ऑक्टोबर ११ २००४

संकीर्ण विचार

१. 'पूर' हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामात लावताना दीर्घोपान्त्य लिहावा.

उदा : नागपूर, राजापूर, कानपूर

२. 'कोणचा ', 'एकादा' असे न लिहिता 'कोणता ', 'एखादा' असे लिहावे
३. 'हळूहळू ', 'मुळूमुळू ', 'खुटूखुटू' या शब्दातील दुसरा आणि चौथा स्वर दीर्घ लिहावा.
४. 'तसूतसू ', 'झुंजूमुंजू ', 'चिरीमिरी' यांसारख्या पुनरूक्त शब्दांतील ऊकार व ईकार मूळ घटक शब्दांमधे ते दीर्घ असल्याने दीर्घ लिहावे. परंतु पुनरूक्त शब्द नादानुकारी असल्यास ते उच्चाराप्रमाणे, र्‍हस्व लिहावे.

उदा : 'लुटुलुटु ', 'दुडुदुडु ', 'रुणुझुणु'

५. एकारान्त नामाचे सामान्यरूप याकारान्त करावे.

उदा : करणे - करण्यासाठी, फडके - फडक्यांना, पाहणे - पाहण्याला. अशा रूपांऐवजी करणेसाठी, फडकेंना, पाहणेला असे लिहू नये.

६. लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोली भाषा घालताना तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे असावे. अन्य प्रसंगी तसे लिहू नये.

उदा : कथेतील पात्रांच्या तोंडी 'असं केलं' 'असं झालं' असे लिहावे. बोली भाषेतील रूपे वापरताना त्यावर अनुस्वार द्यावा. परंतु एरव्हीच्या लेखनात तसे लिहू नये.

७. क्वचित्, कदाचित् अर्थात्, अकस्मात् विद्वान् इत्यादी रूढ झालेले तत्सम शब्द अकारान्त लिहावे.

उदा : क्वचित, किंचित, तद्वत, श्रीमान, भगवान, धनवान, संसद, सम्राट, अर्थात, कदाचित.

८. कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे. इंग्रजी शब्द, पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अकारान्त अक्षर आता व्यंजनान्त (पायमोडके) लिहू नये.

उदा : वॅटसन, बायरन, पीएच. डी., कीट्स

९. राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावी. रहाणे, पहाणे, वहाणे अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग करताना 'राहा, पाहा, वाहा' याचबरोबर 'रहा, पहा, वहा' ही रूपे वापरण्यास हरकत नाही.
१०. 'इत्यादी' व 'ही' हे शब्द दीर्घान्त लिहावे. 'अन्' हा शब्द व्यंजनान्त लिहावा. 'इत्यादी' हे अव्यय नसून विशेषण असल्यामुळे ते दीर्घान्त लिहावे.
११. पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना, र्‍हस्वदीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेव्हढ्यापुरते स्वातंत्र्य असते.
१२. संस्कृतात 'ह्' युक्त सर्व जोडाक्षरात 'ह्' हा नेहमी प्रथम येतो.

उदा : ब्रह्म, ब्राह्मण, ह्रस्व, चिह्न

१३. पण मराठीत 'ह्' चा उच्चार प्रारंभी न करता वर्णांची अदलाबदल करून पुढील व्यंजनाचा उव्च्चार अगोदर करतात व त्याचप्रमाणे लिहितात.

उदा : ब्रम्ह, ब्राम्हण, चिन्ह, र्‍हस्व, जिव्हा, प्रल्हाद
माझे मत : आजपर्यंत कायमच 'ब्राह्मण' असेच लिहिले आहे. आणि असेच लिहिलेले पाहिले आहे.

१४. मराठीतील काही शब्दांचा,{हस्वाच्या ऐवजी दीर्घ उच्चार केल्यास त्याचा अर्थ बदलतो.

उदा :

दिन = दिवस दीन = गरीब
सुत = मुलगा सूत = धागा
सलिल = पाणी सलील = लीलेने
सुर = देव सूर = आवाज
शिर = डोके शीर = रक्तवाहिनी
मिलन = भेट मीलन = मिटणे


 टीप : येथील मजकूर सुखदा ह्यांनी मायबोली येथे लिहिलेल्या अनेक लेखांच्या आधारे त्यांच्या सहमतीने तयार केलेला आहे.

Post to Feed
Typing help hide