भातुकलीचा डाव (भाग -१)

प्रस्तावना



पुरुष बायकांना फसवतात, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात अशा अर्थाचं वाक्य अनेकांच्या तोंडून अनेकदा ऐकू येत. आयुष्यात कुठल्याही प्रश्नांना असे ठोक नियम असतात असं मला वाटत नाही. माझीच सल आणि मैथिलीची सुनिता वाचताना नेहमीपेक्षा वेगळ्या घटना आठवल्या. परदेशात राहणं हे जरी चकचकीत दिसलं तरी कधीतरी जाचक ठरू शकतं. राजीखुशीने झालेल्या लग्नातही फसवणूक होऊ शकते. पुरुष ही लग्नाच्या बाजारात हातोहात फसू शकतो आणि त्याचाही मानसिक छळ होऊ शकतो. जगात काही माणसं वाईटच असतात आणि वाईटच वागतात अस म्हणता येणार नाही पण प्राप्त परिस्थितीत ती योग्य तेच वागतील असही ठामपणे म्हणता येत नाही.


आपल्या समाजाची जडण घडण आजही अशी आहे की फसवल्या गेलेल्या स्त्रीला समाजात जगणं मुश्कील झालं तरीही ती आपलं गाऱ्हाणं जगासमोर मांडू शकते. आप्तांच्या कुशीत शिरून ढसढसा रडू शकते. प्रसंगी इतरांची सहानुभूतीही मिळवते. पुरुषाच मात्र तसं नाही. फसवला गेलेला पुरुष एकलकोंडा होऊन जातो. कुणाकडे तरी आपलं मन मोकळं करायला सर्वच पुरुषांना अजूनही शक्य होत का याबाबत मी थोडी साशंक आहे.

भातुकलीचा डाव ही कथा अशाच परिचयात आलेल्या कुटुंबावर आणि इतरांकडून ऐकलेल्या काही घटनांवर बेतलेली आहे. वर वर पाहता अशक्य वाटणारी ही कथा आजकाल बरेच वेळा समाजात ऐकू येते हे एक न टाळता येणारे वास्तव आहे.


--------



काल किती तरी दिवसांनंतर प्रशांतचा ऑस्टीनहून फोन आला. प्रशांत साने; माझा शाळेपासूनचा जीवलग मित्र. घराजवळच राहायचा. त्याच्या कुटुंबाशीही आमचा चांगला घरोबा होता. साधा, सरळ, हुशार आणि समंजस मुलगा. MSc केल्यावर भारतातल्या एका अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनीतून तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत आला.

"अरे कित्ती दिवसांनी फोन केलास? होतास कुठे इतके दिवस? प्राची भारतात गेलीय म्हणून लाईफ एन्जॉय करत होतास की काय? कधी परत येत्ये ती?" मी त्याची फिरकी घेतली.

"अरे बोल ना! काय झालं? लाइन क्लिअर नाहीये का? प्राची आली का रे की यायची आहे इतक्यात?" मी विचारलं.

"लाइन क्लिअर आहे गं. माझं लाईफच क्लिअर नाहीये बघ," प्रशांतच्या विनोदात एक प्रकारचा विषाद होता.

"म्हणजे रे काय? जरा सविस्तर सांगशील का? झालंय तरी काय?" एक अनामिक हुरहुर मनाला अस्वस्थ करून गेली. पुढच्या एका क्षणभरात प्रशांतच आयुष्य डोळ्यासमोर उभं ठाकलं.

आपला मुलगा परदेशात एकटा राहतो, तो काय खात पीत असेल, एकटा कंटाळत असेल, घरच्या आठवणीने व्याकुळ होत असेल म्हणून प्रशांत इथे आल्यापासूनच काकूंना त्याच्या लग्नाचे वेध लागले होते. भारतात बसून त्यांचे मुलगी बघण्याचे कार्यक्रम सुरू झाले होते. प्रशांतला इतक्या लवकर लग्न करायचे नव्हते. नव्या देशात नवी सुरुवात करून आपण अजून स्थिर स्थावर झालो नाही आहोत याची त्याने काका काकूंना स्पष्ट कल्पना दिली होती. पण लग्न तर एक दिवस करायचं आहेच ना मग उशीर कशाला अस म्हणून त्याच म्हणणं काका काकूंनी फारसं मनावर घेतलं नव्हत.

थोड्याच दिवसांत त्यांना प्राचीचं स्थळ सांगून आले. त्याच परिसरात राहणाऱ्या या स्थळाला साने कुटुंब बऱ्यापैकी ओळखत होत. काही समारंभात प्रशांत आणि प्राचीची गाठभेटही झाली होती. प्राची BSc झाली होती, नोकरीही करत होती. तिच्या वडिलांचा स्वत:चा व्यवसाय होता. सुखवस्तू घरातल्या या एकुलत्या एक कन्येला  कसही करून अमेरिकेतला नवरा हवा होता. इतर बरेच नातेवाईकही परदेशात स्थायिक असल्याने तिच्या आई वडिलांचीही तशीच इच्छा होती. प्रशांतच्या स्थळावर त्यांची नजर होतीच.  यंदा कर्तव्य आहे अशी कुणकुण लागल्यावर प्राचीचे वडील स्वतः प्रशांतच्या घरी गेले. रीतसर फोटो पत्रिका देऊन आले. पत्रिका जुळल्यावर काकूंनी प्रशांतला फोटो पाठवला. प्राचीत न आवडण्यासारखं काहीच नव्हतं. घर, घराणं, रूप, शिक्षण सर्वांत ती उजवीच होती, माहितीतली होती, तिला पूर्वी प्रत्यक्षात पाहूनही झालं होत. प्रशांतने उगीच जास्त विचार न करता आईला आपला होकार कळवला.

सहा महिन्यांनी लग्नाचा मुहूर्त निघाला. तो पर्यंत प्रशांत आणि प्राचीचं चॅट, फोनाफोनी, ईमेल प्रकरण जोरात सुरू होतं. चांगली एक महिन्याची रजा काढून प्रशांत लग्नासाठी मुंबईत गेला. लग्नानंतर बंगलोर, म्हैसूर, कोडई कनालला हनीमूनसाठीही गेला. त्यानंतर दोघे मिळूनच अमेरिकेला परत आले. वर्षभरानंतर घरची फार आठवण होते म्हणून एक दीड महिन्यांसाठी प्राची भारतात गेली होती.

"सांगतो गं! कुणाला तरी अगदी मनातलं सांगावसं वाटलं म्हणून तर फोन केला तुला. प्राची पुन्हा कधीच परत येणार नाहीये, मला सोडून ती कायमची निघून गेली आहे."


(क्रमशः)