ऑक्टोबर ११ २००६

भयोत्सव (भाग - १)

ह्यासोबत

ऑक्टोबरच्या महिन्यापासूनच अमेरिकेत एकेका सणाला सुरुवात होते. ऑक्टोबरमध्ये हॅलोवीन, नोव्हेंबरमध्ये थॅंक्स गिव्हिंग आणि डिसेंबरमध्ये ख्रिसमस. भयकथांच्या विलक्षण आवडीमुळे हॅलोवीनबद्दल फार पूर्वी पासूनच वाचले, ऐकले होते. त्यावेळी हा सण फारच अघोरी असावा व यामुळे समाजात भीती वाढत असावी की काय असे वाटत असे, परंतु अमेरिकेला आल्यावर या विचारांतला फोलपणा मला कळून आला. घाबरण्याचा आणि घाबरवण्याचा हा सण अतिशय लोकप्रिय असल्याचे लक्षात आले. लहान थोरांना आवडणाऱ्या आणि या महिन्यात येणाऱ्या हॅलोवीनच्या सणाचे औचित्य साधून हा लेख लिहायचे मनात आले.

हॅलोवीनचा इतिहास: हॅलोवीनची पाळेमुळे प्राचीन ब्रिटन व आयर्लंड मधील केल्टिक संस्कृतीत सापडतात. नोव्हेंबरची पहिली तारीख हा त्या काळी उन्हाळ्याचा शेवटचा दिवस मानला जाई. त्यानुसार या दिवसापर्यंत पशुपालन व शेतीची बरीचशी कामे उरकली जात. नेमकी हीच वेळ गेल्या वर्षभरात जे कोणी मरण पावले त्यांचे मृतात्मे घरी परतण्याची समजली जाई.

आख्यायिकेनुसार मृतात्म्यांना या दिवशी नवी शरीरे शोधायची संधी मिळत असे, त्यामुळे ते सर्व शरीरांच्या शोधात गावांत येत. हा दिवस वर्षातला असा दिवस मानला जाई (जातो) ज्यादिवशी आत्मे आपले जग सोडून मर्त्य मानवाच्या जगात सहज प्रवेश करू शकत (शकतात).

या दिवशी मृतात्म्यांनी आपल्या शरीराचा ताबा घेऊ नये म्हणून त्यांना भिवविण्यासाठी गावकरी गावाजवळील टेकड्यांवर किंवा घराबाहेर मोठा जाळ करत. याचबरोबर ते भयानक मुखवटे व भीतिदायक वेष धारण करत; यामुळे नव्या शरीरांच्या शोधात येणाऱ्या मृतात्म्यांना खरी माणसे कोण व मृतात्मे कोण हे समजणे कठीण होईल अशी गावकऱ्यांची धारणा असे. इसवी सनानंतर सुमारे सातव्या शतकात १ नोव्हेंबर हा संतांचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. या दिवशी चर्चकडून संतपद मिळालेल्या किंवा न मिळालेल्या सर्व संतांचे स्मरण केले जाते, यालाच ऑल हॉलोज डे किंवा होली डे (holy day = 'पवित्र दिवस') मानले जाऊ लागले व या दिवसाची पूर्वसंध्या हॅलोवीन म्हणून साजरी केली जाऊ लागली.

हॅलोवीनचा सण प्रामुख्याने अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, पोर्टो रिको (प्वेर्तो रिको), आयर्लंड व ब्रिटन मध्ये साजरा केला जातो. अमेरिकेत १९व्या शतकात या सणाने मूळ धरल्याचे उल्लेख वाचायला मिळतात.

हॅलोवीनच्या सणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जॅक-ओ'-लॅन्टर्न नावाचा भला मोठा भोपळा कोरून केलेला कंदील. ३१ तारखेपर्यंत या भोपळ्यांवर भयप्रद मुखवटे कोरले जातात. रात्री या भोपळ्यांत मेणबत्ती पेटवली जाते. दिवाळीत आपल्याकडे जसा कंदील बाल्कनीत किंवा मुख्य दरवाज्यापाशी लावला जातो तसाच हा जॅक-ओ'-लॅन्टर्न प्रज्वलित करून बाल्कनीत किंवा मुख्य दरवाज्यापाशी ठेवला जातो. या जॅक-ओ'-लॅन्टर्नची आख्यायिकाही प्रसिद्ध आहे.

कथा जॅक-ओ'-लॅन्टर्नची: या कथेची विविध रूपे आहेत, तरी बऱ्याच कथांतील एक कथा उचलून येथे थोडक्यात देत आहे.

जॅक नावाच्या एका अत्यंत हुशार परंतु तितक्याच आळशी आयरिश इसमाने आयुष्यभर काहीही केले नाही. त्याने कधी कुठले चांगले काम केले नाही की कधी कुठले वाईट काम केले नाही. त्याच्या मृत्यूची वेळ जशी जवळ आली तसे त्याला आणायला सैतान आला, परंतु आपल्या हुशारीने त्याने सैतानाला चकवून आपले आयुष्य वाढवून घेतले. असे दोन-तीन वेळा झाल्याने सैतान त्याच्यावर रुष्ट झाला व तुला आणायला परत येणार नाही असे वैतागून सांगून निघून गेला.

तरीही एके दिवशी अचानक नकळतच जॅकला मृत्यू आला व आपण स्वर्गाच्या मोतिया रंगाच्या फाटकापाशी उभे आहोत हे त्याला जाणवले. स्वर्गाच्या दारात उभ्या असणाऱ्या सेंट पीटरने जॅकला सांगितले, 'तू आयुष्यात एकही चांगले काम केले नाहीस. तुला स्वर्गात प्रवेश मिळू शकत नाही. तेंव्हा तुला बहुधा नरकात जावे लागेल.'

जॅक यानंतर सैतानासमोर गेला. सैतानाच्या मनात जॅकला अद्दल घडवायची असल्याने त्याने जॅकला सांगितले, 'तुला नरकातही प्रवेश मिळू शकत नाही कारण आयुष्यभरात तू कोणाचेही वाईट केलेले नाहीस.'

यावर हिरमुसला होऊन जॅकने विचारले, 'तर मग मी या अंधारात जाऊ तरी कोठे?' यावर सैतानाने जवळ पडलेल्या एका कोरलेल्या पोकळ भोपळ्यात नरकातला पेटता कोळसा घातला व सांगितले, 'जेथून आलास तेथेच परत जा आणि कायमचा अंधारात हा कंदील घेऊन भटकत राहा.'

कधी कधी हॅलोवीनच्या रात्री दूरवर अंधारात अजूनही जॅक दिवा घेऊन भटकताना दिसतो म्हणतात.

(क्रमशः)

पुढील भागातः

  • अमेरिकेतील हॅलोवीन, आणि
  • फ्रायडे द १३थ च्या निमित्ताने एक लहानशी भयकथा.

सर्व चित्रे विकिपीडियाच्या सौजन्याने चिकटवली आहेत.

Post to Feedछान
ओघवती भाषा
छान
सुंदर!
छान
भयोत्सव
जनरेशन गॅप
छान
पुढच्या..
नवीन माहिती
असे लेख आनंद देतात
सुरेख
सुरेख माहिती
छान
खुपच रंगतदार माहिती
ट्रिक ऑर ट्रीट
छान माहितीपूर्ण लेख!
एक शंका ...
आभार/ उत्तरे/ निवेदन
उत्तम आणि माहीतीपूर्ण
धन्यवाद
मस्त
धन्यवाद
धन्यवाद
आटोपशीर...

Typing help hide