गगन भरारी- (४)

भजनला अशा ठिकाणी न्यावे लागणार होते जेथे तो सुरक्षित राहू शकला असता. कुमार किंवा अमर त्याला मदत करतील हा विश्वास मेजरला होता. पण त्यांच्या पेक्षा त्याला भोसले साहेबांचा आधार जास्त वाटत होता. शेवटी ह्याला आधी भोसले साहेबांकडे न्यावा ह्या विचाराने मेजरने त्याला जीप मध्ये बसवून जीप सुरू केली.
जीप शंभर मिटर पुढे जाते न जाते तोच समोरून कुमार त्याच्या कारने येताना मेजरने पाहिले. कुमारला कच्च्या तुरुंगाजवळ येत असताना पाहून मेजरला आश्चर्य वाटले.
"कुमार ? तू कसा इथे ?"
"मला वाटलेच होते की आपण ह्यालाच बघायला आला असाल, पण आता कुठे निघालात ? ह्याचे काम झाले का ?" कुमारने भजनसिंग बाबत विचारणा केली.
"नाही, ह्याला जरा फिरवून आणतो बरोबर... काही प्रश्न विचारायचे आहेत ते जरा एकांतात विचारलेले बरे !" मेजर सीक्रेट सर्व्हिसेसमध्ये पक्का मुरलेला अधिकारी होता. मेजरने भजन ला सरळ भोसले साहेबांच्या बंगल्यावर न नेता थोडे फिरवून नेले. त्याला बघायचे होते कोणी त्याचा पाठलाग तर करीत नाही. पण त्याची शंका खोटी ठरली.


भोसले साहेबांनी पूर्ण हकीकत ऐकून आपल्या बंगल्याच्या मागील क्वार्टर त्याला मोकळे असल्याचे सांगितले व मेजर भजनला घेऊन तेथे गेला.
"बोल भजन, तू काही सांगणार आहेस का ?" मेजर सरळ मुद्दावर आला.
"सर, ह्यांत माझी काही चूक नाही, मला कल्पना असती की तो अमर साहेबांना मारेल तर मी त्याला जाऊच दिले नसते". मेजरचे डोळ्यांत एक वेगळीच चमक भरली. इतर केसेस सारखी मारहाण करावी लागणार नाही हे पाहूनच तो खूश झाला. "हम्म्, मग ?" आपल्याला सर्व माहीत आहे हे दाखवणे त्याला भाग होते.
"सर, त्या दिवशी तो आला होता व मी त्यालाच भेटायला जात होतो....." "कोण ?"
"विजयसिंग, माझा भाऊ" "हां, बरोबर... बोल" मेजर अधीर झाला होता.


"तो म्हणाला, खूप पैसे मिळणार आहेत फक्त पुरी साहेबांना समजायला नको"
"हम्म... बोल"मेजर कानांत प्राण आणून ऐकत होता. "आम्ही गेटवर भेटलो व मग आम्ही टेकडीकडे चालत गेलो"
"त्याची एंट्री का नाही केलीस गेटवर?"
"आम्ही गेटवरच भेटलो, गप्पा मारीत उभे होतो- वॉचमनने विचारले, कोणाची एंट्री करू- पण आमचे नक्की होत नव्हते... मी बाहेर जाणार की, तो आत येणार. इतक्यात फोन आला म्हणून वॉचमन मध्ये गेला व बराच वेळ झाला म्हणून विजय तसाच आंत आला !"
"मग टेकडीवर काय झाले ?" "त्याने मला प्लॅन सांगितला, कोणीतरी बडा साहेब एका फाइल साठी खूप पैसे देणार होता" मेजरचे रक्त खवळायला सुरुवात होत होती. ह्या लोकांनी संरक्षण खात्यालाही सोडले नव्हते.
"मग पुढे ?" "सर, त्या बड्या साहेबानेच गार्डनकडचे रेकॉर्ड रूमचे दार उघडे ठेवलेले होते".


इतक्यात मेजरचा फोन वाजला. मेजरने कोण आहे ते न बघताच बंद केला. "तू बोल !" मेजर उतावीळ झाला होता.
"मी फक्त पुरी साहेबांवर लक्ष ठेवायचे ठरले होते. पुरीसाहेब त्या दिवशीही रोजच्या सारखेच ऑफिसातून सरळ मैत्रिणीच्या घरी गेले होते."
मेजरला कळले, भोसले साहेब 'नंतर सांगतो' का बोलले ते !
"पुरी साहेब परत आले की, कुठल्याही परिस्थितीत त्यांना ऑफीसमध्ये येऊ द्यायचे नाही कारण त्यांना राउंड घ्यायची सवय होती रात्रीची."
मेजरचा फोन परत वाजला- कंटाळून मेजरने फोन घेतला.
"सर, जेवायला येणार ना?" कुमार पालीकडून विचारत होता.
"नो डियर, यू कॅरी ऑन, आय हॅव टू इंटरॉगेट हिम टुडे इटसेल्फ." मेजरला भजनसमोर प्रत्येक गोष्टींची काळजी घेत बोलणे भाग होते.
"तू बोल !" मेजरने थोडक्यातच कुमारला कटवले होते.
"सर, एव्हढ्यात गडबड उडाली, ऑफिसची मेन आलार्म सिस्टम कोणीतरी सुरू केली होती.".... मेजर अधीरतेने भजनच्या तोंडाकडे बघत होता. "मी घाबरलो.... पुरी साहेब अजून आलेले नव्हते, म्हणून दार बंद करून मी ऑफिसच्या दिशेने पळत सुटलो" "पुढचे सर्व आपणांस माहीत आहे"


मेजर विचारांत पडला "तुला माहीत नव्हते त्या रूम मध्ये अमरला ठेवल्याचे ?"
"नाही सर, कोणीतरी साहेबांवर गोळी झाडली व अमर साहेबांना किडनॅप केले, इतकंच दुसऱ्या दिवशी कुमार साहेबांनी सांगितले" मेजरला लिंक लागायला लागली "कुमार साहेब कुठे भेटले तुला ?"
"तेच धावत आले होते सकाळी आमच्या कडे" मेजरला आठवले, कुमारचा ऑर्डर्ली अमरकडून परत आल्यावर कुमार इकडे आला होता.
"बडा साहेब कोण आहे ?"
"साहेब, विजयने ते नाही मला सांगितले, तो म्हणाला ते कळण्याची तुला आवश्यकता: नाही."
मेजरने मनोमन गुन्हेगाराच्या पद्धतीचे कौतुक केले- ज्याला जितके कळायला हवे तितकीच माहिती द्यायची ही पद्धत संरक्षण दलाचीच होती.
"विजयसिंगला माहीत होते ?"
"हो साहेब, तो बोलला... सगळं ठीक झाल्यावर मी नोकरी सोडायची मग तो मला सांगणार होता, बडा साहेब कोण ते !"
मेजर जाणून होता,त्याचे काम झाल्यावर दोघेही मारलेच गेले असते.


"फाइल कोणती होती माहीत आहे ?" मेजरने खडा टाकला.
"तो इतकेच बोलला नवीन यंत्र बनवले आहे त्याची माहिती त्यात आहे."
"एव्हिएम साहेबांवर गोळी कोणी झाडली ?"
"माहीत नाही सर; विजयला तर पिस्तूल धरताही येत नाही."
ह्याला विचार करायला वेळ द्यावा लागणार होता. मेजरच्या तपासाची तीच पद्धत होती. ह्याला थोडा मस्काही लावावा लागणार होता.
"तुला कुठे ठेवू ? आंत की बाहेर?"
"साहेब कैदेतच मला सुरक्षित वाटेल...." तो जरा चाचरतच बोलला.



मेजरने एक दोरी शोधली व त्याचे हात चांगले बांधून ठेवले. भजन जरा गोंधळला होता. आपले हात का बांधले जात आहेत ते त्याला कळत नव्हते.
"ऊठ !...." भजन मेजरच्या मागोमाग चालायला लागला. दोघे परत भोसले साहेबांच्या बंगल्यात आले.
"सर झोपले ?" मेजरने साहेबांच्या शिपायाला विचारले."नाही साहेब, वर आहेत... त्यांनी सांगितले...."
इतक्यात भोसले साहेब डोअर बेलचा आवाज ऐकून खालीच येत होते.
"मेजर, काही बोलला हा ?"
" हो सर, मी तुम्हाला सविस्तर सांगतो पण ह्याला आधी परत सोडून येतो."
"मेजर, ह्याला जास्त सुरक्षेची आवश्यकता आहे ?"
मेजरला भोसले साहेबांच्या दूरदर्शीपणाचे कौतुक वाटले.
"सर, मी तिकडे सांगतो इन्चार्जला !"
"नाही मेजर... थांब मीच फोन करतो."


भोसले साहेबांनी अधिक सुरक्षेची व्यवस्था दहा मिनिटांत करायची सूचना करून मेजरला बसायला सांगितले
"दिपक, आपण जेवून घेऊया" "नको सर, आपण सुरुवात करा, मी नंतर जेवतो." -
"अरे, तयार आहे! मला माहीत होते तू मेसला जाणार जेवायला ते; मी तेथेही फोन करून तू माझ्याकडेच जेवायला थांबणार असल्याचे कळवले आहे." मेजरला आता त्यांच्यापुढे काहीच बोलता येईना !
"सर, असं करूया... मी ह्याला सोडून परत येतो, व मग शांतपणे जेवताना गप्पा मारू" मेजर उठत बोलला... "थांब पाणी पिऊन जा !" मेजरला स्वतःच्या नकळत हसू आले व घराची तीव्रतेने आठवण झाली !


भजनसिंगला परत कैदेत सोडून तेथल्या कागदपत्रांवर आवश्यक नोंदी करून तो परत आला तेंव्हा भोसले साहेब व्हिस्कीची बाटली व ग्लासेस डायनिंग टेबलवर ठेवून त्याचीच वाट पाहतं बसले होते. आता गत्यंतर नाही हे कळून चुकल्याने मेजरने रिलॅक्स व्हायचे ठरवले !


भोसले साहेबांनी एखाद्या मित्रासारखी वागणूक मेजरला दिली. हळूहळू मेजरने सर्व परिस्थिती भोसले साहेबांना कथीत केली.
"गूड जॉब मेजर ! यू हॅव टॅलेंट अँड लक टुगेदर !" साहेबांचे उद्गार ऐकून मेजर सुखावला.


मेजरचे कपडे व बॅग कुमारकडे होती. मेजर रात्री भोसलेंच्या घरी जेवल्यावर कुमारकडे गेला. ऑर्डर्लीने कुमार बाहेर गेल्याचे सांगितले - त्याचा नोकरही बॅरेकवर जायला निघाला. मेजरचा बिछाना पाहुण्यांच्या खोलीत तयार होताच. सरळ जाऊन तो बिछान्यावर आडवा झाला.


अत्यंत गाढ झोपेत असताना आपण अचानक उठलो कसे ह्याचे मेजरला नवल वाटले परंतू त्याच्या सहाव्या इंद्रियाने त्याला जागे केले असावे. 'क्लिक' करून आलेल्या पाठोपाठच्या आवाजाने त्याला बाहेर कोणीतरी आल्याचे कळले. कुमार बाहेर गेलेला होता कदाचित तोच परत आला असावा असा विचार करीत तो कोणाची चाहूल लागते का त्याचा अंदाज घेत बिछान्यावर पडून होता. बराच वेळ झाला व काही आवाज येईना - थोड्याच वेळांत त्याला परत झोप लागली.


"मॉर्निंग सर !" कुमार त्याला खोलीत येऊन उठवत होता. "गूड मॉर्निंग कुमार, किती वाजले"
"फक्त आठ !" "बापरे, मी चांगलाच झोपलो होतो की ! रात्री तू आलास तेंव्हा जाग आली नंतर तासभर जागा होतो त्यामुळे असेल!" घाईघाईत उठून त्याने जीवाची कामे करायला घेतली.
"भजनचा काही उपयोग झाला सर?" कुमारने सहज विचारले.
"नाही रे, त्या गाढवाला काहीच माहीत नाही." जोवर बडा साहेब कोण ते कळत नाही तोवर प्रत्येकाबद्दल खबरदारी घेण्याची काळजी मेजर बाळगत होता.
"मी पुढे निघतो, आज जीएल पुरींचे ब्रिफिंग आहे '७१ च्या स्ट्रॅटेजी वर" कुमार घाईत होता.
कुमार गेल्यावर नाश्ता करताना आजच्या दिवसाची सुरुवात कुठून करायची त्याचा विचार मेजर करू लागला.
अचानक भजनचा भाऊ विजयसिंगची त्याला आठवण आली. रात्री भजनला सोडल्या नंतर तो विजयला साफ विसरला होता. पटकन नाश्ता संपवून तो भजनसिंगला विजयचा पत्ता विचारण्यासाठी निघाला. भजनसिंगकडून विजयचा शहरांतला पत्ता काढून व कसे जायचे ह्याच्या खाणाखुणा नीट समजावून घेऊन त्याने चालकाबरोबर एका माहितगार कर्मचारी घेतला.


विजयसिंगचे प्रेत शहरातल्या सरकारी इस्पितळातून विच्छेदनानंतर घरी आणण्यात आलेले होते. तेथे फार काळ न थांबता तो ज्या ठिकाणी विजयचा खून करण्यात आला त्या जागेची तपासणी करून व शवविच्छेदन अहवालाची प्रत बरोबर घेऊन परत निघाला. विजयच्या कुटुंबीयांकडून काय घडले ह्याची माहिती इतक्यातच घेण्याची शक्यता व मेजरची इच्छाही नव्हती.



परत कार्यालयात पोहचल्यावर शांतपणे गोळा केलेली पूर्ण माहिती परत नजरेखालून घातली. स्वतःच्या डायरीत त्याने त्यांच्या तपशीलवार नोंदी करून ठेवल्या. विजयच्या मृत्यूने तपासाचे बरेचसे दरवाजे बंद केले होते. विजयसिंग पर्यंत मारेकरी पोहचला ह्याचा अर्थ तो एक पाऊल आपल्या पुढे चालत आहे हे स्पष्ट होते. अश्या पद्धतीचे गुन्हे करताना गुन्हेगार कुटुंबीयांना अंधारात ठेवणे पसंत करतात म्हणून विजयसिंगच्या कुटुंबीयांना फारशी माहिती नसावी हा मेजरचा होरा होता. पुढे काय करायचे हा प्रश्न भेडसावत होता. आपण येथे असल्यानेच तपासात अडथळे आणण्याचे कार्य होत असल्याची जाणीव मेजरला झाली. त्यावर उपाय एकच होता. येथून निघून गेल्याचे दाखवणे किंवा मारेकरी पुढची हालचाल काय करतो त्याची वाट बघत बसणे. दुसरा पर्याय स्वीकारायला त्याचे मन तयार होईना- म्हणून आपण येथून गेलो आहोत हे दाखवणे त्याला भाग होते.


भजनसिंगचे काय करायचे तो प्रश्न होता. त्याला फार काळ तात्पुरत्या कैदेत अडकवता आला नसता. त्याच्यावर चार्जशीट भरावी लागली असती वा त्याला मोकळा सोडावा लागणार होता. त्याला मोकळा सोडला असता तर त्याच्या जीवाला धोका होताच ! भजनने मेजरला दिलेली माहिती फार जुजबी होती हे मारेकऱ्याला माहीत होणार नव्हते.


फक्त दोन गोष्टींसाठी त्याने तेथे थांबण्याचा निर्णय घेतला- एकतर राडार जॅमर कच्छहून आज येणार आले होते त्याची तपासणी करणे आवश्यक होते. तसेच भोसले साहेबांवर व विजयसिंगवर झाडण्यात आलेल्या गोळीचा 'बॅलेस्टिक' विशेषज्ञांचा अहवाल व बागेत सांडलेल्या रक्ताचा 'फॉरेन्सीक' अहवाल आला की आपण येथून गेल्याचे नाटक वठवण्यास तो तयार झाला असता. भजनसिंगला मोकळा करून त्याला भावाच्या मृत्यू निमित्त सुटीवर पाठवला की तो जरा सुरक्षित झाला असता. त्याने बरेचसे सहकार्य केले होते व त्याचा गुन्ह्यात भाग होताच हे ठामपणे सिद्ध करता येणार नव्हते म्हणून त्याच्यावर कारवाई करण्यात अर्थ नव्हता. पडद्यामागचा खरा सूत्रधार मेजरच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.



ज्या वस्तूसाठी इतक्या घडामोडी झाल्या ती वस्तू आल्याची सूचना भोसलेसाहेबांच्या शिपायाने येऊन त्याला दिली व तो 'राडार जॅमर' ची तपासणी करायला भोसले साहेबांच्या कॅबीनमध्ये पोहचला. बाहेरच त्याची पुरी साहेबांशी गाठ पडली व दोघे एकदमच आत शिरले. भोसले साहेबांच्या चर्येवरूनच त्याने 'ती' वस्तू 'राडार जॅमर' असल्याचे ओळखले.
एखादा जिवंत बॉम्ब हाताळावा इतक्या काळजी पूर्वक त्याने ती वस्तू उचलली. विद्युतघटातली शक्ती संपल्यामुळे जॅमर बंद पडले होते. पूर्ण तपासणी केल्यावर मेजरने भोसले साहेबांना विचारले, "ह्यावर काही सेरियल नंबर नसतात ?"
"नाही. का?"
"हे कुठल्या साठ्यातले आहे किंवा कोणाच्या ताब्यात होते हे आपल्याला कळणार कसे ?"
"तो प्रश्न आहेच, परंतू आपण डिआरडीओ कडे विचारणा केल्यास ?" पुरी साहेबांनी विचारले.
"मी आत्ताच फोन करू का? पण डिआरडिओ पेक्षा आपल्याला सेंट्रल स्टोअर्स वाले जास्त मदत करतील !" भोसले साहेब बोलले.
"नाही सर, जी आपल्याला माहिती आहे त्यापेक्षा जास्त सेंट्रल स्टोअर वाल्यांकडेही नसावी !" मेजरला त्यांच्या कार्याची पद्धत माहीत होती.
"ठीक आहे, मी अर्ध्या तासात चौकशी करून कळवतो " भोसले साहेब कोणाला तरी फोन करून विचारणा करणार होते.


बाहेर पडताना पुरी साहेब बरोबर होते... "मेजर, वूड यू माइंड टू हॅव अ कप ऑफ टी वुइथ मी ?" मेजरला त्यांच्या कॅबीन मधला प्रसंग आठवला. "आय डोन्ट माइंड सर!" दोघे चहा घेताना भजनसिंगचे वृत्तांत हातचे राखून मेजरने पुरी साहेबांना सांगितले.
"माझे काही पर्सनल प्रश्न आहेत मेजर, ते कर्णोपकर्णी होतील अशी भीती मला वाटत होती. म्हणून मी तुला तसे सांगितले होते."
" आय कॅन अंडरस्टँड सर; पण मी ऑफिशियल ड्यूटीवर आहे; मला कुणाच्याच वैयक्तिक बाबींमध्ये रस नाही." मेजरने मोघम उत्तर दिले.


चहा घेत असतानाच भोसले साहेब बोलवतात असा निरोप आला.
"मेजर, राडार जॅमर उघडले की आंत डबीच्या झाकणावर क्रमांक कोरलेला आहे तो दिसेल असे डिआरडीओ ने कळवले आहे. तासाभरात आपल्या बेसवरच्या सर्व गगन विमानांत कुठले जॅमर बसवले आहेत त्याची यादी ते पाठवत आहेत - सोबत जे खराब झालेले जॅमर रिप्लेस केले होते त्यांची यादी ही येत आहे." भोसले साहेबांनी ब्रीफिंग केले.
"ग्रेट, ही डबी उघडण्याची व्यवस्था करूया !"



जॅमर उघडल्यावर त्याच्या झाकणावर कोपऱ्यात कोरलेला नंबर स्पष्ट दिसत होता


क्रमशः