ग्वाल्हेर, सागर, इंदूरच्या मराठी भाषेचे नमुने

[´भाषा आणि जीवन´ ह्या नियतकालिकाच्या १: हिवाळा १९९०  या अंकात प्रकाशित झालेल्या  'मध्यप्रदेशातील मराठी भाषा' ह्या गीता सप्रे ह्यांच्या लेखातला ग्वाल्हेर आणि सागरच्या मराठी भाषेचे नमुने उलगडवून दाखवणारा हा भाग सादर आहे़]

अन् वक्ता जर वीस-बावीस वर्षांचा सुनील असेल, तर विचारायलाच नको. तो तर, " आपण मला बोलायचा मौका दिला त्याबद्दल मी आपला कृतग्य (कृतज्ञ) आहे", असं म्हणेल.
तर हे झाले जबलपुरी मराठी भाषेचे नमुने

पासून पुढे--

ग्वाल्हेरची  परिस्थिती तर याहूनही वाईट आहे. ग्वाल्हेरला एखाद्या मराठी माणसाला तुम्ही एखादा पत्ता विचारा, तो तुम्हांला सांगेल,
    "अशेच सीधे जा अन् मग नुकडवर डाव्या गल्लीत मुरकून जा."
    ग्वाल्हेरला 'भैय्या' हा शब्द बोलताना खूप वापरतात. 'आम्ही तर भैय्या, असं केलं ' अन्  'आमचं तर भैय्या तसं आहे' असा सतत "भैय्या" सोबतीला असतोच.
    अगदी परवाचीच गोष्ट आहे.  आमच्याकडे ग्वाल्हेरचे एक सद्गृहस्थ आले होते.  आजकाल ते दिल्लीला 'सॅटल' झालेत. ते बोलता बोलता म्हणाले,
    "अरे! दुनियाभरात ग्वाल्हेरी माणूस कुठेई असो, तुम्ही त्याला 'शकल'नी ओळखू शकता."
ग्वाल्हेरच्या मराठी भाषेवर हिंदी व उर्दू भाषेचा खूपच प्रभाव आहे. 'हजूर', 'जनाब', 'बजा फर्माया', 'बढिया' असे शब्द तोंडात अगदी सहज रुळलेले आहेत.
    ग्वाल्हेरच्या एका जुन्या सरदार घराण्यातले लोक तर मराठी म्हणून जी काय भव्यदिव्य भाषा बोलतात, तिचा एक नमुना 'पेश-ए-खिदमद' आहे:
    "मांसाबांचा हुकूम होता, रातच्या टेम होता. आमि च्याललो होतो. आसमानमधी तारे अश्ये च्यमच्यम च्यमकत होते - जशे बिजलीचे लट्टूच. अंधेरा असा छायला होता, की आमाला काय बी दिसत नव्हतं. एका पत्थराला टकरावून आमि अशे गडगडलो, की बडी बुरी ठेंच लागली. बहुत खून निघालं. मग आमि पट्टीबिट्टी बांधली जखमेवर अन् धीरे धीरे घरी वापस आलो. आमाला हून गेली देरी. तं मांसाबांनी फिकर करण्याऐवजी खूप डांट पिलवली. आमची तर जबानच बंद हून गेली."


    आता थोडा सागरचा फेरफटका मारू या.
    सागरला मी नणंदेकडे गेले होते. एका मैत्रिणीकडे भेटायला जायचं होतं. पण मला तिचं घर माहीत नव्हतं. म्हणून माझा भाचा प्रदीप वय वर्षे दहा सोबत आला. वाटेत मी त्याला विचारलं,
    "प्रदीप! तुला शकूमावशीचं घर माहीत आहे नं?"
    सागरचे लोक एक विशिष्ट प्रकारचा हेल काढून बोलतात. त्या विशिष्ट सगरियाऊ टोनमधे तो मला म्हणाला,
    "ए माऽऽमी! तू फिकऽर नको करू. मी तुला सागरची कुलियन कुलियन (गल्ली न् गल्ली) घुमऊन देईल."
    शकू घरी नव्हती. 'आई कुठं गेलीय'  म्हणून मी तिच्या मुलाला विचारलं, तर त्यानं सांगितलं,
"आई जरा भटकायला गेलीये. येण्यातच असेल."
    नणंदे शेजारच्या आजी नातवांचं कौतुक सांगत होत्या:
    "अस्सा जिद्दीये. आमि अम्मळ टेकलो नई, कि आमाला परेशान करायला येऊन जातो. बरं, एक काम करा आमचं. अटरियावर एक पुटरिया ठेवलीये नं, ती काढून द्या."
    —अन् मग अटरियावरल्या त्या पुटरियातून एक छानसा जरीचा खण काढून त्यांनी मला दिला.
    संध्याकाळी सागरच्या सुप्रसिद्ध तलावावर बोटिंग करायला निघाले, तर घरातल्या काकांनी सांगितलं,
    "उगीच ज्यास्त देरी नका करू. टाईमवर घरी वापस या हं."
    दुसरे एक भैय्यामामा आपल्या धाकट्या मुलाबद्दल चिडून सांगत होते:
    "संदीपके बारेमें तो बोलनाही बेकार है. पढ़ाई-बिढ़ाईं मधे त्याचं ध्यान थोडीच आहे? नुसतं गावभर भटकायला सांगून द्या."
    एकदा मी श्री. प्रभाकर माचवे1 यांच्याकडे गेले होते. तेव्हा गप्पांच्या ओघात त्यांनी ही सगरिआऊ गंमत सांगितली --
    श्री. माचवे सागरला एका लग्नसमारंभाला गेले होते. घरातले आजोबा उकिडवे बसून पानावर चुना लावता लावता नातवाला म्हणाले,
    "आजीला जाऊन सांग, कि दुनिया भरभरून द्या, म्हणावं."
    विश्व भरभरून काय दिलं जाऊ शकतं, याचं आश्चर्य श्री. माचवे यांना वाटत होतं. ते काहीशा बुचकळ्यात पडले होते. पण तेवढ्यात मुरमुऱ्यांचा चिवडा भरभरून द्रोण ठेवलेलं ताट समोर आलं अन् दुनिया म्हणजे द्रोण, हा उलगडा झाला.


    इंदोरचा माणूस इंदोरला दुसरं पुणं समजतो व आपण शुद्ध मराठी भाषा बोलतो, असा त्यांना उगीचच गैरसमज आहे. इदोरची मराठी भाषा मध्यप्रदेशातल्या इतर शहरांच्या मानाने कमी बिघडलेली आहे हे कबूल; निदान आठ-दहा वर्षांपूर्वी तरी तसं जाणवायचं. पण तेव्हा देखील तिथे "दौडत-दौडत जा, नाहीतर तो निघून जाईल," "तिनी जूडा किती छान घातलाय्," "तो चाहील, तर ऍडमिशन मिळू शकेल" —अशी भाषा सात-आठ वर्षांपूर्वी पण ऐकायला मिळायची. इंदोरच्या मराठी भाषेवर माळवी भाषेचा, विशेषतः टोन, खूप प्रभाव आहे व मराठी लोक बोलताना माळवी पद्धतीनं 'नि' 'नि' असं मधे मधे वापरतात,
    आता तर काय, इंदोरची मराठी भाषा पण खूप बिघडली आहे. "तो एम्. वाय्. हॉस्पिटलमध्ये बीमार पडलाय्, म्हणून त्याची तबियत बघायला चाललोय्" असं इतकं अशुद्ध वाक्य आजकाल तिथं सहज ऐकू येतं व नवीन पिढी तर जबाब नहीं! 'मला सोनालीला मिळायची (भेटायची.) खूप इच्छा आहे.' हिंदी वाक्य 'सोनालीसे मिलनेकी इच्छा है' चं मराठीकरण. 'पेन्सिल छिलून दे,' 'तू मला पकड. नाहीतर मी गिरून जाईन' -- हे असलं भयंकर मराठी आता लहान मुलांच्या तोंडून पण ऐकायला मिळतं.
    ग्वाल्हेरला भाज्यांकरता -- लौकी (दुधी भोपळा), करमकल्ला (कोबी), सूआ (शेपूची भाजी), वगैरे तर इंदोरला -- आल (दुधी), कोला (लाल भोपळा), बटला (मटार), बरबटी (चवळीच्या शेंगा), छोड (हिरवे चणे) -- असे शब्द सर्रास उपयोगात आणतात.

-गीता सप्रे


1. ख्यातनाम हिंदी साहित्यिक