चल सजवाया तिजला

हर हर दिन कसले आले मम भाषेला
कर्तव्य आपुले चल सजवाया तिजला
त्या ज्ञानेशा बाटे की जिंकी पैजा
अमृतास त्या ना  आज चालतिल गमजा
आजला जरी कुणि रंक असो वा राजा
ही उपयोगाची नसते त्याच्या काजा
ती जुनाट झाली रत्नखचित तिचि लेणी
सावरकर वेडे बसले घासत वरुनी
उमजले न त्याना जुनाट हे उतरवुनी
चढवावी तिजवर सुंदर प्लास्टिक लेणी
देशमूख सी. डी. असेच वेडे असती
महाराष्ट्राकरता त्याग पदाचा करती
जरि थोडे वेडे असले होउन गेले
हातून तयांच्या काय चांगले झाले?
नवनवोन्मेषशाली प्रतिभेचे थोर
जे मनोगतावर करती आज विहार
त्या नव्या जगाला वाटे अवघड भारी
छानशा किती भाषासुंदरि शेजारी
ती तुमान सद्रा बेंगरूळ फेकून
ते शर्ट पँट ऐटीत बसा चढवून
कसले ते बाबा आई अन् आजोबा
ते मम्मी डॅडी ग्रँपा आगळी शोभा
सुप्रभात शुभरजनी हे बोजड भारी
गुडमॉर्निंग गुडनाइटची गोडी न्यारी
जे नवे असे ते सर्व चांगले  दिसते
मंदीर पाडुनी गिरिजाघर बांधा ते
मग म्हणा पहा मी काय पराक्रम केला
कर्तव्य करूनी सजवियले मी तिजला