जानेवारी २७ २००६

सहज सरल सापेक्षता - ३

ह्यासोबत

चला! आता पर्यंतच्या लेखात 'आपण नक्की किती वेगाने जात आहोत' हे कसं पाहायचं (किंबहुना कसं पाहायचं नाही!) हे पाहिलं. आता तुम्हाला आपण प्रवास करतो, जातो, हालत आहोत म्हणजे काय याचा थोडासा खुलासा मला करायचा आहे. मी जेंव्हा 'प्रवास करणं' म्हणतो याचा अर्थ वेगात बदल न करता. वेग न वाढवता, न कमी करता. आणि हो! दिशेतही बदल न करता. तुम्ही प्रवास करता म्हणजे तुम्ही त्याच दिशेत, त्याच वेगाने जात राहता. याचा अर्थ तुम्ही कुठल्याही 'ओढी' (पुल) खाली हा प्रवास करत नाही. तुम्ही म्हणाल, "याचा इतका बाऊ करण्याची गरज काय?" मी हेच तर सांगणार आहे आज.

जरा ऍरिस्टॉटलनं काय सांगितलं ते आठवून पाहा. तोच म्हणाला होता की "जर तुम्ही स्थिर असाल तर स्थिर राहता, व जरी हालला तरी पुन्हा त्याच स्थिर स्थितीत परत येता." तो चुकत होता, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. कारण 'हवेचा प्रतिरोध तुम्हाला स्थिर करण्यास कारणीभूत आहे' हे त्यानं हे सांगताना लक्षात घेतलं नव्हतं. असंच ना? 

पण याची उकल व्हायला आपल्याला न्यूटननं यात लक्ष घालेपर्यंत वाट पाहावी लागली. तो म्हणाला, "नाही ऍरिस्टॉटल, चुकलासच तू! जर तुम्ही प्रवास करत असाल, तर करतच राहता. उलट तुम्हाला पुन्हा स्थिर करायलाच बाहेरून ताकद लावायची गरज पडते." अर्थात रोजच्या आयुष्यात, हे काम हवेचा प्रतिरोध करेल, आणि तुम्ही स्थिर व्हाल.

हो! आणखी एक. अशीच एक ओढ आपल्याला 'खाली म्हणजे काय?' 'वर म्हणजे काय?' याची जाणीव करून देते. तीच आपल्याला धरून ठेवून आहे. न्यूटनला हे लक्षात आलं की ही तीच ओढ आहे जी चंद्राला पृथ्वी भोवती फेर्‍या मारायला लावते. अशा ओढीमुळं आपली दिशा बदलते. (म्हणूनच मी वर तुम्हाला दिशा ही बदलायची नाही असं म्हणालो ना!) चंद्रालाही या ओढीमुळेच आपली दिशा सतत बदलावी लागते. ही जर ओढ नसती, तर तो तसाच निसटून दूर निघून गेला असता नि आपण इथूनच हात हालवून त्याला निरोप दिला असता. सूर्याबाबतही आपली तीच गत झाली असती. दररोज, नव्हे प्रत्येक क्षणी पृथ्वी अशी दिशा बदलते म्हणून ठीक. नाहीतर आपण केंव्हाचे गारठून गेलो असतो. 'हे असं का होतं?' याचा उलगडा न्यूटनला करायचा होता.

जर एखाद्या वस्तूचे वस्तुमान जास्त असेल, तर त्या वस्तूची ओढ असेल ना? म्हणूनच आपण सूर्याभोवती फिरतो, सूर्य आपल्या भोवती नाही. खरं ना? पण हे सगळीकडेच लागू व्हायला हवे ना? तुम्ही एक शिशाचा व एक लाकडी गोळा घेऊन पाहा. दोन्ही एकाच वेळी एकाच उंचीवरून सोडून पाहा. शिशाची ओढ जास्त असायला हवी ना? पण ते दोन्ही सारखाच वेळ घेतील. न्यूटन म्हणाला, "असं बघा, एकाच वस्तूवर एकापेक्षा अधिक प्रकारच्या ओढी कार्यरत असतात. जितके त्या वस्तूचे वजन जास्त, तितकीच त्या वस्तूची 'आहे तिथं राहण्याची' ओढ. या मुळेच तर स्थिर असणारी वस्तू स्थिर राहण्याचा प्रयत्न करते. या सार्‍याचा परिणाम म्हणूनच दोन्ही गोळे सारख्याच वेगानं खाली येतात."

मी याला 'एक नवी ओढ' म्हणणं पसंत करेन. पण यात नवे काय आहे? तुम्ही तर सारखेच याचा अनुभव घेत आला आहात. जेंव्हा तुम्ही गाडीचा वेग वाढवता तेंव्हा तुम्ही मागे खेचले जाता. थोडा वेळ जाऊ द्या, की ही ओढ गायब!. डावी कडे वळा, नि हीच ओढ तुम्हाला उजव्या बाजूला ओढेल. थांबा, नि तुम्ही पुढे खेचले जाल.

नाहीतर एखाद्या जत्रेत एका मोठ्या चक्रात बसून बघा. जसजसं तुम्ही फिरता तसतसं तुम्ही बाहेर जाल की काय अशी भिती वाटू लागेल. इथे तुम्हीही फिरत आहात. अगदी चंद्रासारखेच. जर तुम्ही तो पट्टा बांधला नसता, तर तुम्हीही बाहेर फेकले गेला असता, सरळ रेषेत!.  (अर्थात एका पक्षाच्या दृष्टिकोनातून! खरंतर, तुम्ही एका वक्राकारात खालीही याल, पण सध्या ते बाजूला ठेवू.)

आता असं बघा, या ओढीकडे पाहता आईन्स्टाईनची जुनी कल्पना गडबडल्यासारखी वाटते. पहिला भाग आठवा पाहू जिथं तुम्ही एका पोकळीत एकटेच होता.

'तुम्ही स्थिर आहात की नाही' हे तुम्हाला समजत नव्हते पण 'तुम्हाला ओढ आहे की नाही' हे नक्कीच सांगता येत होते. हो ना? कारण तसं असतं तर ते तुम्हाला जाणवलंच असतं नाही का? नक्कीच. तर तुम्हाला एक नि एकच अशी निरपेक्ष स्थिरता नाही, वेळेकडे पाहण्याचाही एक नि एकच निरपेक्ष दृष्टिकोन नाही (किंवा वस्तुमान वा आकार यांच्या कडे पाहण्यासाठीही निरपेक्ष परिमाण नाही), पण तुम्हाला ओढ आहे की नाही हे नक्की कळण्याचा मार्ग आहे असेच ना?. पण आईन्स्टाईन म्हणाला, "मला नाही पटत." आम्ही सारेच म्हणालो, "का नाही रे? बस्स झालं हं आता."

पण आईन्स्टाईन इतक्यावरच ऐकणारा नव्हता आणि हे दिसतं तितकं सोपंही. 

(क्रमशः)

Post to Feedछान!
छान
पुढे काय झाले?
हेच
छान.
स्तुत्य उपक्रम
पुढे

Typing help hide