एक थरारक अनुभव...(रहस्यभेद)

काहितरी अनाकलनीय असं घडलं, नक्की!

वरच्या खोलीतल्या खिडकीतून, गाडीजवळच्या त्या तरुणांच्या घोळक्यात पोप्याला पाहुन चाट पडलेला मी (बोक्या) त्याला हाक मारु लागलो. "अरे, हा काय प्रकार आहे? पोप्या..ऽ" मी जोरात हाक दिली.तसा कुणीतरी हात माझ्या तोंडावर दाबला.
                                                      --- * ---

जवळच्या बाटलीला धक्का लागुन सोडा माझ्या तोंडावर सांडला आणि मी शुद्धीवर आलो. पाऊस पडला असं वाटून घामाघुम अवस्थेत मी गच्चीवर असल्याचं माझ्या लक्षात आलंही नसेल कदाचित इतक्यात खिडकीतून दिसलेलं ते दृष्य आठवून मी ओरडलो -"म्म.म्म..ऽइ..पोप्या.ऽ". माझ्या आवाजाने पराग (जो माझ्या शेजारी पडला असावा,) जागा झाला. पण त्याला काय घडलं ते काहीच आठवत नसावं. तो माझ्या तोंडावर उपडी झालेली सोड्याची बाटली सरळ करत अंगावर खेकसला, " कशाला बोंबलायला लागलायस?"

वरच्या खिडकीतून पोप्याला त्या टोळक्याबरोबर पाहिल्यानंतर पुढे काय काय घडलं, हे मलाही आठवत नव्हतं. अजुनही पुर्णपणे भानावर न आलेल्या मला शेजारी पराग पाहुन गोंधळायला झालं. पराग वर दार उघडायच्या प्रयत्नात तोंडावर पडला होता, ते मला आठवलं आणि मी सैरभैर होऊन त्याला विचारलं, ""मी ही तुझ्याबरोबर दारातून पडलो?"

"कसलं दार? काय बडबडतोयस?" पराग पुन्हा खेकसला. मला आता खरंच काही कळेनासं झालं. "म्हणजे वर जे काही घडलं तर ते स्वप्न होतं की सत्य होतं जे आता परागला तसुभर ही आठवत नाहीये?" माझं डोकं भणभणू लागलं. माझ्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहुन परागनं मला त्याच्या हातातलं घड्याळ दाखवलं. "पाच?" मी दचकुन उभा राहिलो.  तसा दिप्याही उठून बसला, "अरे? बाकीचे कुठायंत?"

मी दिप्या आणि परग्या सोडले तर त्या गच्चीत आणखी कुणीच नव्हतं. "स्वप्न्या..ऽ.‌. शिऱ्या.ऽ..पोप्या.ऽ.ऽ" आम्ही हाका मारायला सुरुवात केली.  एक वाऱ्याच्या झुळुक चाटुन गेली. आणि वरच्या खोलीची ती खिडकी सताड उघडली. त्या खिडकीकडं लक्ष जाताच मी ते स्वप्न किंवा खरंच वर घडलेली घटना आठवून वरच्या खोलीकडं जाणाऱ्या जिन्याकडं पाहिलं. "शिऱ्या..!..ऽ.ऽ"

शिऱ्या त्या वरच्या खोलीकडं जाणाऱ्या जिन्यालगत पहुडला होता. आम्ही त्याला उठवुन पोप्या आणि स्वप्न्या गच्चीत नसल्याचं सांगितलं. तसा तो अडखळत उभा राहिला. "वर बघुया", वरच्या उघड्या खोलीकडं बघत शिऱ्या पुटपुटला. बॅटरी हातात घेऊन आम्ही वरच्या खोलीकडं पोचलो.

"उम्म..म.उ..ह"..मला कोणीतरी विव्हळतंय, असा भास झाला. आम्ही वरच्या खोलीत पोचलो. पोप्या त्या खोलीतल्या एका जुनाट पेटीवर पहुडला होता. ती जुनी पेटी मी मगाशी काही वेळापूर्वी पाहिली होती - स्वप्नात किंवा खरंच!

शुद्धीवर नसावाच असा धुळीनं माखलेल्या त्याचा चेहरा विद्रुप दिसत होता. उठवल्यावर पोप्या पोप्या नाहीच आहे असा काहीसा भासला. मी त्याच्या तोंडावर बॅटरीचा झोत टाकला. प्रचंड लाल झालेले डोळे आणि लाथा-बुक्क्यांनी बदडुन काढलेल्या एखाद्या चोरासारखी झालेली पोप्याची हालाखीची अवस्था बघवत नव्हती. एका गुढ आश्चर्यातच आम्ही पोप्याला घेऊन खाली आलो. जिन्यावरुन माझी नजर थेट त्या गच्चीत पडलेल्या गाठोड्याकडं गेली. गाठोडं! लाल लाल थेंब असलेलं! "हो, हे तर रात्री आम्ही सगळे पोप्यासाठी वरच्या खोलीकडं चाललो असताना त्या खिडकीतून पडलं होतं", मी नजरेतूनच शिऱ्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला.कदाचित, त्याला तरी आठवत असेल आणि त्यामुळं ते स्वप्न नव्हतं हे सिद्ध होईल, असा मनात विचार आला.

शिऱ्यानं काहीच प्रतिसाद न देता ते गाठोडं उघडलं. गाठोड्यात एखाद्या गडीमाणसाच्या १०-१२ वर्षाच्या पोराचे धुळीनं माखलेले कपडे आणि एक लाकडाचा तुकडा. कदाचित हॉकी स्टिकचा! बस्स एवढंच. ते गाठोडं तिथंच सोडुन आम्ही स्वप्नीलला शोधु लागलो. पण डोक्यात पोप्याचे ते असंबद्ध शब्द घुमु लागले- "अरे, यार..तो मुलगा..यार...आमच्या शेतावरच्या जमिनीवर..." " महिपतीच्या लेका...तुझ्यायला..." "एवढंसं कार्टं... च्यामारी"

 मला आता वर्षा-दीडवर्षापुर्वी घडलेल्या घटनेवरून थोडा थोडा संदर्भ लागायला लागला. पोप्याचे वडील, जमीनदार! अतिशय धार्मिक. पोप्यालाच काय आम्हा सगळ्यांनाच त्यांचा धाक वाटत असे. त्यांची कळंबा रोडला लागुन असलेली कैक एकर जमीन. पोप्या एकुलता एक आणि आईचा अतिशय लाडका. पोप्यानं काही मागितलं आणि त्याला ते मिळालं नाही असं कधीच झालं नाही. पैसेवाला असल्यामुळं कॉलेजात गाड्या आणि गाडयांतून पोरी फ़िरवुन पटवण्याचं कसब पोप्याला अवगत होतं. एकदोन वेळेला पोरीला फ़ार्महाऊसवर नेण्याचा विचारही त्यानं आम्हाला बोलुन दाखवला होता. आम्ही कुणीही त्याला कधीच प्रतिसाद दिला नाही की कधी प्रोत्साहनही दिलं नाही.

पोप्याचं ते अप्रतिम फ़ार्महाऊस. मोठ्या आकाराच्या खिडक्या आणि खिडकीतून दिसणारा सुंदर झरा. तिथलं वातावरण अगदी रोमॅण्टिक म्हणायला हरकत नाही, असं.

त्या फ़ार्महाऊसवर मागच्या बाजुला राहणारा रखवालदार, महिपती. अगदी वडलांशी प्रामाणिक आणि त्याचा पाचवी-सहावीत शिकणारा मुलगा. दोघेच त्या फ़ार्महाऊसची निगा राखत. पोप्या कळंबा रोडवर मुलीसोबत जीपमधून फ़िरताना दिसल्याचं एकदा महिपतीनं मालकाच्या कानावर घातलं होतं. त्यादिवशी खावी लागलेली बोलणी आणि त्यामुळं झालेल्या अपमानाला पोप्यानं आम्हा मित्रांसोबत मदिरापान करताना वाट मोकळी करुन दिली होती. तेव्हापासून, दर बुधवारी महिपती राशिवड्याला गावी त्याच्या म्हातारीसाठी जातो, हे पोप्यानं हेरून ठेवलं होतं.

"आज रश्मी आहे, बरोबर. पुरा दिन आपन ऐश करेगा फ़ार्महाऊसपर, स्साला आज बुधवार है" पोप्याचा चेकाळलेला आवाज ऐकुन मी फ़ोन खाली ठेवला, "कठीण आहे, पोप्याचंही आणि त्याच्याबरोबर बिनधास्त फ़िरणाऱ्या त्या पोरींचही!"

बुधवारी रात्रीच पोप्याच्या आईनं आम्हा सगळ्या मित्रांना जेवायला बोलावलं होतं. शिऱ्याची वाट बघत आणि पोप्याच्या वडलांचं लेक्चर ऐकत आम्ही दिवाण्खान्यात बसलो होतो.
"शिरपा फ़ार्महाउसवर दिसत नाही, मालक. कुठंबी सापडंना प्वार, अख्खं शेत पालथं घातलं" घाबराघुबऱ्या महिपतीनं पोप्याच्या वडलांच्या पायावर लोटांगण घातलं. पोप्या माझ्या नजरेला नजर देऊ शकला नाही.
"तू कुठं मेला होतास?" पोप्याचे वडील महिपतीवरच कडाडले.
"म्या, म्या गावी गेलंतो," महिपती रडायला लागला.
"गावी?, अरं हा! आज बुधवार नव्हं का?"

                                                    --- * ---

"अरे! आजची रात्रही बुधवारचीच होती की", मी भानावर आलो. कपाळावरचा घाम पुसला.

"स्वप्नील...ए स्वप्न्या.ऽ..." आम्ही स्वप्नीलला गच्चीच्या चारी बाजुंना हुडकु लागलो.

"अऽ..ए..ब..बोक्या..."

"अरे, हा तर स्वप्नीलचा आवाज!" शिऱ्या वाड्याच्या आतल्या बाजुला बॅटरीचा झोत टाकत म्हणाला. सगळे जण आत मध्ये धावलो. शिऱ्या जरा सावकाश आला..त्याचं लंगडणं पाहुन माझं लक्ष त्याच्या गुडघ्याकडं गेलं. त्याच्या गुडघ्याला माझा मफ़लर बांधला होता. हा मफ़लर तर मीच बांधला होता शिऱ्याला काही तासांपुर्वी. म्हणजे? म्हणजे ते स्वप्न नव्हतं. खरोखरंच घडलं होतं. मग, पराग, दिप्या, शिऱ्या कुणालाच कसं काही आठवत नव्हतं?

बॅटरीच्या प्रकाशात एका पिंपाला टेकुन झोपलेला स्वप्नील अजुनही झोपेतच होता. पोप्यानं त्याच्या चेहऱ्यावर सोडा फ़वारला. तसा तो जरा फ़्रेश झाल्यासारखा वाटला.

स्वप्नीलला घेऊन आम्ही सगळे तो जिना उतरु लागलो. जिन्याच्या एका मोडक्या पायरीवर बॅटरी माझ्या हातातून सटकली. आणि..आणि तोच तो मला परिचित आणि इतरांना कदाचित अपरिचित असा विव्हळणारा आवाज आला - " उम्म.्हह..उह..आई गं.ऽ" हयावेळी तो आवाज अगदी मोठा, कदाचित त्या मागच्या विहीरीवरुन आला असावा", असं वाटलं. "पोप्या भाग..ऽ" शिऱ्या ओरडला. तसा पोप्या सगळी ताकद एकटवून पळाला. 'पण धाडसी शिऱ्या असं एकदम 'पळुन जा, असं पोप्याला का सांगत होता?', 'की, शिऱ्याही पोप्याला त्याच्या वर्ष-दीडवर्षापुर्वीच्या कृष्णकृत्यात सामील होता?',डोक्यात विचार येऊन गेला. पोप्यामागोमाग स्वप्न्या..मी, दिप्या, परग्या आणि शिऱ्या. त्या वारुळावरुन उडी मारुन कधी गाडीपाशी पोचलो....ते मागं वळुन बघितल्यावर कळलं.

"खटर..र्ऱ..खट..र्र.." गाडी चालु झाली. शिऱ्यानं जोरात रिव्हर्स घेतला..यु टर्न घेऊन गाडी वळवली आणि माझ्या काचेसमोर तो वाडा आला. पहाटेच्या प्रकाशात वाड्याच्या वरच्या खोलीची खिडकी स्पष्ट दिसली. खिडकीतून १०-१२ वर्षांचा एक मुलगा मळक्या फ़ाटक्या कपड्यात आमच्याकडं बघुन डोळे चोळु लागला...आणि तोच तो परिचित विव्हळण्याचा आर्त आवाज ऐकु आला - "उम्म.्हह..उह..आई गं.ऽ वाचवा.ऽ.ऽ"

                                                    --- * * *---