सातवा अध्याय

[२१]


श्री भगवान् म्हणाले


प्रीतीने आसरा माझा घेउनी योग साधित ।
जाणशिल कसे ऐक समग्र मज निश्चित ॥ १ ॥


विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुज सांगतो ।
जे जाणूनि पुढे येथे जाणावेसे न राहते ॥ २ ॥


लक्षावधींत एखादा मोक्षार्थ झटतो कधी ।
झटणार्‍यांत एखादा तत्त्वता जाणतो मज ॥ ३॥


पृथ्वी आप तसे तेज वायु आकाश पाचवे ।
मन बुद्धि अहंकार अशी प्रकृति अष्ट-धा ॥ ४ ॥


ही झाली अपरा माझी दुसरी जाण ती परा ।
जीव-रूपे जिने सारे जग हे धरिले असे ॥ ५ ॥


ह्या दोहींपासुनी भूते सगळी जाण निर्मिली ।
सार्‍या जगास तद्-द्वारा मूळ मी आणि शेवट ॥ ६ ॥


दुसरे तत्त्व नाही चि काही माझ्या पलीकडे ।
ओविले सर्व माझ्यात जसे धग्यामधे मणि ॥ ७ ॥


पाण्यात रस मी झालो चंद्र-सूर्यी प्रकाश मी ।
ओं वेदी शब्द आकाशी पुरुषी पुरुषार्थ मी ॥ ८ ॥


मी पुण्य-गंध पृथ्वीत असे अग्नीत उष्णता ।
प्राणि-मात्रात आयुष्य तपो-वृद्धांत मी तप ॥ ९ ॥


सर्व भूतांत जे बीज ते मी जाण सनातन ।
बुद्धिमंतांत मी बुद्धि तेजस्व्यांत हि तेज मी ॥ १० ॥


वैराग्य-युक्त निष्काम बळवंतांत मी बळ ।
राहे धरूनि धर्मास ती मी भूतांत वासना ॥ ११ ॥


माझ्यातूनि तिन्ही झालेसात्त्विकादिक भाव ते ।
परी त्यांत न मी राहे ते चि माझ्यांत राहती ॥ १२ ॥


[२२]


ह्या गुणात्मक भावांनी विश्व मोहूनि टाकिले ।
ज्यामुळे मी न जाणू ये गुणातीत सनातन ॥ १३ ॥


माझी ही त्रिगुणी दैवी माया न तरवे कुणा ।
कासेस लागले माझ्या ते चि जाती तरूनिया ॥ १४ ॥


हीन मूढ दुराचारी माझा आश्रय सोडिती ।
मायेने भ्रांत होऊनि आसुरी भाव जोडिती ॥ १५ ॥


भक्त चौघे सदाचारी भजती मज अर्जुना ।
ज्ञानी तसे चि जिज्ञासु हितार्थी आणि विव्हल ॥ १६ ॥


ज्ञानी वरिष्ठ सर्वात नित्य-युक्त अनन्य जो ।
अत्यंत गोड मी त्यास तो हि गोड तसा मज ॥ १७ ॥


उदार हे जरी सारे ज्ञानी तो मी चि की स्वये ।
जोडला स्थिर माझ्यात गति अंतिम पाहुनी ॥ १८ ॥


अनेक जन्म घेऊनि पावला शरणागति ।
विश्व देखे वासुदेव संत तो बहु दुर्लभ ॥ १९ ॥


भ्रमले कामना-ग्रस्त धुंडिती अन्य दैवते ।
स्वभाव-वश होऊनि तो तो नियम पाळिती ॥ २० ॥


श्रद्धेने ज्या स्वरुपास जे भजू इच्छिती जसे ।
त्यांची ती चि तशी श्रद्धा स्थिर मी करितो स्वये ॥ २१ ॥


त्या श्रद्धेच्या बळाने ते त्या स्वरुपास पूजिती ।
मग मागितले भोग पावती मी चि निर्मिले ॥ २२ ॥


अल्प बुद्धीमुळे त्यांस मिळे फळ अशाश्वत ।
देवांचे भक्त देवांस माझे ते मज पावती ॥ २३ ॥


व्यक्त मी हे चि ते घेती बुद्धि-हीन न जाणुनी ।
अव्यक्त थोर जे रूप माझे अंतिम शाश्वत ॥ २४ ॥


वेढिलो योग-मायेने अंधार चि जगास मी ।
अजन्मा नित्य मी कैसा मूढ कोणी न ओळखे ॥ २५ ॥


झाली जी जी हि होतिल भूते आहेत आज जी ।
सगळी जाणतो ती मी मज कोणी न जाणती ॥ २६ ॥


[२३]


राग-द्वेषांमुळे चित्ती जडला द्वंद्व-मोह जो ।
संसारी सगळी भूते त्याने मोहूनि टाकिली ॥ २७ ॥


ज्यांनी झिजविले पाप पुण्य-कर्मे करूनिया ।
ते द्वंद्व-मोह तोडूनि भजती मज निश्चये ॥ २८ ॥


झटती आश्रये माझ्या जरा-मृत्यु गिळावया ।
ते ब्रम्ह जाणती पूर्ण तसे अध्यात्म कर्म हि ॥ २९ ॥


अधिभूताधिदैवांत अधियज्ञांत जे मज ।
देखती ते प्रयाणी हि जाणती मज सावध ॥ ३० ॥


अध्याय सातवा संपूर्ण