| ह्यासोबत |
वातावरणीय अभिसरण -६
विसाव्या शतकातील गरूडझेप- पूर्वार्ध
विसाव्या शतकातील तंत्रज्ञानातील प्रगतीने वातावरणीय अभिसरणाच्या आकलनातील प्रगतीसही बरोबर घेतले. दळणवळणाच्या साधनांमधे झालेल्या प्रगतीने जगभरातील शास्त्रज्ञांना जवळ आणले आणि जगभरात हवामाननोंदी ठेवणाऱ्या वेधशाळांचे एक मोठे जाळे तयार झाले.
सर गिल्बर्ट वॉकर (१८६८ते १९५८) हे ब्रिटिश गणितज्ञ व हवामानशास्त्रज्ञ. १९२३ मध्ये त्यांनी विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील व पश्चिमेकडील प्रदेशातील वातावरणीय दाबामध्ये परस्परसंबंध असल्याचे सिद्ध केले. विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पूर्वप्रदेशातील वातावरणीय दाब अधिक असेल तर पश्चिमप्रदेशात तो सहसा कमी असतो आणि पूर्वप्रदेशात वातावरणीय दाब कमी असेल तर पश्चिमप्रदेशात तो अधिक असतो. अशाप्रकारे पूर्व-पश्चिमेकडील प्रदेशांमध्ये वातावरणीय दाबाचा 'सीसॉ' चालू असतो. ह्या 'सीसॉ'ला त्यांनी 'दक्षिण कंपन' (Southern Oscillation) असे नाव दिले. ह्या काळात वॉकर ह्यांची ब्रिटिश सरकारी अधिकारी म्हणून भारतात नियुक्ती झाली होती. १९०४ ते १९२४ च्या दरम्यान वॉकर हे भारतीय हवामान खात्याचे मुख्याधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत होते. भारतातील मौसमी पाऊस, पश्चिम कॅनडातील तापमान आणि ऑस्ट्रेलिया व आफ्रिकेतील दुष्काळ अशा विविध घटनांचा संबंध दक्षिण कंपनाशी असल्याचे त्यांनी ह्या संशोधनाअंती दाखवून दिले. अशाप्रकारे दक्षिण कंपनाचा जागतिक हवामानाशी असलेला संबंध लक्षात आला व पुढे अनेक संशोधकांनी ह्या विषयामध्ये संशोधन केले. भारतातील वास्तव्यामध्ये त्यांनी दूरगामी हवामान अंदाज वर्तविण्याच्या पद्धतींवर मूलभूत संशोधन केले. वॉकर ह्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भारत मौसम विज्ञान विभागाकडून (India Meteorological Department) गेल्या काही वर्षांपासून मौसमी हवामानशास्त्रामध्ये विशेष संशोधन करणाऱ्या देशस्थ/परदेशस्थ शास्त्रज्ञास दरवर्षी 'सर गिल्बर्ट वॉकर पुरस्कार' प्रदान केला जातो. ह्या पुरस्कारांतर्गत २२ कॅरट प्रतिच्या सोन्याचे ५० ग्रॅम वजनाचे पदक व प्रशस्तिपत्र यांचा समावेश असतो.
|
| आकृती ४. वॉकर अभिसरण (www.bom.gov.au येथून सुधारीत) |
|
| आकृती ५. ३५ अंश उत्तर अक्षवृत्तावर १० मीटर प्रति सेकंद वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने निर्माण केलेला एकमन प्रवाह व एकमन स्तर. Stewart, R.H., 'Introduction to Oceanography', Chapter 9, Texas A and M University येथून सुधारीत. |
|
| आकृती ६. ध्रुवीय व उपविषुववृत्तीय जेट प्रवाहांचे स्थान. http://www.physicalgeography.net येथून सुधारीत. |
|
| आकृती ७. आंतरविषुववृत्तीय ऊर्ध्वप्रवाह प्रदेशाचे जानेवारी व जुलै महिन्यातील स्थान. http://www.newmediastudio.org/ येथून सुधारीत. |
विसाव्या शतकामध्ये जागतिक वातावरणामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध अभिसरण चक्रांचा, वातावरणीय घटनांचा शोध लागला आणि ह्या घटना का आणि अशा घडतात हे जाणून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन झाले, होत आहे. ह्यातील काही ठळक घटना म्हणजे एल् निन्यो व ला निन्या (विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान व दाब आणि दक्षिण कंपन ह्याचा दृढसंबंध असल्याने एल निन्यो व दक्षिण कंपन मिळून तयार होणाऱ्या संयुक्त घटनेस एन्सो- ENSO: El Nino - Southern Oscillation- असे म्हटले जाते), द्विवार्षिक कंपने (Quasi Biennial Oscillations), ध्रुवीय कोन(Polar Vortex) , उत्तर अटलांटिक कंपने (North Atlantic Oscillations), आर्क्टिक कंपने (arctic Oscillations) वगैरे. ह्या हवामानीय घटना विविध प्रदेशांमध्ये घडत असतात, त्यांची भौगोलिक व्याप्ती व कालव्याप्ती भिन्न आहेत, मात्र वातावरणीय अभिसरणामुळे ह्या सर्व घटना आणि जागतिक हवामान ह्यांचा निकटचा संबंध आहे. ह्या घटनांची तपशीलवार माहिती पुढील काही लेखांमध्ये पाहू.
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
