापूर डॉलर एव्हढ्या किंमतीचा होता. मला अजून डॉलर मध्ये खर्च करायची सवय नव्हती. माझा हिशोब सुरू झाला. चार डॉलर्स म्हणजे शंभर रूपये ( त्यावेळी १ सिंगापूर$ = २५ रू. होता,आता त्याची किंमत दुप्पट झाली आहे). शंभर, सव्वाशे रुपये खर्च करून एक हवा भरलेला फुगा घ्यायचा मला धीर होईना. असा काही वेळ गेला. मुलाचा हट्ट चालूच होता.
बाबा आल्याबरोबर त्याने लगेच त्याच्याकडे तक्रार केली, " बाबा, आई मला फुगा घेऊन देत नाहीये." बाबाने विचारले काय झाले ते.. मग त्या फुगेवाल्याकडे जाऊन दोन तीन फुगे घेऊन आला. लाडक्या लेकाचा हट्ट, बाबा पुरवणारच ना? पण मला जरा राग आला. मी त्याला म्हणाले, "अरे मी नाही म्हणाले असताना तू का घेऊन दिलेस फुगे? १०० रूपयांचा चा फुगा कशाला पाहिजे? काही वेळातच तो फुटून जाईल. मग काय उपयोग?" मी असे बोलतेय, तो पर्यंत मुलाच्या हातातला एक फुगा खरच फुटला होता. मी म्हणलं, "बघ मी सांगत होते ना". त्या वेळी माझ्या पतीने मला जे सांगितले ते मी आजतागायत विसरले नाही. तो म्हणाला,
"शंभर रूपये, चार डॉलर आणि ते खर्चून घेतलेली वस्तू उपयोगी आहे कि निरूपयोगी वगैरेचे महत्त्व आपल्याला. त्या लहान मुलाला काय त्याचे? त्या फुग्याची किंमत शंभर रूपये असेल, पण तो मिळाल्यावर त्याला जो आनंद झाला, त्याची किंमत लाख मोलाची आहे. वस्तूची किंमत फक्त पैशात मोजायची नसते."
तेव्हापासून जेव्हा कधी असा प्रसंग येतो, माझे पुणेरी, कोकणस्थी मन हिशोब करायला लागते, तेव्हा मला तो प्रसंग आठवतो.
बघता बघता आमचा तिथला मुक्काम संपत आला होता. परत जाण्याची तयारी सुरू झाली. त्या लहानशा कालावधीत, अनेक आठवणींचा संचय झालेला होता. माझ्या मुलाची काही छोटी, मित्रमंडळी झाली होती तिथे. इमारतीच्या जवळ असलेल्या क्रिडांगणावर, सकाळ, संध्याकाळ ते सगळे मनसोक्त दंगा करीत असत.एकमेकांची भाषा त्यांना कळत नव्हती, पण त्यामुळे त्यांना काहीच फरक पडत नसे.
माझे पती अजून काही काळ सिंगापूरमध्येच राहणार होते. आम्ही विमानतळाकडे निघालो. काही बोलावेसे वाटत नव्हते. टॅक्सीच्या काचेतून सिंगापूर दिसत होते. आता इथे परत कधी येईन असे वाटत नव्हते. तो काळच अनिश्चितीचा होता. पुण्यात आम्ही दोघेच (मी आणि माझा मुलगा) राहणार होतो. तो विचार पण त्रासदायक वाटत होता. विमानतळाच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. मागे वळून पाहिले आणि सिंगापूरचा निरोप घेतला. त्यावेळी मला माहिती नव्हते, की अजून काही वर्षांनंतर मी परत सिंगापूर मध्ये येणार होते, खूप मोठ्या कालावधीसाठी.
आणि सिंगापूर जणू माझे दुसरे घरच होणार होते.
(क्रमशः)