ह्यासोबत
माझे हे नाना आजोबा कोल्हापुरातल्या एका पतसंस्थेमध्ये अकौंटट(मराठीत बहुधा हिशेबनीस) होते. उंच,सडपातळ बांधा̱ आणि गोरा रंग,मोठ्या मिशा , गळ्यात एक गांधी पिशवी यामुळे एकदम वेगळीच छाप पाडुन जायचे सगळ्यांवर. लोकांना प्रथमदर्शनी फ़ारच कडक वाटत त्यामुळे नवखी मंडळी जरा जपुनच असायची पण खरं तर खुप छान होते स्वभावाने... आम्हा नातवंडाना घेऊन फ़िरायला जात .. गोष्टी सांगत ... त्या अनेक अनुभव कथांच्या मधली ही पण एक त्यांची स्वानुभव कथा ...
तर माझे हे आजोबा फ़ार दत्तभक्त !! दर पौर्णिमेला कोल्हापुरवरून नृसिंहवाडीला जायचे. ( नरसोबाची वाडी - हे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले दत्ताचे जागृत देवस्थान आहे) पौर्णिमेच्या दिवशी ऑफ़िस सुटलं की आधी वाडीच्या दत्ताचं दर्शन घ्यायचं आण मगच पौर्णिमेचा उपवास सोडायचा असा त्यांचा खाक्या होता.
त्यावेळी म्हणजे साधारण ५०-६० वर्षांपूर्वी वाडीला बस जात नसे.त्यामुळे कोल्हापुर ते जयसिंगपुर बसने व पुढे साधारण ३० एक किमी अंतर पायी जावं लागत असे.
असं असुनही नानांचा नेम कधी चुकला नाही.ऊन-वारा-पाऊस कशाही परिस्थितीत पौर्णिमेला नाना वाडीला जायचेच.कधीपासुन ते त्यांनाही नक्की आठवत नव्हतं पण ते त्यांच्या लहानपणापासुनच वडिलां बरोबर जात असत.
तर अशाच एका पौर्णिमेला घडलेली ही घटना....
पावसाळ्याचे दिवस होते. सकाळपासुनच पावसाची संततधार चालु होती. महिन्याची सुरुवात असल्याने ऑफ़िसमध्ये हिशेबाचं काम पण बरंच होतं नानांना . त्यामुळे नेहमी पेक्षा जरा उशीरच झाला होता त्यांना निघायला. शिवाय पावसामुळे अंधारही लवकर पडला.कोल्हापुर सोडलं तेव्हाच ७.३० झाले होते. आता रात्री घरी पोचायला उशीर होणार आणि आजी त्यांची वाट पहात उगीच काळजी करत रहाणार या विचारात ते होते.तेवढ्यात बस धक्का लागल्यासारखी थांबली आणि नानांच नाक समोरच्या सीटच्या दांडिला जोरात आपट्लं. काय झालं पाहीलं तर बससमोर एक झाडाची फांदी पडली होती. इतक्या पावसात ती फ़ांदी बाजुला करून बस जयसिंगपूरात पोचायला ९.१५ झाले. आता यापुढे अजुन १ ते २ तास पावसातून चालायचं होतं.
हातात फ़क्त एक छत्री,पिशवी आणि एक टॉर्च ..... तसाच नानांचा पुढचा प्रवास सुरु झाला !!
(क्रमश:)
आजकाल सोनी टिव्हीवर चालु असणारी "मन में है विश्वास" ही मालिका पाहिली आणि माझ्या अगदी जवळच्या नात्यातल्या आजोबांच्या बरोबर घड्लेली एक घटना आठवली.जवजवळ ५०-६० वर्षापुर्वी घडलेली ही सत्य घटना आहे.ते माझे आजोबा आज आपल्यात नाहीत पण त्यांची आठवण आली आणि मनोगतीयांच्या पुढे ही गोष्ट मांडावीशी वाटली इतकंच !!