आजी

मोठी आजी

मोठी आजी म्हणजे माझी सख्खी आजी. शिरोड्याला रहाणारी. आम्ही आता २५-२५ वर्षांचे घोडे झालो तरी अजूनही चतुर्थी-दिवाळीला फ़टाक्यांसाठी पैसे पाठवणारी. फ़ोनवर बोलताना रुक्ष "हॆलो" ऐवजी "ए ऊषा" "ए गौतम" अशी अकृत्रिम हाक मारणारी. तिच्या नातवांना चष्मे लागले तरी स्वत: मात्र अजूनही बिनचष्म्याने सुईत दोरा ओवणारी.
माझ्या आईची आई.

मी लहानपणी जास्त वेळ आजोळी राहिल्याने असेल, अथवा आजीच्याच भाषेत सांगायचं तर हा "नक्षत्रांचा गुण" असेल, पण माझं आणि आजीचं प्रथमपासूनच छान जमत गेलंय. आजही हातून काही चांगलं काम घडलं (हा योग क्वचितच येतो!) तर आई-बाबांनंतर माझा फ़ोन जातो तो आजीलाच.

Graduation च्या वेळची गोष्ट... माझ्या अभ्यासाची लक्षणं ठीक दिसत नाहीसे पाहून आईनं आजीला पाचारण केलं आणि मी खरंच वर्षभरात केला नसेल एवढा अभ्यास आजी आल्यानंतरच्या महिन्याभरात केला.

पहाटे चार वाजता आजी आपल्या मऊसूत आवाजात हाका मारू लागायची. आधी मी "ऊठतोच" "फक्त पाच मिनीटं" वगैरे बडबडून पुन्हा झोपायला बघायचो; पण आजीच्या हाका काही थांबायच्या नाहीत आणि ऊठल्याशिवाय गत्यंतरच नसायचं. मी अभ्यासाला बसल्यावर झोपून पडू नये म्हणून आजी १५-२० मिनीटं माझ्यासोबत बसायची, आणि माझी झोप आता पक्की उडालीय याची खात्री पटल्यावरच झोपायला जायची.

नंतरही दिवसभर माझ्या अभ्यासावर तिचं जातीनं लक्ष असायचं. या supervision चं मला दडपण कधीच आलं नाही. उलट फायदाच झाला. एक गंमत सांगतो. माझा एक मित्र जुन्या प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे घेऊन यायचा; तास -अर्धा तास त्यातील प्रश्नांशी झटापट - बहुदा निष्फळ !- केल्यावर आमची गाडी क्रिकेट, सिनेमा, कॊलेजमधील भानगडी यांसारख्या अतिमहत्वाच्या वळायची. आजीनं एक-दोनदा हे पाहिलं, पण काही बोलली नाही. दुसया वेळी तो येऊन टपकताच आजीनं त्याला "गौतम घरान ना" असं सांगून बाहेरच्या बाहेरंच पिटाळून लावलं. मी आत आहे हे त्याला माहीत होतं, बाहेर तो आला आहे हे मला कळलं होतं, पण आम्ही दोघं काय ते समजून चुकलो. परीक्षा होईपर्यंत पुन्हा काही तो मित्र परत आला नाही.

दिवसभराच्या कडक शिस्तीची भरपाई आजी रात्री करायची ती झोपण्यापुर्वी डोक्याला खोबरेल तेल थोपटून. काही क्षणांतच सारा शीण दूर जायचा. डोकं हलकं व्हायचं. मुलावरील आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी आईही अधून-मधून प्रयत्न करायची, पण आजीचा हात लागताच जी एक विलक्षण गुंगी यायची तो अनुभव आईच्या हातून कधी आला नाही.

आमच्या पिढीशी आजीचं अगदी उत्तम जमतं याचं प्रमुख कारण म्हणजे तिचा बहुश्रूतपणा. "जुनं ते सोनं आणि नवीन म्हणजे खोटं नाणं" असा तिचा कधी अट्टाहास नसतो. ती "रामायण" "महाभारत" पहाते, आणि "दामिनी" " "अवंतिका" ही पहाते. बातम्या ऐकते. रोजचा पेपर वाचते. गावातल्या, गोव्यातल्या एवढंच काय पण देशातल्या आणि जगातल्या ठळक घडामोडींची तिला कल्पना असते. राजकारणात तर तिची स्वत:ची अशी ठाम मतं आहेत आणि ती ठासून मांडायला  ती अजिबात कचरत नाही. तिचं "पक्षांतर" घडवून आणण्याच्या बाबतीत माझ्यासकट सर्वांनीच हात टेकलेत. आजचे दल-बदलू राजकारणी आजीचा हा एक जरी गुण ऊचलतील तर किती चांगले होईल!

जुनी माणसं सनातनी, कर्मठ असतात असा एक सर्वसाधारण अनुभव असतो. आमची आजी मात्र देवाधर्माच्या बाबतीत अतिशय पुरोगमी आहे. प्रत्येकानं काही प्रमाणात तरी पूजा-अर्चा करावी, सोवळं-ओवळं पाळावं असा तिचा कटाक्ष नक्कीच असतो. पण कर्मकांडाचा अतिरेक ती स्वत:ही कधी करत नाही, आणि दुसयांवर तर सक्ती मुळीच नाही.

म्हातारी माणसं भोळी-भाबडी असतात हा आणखी एक समज. आजी मात्र चांगलीच धूर्त आणि व्यवहारचतुर आहे; दुसयाला अडचणीत न आणता, न दुखवता आपली काम कशी करावी हे तिच्याकडूनच शिकावं.

सर्वांवर तिची माया आहे पण हे करताना तिनं वास्तवाचं भान कधी सुटू दिलेलं नाही. ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत असं तिला वाटतं त्या केल्याशिवाय ती रहात नाही आणि ज्या गोष्टी पटत नाहीत त्या बोलून दाखवायला ती डरत नाही. आजच्या "ओठात एक आणि मनात दुसरंच" अशा जमान्यात आजीच्या स्वभावातला हा पारदर्शीपणा अधिकच भावतो.

माझं शिक्षणासाठी पुण्याला जायचं ठरलं तेव्हा ही बातमी कानावर घालण्यासाठी शिरोड्याला गेलो. मामा-मामी, मावशी यांनी "सांभाळून रहा" "नीट अभ्यास कर" वगैरे सांगितलं. आजीचा ऊपदेश मात्र सर्वस्वी वेगळा आणि माझे पाय जमिनीवर आणणारा होता. ती म्हणाली, " आई-बाबांनी तुझ्या शिक्षणासाठी जो खर्च केला तो ध्यानात ठेव. नोकरी धंदा लागल्यावर आधी तो हिशोब चुकता कर आणि नंतरच काय ती मौज-मजा."

अशी आहे आमची आजी. तिच्यासारखी आजी आम्हाला लाभली आहे हे आम्हा भावंडांचं भाग्य यात वादच नाही. पण आमच्यासारख्या एकापेक्षा एक ऊपद्व्यापी नातवांबद्दल तिचं काय मत आहे हे मात्र आम्ही तिला अजून विचारलेलं नाही.

-गौतम
२५/०८/२००४