एप्रिल १२ २००७

अंधश्रद्ध - भाग १

ह्यासोबत

लेखन प्रकार: गूढकथा

रात्रीचे साडेदहा वाजून गेले होते. बाहेरची रहदारी मंदावली होती. वसुंधराताईंनी हातातील कादंबरी मिटली आणि व्हरांड्याकडे नजर टाकली. संध्याकाळपासून धो धो पाऊस कोसळत होता. आताही पावसाची मोठी सर आली होती. व्हरांड्यातील दिव्याच्या मंद प्रकाशात संगमरवरी जमिनीवर पडणारे पावसाचे टपोरे थेंब आजूबाजूच्या निरव शांततेचा भंग करत होते. वसुंधराताईंनी एक सुस्कारा सोडला. त्या आरामखुर्चीतून उठायला जाणार एवढ्यात कोणीतरी दारावरची बेल वाजवली. "कोण असेल बरं पावसाचं इतक्या रात्री?" असा विचार करत त्या दरवाज्यापाशी आल्या. पुन्हा बेल वाजली. वसुंधराताईंनी पीप-होलला डोळा लावून बाहेर पाहिले. दाराबाहेर रीमा ओलीचिंब होऊन थरथरत उभी होती. तिला दारापलीकडे वसुंधराताईंची चाहूल लागली तशी ती ओरडून म्हणाली,"आई! दरवाजा उघड लवकर. प्लीज, लवकर कर." तिच्या आवाजात अजिजी होती. वसुंधराताईंचा हात कडीवर गेला आणि तेथेच थबकला. क्षणभराने निर्विकारपणे त्या माघारी फिरल्या. बाहेरून रीमा बेल वाजवत होती. दरवाजाही ठोठावत होती. "आई! उघड ना गं दार, असं काय करत्येस? आई मी रीमा, आई गं! ए आई उघड ना गं दरवाजा!" रीमा काकुळतीने आईला सांगत होती. वसुंधराताईंनी शांतपणे दिवा मालवला, जसे काहीच घडले नव्हते आणि त्या झोपायच्या खोलीत जायला वळल्या.

घड्याळात रात्रीचे दोन वाजले होते. वसुंधराताई खाडकन गादीवर उठून बसल्या. हवेत गारवा होता तरी त्यांना दरदरून घाम फुटला होता. गेल्या सलग तीन रात्री त्यांना हे एकच स्वप्न पडत होते. रीमा, त्यांची एकुलती एक मुलगी मुंबईला राहत होती. शिकत असताना होस्टेलवर राहायची आणि आता नोकरी लागल्यावर तिला मुंबईच्या उपनगरात ऑफिसकडून फ्लॅट मिळाला होता. नानासाहेबांनी रिटायर झाल्यावर खोपोलीला हा बंगला बांधला होता. नानासाहेब आणि वसुंधराताई खोपोलीला आरामशीर निवृत्त आयुष्य जगत होते. ऑफिसने तिला कारही दिली होती. रीमा महिन्यातून एकदा शनिवार रविवारी आई-बाबांना भेटायला खोपोलीला एक चक्कर टाकायचीच. तशी वसुंधराताईंची इच्छा असायची की प्रत्येक शनिवार रविवार तिने आपल्यासोबत घरी घालवावा परंतु रीमाच्या नोकरीमुळे, कामातील व्यग्रतेमुळे ते शक्य होत नव्हते.

रीमाने ग्रॅज्युएशननंतर जर्नालिझमचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. गेले वर्षभर मुंबईतील एका अग्रगण्य टीव्ही चॅनेलच्या दैनंदिन बातम्यांच्या कार्यक्रमासाठी ती काही ठळक बातम्या गोळा करत होती. काही महिन्यांपूर्वी तिच्या बॉसने बढती आणि सोबत एक आगळीवेगळी जबाबदारी तिच्या गळ्यात टाकली होती. त्यानुसार काही 'हटके' बातम्या तिला गोळा करायच्या होत्या. त्यांच्या टीव्ही चॅनेलला अंधश्रद्धा, बुवाबाजी, करणी, मंत्र-तंत्र, भुताटकी अशा थोड्याशा वेगळ्या विषयांवर एक टाइम-स्लॉट टाकायचा होता. रीमाच्या बेधडक स्वभावाची पुरेपुर कल्पना असलेल्या तिच्या बॉसला रीमाशिवाय दुसरा कोणताही वार्ताहर या कामगिरीसाठी सुचणे केवळ अशक्य होते. रीमानेही आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. महिन्याभरात तिने आणि तिच्या चमूने मुंबईतील एक बंगाली बाबा आणि त्यानंतर भानामतीच्या एका प्रकरणाचा छडा लावला होता. अगदी हिरिरीने त्यांनी या प्रकरणांचा पाठपुरावा केला होता. स्वत: रीमाचा या बुवाबाजी, भुतेखेते, देवदेवस्कीसारख्या गोष्टींवर काडीमात्र विश्वास नव्हता. परंतु त्या बंगालीबाबाचे बिंग फुटल्यावर त्याने रीमाला बरेच शिव्याशाप दिले होते आणि याचे चित्रण वसुंधराताईंनी पाहिल्यापासून त्या हवालदिल झाल्या होत्या.

रीमाला फोन करून त्यांनी परोपरीने हे काम न करण्याबाबत सुचवले होते. परंतु ऐकेल तर ती रीमा कसली? तिने निक्षून आईला सांगितले होते की हे काम तिला मनापासून आवडते आणि ती ते करत राहणार. बहुधा त्याचा परिपाक वसुंधराताईंना या स्वप्नांत दिसत होता. सकाळ झाल्यावर आधी रीमाला फोन लावायचा असे ठरवून त्या पुन्हा गादीवर पडल्या.

----


सकाळी आठ वाजता त्यांनी रीमाच्या मोबाईलफोनचा क्रमांक फिरवला. "ए आई! काय गं इतक्या सकाळी फोन करत्येस? जाम घाईत आहे मी. उशीरच झाला होता निघायला," पलीकडून रीमाचा आवाज आला. "काही नाही गं! सहजच फोन केला." वसुंधराताई उद्गारल्या. "हम्म! म्हणजे नक्की काहीतरी खास कारण असणार," आपल्या आईची सवय जाणून रीमा हसत म्हणाली. आईच्या या सहज फोन करण्याची आता तिला सवय झाली होती. कधीतरी चांगले स्थळ आले म्हणून, कधीतरी मुंबईला गडबड उडाली म्हणून तर गेल्या महिन्यापासून स्वीकारलेल्या या नव्या जबाबदारीची काळजी वाटते म्हणून वसुंधराताई बरेचदा वेळीअवेळी 'सहजच' फोन करायच्या.

"हे कारमध्ये मोबाईलवर बोलणे जमत नाही अद्याप मला, लक्ष ड्रायव्हिंगवर राहत नाही पण सांग का फोन केलास ते?" रीमाने आईला सांगितले.
"मला ना गेले काही दिवस एकच स्वप्न पडतंय रीमा आणि त्याने मला अस्वस्थ करून टाकलंय."
"कुठलं स्वप्न?" रीमाने कुतूहलाने विचारले.वसुंधराताईंनी स्वप्नाची इत्थंभूत माहिती रीमाला दिली. रीमाने शांतपणे ती ऐकून घेतली. आपली आई देवाधर्मावर विश्वास ठेवणारी असली तरी अशा फुटकळ स्वप्नांवर विश्वास ठेवणारी नाही हे ती जाणून होती. बहुतेक लागोपाठ पडलेल्या एकाच स्वप्नाने आईला बेचैन केले असेल हे तिला जाणवले.
"हे बघ आई! मन बेचैन असलं ना की अशी स्वप्न पडतात बरेचदा. स्वप्न आणि सत्य यांच्यामध्ये बरेच दरवाजे असतात. मानवी मनाला सत्यापासून स्वप्नापर्यंतच्या वाटेवर लागणार्‍या या दरवाजांना अजून उघडणे जमलेले नाही. या बंद दरवाज्यांमागे काय आहे हे न जाणताच उगीच एखाद्या घटनेला अद्भुताचे विशेषण लावणे बरोबर नाही. अंधश्रद्धा या अशाच जन्माला येतात." समजावणीच्या सुरात रीमाने म्हटले.
"पुन्हा बंद दरवाजाचा विषय नको बाई," आपल्या स्वप्नाची आठवण येऊन वसुंधराताई म्हणाल्या,"पण मला सांग हे स्वप्न, सत्याचे दरवाजे वगैरे नवीनच कुठेतरी वाचलेलं दिसतंय."
"हो, हो नवीनच. हल्ली मानसशास्त्रावरील बर्‍याच पुस्तकांचा फडशा पाडत असते त्यातच कोठेतरी मिळालं," रीमा उत्साहाने फसफसून बोलत होती.
"हम्म! रीमा या मानसशास्त्राचं आणि मानसशास्त्रज्ञांचंही काही खरं नसतं बघ. ते सर्व जगाला आपले क्लायंट्स मानतात की काय कोण जाणे," लेक सुखरूप आहे याची खात्री पटल्यावर वसुंधराताई जरा मोकळेपणाने म्हणाल्या.
"अगं आई यापुढे आम्हाला जादूटोणे, मंत्र-तंत्र, काळी जादू, अघोर विधी असे काहीसे करणार्‍या काही व्यक्तींवर एक कार्यक्रम करायचा आहे" रीमा पुन्हा उत्साहाने सांगू लागली. क्षणभरापूर्वी अनुभवलेला मोकळेपणा वसुंधराताईंना पुन्हा दगा देऊन गेला.
"रीमा, कशाला या गोष्टींच्या मागे लागतेस? तू तुझ्या बॉसना सांगून बदली करून घेऊ शकत नाहीस का? हे असलं काहीतरी नसतं लचांड मागे का लावून घेतेस बाई? तो बंगाली बाबा कसं काहीबाही बोलत सुटला होता माहित्ये ना, उगीच कोणाचे शाप नको लागायला मागे. सोड हे सगळं."
रीमाला आईचे बोलणे ऐकून थोडीशी गंमत वाटली पण आईच्या आवाजातली काळजी पाहून तिने हळूच म्हटले,"आई, नको अशी अंधश्रद्धा बाळगू. काहीही होणार नाही. या असल्या भोंदूबाबांचे शाप कुठले आल्येत भोवायला? अशा अंधश्रद्धांच्या भीतीच्या पगड्यातून लोकांची सुटका झालीच पाहिजे. मी, आमचे चॅनेल, माझी टीम जे काम करतो आहोत ना ते समाजाच्या चांगल्यासाठीच आहे. आमचं काहीही वाईट होणार नाही. ऑफिस आलंच माझं, बंद करते आता फोन. तू अजिबात काळजी करू नकोस. निर्धास्त झोपत जा नाहीतर बाबांनाच सांगते तुझ्या स्वप्नांबद्दल."
"नको नको, त्यांना सांगू नकोस. ते उगीच माझी रेवडी उडवतील. चल, काळजी घे आणि येत्या शनिवारी जमल्यास ये गं राहायला, तुला पाहावंस वाटतंय!" असं म्हणून वसुंधराताईंनी फोन बंद केला. लेकीशी बोलल्यावर त्यांना मनापासून बरं वाटलं.


----
(क्रमश:)

Post to Feedह्म्म्म्म
ठीक!
उत्सुकता
कथा
शुक्रवार १३ तारीख.....
योगायोग
एकदमच-
उत्सुकता

Typing help hide